Home > Election 2020 > कन्हैयाकुमारमुळं बेगुसरायमध्ये रंगतदार लढत

कन्हैयाकुमारमुळं बेगुसरायमध्ये रंगतदार लढत

कन्हैयाकुमारमुळं बेगुसरायमध्ये रंगतदार लढत
X

बेगुसरायमध्ये फिरताना मला १९७७ मधील लोकसभा निवडणुकीची आठवण येतेय. आणिबाणी उठल्यानंतरचा तो माहोल, जनतेचा कॉन्ग्रेसबाबतचा राग, आक्रोश. ते वातावरणचं सांगत होतं की, कॉग्रेस पराभूत होणार. अगदी असंच वातावरण इथं बेगुसरायमध्ये आहे. इथला तरूण बदल घडवून आणण्यासाठी पेटून उठलाय. त्यांच्या चेह-यावरचा राग, चीडच सांगतेय की, तो गिरीराजना पराभूत करणार. जाती, धर्म, पंथांच्या पलिकडं गेलेला हा तरूण क्रांतीदूत बनलाय. राजू पटेल नावाचा तरुण म्हणाला, मेरे घरके सभी लोक लालूजीके समर्थक है. मगर मै कन्हैया को वोट दूँगा..वो ही योग्य उम्मीदवार है.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात पदाधिकारी राहिल्याचा दावा करणाऱ्या कन्हैया नावाच्या एका युवकाचा व्हिडीओ आम्ही घेतलाय. तो म्हणतो, होय मी संघाचा आहे. मी संघ सोडलेला नाही. पण भाजपाच्या चुकीच्या गोष्टींचं मी समर्थन करीत नाही. राममंदीराच्या मुद्यावर ते आमची सतत फसवणूक करीत आहेत... यावेळी मी कन्हैया निवडूण यावा यासाठी जीवाचं रान करतोय. तो आमचे प्रश्न सोडवू शकेल असं वाटतयं. मी पक्ष वगैरे मानत नाही..... अशी बरीच बोलकी उदाहरणं आहेत.

अगदी भाजपा, राजदच्या तरूण कार्यकर्त्यांवरही कन्हैयाने जादू केलीय. रजत एवढीच ओळख सांगणारा तरूण म्हणाला, हमारे पंचायत एरिया के सभी युवा कन्हैया का प्रचार कर रहे है. आम्ही चहा टपरी, पान स्टाल, रस्त्यावरचे फेरीवाले यांच्याशी मुद्दाम चर्चा केली. नाव विचारले की, नाम मत पुछीए, असं उत्तर यायचं. पत्रकार है,महाराष्ट्र से आए है, असं म्हटल्यानंतर मोकळेपणाने बोलायचे. मुस्लिम व्यावसायिकाला, आप तो तन्वीर हसनको वोट देंगे, असं म्हटल्यावर त्याचं उत्तर नकारार्थी असायचं. वो मुस्लिम है, इसलिए हम उनको वोट देंगे, ऐसा क्यों सोचते हो आप? उनको हम दो-तीन बार वोट दे चुके है, इस बार कन्हैय्या को देंगे. वो जरूर चुनके आएगा, अशी त्यांची प्रतिक्रिया होती. बेगुसरायच्या मार्केटमध्ये पावर बँक घेण्यासाठी म्हणून आम्ही गेलो. दुकानदार मुस्लिम होता. क्या हलचल है इलेक्शन की? या प्रश्नावर तो लगेच काही बोलला नाही. समोरचे ग्राहक दुकानाबाहेर पडल्यानंतर तो बोलला. कन्हैय्या का अच्छा चल रहा है, वो चुनके आएगा. मी म्हटलं,चर्चा है की मुस्लिम वोट तन्वीर हुसेनको जा रहा है... तो मला थांबवत म्हणाला, नही भाईसाहब, हमारी पहचानका कोईभी मुस्लिम उनको वोट नही देगा. उसको हम चान्स दे चुके है. इस बार ज्यादा से ज्यादा मुस्लिम वोट कन्हैय्या को मिलेगा. आम्ही महाराष्ट्रातून कन्हैय्यासाठी आलोय हे सांगितल्यानंतर, १२०० रूपयाची पावर बँक त्याने ९०० रुपयांना दिली.

