Home > मॅक्स ब्लॉग्ज > अर्ज भाग १ : सिंधूदूर्ग एस्कॉर्ट सर्व्हिस

अर्ज भाग १ : सिंधूदूर्ग एस्कॉर्ट सर्व्हिस

हेडलाईनमध्ये अर्ज आणि एस्कॉर्ट सर्व्हिस हे दोन्ही शब्द एकत्रच वाचल्याने आपण ही अचंबीत झाला असाल. आता हे दोन्ही शब्द एकत्र का आले आहेत त्यात सिंधूदुर्ग चा कसा समावेश आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला वाचाव लागेल डॉ. रूपेश पाटकर यांचा हा लेख.....

अर्ज भाग १ :  सिंधूदूर्ग एस्कॉर्ट सर्व्हिस
X

२०१९ च्या जुलै मधली गोष्ट. तारीखही आठवडे २५ जुलै माझा पत्रकार असलेला मित्र भगवान शेलटे सहज भेटायला आला होता. तो त्या वेळी सिंधुदुर्ग लाईव्ह नावाच्या स्थानिक चॅनलसाठी काम करत होता. बोलता बोलता तो सह महणाला, "सर, एखादी नवीन स्टोरी सुचवा ना."

पाच दिवसानंतर ३० जुलै आहे. त्या निमित्ताने स्टोरी करणार का? मी विचारले.

"३० जुलैच्या निमिताने ?" त्याचा चेहरा प्रश्नार्थक झाला.

३० जुलै हा मानवी तस्करी विरोधी दिन'. म्हणून म्हटले, यावर स्टोरी करणार का?"

त्याला हा विषय बातमीदाराच्या नजरेतून इंटरेस्टिंग वाटला. पण बातमी काय करायची हा त्याच्या पुढचा प्रश्न होता. त्याला जनरल माहिती सांगण्यात इंटरेस्ट नव्हता आणि त्याने काही साध्य देखील होणार नाही हे त्याला ठाऊक होते.

"सर, विषय सनसनाटी आहे पण लोकांचे प्रबोधन झाले पाहिजे, अशी स्टोरी करायला हवी. काय करूया?"

"माझे एक मित्र आहेत. अरुण पांडे त्यांचे नाव. ते गोव्यातील वास्को या किनारपट्टीच्या भागात मानवी तस्करी विरोधी काम करतात, त्यांचा नंबर देतो. ते तुला सुचवतील" मी म्हणालो.

"मग तर उत्तमच झाले. मी त्यांचीच मुलाखत घेतो" भगवान म्हणाला.

"पण आता दिवस थोडे राहिलेत. तू लगेचच कॉल करून त्यांची अपॉइंटमेंट घे", मी म्हणालो.

सर ते खूप सिनियर असतील ना? मला त्यांच्याशी बोलायला थोडी भीड वाटेल. तुम्हीच कॉल करून माझ्यासाठी अपॉइंटमेंट घ्याना" त्याने मलाच गळ घातली.

मी लगेच त्यांना कॉल केला. कोणतेही आढेवेढे न घेता ते म्हणाले, "तुमच्या मित्राच्या चॅनलली मी केव्हाही इंटरव्ह्यू द्यायला तयार आहे. पण तुम्हाला जर तुमच्या बातमीने समाजावर काही फरक पडावा असे वाटत असेल तर मी सांगतो तसे कराल ? माझा इंटरव्ह्यू करू नका."

"मग?"

"गुगल सर्चवर जा आणि सिंधुदुर्ग एस्कॉर्ट सर्व्हिस हे शब्द टाइप करा आणि सर्च बटण प्रेस करा. तिथे तुम्हाला अनेक साईट दिसतील, अगदी कॉन्टॅक्ट नंबर सकट. त्यातील कोणत्याही एका नंबरवर कॉल करून पाहा. तुमची शोध पत्रकारीताही होईल!" ते म्हणाले.

त्यांच्या सांगण्याप्रमाणे आम्ही गुगल सर्चवर गेलो. सिंधुदुर्ग एस्कॉर्ट सर्व्हिस टाइप केले आणि आम्हाला अक्षरशः शेकडो रेफरन्स मिळाले. त्यात अनेक मोबाईल नंबर होते. त्यातील एक मोबाईल नंबर घेऊन भगवानने कॉल केला. "हॅलो, एस्कॉर्ट सर्व्हिस ?"

