Home > मॅक्स ब्लॉग्ज > सचिन वाझेच्या निमित्ताने : ऍड . विश्वास काश्यप

सचिन वाझेच्या निमित्ताने : ऍड . विश्वास काश्यप

पोलिस अधिकारी सचिन वाझे आणि मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बनं राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाली असताना माजी पोलिस अधिकारी ऍड . विश्वास काश्यप यांनी आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सचिन वाझेच्या निमित्ताने : ऍड . विश्वास काश्यप
X

सचिन वाझे काय करून ठेवले रे बाबा तू? कुठे नेऊन ठेवलय मुंबई पोलिसांना? करोनाच्या काळात जनमाणसात उंचावलेली मुंबई पोलिसांची प्रतिमा तुझ्या एका बालिश आणि फालतू आत्मविश्वासामुळे अक्षरशः धुळीस घालवून बसलास तू. कसाबसारख्या अतिरेक्याला आमच्या निशस्त्र ओंबळे हवालदाराने जीवाची पर्वा न करता पकडले. कसाबच्या हातातील येके फोटी सेवनच्या सगळ्या गोळ्या त्याने आपल्या पोटात घेऊन तो हुतात्मा झाला, महानायक झाला. तू मात्र पैशाच्या राशी पोटात आणि पोटाच्या वर लावून मात्र बदनाम आणि खलनायक झालास. काय म्हणावं तुला?

तू त्या आयपीएस लोकांच्या नादी लागून स्वतःला आयपीएस समजायला लागलास . अरे ते आयपीएस मंडळी तुझ्यासारख्या लाखो कनिष्ठ अधिकाऱ्यांना कुत्र्यासारखे वागवतात हे तुला कधीच समजले नाही का रे? तुझ्यासारख्या चा वापर ते एखाद्या निरोध सारखा करतात हे तुला का कळले नाही किंवा ते समजून उमजून सुद्धा तुला आयपीएस लोकांचा निरोध होणेच जास्त आवडले का?

पोलीस दलातील काही अधिकारी स्वतःला एन्काऊंटर स्पेशालिस्ट समजतात. अरे बाबांनो तुम्ही कसले इनकाउंटर स्पेशालिस्ट? दाऊद गॅंग, गवळी गॅंग, छोटा राजन गॅंग आणि इतर गँगची भडवेगिरी करत आणि लाखो रुपये कमवत तुम्ही इनकाउंटर गिरी केली हे सूर्यप्रकाशाइतके उघड गुपित आहे. इनकाउंटरगिरी चा हप्ता तुझ्यासारख्या कनिष्ठअधिकाऱ्याकडून वरिष्ठ आयपीएस कडे जातच असतो किंवा हफ्ता उलट दिशेने सुद्धा येत असतो. आयपीएस ते कनिष्ठ अधिकारी.

इनकाउंटर म्हणजे खून तुझ्यासारख्या 63 की काय इनकाउंटर सॉरी खून केलेल्या अधिकार्‍यांच्या डोक्यात हवा तयार होते. तो आपल्या वरिष्ठांना आणि कनिष्ठाना तुच्छ समजायला लागतो. तो एका गुर्मीत राहायला लागतो. पाच पाच मोबाईल फोन वापरणे, उंची खाजगी गाड्या वापरणे, उंची कपडे वापरणे, बुटापासून गॉगल पर्यंत सर्वच ब्रँडेड. सचिन तुला सांगू का, पोलिस अधिकाऱ्याचे सर्वात महत्त्वाचे हत्यार काय असते ते? ते असते त्याचा पेन ज्या सफाईदारपणे जो पोलीस अधिकारी त्याचा पेन वापरून गुन्हेगारावर दहशत बसवतो आणि ज्या कायदेशीरपणाने कागदपत्रे बनवून कोर्टात केस जिंकतो तोच खरा अधिकारीअसतो. तुझ्यासारखे तथाकथित इनकाउंटर स्पेशालिस्ट यांना तर आपल्या पोलिस स्टेशनच्या स्टेशन डायरी मध्ये दोन ओळी सुद्धा लिहिता येत नाहीत. गुन्ह्याची कागदपत्रे बनविणे तर फारच दूरची बाब. तुम्हाला दोन ओळी लिहिता येत नाहीत तरी सुद्धा तुमचा किती माज रे? तो माज तुमच्या त्या आयपीएस अधिकाऱ्यामुळे आलेला असतो.