मंझोरमध्ये कोळी समाजातील शिक्षक संभू यांच्याशी बोललो. तो म्हणाला, हमारे पाँच पंचायत क्षेत्रसे कन्हैया को अच्छी बढत मिलेगी. पत्रकार पुष्पराज यांचे नातेवाईक डॉ. परमानंद चौधरी यांच्याकडं जेवायला गेलो असताना, निवडणुकीचा विषय काढला. ते भाजप समर्थक आहेत. तरीही ते बोलले, लढाई दिलचस्प हो रही है. शेवटच्या टप्प्यात ही लढत कन्हैया विरुद्ध गिरीराज सिंह अशी थेट बनलीय. भाजपाचा ढोंगी राष्ट्रवाद विरूध्द कन्हैयाचा सर्वसमावेशकवाद. कन्हैयाची सगळी मांडणी तर्कशुद्ध आहे. त्याच्या एकाही प्रश्नाचं उत्तर भाजपाकडं नाही. तो बेगूसरायच्या विकासाचे प्रश्न उपस्थित करतोय. त्याचं विकासाचं व्हिजन तो सांगतोय...

बेगुसरायमे युनिव्हर्सिटी, आयआयटी क्यों नहीं? यहॉ सबसे बडा उत्पादन मका का है, तो यहॉ पॉपकॉर्न क्यों नहीं बनता? टमाटरकी उपज इतनी अच्छी है, तो यहॉ सॉस क्यों नहीं बनता?... क्योंकी बीजेपीके पास व्हिजन नहीं, जूमलेबाजी है. वो सिर्फ अदानी,अंबानी के लिये काम करना चाहते है... बेगुसराय चांगला जिल्हा बनू शकतो, असा विश्वास देऊन तो त्याच्या विकासाचं व्हिजन स्पष्ट करतो. देशद्रोही हा मुद्दा कन्हैयाने भाजपावर उलटवलाय.

बेगुसरायकी शहिदोंकी धरती किसी देशद्रोही को जन्म दे सक्ती है क्या?

असा सवाल तो गर्दीला करतो तेव्हा, नहीं, नहींचं जोरदार उत्तर येतं. बेगुसरायपर जिन लोगोंने यह कलंक थोपा है, उन्हे सबक सिखाईए, असं आवाहन तो करतो, तेव्हा त्याला जोरदार प्रतिसाद मिळतो. लोकांशी संवाद साधण्याची कला हे त्याचं बलस्थान आहे. त्यांचं भाषण ऐकलेला माणूस त्याला सहजासहजी विसरू शकत नाही. तो कन्हैयाचा फॅन बनून जातो.

सच बनाम झुठ, तानाशाही बनाम लोकतंत्र…

दल की नहीं दिलकी लढाई है …

'जातपर ना पातपर कन्हैया की बातपर …

बडी सोच और नया नजरिया …

लेकर आया अपना कन्हैया …

नेता नहीं बेटा है, हाथी, घोडा …

पालखी..जय कन्हैया लालकी …

या घोषणा मतदारांच्या हृदयापर्यंत पोचल्यात. बेगुसरीय्या और बहरिया... हा मुद्दा प्रभावी ठरलाय. गिरीराज सिंह हे बाहेरचे, लादलेले उमेदवार आहेत, हा मुद्दा मतदारांच्या मनात ठसवण्यात कन्हैया यशस्वी ठरलाय.

