Thanks Ambedkar : शिक्षित स्त्री म्हणजे संपूर्ण समाजाचे सामर्थ्य!
स्त्री-स्वातंत्र्य आणि समानतेच्या संघर्षाचे सर्वोच्च प्रेरणास्थान म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महिलांना शिक्षण आणि बाबासाहेब यांच्यावर मोनिका नामे यांचा लेख
X
भारतातील सामाजिक रचनेत शतकानुशतके स्त्री ही दुर्लक्षित, दुय्यम आणि दडपलेल्या घटकांपैकी एक मानली गेली. patriarchal system पितृसत्ताक व्यवस्थेने स्त्रियांच्या जगण्यावर असंख्य बंधने लादली. भारतीय समाजात स्त्रीला शिक्षणाची Women's Education संधी नव्हती, संपत्तीवर अधिकार नाही, स्वातंत्र्य नाही; विवाहात तिची भूमिका नेहमी दुय्यमच, आणि सार्वजनिक जीवनात तर तिचे अस्तित्व जवळजवळ नगण्य अशा अंधःकारमय परिस्थितीत महिलांना माणूस म्हणून समान प्रतिष्ठा मिळवून देणारी विचारधारा निर्माण करणारे आणि त्या प्रतिष्ठेला कायदेशीर आधार मिळवून देण्यासाठी सातत्याने संघर्ष करणारे Dr. Babasaheb Ambedkar डॉ. बाबासाहेब आंबेडकर, त्यांच्या देशासाठी व समाजासाठी असंख्य योगदानांमध्ये, स्त्री उन्नतीसाठी त्यांनी केलेला हा लढा मला सर्वांत जास्त प्रेरणादायी व सन्माननीय वाटतो.
डॉ. आंबेडकर स्त्री समानतेकडे केवळ सामाजिक सुधारणा म्हणून नव्हे, तर राष्ट्राच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक घटक म्हणून पाहत होते. त्यांच्या प्रयत्नांमुळे भारतीय महिलांच्या आयुष्यात खोलवर बदल घडून आला आणि नवी क्रांती घडली. कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजातील महिलांच्या प्रगतीवरून ठरते, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे. व त्यासाठी ते सदैव प्रयत्नशील राहिले हे दिसतं.
॰महिला समानतेची संविधानिक पायाभरणी
भारतीय संविधानाचे प्रमुख निर्माते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांच्या हक्कांना विशेष महत्त्व दिले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे संविधानात अशा अनेक तरतुदी समाविष्ट झाल्या, ज्यांनी भारतीय स्त्रियांना अधिकारसंपन्न बनवले.
त्या तरतुदींमुळे महिलांनाः
-कायद्यापुढे समान वागणूक मिळण्याचा हक्क मिळाला. (अनुच्छेद 14)
-लिंगाधारित भेदभावापासून संरक्षण मिळाले. (अनुच्छेद 15)
-सरकारी सेवांमध्ये समान संधी व न्याय्य वागणूक मिळाली. (अनुच्छेद 16)
-मूलभूत हक्क आणि स्वातंत्र्यांचा लाभ मिळाला. (अनुच्छेद 19)
-जीवनाचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा पूर्ण हक्क मिळाला. (अनुच्छेद 21)
या तरतुदींमुळे भारतात महिला समानतेचा मजबूत आणि शाश्वत पाया घातला गेला. आज भारतीय महिलांच्या हक्कांची प्रत्येक लढाई या संविधानिक अधिकारांवर आधारित आहे आणि याचे श्रेय डॉ. आंबेडकरांना जाते.
॰हिंदू कोड बिल – भारतीय स्त्रीमुक्तीचा क्रांतिकारी टप्पा
बाबासाहेब आंबेडकरांचे सर्वात धाडसी आणि ऐतिहासिक योगदान म्हणजे हिंदू कोड बिल. त्या काळात या बिलचे क्रांतिकारी स्वरूप समजून घेण्यासाठी हे लक्षात घ्यावे की, समाजाच्या पारंपारिक रूढींमध्ये अडकलेल्या लोकांनी या बिलाचा तीव्र विरोध केला. तरीही, आंबेडकरांनी महिलांच्या हक्कांसाठी कोणतीही तडजोड केली नाही.
या कायद्यामुळे महिलांना अनेक मौलिक हक्क प्राप्त झाले:
-स्त्री-पुरुषांना समान वारसाहक्क
-संपत्तीवरील पूर्ण स्वामित्व स्त्रियांना
-दत्तक घेण्याचा अधिकार महिलांना
-घटस्फोटाचा कायदेशीर हक्क
-पुनर्विवाहाचा अधिकार मान्य
हिंदू कोड बिलामुळे महिलांना ‘घरातील वस्तू’ म्हणून मर्यादित न राहता कायद्याद्वारे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व प्राप्त झाले. हे बिल भारताच्या स्त्रीमुक्ती चळवळीतील सर्वात निर्णायक पाऊल ठरले.
॰विधवा, दलित आणि शोषित स्त्रियांसाठी केलेला संघर्ष
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांवरील अन्याय फक्त पितृसत्तेपुरता मर्यादित मानला नाही. त्यांनी जात, धर्म, वर्ग आणि प्राचीन रूढींच्या जाळ्यात अडकलेल्या स्त्रियांच्या दु:खाकडे विशेष लक्ष दिले.
-त्यांनी विधवांचे पुनर्विवाह सुलभ होण्यासाठी पाठबळ दिले.
-विधवांवर होणाऱ्या सामाजिक दडपशाही, मुंडन, विशिष्ट रंगाची साडी परिधान करण्याची सक्ती, बहिष्कार अशा अमानवी प्रथांचा त्यांनी कट्टर विरोध केला.
