Home > मॅक्स ब्लॉग्ज > डीएसपी देविंदर सिंगच्या अटकेचा अर्थ काय?

डीएसपी देविंदर सिंगच्या अटकेचा अर्थ काय?

डीएसपी देविंदर सिंगच्या अटकेचा अर्थ काय?
X

काश्मीर खोऱ्यातील दोन अत्यंत जहाल दहशतवाद्यांना पळवून नेत असतांना एका ज्येष्ठ पोलिस अधिकाऱ्याला जम्मू-काश्मीर पोलिसांनी अटक केली आहे. देविंदर सिंग असं या पोलिस अधिकाऱ्याचं नाव असून नाकाबंदी दरम्यान त्याला अटकरण्यात आली आहे. महत्वाचं म्हणजे दहशतवाद विरोधी कारवायांसाठी देविंदर याला राष्ट्रपती पदकानं गौरव करण्यात आला. सध्या देविंदर सिंगची चौकशी सुरु असून या चौकशीतून अनेक मोठे खुलासे पुढ येवू शकतात. संसदेवरच्या हल्याप्रकरणी फाशीची शिक्षा झालेल्या अफजल गुरु यानेदेखील देविंदर सिंग यांच नाव घेतलं होत.

दोन जहाल दहशतवादी काश्मीरबाहेर पळण्याच्या प्रयत्नात असल्याची गुप्त माहिती काश्मीर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे दक्षिण काश्मिरच्या पोलिस महासंचालकाच्या नेतृत्वात नाकाबंदी करण्यात आली. या नाकाबंदीमध्ये पोलिसांनी एक कार अडवली, त्यात मागच्या सिटवर बसलेले दोन दहशतवादी पकडले गेले. मात्र त्याहीपेक्षा मोठा धक्का पोलिसांना बसला जेव्हा त्यांनी पाहिलं की चालकाच्या शेजारी पोलीस उपअधीक्षक देविंदर सिंग बसले होते.

कोण आहेत देविंदर सिंग?

देविंदर सिंग पोलीस उपअधीक्षक पदी कार्यरत होते. यापूर्वी दहशतवाद्यांसोबतच्या अनेक चकमकीत त्यांनी भाग घेतला, नेतृत्व केलं. श्रीनगर आंतराष्ट्रीय विमानतळावर अपहरण विरोधी पथकाचे नेतृत्व ते करत होते. २०१८ मध्ये देविंदर सिंग यांना राष्ट्रपती शौर्य पुरस्कार मिळाला. काही दिवसांपूर्वी काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती दाखवण्यासाठी काहीदेशांच्या राजदूतांना श्रीनगरला बोलावण्यात आलं होत. या सर्व राजदूतांच्या स्वागताची जबाबदारी देविंदर सिंगकडे होती. काही दिवसांपूर्वी देविंदर सिंगला पदोन्नती देण्याचा प्रस्तावही आला होता.

प्रकरण एवढं गंभीर का आहे?

देविंदर सिंग याने त्याच्या कार्यकाळात अनेक दहशवाद्यांना ठार केलंय. दोन जहाल दहशतवाद्यांसोबत रंगेहाथ पकडल्यामुळे सिंग याने आतापर्यंत केलेल्या सर्व कारवाया, आता संशयाच्या फेऱ्यात सापडल्या आहेत. या दोन दहशतवाद्यांना देविंदर सिंगने आपल्या घरी आश्रय दिला होता. मात्र यापूर्वीही देविंदरने अनेक जहाल दहशतवाद्यांना आपल्या घरी ठेवलं असल्याची माहिती समोर येतेय. संसदेवरच्या दहशतवादी हल्याचा प्रमुख आरोपी अफजल गुरु यानेही देविंदर सिंग याच नाव घेतलं होतं. देविंदर सिंगच्या सांगण्यावरुन दिल्लीत मी काही जणांना मदत केल्याचं अफजल गुरुने त्याच्या वकिलाला लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं. त्यामुळे देविंदर सिंग याचा यापूर्वी झालेल्या मोठ्या दहशतवादी हल्यात सहभाग होता का? या प्रकरणात देविंदर सिंग एकटाच सहभागी आहे की दुसरे पोलीस अधिकारीही सहभागी आहेत? असे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झालेत.

आतापर्यंतच्या पोलीस चौकशीतून काय समोर आलंय?