गेल्या सहा महिन्यांपासून त्याची सुरू असलेली तयारी, ही त्याची मोठी जमेची बाजू आहे. हिंदू मतांच्या ध्रुवीकरणासाठी भाजपा ज्या खेळ्या करतोय,त् या त्यांच्या अंगलट येत आहेत. गिरीराज सिंह यांचं मुस्लिम समाजाबाबत केलंलं तीन गज जमीनचं विधान त्यांना खूप महागात पडलंय. मुस्लिम समाजात त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटलीय. मुस्लिम मतांचं एकत्रिकरण कन्हैयाच्या बाजुने झालयं. कन्हैया हाच भाजपाच्या हिंदूत्वाला उत्तर देऊ शकतो, असं त्यांना वाटतं. राजदचे उमेदवार तन्वीर हसन यांनी गेल्या निवडणुकीत तीन लाखांवर मत घेतली असली तरी, यावेळी ते स्पर्धेत नाहीत,ही वस्तुस्थिती आहे. तन्वीर यांना फारशी मुस्लिम मतं पडणार नाहीत, हे लक्षात आल्याने राजदची परंपरागत मतं कन्हैयाच्या बाजुने झुकण्याची शक्यता निर्माण झालीय. कन्हैया निवडूण येणार, असा निर्माण झालेला माहोल, काठावरच्या, द्विधा मनःस्थितीतील मतदारांना प्रभावित करू शकतो. एवढ्या कमी कालावधीत जातीच्या मतांचं गणित समजून घेणं कठीण आहे. भूमिहारांची मतं कन्हैयाला किती पडतात? यावर बरीच मत-मतांतरं आहेत.दलित मतांबद्दलही अशीच स्थिती आहे. पैशाने किती मतदान बदलू शकतं, हा ही मुद्दा आहेच. मतदार जातीच्या पलिकडं जाऊन मतदान करतात का, हा खरा कळीचा प्रश्न आहे. कन्हैय्याची प्रचार यंत्रणा विस्कळीत, त्याच्या भोवतीच केंद्रीत आहे. समन्वयाचा अभाव आहे, अशा त्रुटी ठळकपणे दिसतात. पण त्याचा फारसा विपरीत परिणाम होईल असं वाटत नाही.

काल दिवसभरात, विविध स्तरांतील लोकांशी आम्ही बोललो. कोणी उघडपणे तर कोणी सावधपणे कन्हैयाच्या विजयाची ग्वाही देत होता. गिरीराज विजयी होतील असं म्हणणारेही काहीजण भेटले. पण तनवीर जिंकतील,अ सं ठामपणे सांगणारा कोणी भेटला नाही. कन्हैय्याने अर्धी लढाई इथंच जिंकलीय. बेगुसराय लोकसभा मतदारसंघ या निवडणुकीत देशाचा केंद्रबिंदू बनवण्यात तो यशस्वी झालाय. त्याता सगळ्या देशाचं लक्ष या मतदारसंघाकडं आहे. एकदा मतदारांनी आपलं मत बनवलं की, ते सहजासहजी बदलत नाहीत,अ सा माझा अनुभव आहे. इथं परिवर्तनाची लाट मला स्पष्टपणे दिसतेय. या लाटेत कन्हैय्या विजयी होणं अपेक्षित आहे. तरीही शेवटच्या दोन दिवसात काहीही घडू शकतं, अशी भीती व्यक्त करणारे बरेचजण भेटले... यदाकदाचित असं काही विपरीत घडलंच तर, आपली लोकशाही अद्यापही जाती, धर्माच्या,उच्चनीचतेच्या आणि पैशाच्या चिखलात रुतून बसलीय,अ सेच खेदाने म्हणावे लागेल. हा खऱ्या अर्थाने लोकशाहीचा पराभव ठरेल.

साभार (आनंद मंगनाळे यांच्या फेसबुक वॉलवरून )

Updated : 28 April 2019 8:59 AM GMT
Next Story
Share it
Top