आता मुकेश अंबानीच्या घरापासून लांब एक किलोमीटर अंतरावर गाडी कशाला ठेवलीस? ( घराच्या बाजूला नाही ) आणि ठेवली ते ठेवलीस त्यात दहा बारा जिलेटिनच्या काड्या ठेऊन असा काय बॉम्बस्फोट होणार होता? सर्वसामान्य लोकांना वाटते की जिलेटिन म्हणजे बॉम्ब. खरं म्हणजे बॉम्ब तयार करण्यामध्ये ज्या दहा बारा वस्तूंचा समावेश होतो त्यात जिलेटीन ही एक वस्तू. जिलेटिन सोबत दहा - बारा वस्तूंचा एकत्र समावेश केल्यावर बॉम्ब तयार होतो. बरोबर न सचिन? मला वाटतं तू बॉम्ब डीस्पोजलचे ट्रेनिंग घेतले असशील? की फक्त तथाकथित इनकाउंटर स्पेशलिस्ट ..

मला माहित आहे तुझ्यासारखे कनिष्ठ अधिकारी वरिष्ठ आयपीएस ला विचारल्याशिवाय घरीसुद्धा जात नाहीत. मग एवढी मोठी गाडी पार्क करताना तू तुझ्या परमवीरसिंग नावाच्या बापाला सॉरी सी पी ला विचारले असेलच ना? आता ते परमवीरसिंग काही बरळायला लागले आहेत. शंभर कोटी नी काय काय...

सचिन तुला सांगू का हे आयपीएस मंडळी कधी काय करतील सांगता येत नाही. मागे नाही का सत्यपालसिंग नावाचा भैय्या मुंबई सी पी सकाळी राजीनामा देऊन दुपारी उत्तरप्रदेशला जाऊन भाजपच्या तिकिटावर निवडणूक फॉर्म भरायला गेला होता. पक्का संघी होता तो. तुझ्या जिलेटिन च्या केसमध्ये तुझ्या परमवीरसिंगला सुद्धा अटक होणार होती. कारण त्यांच्या विरोधात तर भक्कम पुरावा स्पष्टपणे दिसत होता. मग परमवीर सिंगने त्यांचा गुप्त हुकमी पत्ता वापरून केंद्राशी हातमिळवणी केली. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर गंभीर की काय आरोप करण्याच्या बोलीवर त्यांनी त्यांची अटक मटक करून टाकली . त्यांची सून भाजप ह्या राजकीय पक्षातील नेत्यांच्या घरातील आहेत म्हणे. असो .

मीडिया पण इतकी शहाणी की काही विचारू नकोस. सचिन वाझे नंतर सी पी परमवीरसिंगला सुद्धा अटक कधी होणार? ही हेडलाईन न बनविता, परमवीरसिंग यांनी फोडला लेटर बॉम्ब अशाप्रकारची हेडलाईन चालवली गेली. ( काय पांचट हेडलाईन आहे बघ ना ) 99 % मीडिया ही गोदी मीडिया आहे. त्यामुळे त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार? सगळे विकाऊ आहेत. मालकांना पाहिजे तशी बातमी चालवून दिवसभर चघळत बसणे एवढेच त्यांचे काम.

खरं म्हणजे तुझ्यासारखे तथाकथित एन्काऊंटर स्पेशालिस्ट लोकांना हिच चाटु पत्रकार मंडळी त्यांच्या वर्तमानपत्रात, मीडियात हिरो बनवितात. या पत्रकारांसमोर एक हजार, दोन हजार रुपयाचे पाकीट टाकले कि ते तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांच्या बाजूने असेल नसेल ते भरभरून लिहितात. त्यामुळे तुमच्या डोक्‍यात हवा ही मंडळीच घुसवतात. पोलीस ठाण्यात 24 तास काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बाजूने ते कधीच लिहीत नाहीत. एका स्टेशन हाऊसच्या ड्युटीमध्ये चार चार गुन्हे दाखल झाल्यावर त्या गुन्ह्याची कागदपत्रे तयार करताना तो अधिकारी दोन दोन दिवस घरी जात नाही. ह्यात त्या चाटु पत्रकाराला कोणतेही "बातमी मूल्य" कधीच दिसत नाही. परंतु तुमच्यासारख्या तथाकथित स्पेशलिस्टकडून मिळणाऱ्या पाकीटामुळे तुमच्या संबंधित भरभरून तीन-तीन कॉलम बातमी दिली जाते. तुझ्यासारख्या तथाकथित इनकाउंटर स्पेशालिस्टच्या अधोगतीमध्ये ह्या पत्रकारांचा सुद्धा तेवढाच वाटा आहे.