-देवदासी प्रथेला सामाजिक गुलामगिरीचे स्वरूप मानून त्याविरुद्ध लढा दिला.
-दलित समाजातील स्त्रियांवर होणारे अघोरी अत्याचार रोखण्यासाठी जागृती केली.
आंबेडकरांच्या मते, स्त्री असो वा दलित, प्रत्येक प्रकारच्या गुलामगिरीविरुद्ध लढा हाच खरा मार्ग होता आणि त्यासाठी त्यांनी आपल्या शब्दांचा आणि कृतीचा एकत्रित वापर केला.
॰महिला शिक्षणाची क्रांतिकारक दृष्टी
बाबासाहेबांचा स्त्री उन्नतीवरील सर्वात ठोस विश्वास म्हणजे शिक्षण. त्यांनी सांगितलेला महामंत्र “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” याचा गाभा महिलांच्या सक्षमीकरणात आहे. ते म्हणायचे की शिक्षणाशिवाय स्त्री कोणत्याही प्रकारची गुलामगिरी मोडू शकत नाही.
त्यामुळे त्यांनी:
-संविधानात स्त्रीशिक्षणाला प्रोत्साहन दिले.
-सरकारी मदत व शैक्षणिक सवलतींच्या योजना सुरू केल्या.
-मुलींच्या शाळांसाठी धोरणात्मक पाठबळ दिले.
आंबेडकरांचे मत स्पष्ट होते, शिक्षित स्त्री म्हणजे संपूर्ण समाजाचे सामर्थ्य.
॰कामगार महिलांसाठी कायदे व संरक्षण
कामगार मंत्री म्हणून डॉ. आंबेडकरांनी शेकडो कामगार कायदे बनवले. त्यात महिलांसाठी विशेष तरतुदी होत्या:
-मातृत्व रजा (Maternity leave) ही कायदेशीर करून महिलांच्या आरोग्याचे संरक्षण.
-कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि अत्याचारांपासून संरक्षण.
-समान कामासाठी समान वेतन मिळावे यासाठी आग्रह.
-कामाचे तास नियमित करणे व महिलांवर होणारे श्रमशोषण कमी करणे.
त्या काळासाठी हे उपाय अत्यंत प्रगत आणि क्रांतिकारी होते.
॰सामाजिक व धार्मिक बंधनांवर प्रहार
डॉ. आंबेडकरांनी धार्मिक ग्रंथांतील आणि प्रथांमधील स्त्रीद्वेषी कल्पनांचा निर्भीडपणे विरोध केला. त्यांच्या मते धर्म, परंपरा किंवा संस्कृती या नावाखाली स्त्रीच्या मनुष्यत्वावर आघात करणारी कोणतीही गोष्ट मान्य असू शकत नाही.
त्यांनी:
-स्त्रियांच्या हालअपेष्टांची मुळे शोधली,
-त्यांचे मूळ पितृसत्ताकता आणि धार्मिक ग्रंथांतील अन्यायात असल्याचे दाखवले.
-समतेच्या मूल्यांवर आधारित समाजाचा आग्रह धरला.
त्यांचे लक्ष्य फक्त महिलांना अधिकार देणे नव्हते, तर विचार बदलणे, व त्यायोगे स्त्रियांना मानसिक आणि सामाजिक स्वातंत्र्य मिळवून देणे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्त्री-सक्षमीकरणासाठीचे कार्य हे फक्त कायदे मांडण्यापुरते किंवा धोरणात्मक वक्तव्यांपुरते सीमित नव्हते; ते मानवी मुक्तीच्या व्यापक आणि सखोल तत्त्वज्ञानातून उगम पावलेले होते.
भारतीय महिलांना त्यांनी कायदेशीर अधिकार, सामाजिक प्रतिष्ठा, आर्थिक स्वयंपूर्णता, शिक्षणाची ताकद आणि स्वाभिमानाची जाणीव अशा प्रत्येक पातळीवर सक्षम बनवले. भारतीय स्त्रिया आज शिक्षण, राजकारण, विज्ञान, अर्थव्यवस्था, खेळ, कला आणि प्रशासन अशा प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करताना दिसतात. त्यांच्या या सर्वांगीण प्रगतीची मजबूत पायाभरणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केली, हे निर्विवाद आहे. देशातील प्रत्येक महिला आणि मुलीने बाबासाहेबांसह ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या अथक संघर्षाची आणि न डगमगता उचललेल्या प्रयत्नांची सदैव कृतज्ञतेने आठवण ठेवायला हवी. संविधानाचे शिल्पकार, कुशल अर्थशास्त्रज्ञ, कायदेतज्ज्ञ, राज्यशास्त्र-समाजशात्र तज्ज्ञ, वंचित-शोषितांच्या हक्कांसाठी झटणारे तारणहार आणि कामगारांच्या हिताचे निष्ठावान रक्षक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रीमुक्तीच्या चळवळीला दिलेले योगदानही तितकेच अनन्यसाधारण आहे. त्यामुळे स्त्री-स्वातंत्र्य आणि समानतेच्या संघर्षाचे सर्वोच्च प्रेरणास्थान म्हणून त्यांचा गौरव करणे गरजेचे होते.
मोनिका नामे
(लेखिका)

मोनिका नामे
सामाजिक आणि राजकीय रचनेत दडलेल्या विषमतांकडे लक्ष वेधणे हे माझ्या लेखनाचं उद्दिष्ट. सोबत पितृसत्ता व सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारणे व स्त्रीवादी परिवर्तनाची दिशा दाखवणे ही बांधिलकी.





