Home > मॅक्स ब्लॉग्ज > भविष्य आणि मानसोपचारतज्ज्ञ

भविष्य आणि मानसोपचारतज्ज्ञ

गावात लोकांचा चेहरा बघून भविष्य सांगणाऱ्या लोकांना गावातील लोकांच्या समस्या चटकण कशा समजतात? मात्र, इतकं शिकून देखील मानसोपचारतज्ज्ञांना रुग्णांच्या समस्या का समजत नाहीत ? वाचा सामाजिक मानसोपचारतज्ज्ञ निलेश मोहिते यांचा लेख

भविष्य आणि मानसोपचारतज्ज्ञ
X

किताबे बहुतसी पढ़ी होंगी तुमने

मगर कोई चेहरा भी तुमने पढ़ा हैं...?

पढ़ा हैं मेरी जान, नजर से पढ़ा हैं

बता मेरे चेहरे पे क्या क्या लिखा हैं..?


"तर मग डॉक्टर सांगा की, तुम्ही माझा चेहरा बघून माझ्याबद्दल काय अंदाज लावू शकता...?" 20 वर्षाच्या तरुण अरुणाचली महाविद्यालयीन मुलीने मला बुचकळ्यात टाकणारा हा प्रश्न विचारला. ती तिच्या मैत्रिणीसोबत आमच्या क्लिनिकमध्ये आली होती. तिच्या अनपेक्षित प्रश्नामुळे मला खूप आश्चर्य वाटले. "माफ कर मुली... मी अंदाज नाही लावू शकत... आपल्याला मला आपली समस्या स्वतः सांगावी लागेल"

मी उत्तर दिले.

मग थोड्या नाराजगी ने ती म्हणाली, "अरे .. !! मी तुमच्याकडे बऱ्याच अपेक्षा घेऊन आली होती.. तुमच्याबद्दल खूप ऐकलं होतं.. आमच्या गावात एक अशिक्षित बाबा (मांत्रिक) आहेत. पहिल्यांदा ज्यांना भेटतात त्या लोकांच्या चेहरा पाहून त्यांच्या सर्व समस्या ते सांगतात... तुम्ही मनावरील बरीच पुस्तके वाचली असतील.. तर मग तुम्ही माझा चेहरा पाहून माझी समस्या ओळखून घ्यावी..."

आता तिच्याकडून मला तिच्या प्रश्नामागची गोम लक्षात आली. त्या अवघड क्षणी देखिल मला लहानपणीचा बाजीगर सिनेमातील माझ्या आवडत्या गाण्याची आठवण आली –

'किताबें बहुतसी पढ़ी होंगी तुमने..'

मी आमचे मानसिक आरोग्याचे काम आसाम आणि अरुणाचल प्रदेशात सुरू केल्यापासून माझे मुख्य प्रतिस्पर्धी हे सहकारी डॉक्टर नसून (शहरांप्रमाणे), तर अनेक मांत्रिक, बाबा, काळ्या जादूचे प्रयोग करणारे इत्यादी लोक आहेत. त्यांच्यातील बरेच जण निरक्षर आहेत किंवा त्यांचे प्राथमिक किंवा माध्यमिक शालेय शिक्षण देखील झालेले नाही. पण त्यांना लोकांच्या मानसशास्त्र आणि समुदायाबद्दल खूप चांगले आकलन आहे.

