Top
Home > मॅक्स ब्लॉग्ज > पूजा चव्हाण प्रकरणातील विविध कंगोरे

पूजा चव्हाण प्रकरणातील विविध कंगोरे

टिकटॉक स्टार आणि कथित सामाजिक कार्यकर्ती पुजा चव्हाण हिच्या मृत्यूनंतर राज्याचे वनमंत्री संजय राठोड आरोपीच्या पिंजऱ्यात असून ते अनेक दिवसापासून गायब आहेत. बंजार समाज पंचायतीने या प्रश्नात लक्ष घातल्यानं यातील विविध कंगोऱ्यावर भाष्य केलयं सामाजिक कार्यकर्त्या प्रा.डॉ.अनुप्रिया खोब्रागडे यांनी....

पूजा चव्हाण प्रकरणातील विविध कंगोरे
X

एखाद्या घटनेला धार्मिक किंवा राजकीय रंग देण्याची परंपरा भारतात नवी नाही. राजकारणात तर विरोधी पक्षांना असे मुद्दे सतत हवे असतात. एखादी घटना वादग्रस्त करणे व ती घटना कोळसा सारखी सतत जळत ठेवावी लागते. त्याला हवाही द्यावी लागते. मात्र सत्तेवर असलेले राजकारणी बचावात्मक पवित्रा घेतात आणि मोघम बोलून तो जळता कोळसा विझवण्याचा प्रयत्न करतात. राजकारणात कुणाला कसे पद्धतशीरपणे संपवायचे, यासाठी साम, दाम, दंड, भेद या चारही नीतीचा वापर केला गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. राजकारणात प्रत्येकाला एकमेकांच्या नाड्या माहीत असतात.

योग्य वेळ आल्यावर त्या आवळल्या जातात. तसे पाहिले तर इथे कोणीही कोणाचा नाही. समुद्रात जहाज बुडायला लागले तर सर्वात आधी उंदीर जहाज सोडून पळायला लागतात. राजकारणातही फारसे काही वेगळे चित्र नाही. अंगाशी आल्यावर जो तो कातडीबचाऊ धोरण अवलंबितो. हे सारे खरे असले तरी समाजात काही बुद्धिजीवी, सामान्य, शैक्षणिक, धार्मिक गटही आहेत ते अशा प्रकरणांकडे कोणत्या भूमिकेतून पाहतात हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. या पार्श्वभूमीवर नुकत्याच 7 फेब्रुवारी 2021 रोजी झालेल्या पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्ये कडे विविध कंगोऱ्यातून पाहाणे व त्यावर सामाजिक परीक्षण करणे अगत्याचे ठरते. या प्रकरणात पोलिसांनी ADR म्हणजेच 'ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट' तयार केला. कोणावरही अजून FIR दाखल नाही. दर दोन-चार दिवसांनी नवीन नवीन गोष्टींची भर या प्रकरणात पडत आहे.

न्यूज चॅनेलवाल्यांना 'ब्रेकिंग न्यूज' मिळाली आहे. विरोधकांना आयते 'भांडवल' मिळाले आहे. पूजाचे कुटुंबीय प्रत्येक वेळी आपले वक्तव्य बदलत आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत पुणे पोलिसांकडून रिपोर्ट मागवले आहेत. न्यायालयीन कामकाज कायद्याच्या अखत्यारीत राहून होईल परंतु यानिमित्ताने पुन्हा काही प्रश्न ऐरणीवर आलेले आहेत आणि सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून ते महत्त्वपूर्ण ठरतात. हे एका फुले शाहू आंबेडकरी विचारांच्या पुरोगामी महाराष्ट्रातील सामान्य नागरिकाच्या मनात उपस्थित झालेले प्रश्न आहेत. मुळात 'व्हिक्टिम' ठरलेली पूजा चव्हाण कोणत्या समाजातील होती? संशयित आरोपी अरुण राठोड विलास चव्हाण हे कोणत्या समाजातील होते? या दृष्टिकोनातून या प्रकरणाकडे पाहण्यात मुळात समाजस्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून घातक ठरू शकते.

पूजा, अरुण, विलास या तरुणांच्या निमित्ताने समस्त तरुण वर्गाची मानसिकता, त्यांच्या समोरील आव्हाने, प्रश्न आणि त्यांनी त्यांच्या परीने शोधलेली उत्तरे यावर विचार करणे महत्त्वाचे ठरते. त्यामुळे त्या तरुणांचा समाज कोणता आहे? हा प्रश्न गौण ठरतो. पहिल्या प्रश्नाकडे लक्ष वेधले जाते ते, राजकारणी अशा तरुणांचा कसा वापर करून घेतात? या प्रश्नाकडे. याचे जिवंत उदाहरण या प्रकरणामुळे दिसून येते.साधारणपणे राजकारण मग ते स्थानिक स्वराज्य संस्थेतील नगरसेवक असो किंवा आमदार खासदार, ते अशा तरुणांना हेरतात, त्यांच्या प्रश्नांना कुरवाळत, त्यांना जवळ करतात. मग त्या तरुणाच्या घरातील कोणी दुर्धर आजाराने ग्रस्त असले, घरात कोणाचे लग्न निघाले, एखादे प्रकरण घडले तर अशावेळी हे राजकारणी यांच्या मदतीला धावून जातात. समुद्रातून लोटाभर पाणी काढले तर काहीच फरक पडणार नसतो. ते त्यांना पैसा पुरवतात.