"जी। आप वॉट्स अप पे 'हाय' भेजीए।''

"मैं पूछना चाहता….."

"बात मत किजीए। वॉट्स अप पे मेसेज भेजीए।"

एवढ्याच संभाषणानंतर पलीकडच्या माणसाने कॉल कट केला. त्याच्या नंबरवर व्हॉट्सअप वरून 'हाय' मेसेज भगवानने पाठवला. त्यावर त्या माणसाने भगवानच्या व्हॉट्सअपवर पुढील उत्तर पाठवले,

"१. येस सर. मिल जायेगी सर्व्हिस कहा से बोल रहे हो आप?

२. मेरे पास २ अवर्स के लिये ६,००० और फूल नाईट ८,००० तक की लडकी अव्हेलेबल है....

३. ५०% पेमेंट में अॅडव्हान्स लेता हूँ, पेटीएम या बँक अकाऊंट में, ५० परसेन्ट पेमेंट आप को मॅडम को देना है. ओके सर !"

आणि त्यानंतर त्या माणसाने भगवानच्या व्हॉट्सअप वर २० तरुणींचे फोटो पाठवले. खरं सांगायचं तर भगवान घाबरून गेला. इतक्या राजरोसपणे देहविक्रीचा धंदा चालू आहे, याचा त्याला धक्का बसला.

त्यानंतर त्याने आपल्या मित्रांशी या अनुभवाबाबत चर्चा केली, तेव्हा त्यांनी त्याला आणखी धक्कादायक माहिती ऐकवली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरातील कोणकोणत्या हॉटेलात देहविक्रीसाठी जागा पुरवली जाते, त्याची त्यांनी माहिती दिली.

भगवानने त्याचा हा सर्व अनुभव जेव्हा माझ्या त्या वास्कोतील मित्रांशी शेअर केला तेव्हा ते म्हणाले की, "गोवा पोलिसांनी २०१८ या वर्षात एकूण ८१ महिलांची सुटका केली, त्यात महाराष्ट्रातून आलेल्या महिलांची संख्या २८ होती, म्हणजे सर्वांत जास्त महिला तुमच्या महाराष्ट्रातून आणण्यात आल्या होत्या. पूर्वी रेडलाईट एरिया पुरता मर्यादित असलेला देहविक्रयाचा बाजार आता सर्वत्र पसरला आहे. मसाज पार्लरच्या नावाखालीदेखील तो चालवला जातो. पण आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत 'ऑनलाइन' चालवला जातो आहे. गोव्यातील किनारपट्टीच्या भागात हा फोफावला आहेच; पण मोपा विमानतळ प्रकल्पानंतर तो तुमच्या सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात फोफावेल.'

वास्कोतील त्या मित्रांच्या बोलण्याने माझ्या मनात आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या; पण आपल्याला जाणीव नसलेल्या एका भयानक वास्तवाची जाणीव निर्माण झाली आणि भगवानसाठी बातमी हा विषय माझ्या डोक्यातून बाजूला पडला.

खरं सांगायचं तर ऑनलाईन धंद्याचं बाजूलाच राहू द्या. २००७ पर्यंत देहविक्री, वेश्या, भडवे, घरवाल्या, रेडलाईट एरिया हे शब्द मला फक्त ऐकून माहीत होते. त्यातलं वास्तव मला अजिबात माहीत नव्हतं.

२००७ मध्ये मी गोव्यातील बांबुळीच्या 'इन्स्टिट्यूट ऑफ सायकियाट्री अँड ह्यूमन बिहेवीअर' या संस्थेत सिनियर रेसिडेंट म्हणून काम करत होतो. ही संस्था म्हणजे गोवा मेडिकल कॉलेज सायकियाट्री डिपार्टमेंट.