तर मी काय म्हणत होतो त्या परमवीर सिंगबद्दल. हे महाशय ठाण्यात सी पी असताना तुझ्यासारख्या तथाकथित इनकाउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माला पुन्हा नोकरीत घेतले होते. त्या शर्माने सुद्धा तिथे छान छान पैशाच्या केसेस सोडविल्या. त्या दाऊदच्या भावाला शर्मा आणि टीमने अटक केली. त्यावेळी सुद्धा बराच मोठा आर्थिक घोटाळा झाल्याची पोलीस वर्तुळात चर्चा होती . हे परमवीरसिंग म्हणजे आयपीएस च्या नावाखाली चालवीत असलेल्या मोठ्या खंडणीखोर गँगचे प्रमुख असल्यासारखेच वाटतात नाही का? आता बघ ना तुलासुद्धा त्यांनी मुंबई पोलीस खात्यात घेतले आणि जिथे भरपूर पैसा मिळेल अशा युनिटला ठेवले. कळतं रे सगळ्यांना. पण लोकं घाबरून बोलत नाही.

तुला मी काय सांगू मित्रा, 98 टक्के आयपीएस हे भ्रष्ट असतात. एकदा आयपीएस झाल्यावर तो दहा पिढ्यांचे कल्याण होईल इतका गडगंज पैसा कमवतो. 98 टक्के आयएएस आणि आयपीएस लोकांचे तथाकथीत उत्पन्न एकत्र केले तर महाराष्ट्रासारख्या राज्याचा दोन वर्षाचा अर्थसंकल्प तयार होईल. हसू नकोस , खरं सांगतो तुला मित्रा. मुंबईच्या सी पी या पदाबद्दल मीडियाने इतके कोडकौतुक करून ठेवलय ना की काय सांगू? जसे काही दुसऱ्या शहराला सीपी नाहीतच. मुंबई सीपी हे पद आयपीएस लोकांसमोर इतकं छान पैकी मृगजळ तयार करून ठेवले आहे की आयपीएस झाल्यानंतरचे सर्वोच्च टोक म्हणजे मुंबई सीपी. ते प्राप्त करण्यासाठी प्रत्येक आयपीएस सगळे साम दाम दंड भेद वापरून काहीही करून ते मिळविण्याचा प्रयत्न करतो. एकदा का ते पद मिळालं की तो हवेत असतो आणि निवृत्त झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून त्याला कोणी हिंग लावून सुद्धा विचारत नाही. कुठल्यातरी गार्डनमध्ये मॉर्निंग करीत असतो माजी मुंबई सीपी.

सचिन, नवीन भरती होणाऱ्या पीएसआय साठी तुझी कहाणी म्हणजे अधिकाऱ्याने कसे वागू नये याचे उत्तम उदाहरण आहे. कारण सध्याचे नवीन पीएसआय हेसुद्धा पैशाच्या मागे जास्त लागलेले दिसतात. पीएसआय झाल्यानंतर पाच सहा वर्षात एपीआय झाल्यावर तर त्या अधिकाऱ्याला आयपीएस झाल्यासारखेच वाटते. स्वतःला तो जास्तच शहाणा समजायला लागतो. तेव्हा कनिष्ठ अधिकाऱ्यांनो पहिल्यांदा कायदा व्यवस्थित शिकून घ्या. पेन व्यवस्थित चालवायला शिका. अतिशहाणपणा करू नका. वरिष्ठ आणि आयपीएसचे पाय चाटु नका. नाहीतर तुमचा सचिन वाझे झालाच म्हणून समजा.

सचिन मित्रा, काय तुझ्या कर्माची कहाणी. व्यवस्थित नोकरी केली असतीस , पैशाच्या मागे लागला नसतास, घराकडे, मुलाबाळांकडे, त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष दिले असतेस तर आता तुझ्या निवृत्तीच्या राहिलेल्या शेवटच्या दोन-तीन वर्षात तू सुखी राहिला असतास. आता कमीत कमी तुला दोन वर्ष जामीन मिळणार नाही बघ. तुझ्यावर गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे तुला कमीत कमी दहा दहा वर्षाची शिक्षा होणारच मित्रा संपलं तुझं आयुष्य मित्रा तू काय कमावलंस मित्रा ? प्रचंड पैसा तुझ्या कामाला आला नाही. तुझे कुटुंब तुझ्या कामाला आले नाही. ते तर बिचारे आयुष्यभर समाजात खाली मान घालूनच जगणार आहेत. तुझा तो परमविरसिंह तुझ्या कामाला आला नाही असो. मित्रा, माझा पुनर्जन्मावर विश्वास नाही. परंतु पुढच्या जन्मी तु पोलीस मात्र होऊ नकोस हीच तुला विनंती आहे

तुझ्या कृत्यांमुळे शर्मिंदा झालेला एक माजी पोलिस अधिकारी
ऍड . विश्वास काश्यप ,
माजी पोलिस अधिकारी ,
मुंबई .

Updated : 22 March 2021 10:21 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top