अर्थशास्त्रातील नोबेल अभिजित बॅनर्जी यांना मिळाल्याबाबत..

101
Courtesy : Social Media

अर्थशास्त्रातील नोबेल बक्षिसाच्या निमित्तानं गरिबी हा विषय सार्वजनिक चर्चांच्या / धोरणकर्त्याच्या अजेंड्यावर अधिक प्रमाणात यावा. यासाठी अभिजित बॅनर्जी या “देशी” अर्थतज्ञाला, इतर दोघांच्या बरोबर अर्थशास्त्रातील नोबेल बक्षीस मिळाले याचा आनंद आहेच. पण त्यापेक्षा जास्त समाधान “गरिबी” या विषयावर काम करणाऱ्याला हे बक्षीस मिळाल्याचे आहे.

गरिबी हा म्हटलं तर त्या गरीब व्यक्तीचा व्यक्तिगत प्रश्न असतो. पण ज्यावेळी कोट्यावधी व्यक्ती व कुटूंब गरीब असतात. त्यावेळी गरीब नसलेल्या / सुखवस्तू कुटुंबावर वाईट परिणाम करण्याची कुवत त्या सार्वत्रिक गरिबीत असते. सार्वत्रिक गरिबीचा संबंध पर्यावरणीय प्रश्नाशी आहे.

सार्वत्रिक गरिबीचा संबंध लोकसंख्या वाढीशी आहे.

सार्वत्रिक गरिबीचा संबंध तुमच्या सामाजिक सुरक्षेशी येऊन भिडतो.

सार्वत्रिक गरिबी, म्हणजेच क्रयशक्तीच्या अभावामुळे, तुम्ही ज्या कंपन्या मध्ये काम करता त्या कंपन्यांनी बनवलेल्या वस्तुमालाला उठाव न मिळाल्यामुळे तुमची कंपनी बंद पडण्याशी आहे.

व्यक्ती / कुटुंब गरिबी / दारिद्र्यात खिचपत पडतात. याचे कारण त्यांचे नशीब फुटकं निघतं / किंवा त्या आळशी असतात हे नाही. गरीब लोकांकडे मानवी दृष्टिकोनातून बघा, त्यांची दया येऊन त्यांना जमेल तशी मदत करा या मानसिकेतेतून विचारी मध्यमवर्गाने बाहेर येण्याची तातडी आहे.

गरिबी हा फक्त राजकीय अर्थव्यस्वस्थेचा “मॅक्रो” पातळीवरचा प्रश्न नाहीये. तर तो तुमच्या व्यक्तिगत आयुष्यावर “मायक्रो” पातळीवर दुष्परिणाम करणारा प्रश्न आहे. गरिबीविरुद्धच्या युद्धात विचारी मध्यमवर्गीयांनी सामील झाले पाहिजे !