गावात जेव्हा केव्हा मुक्काम करतो, तेव्हा बर्‍याच वेळा मी त्यांच्याशी बोलण्यासाठी जातो आणि त्यांच्याकडून बर्‍याच मनोरंजक गोष्टी शिकतो. एखाद्या व्यक्तीला न विचारता त्यांच्या ग्राहकांना प्रभावित करण्यासाठी ते त्या व्यक्तीचे दु: ख स्वतःहून सांगण्यास सुरूवात करतात. त्यांच्याकडे सर्व वयोगटातील माणसांसाठी काही ठराविक सूत्रे आहेत. म्हणून, ते त्या व्यक्तीला सांगू लागतात

"तुम्ही एक छान व्यक्ती आहात. आपण नेहमीच इतरांबद्दल विचार करता आणि स्वतःबद्दल नाही. आपण खूप दयाळू आहात आणि इतरांना मदत करता पण इतर लोक तुमच्याबद्दल असा विचार करीत नाहीत. त्यांना तुमच्या प्रगतीचा हेवा वाटतो. म्हणून ते काळ्या जादूचा प्रयोग तुमच्यावर करु पाहात आहेत. आता तुम्हाला सर्व जण दुर्लक्ष करत आहेत... कोणीही तुम्हाला समजून घेत नाहीत.. तुम्हाला आतून अशक्तपणा वाटतो, झोप नीट लागत नाही, ईच्छा नसून आपला अमाप खर्च होतो, तसेच तुमचे खूप मोठी स्वप्ने आहेत... मला खात्री आहे की, तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होतील. पण तुमच्या यश मिळण्यात काही अडचणी आहेत आणि त्यातील मुख्य अडचण म्हणजे जादूटोना, करणी इत्यादी आहे."

ते सर्वांना समान गोष्ट सांगतात आणि सर्व लोकांना असे वाटते की बाबा / मांत्रिक त्यांना त्यांची स्वतःची कहाणी सांगत आहेत.. आणि मग ते लोक त्यांच्या जाळ्यात सहजपणे अडकतात.

बर्‍याच वेळा लोक मानसोपचारतज्ज्ञांकडून विचित्र अपेक्षा ठेवतात. त्यांना वाटते की मी त्यांचा चेहरा पाहून किंवा फक्त बोलण्याद्वारे (5 मिनिटांसाठी) सर्व काही समजू शकतात. तसेच बर्‍याच लोकांना असेही वाटते की मानसोपचारतज्ज्ञ सहजपणे किंवा एखाद्या व्यक्तीला त्याच्या स्वप्नांचा अर्थ सांगू शकतात... जेव्हा कोणी मला अशा विचित्र गोष्टी विचारतात तेव्हा मी ह्या सर्व प्रश्नांचा मनातल्या मनात खूप आनंद घेतो.

आमच्या मनोचिकित्सा प्रशिक्षणात व्यक्तिच्या मानसिक स्थिती आकलनाचा एक भाग असतो. ज्यामध्ये आपण व्यक्तीच्या वेशभूषा, पेहराव आणी हावभाव ह्या बद्दल शिकतो. बर्‍याच वेळा ह्या गोष्टी (कपडे, जीवनशैली, स्वच्छता इ.), गंभीर मानसिक आजाराच्या बाबतीत आम्हाला थोडा क्लू देतात. परंतु काही केसमध्ये त्या जास्त महत्त्वाच्या नसतात. आम्ही व्यक्तीच्या चेहऱ्यावरील हावभावांच्या आकलनाबद्दल देखील शिकतो ( जसे की आक्रमक, दु: खी, चिडचिडे, उत्साही, सामान्य).

हे आपल्या चेहऱ्यावरील प्रतिबिंबित होण्याऱ्या भावनांमुळे व्यक्तीच्या मनात काय भावना चालू आहेत, हे जाणून घेण्यास थोडीशी मदत होते. ही अशी सर्व चिन्हे गंभीर आजाराच्या केसमध्ये मदत करतात. परंतु सहसा सामान्य व्यक्तीमध्ये नाही. कोणताही मनोचिकित्सक एखाद्याचा चेहरा बघून एखाद्याचा इतिहास / कथा सांगू शकत नाही.

मानसोपचारतज्ज्ञांबद्दल अशी अंधश्रद्धा कमी करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मानसोपचारतज्ज्ञांनी क्लिनिकमधून बाहेर यावे, लोकांना भेटावे, समाजात मिसळावे व समाजाशी संवाद साधावा, सोशल मीडियावर लिहावे तरच लोकांना मानसशास्त्रज्ञ देखील सामान्य माणसासारखेच असतात आणि विशेष कोणी नसतात ह्याची जाणीव होईल.

