Enough is Enough !

परवा महाराष्ट्राच्या प्रमुखाने डॉक्टरांच्या संपाबद्दल बोलताना एक महत्वाचे विधान केले. “Enough is Enough”. त्याचे असे झाले आपली पारदर्शक भूमिका मांडताना ते म्हणाले होते, ‘आम्ही या डॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य केल्यात. येत्या दोन वर्षांमध्ये हॉस्पिटल्समधेही अनेक सुधारणा आणीत आहोत. लवकरच डॉक्टरांच्या कामाचा ताणही कमी केला जाईल.’ असे अनेक तपशील तावातावाने देत ते बोलत होते. शेवटी ते म्हणाले "आता डॉक्टरांनी संप सोडला पाहिजे, तात्काळ कामावर रुजू झाले पाहिजे, Enough is Enough !" हे भाषण अनेक वृत्तवाहिन्यांनी अनेकवेळा देशभर दाखविले.

माझ्यासारख्या राजकारणाशी काडीचाही संबंध नसलेल्या सामान्य माणसाला वाटते की, ‘तुमच्या हातात जनतेने एवढी तलवार दिलेली आहे मग त्याचा उपयोग तुम्ही सकाळी ब्रेडला बटर लावण्यासाठी का करत आहात?’ आता तुम्ही काही विरोधी पक्षात नाही. आरडाओरड करण्याची तुम्हाला काहीच गरज नाही, आवाज चढविण्याचीही गरज नाही, वत्कृत्वाचा उत्कृष्ठ अविष्कार दाखविण्याची तर मुळीच गरज नाही. तुम्ही शासनप्रमुख म्हणून फक्त समोर आलेल्या फाईलवर लाल अक्षरातील सहीने तुमचा निर्णय लिहायचा आहे, इतकेच!

पण आज महाराष्ट्रात मोठी गम्मतच सुरु आहे. एकीकडे सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षासारखा वागतो आणि सारखे ‘अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय’ करून अध्यक्ष्यांनाच आपल्या ‘नम्र आणि अतिसौम्य स्वरात’ साकडे घालत असतो. तर दुसरीकडे विरोधी पक्ष सत्ताधारी असल्यासारखा गतकाळाच्या सोनेरी दिवसांच्या आठवणीत मशगुल दिसतोय आणि सामान्य माणूस ज्यांनी या दोघांनाही वेगवेगळ्या कारणासाठी आणि वेगवेगळ्या कामासाठी निवडून दिले आहे तो मात्र ‘आपण हे काय करून बसलो’ असे म्हणून डोक्याला हात लावून बसला आहे. अगदी हतबल झाला आहे. आता खरा प्रश्न असा आहे की कुणी कोणाला "Enough is Enough" म्हणायचे?

रोज दुसऱ्याना पोटभर जेवण घालून हालाखीचे दिवस काढत मृत्यूला कवटाळणाऱ्या शेतकऱ्यांनी म्हणावे का? ‘मायबाप, Enough is enough !’

दिवसाढवळ्या उपराजधानीमध्ये होणाऱ्या खूनसत्राने त्रस्त झालेल्या नागपूरकरांनी म्हणावे का ? ‘गृहमंत्री महोदय, Enough is enough !’

‘अच्छे दिन’ची व्यर्थ वाट पाहणाऱ्या गृहिणीने रोज सकाळी नव्या दरवाढीची बातमी ऐकून धक्का बसल्यावर म्हणावे का, ‘Enough is enough.’

खासदाराने चप्पलेने मारहाण केलेल्या एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याने म्हणावे का ?

भर उन्हाळ्यात पोलीस भरतीचे नियोजन करणाऱ्या अमानवी प्रशासनाला विचारावे का? की पोलिस भरतीमध्ये जीवाच्या आकांताने धावताना मरण पावलेल्या तरुणाच्या आई-बापाने त्या हुशार आय.पी.एस. अधिकाऱ्याला ऐकवावे, ‘पोलीसमामा, ‘Enough is enough.’

कोट्यवधींचे घोटाळे समोर येऊनही त्यातल्या चोरभामट्यांचे काहीच वाकडे होत नाही हे बघून चिडलेल्या हताश नागरिकाने ओरडावे का, ‘अरे काय लावलेय हे? ‘मामू, इनफ इज इनफ हं !

की ज्यांना आम्ही इतक्या भरघोस मतांनी निवडून दिले त्यांची टोकाची अकार्यक्षमता आणि भोंदूगरी बघून, मतदारांनीच लोकप्रतिनिधींना म्हणावे, “चला, राजे घरी चला, नाही जमत तुम्हाला, Enough is Enough!”

कुणी आता कुणाला म्हणायचे "Enough is Enough"!

  • श्रद्धा बेलसरे-खारकर

Updated : 31 March 2017 9:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top