  • देविंदर श्रीनगरच्या इंदिरा नगर इथल्या बदामीबाग इथं राहायचा
  • बदामीबागमध्ये राजकीय नेते, लष्करी आणि सनदी अधिकारी राहतात
  • सुरक्षेच्या दृष्टीने हा अंत्यत संवेदनशील भाग मानला जातो
  • देविंदरच्या घरातून २ एके-५६ रायफल्स, २ पिस्तूल,२ ग्रेनेड जप्त
  • दोन दशतवाद्यांना काही महिन्यांसाठी चंदीगड इथं घेवून जात होता
  • हे दहशतवादी २६ जानेवारीला दिल्ली, पंजाब, चंदीगड आणि जम्मूमध्ये दहशतवादी हल्ले घडवण्याच्या तयारीत होते
  • गाडीचा चालक इरफान मीर आतापर्यंत पाच वेळा पाकिस्तानमध्ये जाऊन आलाय
  • देविंदर सिंग काही वर्षांपासून हिवाळ्यात दहशतवाद्यांना जम्मूमध्ये आश्रय देत होता
  • नवीद आणि आसिफ नावाच्या दोन दहशतवाद्यांना देविंदरने श्रीनगरच्या घरात आश्रय दिला होता

अफजल गुरु प्रकरणात देविंदर सिंग याची काय भूमिका आहे?

२००१ मध्ये संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य आरोपी अफजल गुरुने त्याच्या वकिलाला पाठवलेल्या पत्रामध्ये देविंदर सिंगचा उल्लेख आहे. ऑक्टोंबर २००६ मध्ये खटला सुरु असतांना अफजल गुरुने तिहार जेलमधून हे पत्र लिहीलं होत. सर्जिकल उपकरणं विक्री प्रकरणात खोट्या केस दाखल करुन मला देविंदर सिंगने खूप मारहाण केली. १ लाख रुपये दिल्यानंतर देविंदर सिंगने मला सोडून दिलं. मात्र देविंदर सिंग एका मध्यस्थ व्यक्तीच्या माध्यमातून माझ्यासोबत संपर्कात होता असं अफजल गुरुने या पत्रात लिहीलं होत. दिल्लीला स्थायिक झाल्यानंतर देविंदर सिंग यांच्या मुलाची ट्यूशन मी घेत होतो. संसद हल्ल्यात सहभागी झालेल्या काही जणांची दिल्लीत मदत करण्या आदेश देविंदरने सिंगने दिला होता. त्या व्यक्तीला मदत न केल्यास कुटुंबियांना ठार कऱण्याची धमकी देविंदरने एका मध्यस्थामार्फतआपल्याला दिली होती, असं अफजल गुरूचं म्हणणं होतं. त्यामुळे आता संसद हल्ला प्रकरणी देविंदरच्या भूमिकेची चौकशी करावी लागणार आहे.

अफजल गुरुच्या पत्रात नेमकं काय लिहीलं आहे?

मी काश्मीरमध्ये सर्जिकल उपकरण विक्रीचा व्यवसाय करत असतांना, मला पोलिसांना ५०० रुपय़ांची लाच द्यावी लागत असे. लाच दिली नाही तर खोटे गुन्हे दाखल व्हायचे. एके दिवशी अचानक मला (एसटीएफ) विषेश कृती दलाच्या जवानांनी ताब्यात घेतलं. मला पैहलाव कॅम्पला नेलं. तिथे उपायुक्त विनय गुप्ता यांनी मला अमानूष मारहाण केली. हत्यार बाळगण्याचा आरोप माझ्यावर ठेवला गेला. मात्र इन्स्पेक्टर फारुख यांनी १ लाख रुपये दे, तुला सोडून देवू अन्यथा तुला मारुन टाकू अशी धमकी दिली. त्यानंतर मला हुहमा कॅम्पला नेण्यात आलं. तिथे उपअधीक्षक देविंदर सिंग यांनी मला पुन्हा मारहाण केली. मारहाण थांबवण्यासाठी मी १ लाख रुपये देण्याचं पोलिसांना कबूल केलं. बायकोचे दागिने गहाण ठेवून ८० हजार रुपये जमवले. उरलेल्या २० हजार रुपयांसाठी माझी स्कूटर पोलिसांनी ठेवली. त्या कॅम्पमध्ये दुसरा एक आरोपी होता त्याचं नाव तारीक होतं. त्याने मला सरळ जीवन जगायचं असेल तर एसटीएफ (विशेष कृती दल पथक) सोबत सहकार्याची भूमिका ठेव असा सल्ला दिला.

