Home > मॅक्स ब्लॉग्ज > दिलीप कुमार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भेट आणि देणगी...

दिलीप कुमार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भेट आणि देणगी...

दिलीप कुमार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भेट कुठं झाली? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलीप कुमार यांनी दिलेली देणगी का नाकारली? वाचा मुकुल निकाळजे यांनी लिहिलेला भेटीचा क्षण...

दिलीप कुमार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भेट आणि देणगी...
X

हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे आज वयाच्या 98 व्या वर्षी निधन झाले. अनेक लोकप्रिय सिनेमे देणाऱ्या, प्रेक्षकांच्या मनावर दीर्घकाळ राज्य करणाऱ्या, मुस्लिम ओबीसींच्या सामाजिक न्यायाच्या चळवळीत 1990 साली स्वतः सहभागी होऊन या चळवळीला गती देण्यासाठी काम केलेल्या या पडद्यावरील व खऱ्या आयुष्यातील नायकास विनम्र आदरांजली!!!

बाबासाहेब आणि दिलिप कुमार यांच्यातील भेट...

औरंगाबाद येथील अशोक हॉटेल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दिलीप कुमार यांची एकदा भेट झाली होती. बाबासाहेब औरंगाबादला आल्यानंतर याच हॉटेलमध्ये थांबत असत. ज्यावेळी ही भेट झाली तेव्हा बाबासाहेब आपल्या मिलिंद महाविद्यालय चालवण्यासाठी निधीची जुळवाजुळव करण्याच्या कामात व्यग्र होते.

एकदा बाबासाहेब आणि दिलीप कुमार हे एकाच वेळी याच हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. तोपर्यंत दिलिप कुमार यांनी सिने जगतात प्रचंड लोकप्रियता मिळवलेली होती. माईसाहेब (सविता कबीर) यांचे भाऊ बाळू कबीर यांनी त्यांची व बाबासाहेबांची भेट घडवून आणली.

या भेटीत दोघांनीही एकमेकांचे अतिशय उत्साहात स्वागत केले. राजकारण, सामाजिक परिस्थिती विषयी दोघांनी बरीच चर्चा केली. बोलता बोलता दिलीप कुमार यांनी बाबासाहेबांना मिलिंद महाविद्यालयासाठी मोठी रक्कम देणगी म्हणून देण्याची इच्छा व्यक्त केली. ती नाकारत बाबासाहेब त्यांना म्हणाले की

"तुमच्या सिनेमा सृष्टीतील लोकांना चारित्र्य नाही, त्यामुळे मी तुमची देणगी स्वीकारून माझ्या विद्यार्थ्यांना तुमचा आदर्श देऊ इच्छित नाही". यावर बाबासाहेब आणि दिलिप कुमार यांच्यात मतभेद झाले.

माईसाहेब आणि बाळू कबीर या दोघांचीही इच्छा होती की, बाबासाहेबांनी दिलीप कुमारांची देणगी स्वीकारायला हवी होती, आपल्याला मिलिंद कॉलेजच्या उभारणीसाठी निधीची फार आवश्यकता आहे.

बाळू कबीर या भेटी नंतर बाबासाहेबांना म्हणाले की आपण दिलीप कुमार यांनी देऊ केलेली रक्कम स्वीकारायला पाहिजे होती. त्यावर बाबासाहेब बाळू कबीर यांच्यावर रागावले, ते त्यांना म्हणाले

"तू मूर्ख आहेस, मी या देणगीसाठी माझ्या तत्वांसोबत तडजोड करू शकत नाही, मग भलेही माझं कॉलेज बंद पडलं तरी चालेल". अश्याप्रकरे दिलीप कुमार यांचा आपले तत्व आणि स्वाभिमान राखून जगणाऱ्या बाबासाहेबांसोबत सामना झाला होता. ऐन तारुण्यात प्रसिद्धीच्या शिखरावर असताना बाबासाहेबांसोबतचा असा प्रसंग अनुभवल्या मुळे नक्कीच दिलीप कुमार यांच्या व्यक्तिमत्वात बदल झाला असावा आणि म्हणूनच नंतर ते मुस्लिम मागासवर्गीयांच्या सामाजिक न्यायाच्या चळवळीत सहभागी झाले असावेत.

मुकुल निकाळजे

(भेटीचा संदर्भ - डॉ. सविता आंबेडकर यांनी लिहिलेल्या 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहवासात' या पुस्तकात या भेटीचा उल्लेख करण्यात आला आहे.)

Updated : 7 July 2021 12:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top