Home > मॅक्स ब्लॉग्ज > हिंसेचा अतिरेक ! न्यू सक्सेस फॉर्म्युला !

हिंसेचा अतिरेक ! न्यू सक्सेस फॉर्म्युला !

हिंसेचा अतिरेक ! न्यू सक्सेस फॉर्म्युला !
X

२१ जून २०१९ ला शाहिद कपूर अभिनित चित्रपट 'कबीर सिंग ' ( Kabir Singh ) प्रदर्शित झाला . कियारा अडवाणी या नवतारकेशी त्याची रोमँटिक पेयर त्यात दाखवली होती . सदर चित्रपट रिलीज झाल्यानंतर त्यावर अनेक उलटसुलट प्रतिक्रियांचे मोहोळ उठले . कबीर सिंग अर्थात शाहिद कपूर यात डॉक्टर आणि त्याची ऑन स्क्रीन प्रेयसी प्रीती सिक्का अर्थात कियारा आडवाणी ही देखील त्याच्याप्रमाणे मेडिकल स्टुडन्ट असते . या दोघांमध्ये रोमान्स दाखवताना त्यांचे एक प्रदीर्घ चुंबन दृश्य आहे .. त्यांच्या प्रेमाला नायिकेचे वडील आडकाठी घेतात आणि पुढे 'डॉक्टर ' होणारा नायक कबीर सिंग माथेफिरू होत हिंसेचा आगडोंब उसळवतो ! रक्ताचे पाट वाहतात .. प्रचंड प्रमाणात हिंसेचा अतिरेक दाखवत शेवटी काय तर Everything is fair in Love & War ! ' हे आजच्या प्रेक्षकांना शाहिद कपूर कियारा आडवाणी मार्फत समजते !

नुकताच प्रदर्शित झालेल्या रणबीर कपूर ,रश्मिका मंदाना ,बॉबी देओल , अनिल कपूर सारखी मोठी स्टारकास्ट असलेला 'ऍनिमल ' ( Animal ) बॉक्स ऑफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणे घेतोय ! अनेक प्रेक्षकांनी (नाहक ) हिंसेचा अतिरेक असं म्हणूनही 'एक बार फिल्म देखने में हर्ज ही क्या है '? असं म्हणत कौटुंबिक गर्दी सध्या 'ऍनिमल 'बघण्यासाठी गर्दी करत आहेत !

एका ट्रेड विश्लेषकाने नाव न छापण्याच्या अटीवर आपलं मत मांडलं - त्यांचे मत त्यांच्या शब्दात - सध्या आपल्या समाजाला 'हिंसेची ' भुरळ पडली आहे .. सिनेमाच्या मोठ्या पडद्यावर दाखवण्यात येणारी प्रत्येक हिंसा कधी 'कारणीक ' तर कधी 'सिनेमॅटिक लिबर्टी ' म्हणून सरधोपट मान्य केली जातेय . थिएटर मध्ये तिकिट काढून येणारा प्रेक्षक हा प्रत्येकवेळी युवा -तरुण नसतो .. चाळीशी आणि त्यापुढील अनेक प्रेक्षक , स्त्रिया , मुलं ही देखील असतात .. मनोरंजन म्हणून असे 'व्हायलंट ' चित्रपट आवडीने पाहिले जातात . नायकाने केलेली हिंसा ही समर्थनीय आहे अशी एकूणच धारणा आता बनत चालली आहे . म्हणूनच प्रेमकथा -रोमँटिक स्टोरी असा बॅकड्रॉप असलेले हे चित्रपट तुफान हिट -सुपर हिट ठरलेत .. कबीर सिंग असो किंवा नुकताच रिलीज झालेला 'ऍनिमल ' असो .. कलाकार म्हणतात -दिग्दर्शक आणि लेखक जे कथानक आमच्यापुढे मांडतात ते अपिलिंग वाटलं , चॅलेंजिंग आहे अशी आमची भावना झाली की तो चित्रपट आमच्या मनावर गारूड करतो .. मग त्यात हिंसा असो किंवा अश्लील दृश्यांची भरमार असो ! कलाकारांना या 'सामाजिक उठाठेवीत ' काडीमात्र रस नसतो , संबंध नसतो ! दोन तरुण डॉक्टर्स इतके बेजवाबदारपणे 'कबीर सिंग 'मध्ये वागतात , तरी त्यांची वागणूक समाजाला समर्थनीय वाटते , ऍनिमल 'मधील रणबीर कपूरची हिंसा , अश्लील दृश्य देखील कथेला अनुरूप वाटतात , म्हणूनच तर 'ऍनिमल ' फिल्म आज सुपर हिट ठरला आहे .. हा अलीकडचा नवा ट्रेंड आहे !

यापूर्वी गेल्या १५-२० वर्षांतील अनेक हिंदी चित्रपटांकडे एक दृष्टिक्षेप टाकल्यास ज्यात जितकी जास्त हिंसा असे अनेक चित्रपट प्रेक्षकांनी उचलून धरलेत .. वानगी दाखल काही नावं पाहू - सत्या (१९९८ ) ,वास्तव (९९), कंपनी (वास्तव ) , डी , सरकार (२००५ ) सरकार राज (२००८) , पुढे शूट आउट at लोखंडवाला , आणि वडाला हे सगळे चित्रपट गुन्हेगारी विश्वाला समर्पित होते त्यामुळे त्यात बंदुकीच्या फैरी झडणारच ! अंडरवर्ल्डवर आधारित असलेले सगळेच सिनेमे बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरलेत ..

७० -८० च्या दशकात महानायक अमिताभ बच्चनने दिवार ' सारखे चित्रपट केलेत ज्याने त्याला अँग्री यंग मॅन या इमेजमध्ये कैद केले पण त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी जगत होती हे नक्कीच .. रॅम गोपाल वर्माने तर अंडरवर्ल्ड वर पीएचडी करावी इतके असे चित्रपट काढलेत !

आजही हा ट्रेंड बेफाम घोडदौड करतोय .. अनेक मान्यवर ,लेखक ,समाज प्रबोधन करणारे कंठशोष करत आहेत -समाजातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढतेच आहे .. अबोध असलेली लहान मुलं गुन्हेगारी विश्वात खेचली जात आहेत ..सहज मारधाडीस प्रवूत्त होत आहेत ..समाज अनेक मानसिक समस्यांना तोंड देत आहेत ..पण करमणुकीच्या नावाखाली मात्र असे 'हिंसाप्रधान ' चित्रपट 'गल्लाभरू ' असल्याने लोकप्रिय होत आहेत .. हा सक्सेसचा न्यू हिट एन्ड हॉट फॉर्म्युला ठरला आहे .. जो समाजमान्य ठरला आहे ! हे दुदैव म्हणावं की काळाची (मनोरंजनाची ?) गरज ?

Updated : 9 Dec 2023 3:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top