Home > मॅक्स ब्लॉग्ज > अदानी अंबानींमुळे 'मोदी' प्रतिमा मलिन होत आहे का?

अदानी अंबानींमुळे 'मोदी' प्रतिमा मलिन होत आहे का?

मोदी उद्योगपतींच्या हातातील कठपुतली झाले आहेत का? शेतकरी आंदोलनामुळे मोदी प्रतिमा मलीन झाली आहे का? देशांचे लोकप्रिय पंतप्रधान अशी ओळख असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी बाबत शेतकरी आंदोलकांना काय वाटतं? वाचा मॅक्समहाराष्ट्रचा स्पेशल रिपोर्ट

अदानी अंबानींमुळे मोदी प्रतिमा मलिन होत आहे का?
X

'मोदी है तो मुमकिन है' असं आत्तापर्यंत दिल्लीच्या केंद्र सरकारच्या भावना होत्या. मात्र दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाने या भावनांना तडा गेला आहे का? तसं पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निर्णायक, कठोर अशी प्रतिमा जगभरात तयार झालेली आहे. मात्र शेतकरी कायद्यामुळे मोदी सरकार हतबलतेच्या किनाऱ्यावर आहे का? नरेंद्र मोदी उद्योगपतींच्या हातातली कठपुतली आहेत का? असा सवाल दिल्ली आंदोलनाच्या निमित्ताने उपस्थित होतो आहे. सध्या जगभरात दिल्लीतील शेतकरी आंदोलनाची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. मोदी सरकार विरोधात शेतकऱ्यांनी उपसलेलं आंदोलनाचं हत्यार देशाच्या इतिहासातील आंदोलनांचे आगळेवेगळे प्रतिक म्हणून ओळखले जात असताना दिल्ली आंदोलनातील शेतकऱ्यांच्या मनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारबाबत नक्की काय भावना आहेत, हे मॅक्स महाराष्ट्रने जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

दिल्लीतल्या सिंघु बॉर्डरवरील शेतकरी आंदोलनकर्ते मदुरसिंह म्हणतात की,

"आपले पंतप्रधान काही कामाचे नाही, त्यांना जनतेचे प्रश्न समजत नाहीत. मोदींनी देशातील जनतेसोबत धोका केला आहे. संपूर्ण जग पाहत आहे की शेतकऱ्यांना या मोदी सरकारने कसं वेठीस धरलं आहे. त्यांच्या हट्टीपणाला आम्हीही पुरुन उरु. जोपर्यंत हा नवीन शेतकरी कायदा रद्द करुन आमचा हक्क आम्हाला मिळत नाही. तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही."

तर दुसरीकडे निर्मलसिंह सांगतात की, "मी कुणी नेता नाही, मी कुणी खलिस्तानी, आंतकवादीही नाही. मी एक सामान्य शेतकरी आहे. पंतप्रधान मोदी यांच्यावर आम्ही जराही खूश नाही, कारण त्यांच्या सरकारने आणलेले कायदे हे शेतकरीविरोधी असून शेतकऱ्याला संपवून टाकणारे आहेत. ज्या मोदींना जनतेनं निवडून दिलं. पंतप्रधानपदासारख्या महत्वाच्या पदावर बसवलं, तेच मोदी आता जनतेच्या विरोधातले कायदे करत आहेत.

राजा हा जनतेची सेवा करणारा असतो. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता राजा हा खलनायकाच्या भूमिकेत असल्याचं पाहायला मिळतेय. जोपर्यंत हे तीन काळे कायदे मागे घेत नाही. तोपर्यंत आम्ही दिल्ली सोडणार नाही. आमच्यासोबत आता हिंदू-मुस्लिमांसह अन्य राज्यांचा पाठिंबा आहे. पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र, तामिळनाडू, उत्तरप्रदेश, गुजरात, राजस्थान, बिहार ही सगळी राज्यं आमच्यासोबत आहेत. खलिस्तानी, आतंकवादी अशी नावे देऊन मोदी सरकार आम्हा शेतकऱ्यांना बदनाम करण्याचा प्रपोगंडा चालवत आहेत.

पंजाबमधील कॅप्टन शुबराल सिंह शेरगील म्हणतात की...

"जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व चांगलं असतं तर देशातली जनता रस्त्यावर नसती. मोदी सरकारने 33 कंपन्या विकून त्यांचं खासगीकरण केलं आहे. त्याचा फायदा कॉर्पोरेट सेक्टरला मिळत आहे. मोठ-मोठ्या धनदांडग्या उद्योगपतींचे कर्ज सहजरित्या माफ होतं. त्याचप्रमाणे त्यांच्या मागण्याही पूर्ण होतात. तर आम्ही शेतकऱ्यांनी काय केलं आहे? आम्हीही या देशाचे नागरिक आहोत, आमच्यामुळे देशातल्या जनतेचं पोट भरतं. देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी हरितक्रांती आणून "जय जवान, जय किसान" असा नारा दिला. त्यानंतर शेतीला भरभराट आली संपूर्ण देशाचं पोटं भरण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. परंतु आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना रस्त्यावर आणून सोडलं आहे. शेतीचा जीडीपी हा योग्यरित्या असल्याचं मोदी सरकारला बघवत नाही. म्हणूनच त्यांनी अदानी, अंबानींसारख्या उद्योगपतींना या नव्या कायद्यातंर्गत शेतकऱ्यांच्या जमिनी देण्याचा मास्टरप्लान केला आहे."

राजस्थानचे जोगिंदर सिंह सांगतात की...

"पंतप्रधान मोदी हे औरंगजेबच्या भूमिकेत येऊन जनतेच्या विरोधातले कायदे बनवत आहेत. मोदीजी तुम्ही तर पाच वर्षांचे पंतप्रधान आहात आम्ही तर आमच्या मागण्या पूर्ण करुन घेण्यासाठी 50 वर्षही बसू शकतो. प्रजेने तुमची निवड चांगल्या कामांसाठी केली आहे. लवकरात लवकर आपण आम्हा शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा अन्यथा आमचं हे धरणे आंदोलन सुरुच राहील."

गुलजार सिंह म्हणतात की...

"पंतप्रधान मोदी हे सगळ्यात मूर्ख पंतप्रधान आहेत. ते शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत नाहीत. लुधियानातील आक्रमसिंह हा तरुण मोदी सरकारविरोधात या आंदोलनात सहभागी झाला असून हे कायदे मोदी सरकारने रद्द करावे अशी मागणी हा तरुण करतो.

कॅथॅलिटीतील रजत कुमार हा तरुण सांगतो की...

" या आंदोलनात मोठ्या प्रमाणात तरुण-तरुणींनी सहभाग घेतला आहे. मोदींनी स्वतःची प्रतिमा स्वतःच खराब करण्याचं ठरवलं आहे, असं वाटतेय. कारण अगोदर तरुणांना रोजगार देणार असा दावा करत देशातील युवा पिढीला बेरोजगारीच्या उंबरठ्यावर आणून बसवलं आणि आता तर शेतकऱ्यांचं अस्तित्व हिरावून घेण्याचा घाट या नव्या शेतकरी कायद्यातून मांडला आहे."

तसेच पंजाब मधील तरुणाई म्हणतेय की...

"अगोदर मोदींनी चहा विकला, तसा आता देश विकतायेत".

जेव्हा पासून मोदी पंतप्रधान झाले आहेत. तेव्हापासून मोदींनी नोटाबंदी, जीएसटी, रेल्वे, विमान कंपन्या असे अनेक चुकीचे निर्णय घेतले आहेत. तसेच आता शेतकऱ्यांवर मोदी हे तीन काळे कायदे लादत आहेत. मोदींचं व्यक्तिमत्व जरी चांगलं असलं तरी त्यांनी देशाप्रती घेतलेले निर्णय देशाला जगाच्या नकाशात मागे टाकणारे आहेत."

मेहरसिंह सांगतात की...

"नरेंद्र मोदी यांना आम्ही पंतप्रधान म्हणून निवडून दिलं कारण गरीब घराण्यातील मुलगा आहे. देशाच्या हितासाठी काम करेल . परंतु हे पंतप्रधान देशाला विकायला निघाले आहेत."

"मोदींनी आपल्या दुसऱ्या टर्ममध्ये, भारतीय रेल्वे विकली, भारतीय विमान कंपन्या विकल्या" आणि आता देशातल्या शेतकऱ्यांच्या जमिनी उद्योगपतींच्या हाती विकण्याचा घाट घातला आहे.

एकदंरीत आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रियेनंतर मोदींची निर्णय़ घेणारा नेता ही प्रतिमा जनमानसात कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोदींनी जगभरात निर्माण केलेलं वलय कुठेतरी संपुष्टात येण्याचं चित्र लवकरच स्पष्ट होईल असं आंदोलनकर्ते म्हणतात.

"पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याच प्रतिमेला तडा जाईल असे काम करत आहेत. मोदींच्या सहवासात असणारे काही अधिकारी असे निर्णय घेण्यासाठी त्यांची दिशाभूल करतायेत?" असा सवाल हरियाणातील एका शेतकऱ्यांने उपस्थित केला आहे.

Updated : 17 Dec 2020 7:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top