मग हे राजकारणी त्या तरुणांच्या गळ्यातला ताईत बनतात ते कायमचा. कारण त्यांनी त्यांच्या घरादाराला टेकू दिलेला असतो. कठीण प्रसंगी केलेली मदत तो तरुण कधीच विसरत नाही. मदत क्षणभराची असते, पण तो तरुण आयुष्यभर त्या उपकाराच्या ओझ्याखाली दबला जातो. तो आपल्या कुटुंबाशी नाही, एखाद्या महापुरुषाच्या विचारधारेशी नाही, आपल्या तत्वांशी नाही पण त्या राजकारण्याशी बांधील राहतो आणि यातच आपल्या आयुष्याचे सार्थक मानतो. ही स्ट्रॅटीजी कळायला त्याचे आयुष्य निघून जाते किंवा आयुष्याच्या शेवटीसुद्धा हे कळत नाही. राजकारण्याला आपला उद्धारकर्ता माणतात. त्याने सोडलेला हुकूम तळहातावरील फोडाप्रमाणे जपतात. अरुण राठोड आणि विलास चव्हाण यांच्या बाबतीतही तसेच झाले.

संजय राठोड हे वनमंत्री असल्यामुळे त्यांच्या वरदहस्तामुळे वनखात्यात ते नोकरीला लागले आणि संजय राठोड यांच्या ओझ्याखाली दबले गेले. ज्या व्यक्तीने आपल्या आयुष्याचे कल्याण केले त्यासाठी ते काहीही करण्यास तयार झाले.नीती-अनीतीचे भान ते विसरून गेले आणि चिखलात पाय रुतत जावे, तसे हे दोघे या प्रकरणात रूतत गेले. येथे बंजारा समाजाचा काहीच संबंध येत नाही. पूजा चव्हाण च्या निमित्ताने देखील पुन्हा काही प्रश्न समाजात उपस्थित होतात. हे प्रश्न फक्त बंजारा समाजापुरतेच मर्यादित नाहीत. भारतातील प्रत्येक नागरीकासाठी ते महत्त्वपूर्ण ठरतात. एक म्हणजे, काय स्त्री स्वातंत्र्याचा अर्थ पुन्हा एकदा तपासून पाहण्याची गरज निर्माण झाली आहे? स्त्री स्वातंत्र्य म्हणजे नेमके काय? याचे पुन्हा परीक्षण करण्याची वेळ आली आहे.

दुसरा प्रश्न उपस्थित होतो तो विवाहबाह्य संबंधाचा. या विवाहबाह्य संबंधातून दोन्ही कुटुंबाच्या सदस्यांना अनेक प्रकारच्या मानहानीला तर सामोरे जावे लागतेच परंतु यातून गुन्हेगार सुद्धा जन्माला येण्याची भीती नाकारता येत नाही (गुन्हेगारांच्या मानसिकतेत बालपणी त्यांच्या मनावर झालेले खोलवर आघात त्यांना गुन्हेगारीकडे व व्यसनाधीनतेकडे नेण्यास प्रवृत्त केल्याचे मानसशास्त्रज्ञांनी अभ्यासाअंती स्पष्ट केले आहे) पुढचा प्रश्न आहे तो यशाचा 'शॉर्टकट' मार्गाचा. 'मेहनतीला पर्याय नाही' हे सूत्र विसरून स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, यशाचे शिखर गाठण्यासाठी एखाद्या नावाचा शिडीसारखा वापर करणे भीतीदायक आहे.

सापशिडीच्या खेळाप्रमाणे इथे फार वर गेल्यावर सर्पाच्या तोंडालाही सामोरे जायचे आहे आणि त्यात आपण धाडकन खाली येऊ शकतो हे आजच्या तरुणांना विसरून चालणार नाही. 'टिक-टॉक' सारख्या आभासी जगाने देखील तरुणवर्गात धुमाकूळ घातला आहे. 'टिक-टॉक' च्या विळख्यात आजचा तरुण वर्ग अडकत चालला आहे. जणू 'टिक-टॉक' वर जास्तीत जास्त 'फॉलोअर' निर्माण करणे, हेच 'करिअर' आहे. सामान्य घरातील असूनही उंची, महागडे कपडे आणि वस्तू वापरण्यासाठी तरुणवर्ग कोणत्याही थराला जायला तयार आहे. पूजाच्या वडिलांच्या निमित्ताने आणखी एक प्रश्न उभा राहतो तो कमकुवत घटकावर 'दबावतंत्र' वापरण्याचा. पोटची मुलगी गेल्याच्या दुःखातून सावरायला वेळ न देता 'पूजा चक्कर येऊन पडली', 'पूजा सोरायसिस च्या आजाराने त्रस्त होती', 'पूजावर कर्जाचा डोंगर होता' असे 'स्टेटमेंट' द्यायला लावून 'दबावतंत्र' वापरले जात आहे. मग ते राजकारण्यांकडून असो किंवा त्यांच्या समाजाकडून किंवा शासकीय यंत्रणेकडून असो. पुढचा मुद्दा येतो तो बुद्धिजीवी वर्गाचा. जो 'क्रीम वर्ग' समजला जातो. काही अपवाद वगळता हा बुद्धिजीवी वर्ग आपला काहीच संबंध नसल्यासारखे फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. ही बाब तर सर्वाधिक घातक वाटते.