१९९०-९६ मध्ये मी दिल्ली विद्यापीठात शिकायला होते. मी कोचिंग क्लासेसमध्ये शिकवायचो. बडगामचे एसएसपी अशफाक हुसेन याचे मेव्हणे अल्ताफ यांच्याशी मी संपर्कात होतो. डीएसपी देविंदर सिंग आणि माझ्या कुटुंबादरम्यान ते मध्यस्थांची भूमिका बजावत असत. अल्ताफ यांनी देविंदर सिंग यांच्या दिल्लीत शिकत असलेल्या दोन मुलांची ट्यूशन घेण्याच्या सूचना केल्या. दहशतवादी हल्ला होण्याचा धोका असल्यामुळे देविंदर सिंग यांची मुलं, घराबाहेर पडत नसल्याचं अल्ताफने मला सांगितलं. एकदा अल्ताफने मला देविंदर सिंग याच्याकडे नेलं, त्यावेळी सिंग यांनी माझ्यासाठी एक छोटसं काम कर अशी विनंती केली. त्यांनी त्यांच्या एका ओळखीच्या व्यक्तीची दिल्लीत राहण्याची व्यवस्था करुन दे असं म्हटलं. त्या व्यक्तीला काश्मिरी भाषा येत नव्हती. तो काश्मीरी नव्हता. त्यामुळे मला त्याचा संशय येत होता. मात्र देविंदर यांच्या कामाला नकार देणं शक्य नव्हत. म्हणून नाईलाजानं मी त्या व्यक्तीची मदत केली. एक दिवशी त्याने कार खरेदी करायची असल्याचं मला सांगितल. मी त्याच्यासोबत करोलबाग इथं गेलो आणि कार खरेदी केली. संबंधित व्यक्ती दिल्लीमध्ये सातत्यानं वेगवेगळ्या लोकांना भेटायचा.

देविंदर सिंग माझ्याशी आणि त्या व्यक्तीशी सातत्याने फोनवरुन संपर्कात राहायचे. एक दिवशी त्या व्यक्तीने मला म्हटलं, तुला काश्मीरला तुझ्या घरी जायचं असेल तर तू जाऊन ये. त्याने माझ्या हातावर ३५ हजार रुपये ठेवले आणि म्हटलं हे बक्षीस म्हणून ठेव. दिल्लीत इंद्र विहारला मी घर भाड्याने घेतलं होतं. काश्मीरला निघण्यापूर्वी मी घराच्या चाव्या घर मालकाकडे दिल्या. ईदनंतर मी १४ डिसेंबरला दिल्लीला परत येईल असं त्यांना सांगतलं. दुसरीकडे श्रीनगरला पोहोचल्यावर तारीकने मला दिल्लीला परत येण्यास सांगितलं. मी सोपोरला बसमार्गे निघालो, मला पोलिसांनी वाटेतचं पकडलं आणि परम्पोरा पोलिस स्टेशनला नेलं. तारीक तिथे उपस्थित होता. माझ्या खिशातून ३५ हजार रुपये पोलिसांनी जप्त केले. मला विषेश कृती दलाच्या मुख्यालयात घेवून गेले. मला खूप मारण्यात आलं, त्यानंतर मला दिल्लीला नेण्यात आलं.

(टीप- ती व्यक्ती संसद हल्यात सहभागी होती आणि त्याने घेतलेली ती एम्बेसडर कार या हल्यात वापरली गेली होती)

सखोल चौकशीची मागणी

या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी काँग्रेसने केलीये. संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्यात देविंदर सिंगची काय भूमिका आहे. याची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केलीये. एकटा पोलीस अधिकारी हे काम करुच शकत नाही. या पोलीस अधिकाऱ्याचं आयएसआय सोबत कनेक्शन असण्याची शक्यता आहे. एवढ्या दिवसापासून एक पोलीस अधिकारी आपल्या शासकीय घरात दहशतवाद्यांना आश्रय देतो आणि कुणालाच कळत नाही, हे अनाकलनीय आहे. त्यामुळे या प्रकरणात गुप्तचर यंत्रणाही अपयशी ठरल्यात. देविंदर याच्यासोबत अजून काही पोलिस अधिकारी सहभागी आहेत का? याची सखोल चौकशी करावी अशी मागणी आता होऊ लागलीये. देविंदर सिंगच्या अटकेवरुन आता भाजप-काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झालेत.

Updated : 14 Jan 2020 11:19 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top