Home > मॅक्स ब्लॉग्ज > टपरीवर ७ रुपयाला असणारा चहा सीसीडीमध्ये १०० रुपयांना का?

टपरीवर ७ रुपयाला असणारा चहा सीसीडीमध्ये १०० रुपयांना का?

चहाच्या टपरीवर ७ रुपयाला मिळणारा कटिंग चहा, सीसीडी किंवा बॅरीस्टा मध्ये १०० रुपयांना का मिळतो? वाचा अर्थज्ञान मध्ये संजीव चांदोरकर यांचं विश्लेषण

टपरीवर ७ रुपयाला असणारा चहा सीसीडीमध्ये १०० रुपयांना का?
X

चहाच्या टपरीवर ७ रुपयाला कटिंग चहा आणि सीसीडी किंवा बॅरीस्टा मध्ये १०० रुपयांना चहा ? याचे सैद्धांतिक अन्वयार्थ लावण्याची गरज आहे एक बाजू: दोन्ही ठिकाणी चहा मिळतो मग किंमतीत एवढा फरक का? ही भांडवलशाहीची नफेखोरी आहे ही अगदी बाळबोध मांडणी झाली. दुसरी बाजू म्हणते सीसीडीतील चहाचा उत्पादन खर्च जास्त असल्यामुळे, चहा उच्च गुणवत्तेचा असल्यामुळे ते जास्त पैसे लावतात.

टपरीवर काय होते ?

पाणी, दूध, चहा पावडर यांच्यात गॅस / ऊर्जा आणि मानवी श्रम यांच्या मार्फत मूल्यवृद्धी केली जाते; ज्यावेळी आपण ७ रुपये कटिंग चहाला देतो. त्यावेळी त्या सर्वांना त्याचा वाटा मिळत जातो. चहाची टपरी साधी असते; ती भांडवल सघन (कॅपिटल इंटेन्सिव्ह) नसते. ७ रुपयातून भांडवलाकडे परतावा जाण्याला फारसा वाव नसतो

सीसीडीमध्ये काय होते ?

सीसीडी मध्ये जाणारे फक्त चहाचा उपभोग घेत नाहीत तर तिथल्या वातावरणाचा (अँबियन्स) देखील चहाबरोबर उपभोग घेऊ इच्छितात. सीसीडी हा फॉरमॅट भांडवली आहे; हे सगळे जॉईंट मोक्याच्या जागांवर असतात. ते विकत घेण्यासाठी सीसीडी कोट्यवधी रुपये मोजते; त्यातील फर्निचर, वातावरण निर्मिती यासाठी अजून काही कोटी रुपये ओतते.

इथे देखील चहापत्ती / दूध वगैरे भले चांगल्या प्रतीचे वापरले असले तरी गॅस / ऊर्जा आणि मानवी श्रममार्फत मूल्यवृद्धी झाली तरी खरी मूल्यवृद्धी वातावरणनिर्मितीतून होते. जी भांडवलच तयार करते.

भांडवलशाही भांडवलाला रिचवण्यासाठी अधिकाधिक भांडवल सघन फॉरमॅट उभे करीत आहे. त्यामुळे दोन गोष्टी घडत आहेत.

(अ) आपण जी किंमत मोजतो त्यातून मोठा परतावा भांडवलाकडे वळेल; यामुळे मानवी श्रमामार्फत होणारी मूल्यवृद्धीचा वाटा कमी होत जाणार आणि भांडवलाने केलेल्या मूल्यवृद्धीचा वाटा वाढत जाणार आहे.

(ब) मुख्य म्हणजे मालक म्हणून सारी निर्णय घेण्याचा अधिकार भांडवलाकडे वर्ग होईल. मानवी श्रमाला किती वेतन द्यायचे. मुळात ते दुकान चालवायचे का बंद करून टाकायचे इत्यादी

ही अंतर्दृष्टी आली की भांडवलशाहीत होणारे अनेक बदलांचे अर्थ लावता येतील.

उदाहरण.. शाळा, हॉस्पिटल्स, मॉल्स, हॉटेल्स, उबेर, ओला, रोबोट्सने चालणारे कारखाने सर्वत्र उत्पादन पद्धतीत जे बदल होत आहेत. त्यांना हेच तर्कशास्त्र कमीजास्त लागू होणार आहे. भांडवलशाहीतील सगळ्या बदलांना "चंगळवादी" सारखी शेलकी विशेषणे लावली की भांडवलशाहीचा अभ्यास करण्यास बाधा येते !


Updated : 19 Jan 2021 5:42 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top