Home > मॅक्स ब्लॉग्ज > डॉ. बाबासाहेब आंबेडकर विरुद्ध राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विरुद्ध राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

आरएसएसचे लोक नेहमी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांपासून दूर का राहिले? यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संघाचे तत्कालीन सरसंघचालक गोळवलकरांनी मांडलेल्या विचारांमध्ये नक्की काय फरक आहे. जाणून घेण्यासाठी नक्की वाचा... सुभाष गाताडे यांचं विश्लेषण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विरुद्ध राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
X

हेडगेवारांच्या नंतर गोळवलकरांनी संघाची धुरा सांभाळली होती. मात्र, ते स्वतः किंवा आरएसएसचे सगळेच लोक आंबेडकरी चिंतनापासून तेवढेच दूर होते असे दिसते. याचे एक उदाहरण सांगतो. आंबेडकरांच्या मृत्यूआधी काही वर्षे 'नवाकाळ' मध्ये (१ जानेवारी १९६९) गोळवलकरांची वादग्रस्त विधाने छापून आली होती, ती पहावी लागतील. त्यांनी बौद्धिक पद्धतीने विचार करत असल्याचे दाखवून मनुस्मृतीतील गोष्टीच योग्य असल्याचे पटवून देण्याचा प्रयत्न केला होता.

शुद्धीकरण शिवाशिवीच्या पद्धतीवर आधारित वर्णव्यवस्था ही ईश्वरदत्त असल्याचे म्हटले होते. या लेखात गोळवलकर यांनी स्पष्टपणे म्हटले होते, की 'स्मृती ईश्वरनिर्मित आहे आणि तिच्यात सांगितली गेलेली चातुर्वर्ण्य व्यवस्थाही ईश्वर निर्मितच आहे. किंबहुना ती ईश्वरनिर्मित असल्यामुळेच तिची मोडतोड करण्याचे प्रयत्न झाले तरी आम्हाला त्याविषयी चिंता वाटत नाही. कारण माणूस आज मोडतोड करतो; परंतु जी ईश्वरनिर्मित योजना आहे .ती पुनःपुन्हा प्रस्थापित झाल्याशिवाय राहणारच नाही.' (पान १६३. श्री. गुरुजी समग्र खंड ९)

आपल्या या लेखनात गोळवलकर यांनी जाति-वर्णव्यवस्थेची भलावण करताना म्हटले होते की 'आपल्या धर्मातील वर्णव्यवस्था ही सहकाराची पद्धतीच तर आहे. किंबहुना; आजच्या युगाच्या भाषेत बोलायचे झाले तर आज ज्याला 'गिल्ड' म्हटले जाते आणि पूर्वी ज्याला 'जात' म्हटले होते. त्या दोन्ही गोष्टी एकच आहेत. जन्मावर आधारित चातुर्वर्ण्य व्यवस्थेत काहीच गैर नाही. परंतू तिच्यात लवचिकता ठेवलीच पाहिजे आणि तिच्यात तशी लवचिकता होतीही लवचिकता असलेली चातुर्वर्ण्य व्यवस्था योग्यच आहे.'

१९५० च्या दशकाच्या मध्यावर हिंदू कोड बिलच्या माध्यमातून हिंदू महिलांना संपत्तीमध्ये वाटा देण्याचा आणि वारसा हक्काचा मर्यादित अधिकार देण्याचा पुन्हा पहिल्यापासून प्रयत्न सुरू केला गेला. त्यावेळी त्यांनी केलेले वक्तव्य याविषयी त्यांच्या मनात असलेली घृणा स्पष्टपणे दाखवून देते. त्यांनी लिहिले होते. "लोकांनी हे चांगल्या प्रकारे लक्षात घेतले पाहिजे की हिंदू कोड बिलाचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे ते मागे घेतले गेले. या आनंदात राहून चालणार नाही. तो धोका अद्यापही जशाच्या तसाच आहे. लोकांच्या आयुष्यात मागच्या दरवाजाने प्रवेश करून हा धोका त्यांची आयुष्ये गिळंकृत करेल. अंधारात दंश करण्यासाठी टपून बसलेल्या विषारी सर्पासारखा हा धोका भयानक आहे.' (श्री. गुरुजी समग्र खंड ६, युगाब्द ५१०६)

संघाशी संबंधित असलेले आर. मलकानी यांनी आपल्या 'द आरएसएस स्टोरी' या पुस्तकात (नवी दिल्ली, इम्पेक्स इंडिया, १९८०) असा विशेष उल्लेख केला आहे की 'हिंदू कायद्याने मनुस्मृतीशी असलेला आपला संबंध संपुष्टात आणला पाहिजे यासाठी दिल्या गेलेल्या कारणांविषयी गोळवलकर संतुष्ट नव्हते.' (पान ७३). अनुसूचित जाती आणि जमातींच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी स्वतंत्र भारताच्या नेतृत्वाने विशेष संधी देण्याच्या ज्या ज्या योजना तयार केल्या, त्यांपैकी एकाही योजनेचे गोळवलकरांनी मनापासून स्वागत किंवा समर्थन केले नव्हते.

आरक्षणाविषयी त्यांचे असे म्हणणे होते की सामाजिक एकतेवर घातला गेलेला हा जबरदस्त घाव आहे. यामुळे परस्पर सद्भावावर आधारित प्राचीन नातेसंबंध विदीर्ण होतील. कनिष्ठ जातींच्या दुर्दशेला हिंदू समाजव्यवस्थाच जबाबदार आहे ही गोष्ट ते नाकारत होते. त्यांनी दावा केला होता की त्यांना घटनात्मक सुरक्षितता दिल्यामुळे आपापसातील वितुष्ट वाढण्याचा धोका आहे. ( गोळवलकर, बच ऑफ थॉट्स, पान ३६३, बंगळुरू: साहित्य सिन्धु, १९९६).

संघाच्या एखाद्या वरिष्ठ नेत्याच्या डोक्यातून आलेली फक्त एक कल्पना म्हणून डॉ. आंबेडकरांना हेडगेवारांसमोर आणण्याच्या या प्रयत्नांकडे पाहता येणार नाही. एका व्यापक योजनेचा हा एक भाग आहे. या योजनेचे कित्येक पैलू आहेत. पहिला पैलू असा आहे की फक्त आंबेडकरांच्याच नव्हे; तर संपूर्ण दलितांच्या इतिहासाचे पुनर्लेखन करणे.

दुसरा पैलू असा आहे की हिंदू धर्माचे एक स्वच्छ रूप सादर करणे. त्यात अस्पृश्यतेसह इतर मानवद्रोही परंपरांचा, रूढींचा एक तर इन्कार करणे शक्य होईल किंवा या प्रथांचा जन्म 'बाह्य आक्रमणां'तून झाल्याचे म्हणता येईल. तिसरा आणि कदाचित सर्वाधिक महत्त्वपूर्ण पैलू म्हणजे व्यापक सामाजिक रूपांतराची भव्य शक्यता गृहीत धरणाच्या दलित मुक्ती आंदोलनाला एक प्रकारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांच्या 'आम्ही' आणि 'ते' या तत्त्वावर आधारित सामाजिक विघटनाच्या आणि विभक्तीकरणाच्या राजनीतीत समाविष्ट करणे.

संकलन : चैतन्य सावळे लेखात ॲड कर

सुभाष गाताडे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विरुद्ध राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

Updated : 2021-09-07T10:13:16+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top