ती मुलगी माझ्याशी तिची खेड्यातील मांत्रिकाशी तुलना करीत होती. ज्याने माझ्यातल्या तरुण मानसोपचारतज्ज्ञाचा अहंकार दुखावला. मी म्हणालो, "ठीक आहे, मला प्रयत्न करु दे... तू खूप चांगली मुलगी आहेस... तू नेहमीच दुसर्‍यांचा विचार करतेस.. पण कोणीही तुझे ऐकत नाही... तुला बऱ्याचदा एकटे वाटते... तुझे पालकही तुझे ऐकत नाहीत... ते तुझ्यावर खूप प्रतिबंध करतात आणि ते तुला समजून घेत नाहीत... तुझी खूप मोठमोठी स्वप्ने आहेत, परंतु आता जरा आत्मविश्वास कमी वाटत आहे तुला... तुझ्या मूडचे पण चढ-उतार होत आहेत. असे वाटत आहे... प्रत्येक गोष्टीपासून दूर पळून जावे असे वाटते... बर्‍याचदा तुम्हाला अशक्तपणा आल्यासारख जाणवतं... तुझी झोप देखील व्यवस्थित होत नाही... आणि तुमच्या चेहऱ्यावरुन मी समजू शकतो. की, तुमच्या नात्यात काही ना काही समस्या नक्की आहे...''. हे सर्व ऐकल्यानंतर ती मुलगी तिच्या समस्येच्या माझ्या अचूक अंदाजाने खूपच आश्चर्यचकित झाली.

"मग सुरवातीला आपण असे का म्हणालात की आपण हे ओळखू शकत नाही?". मी तिला समजावून सांगितले की या गोष्टी तुमच्या वयोगटातील मुलामुलींमध्ये अगदी सामान्य आहेत आणि तुला एकटीलाच नाही तर तुझ्या वयाच्या बऱ्याच तरुणांना असे वाटते. मग मी तिला हे देखील समजावून सांगितले की मांत्रिक / बाबा / ज्योतिषी केवळ चेहरा बघून अनोळखी लोकांच्या कथा कसे सांगू शकतात.

मी पाहिलं आहे की, आपल्या देशात शिक्षण आणि वैज्ञानिक दृष्टिकोनात काहीच संबंध नाही, म्हणून मला या सर्व गोष्टी त्या महाविद्यालयीन मुलींशी चर्चा करून समजवायला लागल्या.

निलेश मोहिते ,सामाजिक मानसोपचारतज्ञ,आसाम

ता. क -मला नेहमीच आश्चर्य वाटते की, सिनेमातील हिंदी गाण्यांचे बोल लोकांच्या / समाजातील भावनांचे वर्णन अगदी अचूकपणे प्रकारे कसे करतात. त्या मुली बाहेर गेल्यां तसे मी माझे हेडफोन लावले आणि ते बाजीगरमधील गाणे सुरु केले... बऱ्याच महिन्यानंतर हे गाणं ऐकत होतो. त्या गाण्यातील दुसर्‍या कडव्याच्या ओळीं खालील प्रमाणे आहेत ..

उमंगे लिखी हैं, जवानी लिखी है

तेरे दिल की सारी कहानी लिखी है

कहीं हाल ए दिल भी सुनता है चेहरा

ना बोलो तो फिर भी बताता है चेहरा

ये चेहरा हकीकत में एक आईना है

बता मेरे चेहरे पे क्या क्या लिखा है।

अनुवाद – श्रुती खामकर

Original post january 2020.

Link- https://m.facebook.com/story.php?story_fbid=2652467231656073&id=100006784667120

Updated : 1 July 2021 3:15 PM GMT
Next Story
Share it
Top