सकाळच्या ओपीडीत पेशंटांची नेहमीच गर्दी असायची. उदास वाटते, चिंता वाटते, रागावर ताबा राहात नाही अशा अनेकांच्या तक्रारी. त्यांच्या या तक्रारींसाठी सल्ला देणे आणि औषधांचे प्रिस्क्रिप्शन लिहिणे हे माझे काम होते. तिथल्या ओपीडीत पेशंट आणि त्यांचे नातेवाईक वगळून इतर कोणी भेटायला यायचंच नाही. अर्थात, अगदीच नाही म्हणायला, औषध कंपन्यांचे प्रतिनिधी आपल्या औषधांच्या जाहिरातींसाठी भेटायचे, तेवढेच!

एक दिवस बिंसी एक कार्ड घेऊन आली. अर्थात, ती काही मला पहिल्यांदाच भेटत नव्हती. ती अनेकदा वेगवेगळ्या पेशंटांच्या सोबतीला यायची. ती एका संस्थेकडे काम करायची. बिंसीप्रमाणे अनेक स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते पेशंटना घेऊन यायचे. या सर्वांनी आपली ओळख देताना आपली आणि आपल्या संस्थांची नावे सांगितलेली असली, तरी त्यांची नावे काही माझ्या लक्षात राहात नसत. मी त्यांना फक्त चेहऱ्याने ओळखत असे.

त्यादिवशी बिंसी आली तेव्हादेखील मी तिला केवळ चेहऱ्याने ओळखले. तिच्या हातातले कार्ड बघून मला ती त्यांच्या संस्थेच्या कसल्यातरी कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका वाटली. ते कार्डही तसे आकर्षक नव्हते. पिवळसर रंगावर पांढरट गोल वर्तुळे आणि त्यावर 'स्विफ्ट वाश' असे मोठ्या अक्षरात लिहिले होते.. माझ्या हातात ते कार्ड देत बिंसी म्हणाली, "आपके योगदान के लिए बहोत बहोत धन्यवाद!"

मला काहीच अर्थबोध होईना. मी त्या कार्डेवरून नजर फिरवत असतानाच तिने ते माझ्या हातून परत घेतले आणि कार्डच्या मागच्या बाजूवर लिहिलेल्या एका ओळीवर बोट ठेवत तिने त्यावर त्यांच्या संस्थेसाठी योगदान देणाऱ्यांच्या यादीत छापलेले माझे नाव दाखवले. ते पाहून मला आश्चर्य वाटणे साहजिक होते.

"हे तुमच्या संस्थेचे कार्ड ना? मी कुठे योगदान दिलेय तुमच्या संस्थेत ?" मी विचारले.

माझ्या या प्रश्नावर ती म्हणाली, "तुम्ही आमच्या पेशंटना पूर्वग्रह न ठेवता समानतेने वागवता."

"त्यात काय मोठेसे? त्याच कामासाठी मी नोकरीवर आहे ना" मी म्हणालो."

"पण इतर डॉक्टरांकडून अशी समानतेची वागणूक मिळत नाही. म्हणूनच आम्हाला तुमच्याकडून आमच्या पेशंटना मिळणारी वागणूक मोठी वाटली, ती म्हणाली.

तिचे म्हणणे मला फारसे पटले नाही. कारण माझे काही सहकारी पेशंटशी बोलताना फारशी आपुलकी दाखवत नसले तरी ट्रीटमेंट देण्याबाबत कोणीही दुर्लक्ष करणार नाही, याची मला खात्री होती. डॉक्टर असले तरी शेवटी तेदेखील माणूसच ना, त्यामुळे व्यक्ती तितक्या प्रकृती. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असणार हे साहजिकच मी असा विचार करत असतानाच त्या कार्डवरचा मजकूर चाळू लागलो. मला आढळले की, त्या कार्डवर छापलेले 'स्विफ्ट वाश' हे चक्क एका लाँड्रीचे नाव होते. पण ती एकी पुनर्वसन कार्यक्रमांतर्गत चालवली जाणारी लाँड्री होती. त्या कार्डवर आणखी एक नाव होतं, 'अर्ज'.

आता हा अर्ज नेमका काय आहे हे जाणून घेण्यासाठी वाचा या मालिकेची पुढचा भाग!

क्रमशः

डॉ. रुपेश पाटकर

लेखक

Updated : 22 Oct 2022 4:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top