Home > मॅक्स ब्लॉग्ज > अस्वस्थ करणारी 'ती' दोन चित्रं

अस्वस्थ करणारी 'ती' दोन चित्रं

जहांगीर आर्ट गॅलरीतलं चित्रप्रदर्शनात तिथल्या 'Revolution and Counter Revolution' या प्रदर्शनातील कापूस उत्पादक शेतकऱ्याशी संबंधित दोन चित्रं अस्वस्थ करणारी होती, त्यानिमित्ताने मातीशी नातं सांगणाऱ्या भावना व्यक्त केल्या आहेत राज्य निवडणूक आयोगाचे सहायक आयुक्त जगदीश मोरे यांनी...

अस्वस्थ करणारी ती दोन चित्रं
X

कापसाच्या एका बोंडात पाच लाख धागे असतात, असं म्हणतात. कापसाची रूई, रुईचं सूत, सुताचं कापड. कापसाची सरकी, सरकीचं तेल आणि पशुखाद्य, असे बरेच धागे एकमेकांत विणले गेले आहेत. या धाग्यांशी प्रत्येकाचं प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष नातं आहे. कापसाचा कोणताही धागा पकडा, तिथून आपल्या नात्याची सुरुवात होते. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी जगण्याचं आणि मरणाचंही कारण कापूसच आहे. कापूस अंग झाकतो. जखमेवर अलगद बसतो. अंथरुणावर निद्रिस्त करतो. सरणावरच्या ओंडक्यांना भडकविणाऱ्या पऱ्हाटीच्या काड्या निर्जीव देहाची राख करण्यास हातभार लावतात.

माझीच कपाशी
मीच उपाशी
माझंच बोंड
माझीच बोंब
माझाच धागा
माझाच फास
माझचं सरण
माझंच मरण

हे सूचण्याचं निमित्त आणि ठिकाण होतं, जहांगीर आर्ट गॅलरीतलं चित्रप्रदर्शन! तिथल्या 'Revolution and Counter Revolution' या प्रदर्शनातील कापूस उत्पादक शेतकऱ्याशी संबंधित दोन चित्रं अस्वस्थ करणारी होती. कापसाच्या धाग्याशी असलेल्या नात्याची आठवण करून देणारी होती. प्रदर्शनात इतरही अनेक लक्षवेधी चित्रं आणि कलाकृती होत्या. श्री. सुरज नागवंशी यांचं चित्र बारकाईनं वाचल्यास- बघितल्यास पांढरं सोन्याचं भीषण वास्तव अंगावर आलं. श्री. मॉग्लॅन श्रावस्ती याच्या चित्रातल्या शेतऱ्याच्या फासानं मन सुन्न झालं; पण ते आशेचा किरणही दाखवणारं होतं.

कापूस म्हणायला नगदी पीक आहे. त्याचं दुखणंही नगदीच आहे. ते जीवघेणं आहे. राज्यातील सर्वाधिक कापूस उत्पादन विदर्भात होतं. शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या विदर्भातच झाल्या. मराठवाडा आणि खानदेशातील कापूस उत्पादकही वैतागले आहेत. कापसाच्या इतिहासाचं उत्खनन केल्यावर त्याची मूळं बरीच खोलवर असल्याचं संशोधकांनी हेरलं आहे. ज्ञात असलेलं सर्वात जुनं कातलेलं सूत मोहें-जो-दरो येथील उत्खनात सापडलं आहे. यावरून इ. स. पूर्व 3,000 वर्षांपासून भारतात कापूस लागवड होत असावी, असा निष्कर्ष आहे. कापसावरचं मीना मेनन आणि उझरम्मा यांचं 'अ फ्रेड हिस्ट्री- द जर्नी ऑफ कॉटन इन इंडिया' हे अलीकडंचं पुस्तकं कापसाच्या इतिहासाचा उलगडा करतं.

जगाचा विचार केल्यास भारतात कापसाचं सर्वाधिक क्षेत्र आहे. तुलनेनं उत्पादनात मात्र मागं आहे. कापसाच्या क्षेत्राबाबत महाराष्ट्र देश पातळीवर अव्वल आहे; पण उत्पादनात हवा आहे. महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्हा कापूस लागवडीत सर्वात पुढं आहे. तिथंच अधिकाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत.

महाराष्ट्रातला सर्वाधिक कापूस विदर्भात पिकतो. सूतगिरण्यांचा बोलबाला मात्र पश्चिम महाराष्ट्रात आहे. पांढरं सोनं पिकतं विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशात. महाराष्ट्राचं मँचेस्टर- इचलकरंजी मात्र कोल्हापूरात आणि भरभराट मुंबई बंदराची. मुंबई विद्यापीठातील राजाबाई टॉवरचासुद्धा एक धागा कापसाशी संबंधित आहे.