समाजाला योग्य त्या दिशेने नेणे समाजाला भरकटण्यापासून परावृत्त करणे व समाजरुपी नावेचे नाविक बनण्याची जबाबदारी खरे तर या वर्गाकडे आहे परंतु हा वर्ग किनारी बसून नाव बुडताना गंमत पाहत आहे. त्यानंतर प्रश्न उपस्थित होतो तो बंजारेतर समाजाचा. मंत्री किंवा ते तरुण आपल्या समाजातील नाही ना? मग कशाला घ्यायचे उर बडवून ! अशी भूमिका इतर समाजाने घेतलेली दिसते. वेगवेगळ्या जातीत वाटल्या गेलेल्या समाजाचे प्रश्नही जातीप्रमाणे वाटले गेले तर या बहुजनांत कधीच एकी निर्माण होणार नाही आणि समाजाची वाताहत व्हायला वेळ लागणार नाही. या प्रकरणामुळे आणखी एक प्रश्न समोर येतो तो 'जात पंचायती' चा. जागतिकीकरणानंत रची तीस वर्षे उलटून गेली. तरी बऱ्याच समाजात जात पंचायतीचा पगडा जबरदस्त आहे. त्यात वैचारिक स्वातंत्र्याला आणि मताला थारा नाही. सदर प्रकरणात जात पंचायतीने बैठक घेऊन निर्णय घेतला आहे, तीच 'जातपंचायती' च्या तोंडची भाषा बंजारा समाज बोलत आहे.

शेवटी जाता जाता आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो बंजारा समाजाचा संजय राठोड यांना समर्थन देण्याचा. भटकंती करणारा, शेती करणारा, मजुरी करणारा हा बंजारा समाज. या समाजाचे नेतृत्व करणाऱ्या संजय राठोड यांनी आपल्या समाजाबद्दल प्रचंड कार्य करून ठेवले आहे या पार्श्वभूमीवर पूजा चव्हाणच्या प्रकरणातील त्यांची कृती 'जस्टिफाय' करता नाही. निदान गुन्हा सिद्ध होईपर्यंत बंजारा समाजाने तटस्थ भूमिका घेणे समाज हिताचे ठरेल. बंजारा समाजाच्या निर्णयाकडे आणि भूमिकेकडे आख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. संपूर्ण बंजारा समाज 'संत सेवालाल' यांना आदर्श, दैवत मानतात. त्या 17 व्या शतकातील संत सेवालाल यांनी 22 वचने सांगितली आहेत. त्यातील दोन वचने इथे मांडणे अगत्याचे ठरते. 1. अनैतिक संबंध ठेवू नका. 2. महिलांचा आदर करा.

बंजारा समाजासाठी संत सेवालाल यांची वचने महत्त्वाची ठरतात की संजय राठोड केवळ आपल्या समाजातील आहे म्हणून पाठिंबा जाहीर करणे महत्त्वाचे ठरते. स्वतः संत सेवालाल यांनी व्यक्तिपूजेला विरोध केला होता व संजय राठोड या नावाची बंजारा समाजाकडून होणारी व्यक्ती पूजाच म्हणता येणार नाही का? खरे तर साऱ्या व्यक्ती एकाच समाजातील असल्याने बंजारा समाज दुहेरी कात्रीत सापडला आहे.

पूजा चव्हाण आणि संजय राठोड या या तराजूत संजय राठोड नावाचे पारडे जड झाले आहे परंतु या पारड्यात संजय राठोड नाव नसते या पारड्यात दुसऱ्या समाजातील व्यक्तीचे नाव असते तर पूजा चव्हाण नावाचे तर पारडे जड झाले असते आणि "बंजारा समाजातील पूजा चव्हाण ला न्याय मिळालाच पाहिजे", "आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे" असे नारे बंजारा समाजाने मोर्चे काढून दिले असते. परंतु 'आपलेच दात आपलेच ओठ' अशी अवस्था बंजारा समाजाची झाली आहे, हे नाकारता येणार नाही. या संपूर्ण पार्श्वभूमीवर खऱ्या अर्थाने सबंध समाज वर्गाला, मग तो कोणताही असो गरज निर्माण झाली आहे ती महापुरुषांच्या विचारधारेची.


प्रा.डॉ.अनुप्रिया खोब्रागडे

Updated : 2021-02-23T12:43:39+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top