महापूराला दीड महिना उलटला तरी KT बंधारा डागडुजीच्या प्रतिक्षेत
X
मांजरा नदीवर बीड आणि धाराशिव जिल्ह्याना जोडणारा पूल आहे. एका टोकाला केज तालुक्यातील भोपळा आणि दुसऱ्या टोकाला धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील खोंदला. या पुलावरून समोर दिसतो कोल्हापुरी बंधारा! आणि असे बंधारे या नदीवर जागोजागी दिसतात. एकट्या बीड जिल्ह्यातच महासांगवी ते घाटसांगवी भागात असे 24 कोल्हापुरी बंधारे आहेत.
कसा असतो KT बंधारा (कोल्हापूर टाईप)?
पावसाळ्यानंतरचे पाणी साठवण्यासाठी नदीच्या प्रवाहात हे बंधारे बांधले जातात. या बंधाऱ्यांमध्ये खांब उभारून त्यांना दारे बसविली जातात, ज्यामुळे पाणी अडवून ते शेतीसाठी वापरता येते. नदीच्या प्रवाहात खांब उभे करून त्यांना दारे बसवतात. या दारांच्या साहाय्याने पाणी अडवले जाते, ज्यामुळे ते साठवता येते. हे बंधारे पाणी साठवण्यासाठी आणि पुलासारखे काम करण्यासाठीही वापरले जातात.
बदलत्या हवामानामुळे पावसाचे चक्र बिघडलं आणि अत्यंत कमी पाऊस पडणाऱ्या मराठवाड्यात 15 ऑगस्ट पासून पुढचा महिना पाऊस पडत राहिला. या पावसात या बंधाऱ्यांमुळे पाणी अडत राहिलं, कोट्यावधी रुपयांचा खर्च करून बसवलेली दारे दुरुस्ती न केल्यामुळे पाणी वाढल्यावर उघडलीच गेली नाहीत आणि पुलावर आलेलं पाणी गावात शिरलं.
बंधाऱ्याची दुरुस्ती कोणी करायची, कोणत्या विभागाने करायची, कोणत्या जिल्ह्याच्या अखत्यारीत हे काम करायचे याच्या चर्चेतच वेळ निघून गेला आणि ऑगस्ट मधल्याच पावसात पुलावर पाणी भरलं. सोयाबीन बरोबरच सुगराव शंकर लांडगे हे शेतकरीही प्रवाहात वाहून गेले. जीवितहानी होऊनही प्रश्न तिथेच राहिला आणि महिनाभराच्या पावसानंतर अचानक ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यावर गावात आणि शेतात पाणी भरलं.
आज दीड महिन्यानंतरही बंधाऱ्याच्या दारात अडकलेलं तसंच आहे. पूलाची डागडुजी अजूनही झालेली नाही. दोन जिल्ह्यांना जोडणारा हा पूल तसाच दुर्लक्षित अवस्थेत वाहतूक करतो आहे. नुकसान भरपाईची वाट पाहणारा शेतकरी पुलावरून जीव मुठीत धरून गावाची, तालुक्याची, जिल्ह्याची वेस ओलांडतो आहे.
#मराठवाडाडायरी
#महापूर
सिरत सातपुते
लेखक






