Home > Top News > वर्तमानपत्रांचे भाग्य ना कुंडलीमध्ये लपले, बाकीचे झोपले, तेव्हा 'ते' रात्रीचे जागले!

वर्तमानपत्रांचे भाग्य ना कुंडलीमध्ये लपले, बाकीचे झोपले, तेव्हा 'ते' रात्रीचे जागले!

वर्तमानपत्रांचे भाग्य ना कुंडलीमध्ये लपले, बाकीचे झोपले, तेव्हा ते रात्रीचे जागले!
X

वर्तमानपत्रं सकाळी तुमच्या घरात पोहोचतात. कारण, रात्रभर आमचे हे लोक जागत असतात. तुम्ही तुमच्या घरात सुखानं झोपी जाता. त्यानंतर रात्रीच्या गर्भात इथं उद्याची कहाणी सुरू होते. नवनिर्मितीच्या दैनिक सोहळ्याची गडबड आकार घेऊ लागते. संपादकीय विभाग एकेक पान फायनल करत जातो. जाहिरात विभाग आपल्या जाहिरातींवरून एकवार नजर फिरवतो. संगणकांवरून आलेल्या पानांची प्लेट प्रेसवर तयार होत जाते. एकेका पानाच्या चार-चार प्लेट तयार होतात. प्लेटवरील अक्षरमुद्रा उमटवून घेण्यासाठी कागदाचे मोठमोठाले रोल सज्ज असतात. चारही रंगाची शाई सोडण्यासाठी टॉवर्स उत्सुक असतात. त्यांना न्यूज रुमकडून येणा-या पानांची प्रतीक्षा असते.

सगळी पानं येतात. प्लेट्स तयार होतात. मशीनला प्लेट्स लागतात. मग, मशीन सुरू होते आणि अंकाची छपाई होत जाते. रंग मॅच होतात का, फोटोचं रजिस्ट्रेशन बरोबर होतंय ना, हे बघितलं जातं. 'ग्रे बार'कडं बारकाईनं लक्ष असतं. प्रिंटिंग नीट झालं तर पाहिजेच. शिवाय, कागद फाटू नये. वेस्टेज वाढू नये. डेडलाइन चुकू नये, असं सगळं बघताना सुरूवातीचे काही अंक फेकून द्यावे लागतात. मग मशीन 'मोसम' पकडते. आणि, मागे वळून न पाहाता सुसाट धावत राहाते...

पूर्ण अंकच्या अंक फोल्ड होऊन मशीनमधून अलगद खाली उतरत जातो. त्याची आपोआप मोजणीही होत जाते. आणि, बाहेर पेपरच्या वाटेकडं डोळे लावून उभ्या असलेल्या निशाचर टॅक्सीमध्ये गरमागरम गठ्ठे ठेवले जातात. तुमच्या घराच्या दिशेनं येण्यासाठी भल्या पहाटे या टॅक्सी निघतात. गाव- शहरांचे सुस्तावलेले चौक या गठ्ठ्यांच्या हालचालींनी वर्तमानात येतात.

ठिकठिकाणचे एजंट्स, त्यांची लाइनवरची पोरं यांची तिथं झुंबड उडते. एजंट्स आपापले गठ्ठे उचलतात. लाइनवरच्या पोरांकडं त्यांचा वाटा दिला जातो. मग, पडत्या पावसात- कुडकुडत्या थंडीत हा पोरगा तळहातावरच्या फोडासारखा पेपरला जपत सायकल दामटत राहातो. आणि, तुम्ही जागे व्हायच्या आत अंगणात वर्तमानाचा हा लेखाजोखा मांडून ठेवतो.

संपादकांच्या सहीला मिरवत सर्वदूर जाणा-या वर्तमानपत्राचे खरे शिल्पकार हे लोक असतात. रातराणीचे हे चालक आहेत, म्हणून हा खटाटोप अव्याहत सुरू आहे! मला सुरूवातीपासूनच या टीमविषयी आकर्षण आहे. नवा-नवा संपादक झाल्यावर मी रात्र-रात्र प्रेसमध्ये थांबायचो आणि एखाद्या टॅक्सीत बसून चौका-चौकातली ती झुंबडही अनुभवायचो.

ज्या पेपरसाठी तुम्ही चार-पाच रुपये मोजता आणि काही मिनिटांचा वेळ देता, त्यामागे किती हॅपनिंग आहे, हे तुम्हालाही कळायला हवंच ना! असो. तर, वर्तमानपत्राची छपाई करणा-या आमच्या 'प्रॉडक्शन विभागा'च्या सहका-यांचा जाहीर गुणगौरव आता रात्रीच आम्ही प्लान्टवर केला. निमित्त होतं, विश्वकर्मा जयंतीचं. छपाई कर्मचा-यांना ना घरून काम करता येते, ना 'शिफ्ट' बदलण्याची सोय असते.

वर्तमानपत्रात त्यांचं ना नाव छापून येतं, ना फोटो उमटतो. पण, डोळ्यांत तेल घालून ही माणसं अशा संकटकाळातही रात्रीचा दिवस करतात, तेव्हा आपला गरमागरम दिवस सुरू होतो.

माझ्यासोबत, आमचे सीइओ तथा स्टेट बिझनेस हेड निशित जैन, स्टेट प्रॉडक्शन हेड- नावातच विश्वकर्मा असलेले- आशिष विश्वकर्मा, स्टेट एचआर हेड अन्वर अली, युनिट प्रॉडक्शन हेड दीपक चौगुले, चंद्रकांत पाटील अशा वरिष्ठ अधिका-यांची टीम होती.

- संजय आवटे

Updated : 19 Sep 2020 4:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top