अमेरिकेतील गृहयुद्धामुळे ब्रिटनला कापसाची कमतरता भासू लागली. तेव्हा मुंबईमार्गे इंग्लंडमध्ये कापूस निर्यात होऊ लागला. कापसाच्या गाठी ठेवण्याचं ठिकाण 'कॉटन ग्रीन' नावानं ओळखलं जाऊ लागलं. (हार्बर लाईननं जाताना कॉटन ग्रीन स्टेशन लागतं; पण तिथं आता कापसाचा मागमूसही नाही जाणवत.) सूत गिरण्यांमुळे 'गिरणगाव' नावारुपास आलं. (गिरण्यांच्या थडग्यांवर आता गगनचुंबी इमारती दिसतात.) कापसाच्या व्यापारात मुंबईनं उचल खाल्ली. भरभराटही झाली; पण कापूस भारतातला आणि कापड इंग्लंडचा. कापूस स्वस्त; कापड महाग. म्हणून संत तुकडोजी महाराज म्हणाले होते, 'कच्चा माल मातीच्या भावे, पक्का होताची चौपटीने घ्यावा'

प्रदर्शनातील कापसाच्या चित्रानं बरीच वर्षे मागं नेलं. दहा रुपये रोजंदारीवर कापूस वेचणीचे दिवस आठवले. पाठीवर किटनाशक फवाणी यंत्र ठेवत एका हातानं हापसे आणि दुसऱ्या हातानं फवारणी करतानाचा उग्र विषारी वासाच्या आठवणी अजूनही झोंबतात. अनेकांचं आजही तेच प्राक्तन आहे. पत्रकारितेतून सरकारी नोकरीत आल्यावर आत्महत्याग्रस्त पूर्व विदर्भात फिरता आलं. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या तत्कालीन महासंचालक Manisha Patankar Mhaiskar मॅडम यांच्या संकल्पनेतून हा दौरा आयोजित करण्यात आला होता. त्यातून यशोगाथा शोधायच्या होत्या. लिहायच्या होत्या. खरं तर यशोगाथेपेक्षा प्रतिकूल स्थितीशी संघर्ष करत धिरानं उभ्या राहणाऱ्या शेतकरी कुटुंबाच्या प्रेरणादायी कहाण्याचं संकलन करायचं होतं. विदर्भात फिरताना वेगळ्या अंगानं कापसाच्या शेतीकडं आणि शेतकरी कुटुंबांकडं पाहता आलं.

कपाशीच्या पिकावर चौहबाजुनं हल्ले होत राहतात. मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढऱ्या माशा, पिठ्या ढेकूण शेतकऱ्यांच्या काळजाची लचके तोडतात. वेचणीला येऊ पाहणारी बोंडं अळी हिरावून नेते. आतड्यांना चिमटे बसतात. पिकावरचा लाल्या रोगाचा पादुर्भाव थेट शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर दिसतो. मर रोग फासाचा धागा शोधण्यासाठी उद्दिपित करतो. बेईमान पाऊस हवा तेव्हा रुसतो आणि नको असताना कोसळतो.

निसर्ग साथ देतो तेव्हा कापूस उत्पादकांचा बाजारात पराभव होतो. निर्सग साथ सोडतो तेव्हा बाजार खुणावतो; पण शेतच नागवं झालेलं असतं. यंदा कापसाचा प्रतिक्विंटल भाव दहा- बारा हजार रुपयांवर गेला; पण ऊरी फक्त खंतच आहे. बाजारा वधारण्याआधीच पावसानं सर्वच धुवून काढलं. झाडाला बोंड ठेवलं नाही. किंबहुना त्यामुळेच बाजार वधारला आणि शेतकरी बेजार झाला. पावसानं झाडालाही सडवलं. शेतकऱ्याला रडवलं. कधी ओला; तर कधी कोरडा दुष्काळ, हेच शेतकऱ्याच्या ललाटी लिहिलं आहे.

श्री. सुरज नागवंशी यांचं चित्र कापसाच्या शेतीची भीषणता मांडतं. कॅन्व्हासभर असलेला भडक लाल रंग भीतीदायक वाटतो. शेतकरी आत्महत्यांचं कटू सत्य सांगतो. शेतकऱ्याच्या रक्तानं माखलेल्या संपूर्ण शेतीत कुठं तरी कापसाची शुभ्र बोंडं दिसतात. आभाळात लुकलुकणारं एखादं चादणं संपूर्ण अंधार भेदत नाही. दिसायला फक्त सुंदर असतं. कॅन्व्हासवरची बोंडंही सुदंर; पण शेतातलं एखादं- दुसरं सुंदर बोंड जगण्यास बळ देण्यासाठी पुरेसं नसतं. ते कष्टाचं पुरेसं फळ नसतं, हे विदारक चित्र काळजी पिळवटणारं असतं.

'क्रांती- प्रतिक्रांती' या प्रदर्शनातलंच श्री. मॉग्लॅन श्रावस्ती यांचं चित्र कटू वास्तव दर्शवताना आशेचा मार्गही दाखवतं. कुटुंबाचा आधारवड हरपल्यानं झालेली हानी भरून निघणार नाही; परंतु आता पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी लढावं लागेल, हेच ते चित्र सांगतं. त्यात फास घेतलेला शेतकरी बाप, मेलेला बैल या पार्श्वभूमीवर एक आई मुलीला पुस्तकातलं काही तरी वाचवून दाखवत आहे. शिक्षण हीच भविष्याची आशा आणि दिशा आहे. तोच एक उन्नतीचा मार्ग आहे, तेच ही थरारक चित्रकथा सांगत असते.

-जगदीश मोरे.

Updated : 20 April 2022 2:37 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top