Home > मॅक्स ब्लॉग्ज > डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षण आणि शाहू महाराज

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षण आणि शाहू महाराज

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं शिक्षण शाहू महाराजांमुळं पूर्ण झालं हे नेहमीच आपण ऐकतो. मात्र, शाहू महाराजांनी मदत केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर नक्की कोणत्या कॉलेजमध्ये शिकले? त्यांनी कोणतं शिक्षण घेतलं? ते कॉलेज नक्की कोणतं होतं? वाचा बाबासाहेबांनी शिक्षण घेतलेल्या कॉलेजचे विद्यार्थी ॲड. प्रवीण निकम यांचं मत...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षण आणि शाहू महाराज
X

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच एक वेगळच नात आहे. आज राजर्षी शाहु महाराजांच्या जयंतीदिनी मला हा संदर्भ सांगण फार महत्त्वाचं वाटत.

"मना सारखा राजा अन राजा सारख मन" ही उक्ती छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्यासाठी खूप समर्पक वाटते. बहुजन समजाने जाती धर्माच्या भिंती तोडून शाश्वत प्रगती करावी यासाठी शाहू महाराजांनी तत्कालिन शैक्षणिक, आर्थिक, शेती व व्यवसायिक धोरणांत समाज उपयोगी अमुलाग्र बदल केले. त्यांनी राबलेली ही धोरणं असंख्य बहुजन लोकांसाठी महत्वपूर्ण ठरली.

मी सध्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. याच विद्यापीठात मागील शतकांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विद्यार्थी आयुष्यात लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे एक महत्वपूर्ण ठसा उमटवला आहे. याबाबत वेगळ काही सांगायलाच नको. मुळातच मला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे येण्याची प्रेरणाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळेच मिळाली.

सन १९१६ साली आपल्या स्वप्नांना योग्य आकार देण्यासाठी डॉ. आंबेडकर लंडन येथे दाखल झाले आणि त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (एल.एस.ई.) येथे पदव्युत्तर अभ्यासक्रमातील पदवी घेतली. दरम्यान याच काळात जगावर पहिल्या महायुद्धाच सावट घोंगावत होत. या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांचा अभ्यास थांबवावा लागला, कारण त्यांना बडोदा संस्थानामध्ये सैन्य सचिव म्हणून बोलावण्यात आले. जुलै १९१७ मध्ये लंडन विद्यापीठाने त्यांना चार वर्षांपर्यंत अनुपस्थिती रजा मंजूर केली आणि डॉ. आंबेडकर मायदेशी रवाना झाले.

या नंतर १९२० साली डॉ. आंबेडकर यांना लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे परत यायचे होतं तेव्हा, लंडन मध्ये शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदतीची आवश्यकता होती. डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या कर्तुत्वा बद्दलचा विश्वास हा सर्वज्ञात होताच. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची बहुजन जनतेविषयी असणारी प्रेम पूर्वक भावना व शिक्षणाविषयी त्यांना असणारा आदर यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही शाहू महाराज व इतर लोकांच सहकार्य मिळालं. याची मदत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपलं लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या विद्यापीठातील ऊर्वरित शिक्षण पूर्ण करण्यासाठी झाली.

छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर दोघही माझ्या प्रेरणेचे स्त्रोत आहेत. आज शाहू महाराज जयंतीदिनी मी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे असताना हा संदर्भ माझ्या समोर उभा राहतो आहे. तो थोडक्यात आपणासमोर मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न केला.

छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन …!!!

फोटो संदर्भ-

इ.स. १९२० साली मानगावच्या सभेसाठी उपस्थित छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १०० वर्षे जुनी आठवण.

- ॲड. प्रवीण निकम

एमएससी. (MSc.) मानवाधिकार आणि राजकारण.

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स

Updated : 26 Jun 2021 7:01 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top