Home > News Update > दिल्ली निवडणूक: मोदी-शाहांना केजरीवालचा धसका?

दिल्ली निवडणूक: मोदी-शाहांना केजरीवालचा धसका?

दिल्ली निवडणूक: मोदी-शाहांना केजरीवालचा धसका?
X

येत्या ८ फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून देशाच्या राजधानीत निवडणुकीचा प्रचार आता चांगलाच तापू लागलाय. एकूण ७० जागांवर लढवल्या जाणाऱ्या या लढतीत भाजप (BJP) आणि आप (AAP) या पक्षांमध्ये चांगलीच जुंपली आहे. मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि झारखंड निवडणुकांमधील अपयश भाजपला दिल्लीच्या निवडणुकीत मोडून काढायचं आहे. गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) पूर्ण ताकदीनिशी दिल्लीच्या रिंगणात उतरलेत. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arwind Kejariwal) पुन्हा सत्तेत टिकून राहण्यासाठी लढा देत आहेत. या लढतीमध्येही काँग्रेस पक्ष इतर राज्यांमधील निवडणुकांप्रमाणेच सक्रीय दिसत नाहीये.

विशेष म्हणजे भाजपने या निवडणुकीत मुख्यमंत्रीपदासाठी कोणताही चेहरा दिलेला नाही. निवडणुकांसाठी हिंदुत्ववादाचा अजेंडा राबवताना कलम ३७० (Article 370), राम मंदीर (Ram Mandir) या मुद्द्यांचा उपयोग राष्ट्रीय निवडणुकांमध्येच झाला आहे. राज्य स्तरावर या मुद्द्यांचा पाहिजे तसा उपयोग भाजपला झालेला नाही. परिणामी भाजपला मोदींच्या नावावर ही निवडणूक लढवावी लागत आहे. आपकडून केजरीवाल मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेतच परंतु त्यांच्याविरुद्ध भाजपचा दावेदार कोण हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही.

भाजपसाठी ही लढत प्रतिष्ठेची झालेली असताना निवडणुकीची सर्व सूत्रं खुद्द अमित शाह यांनी आपल्या हातात घेतली आहेत. देशभरातील सर्व भाजप नेत्यांची फौज भाजपने निवडणूक प्रचारासाठी दिल्लीत उतरवली आहे. भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, राजनाथ सिंह, हरदिप पुरी, नित्यानंद राज, बी.एल. संतोष, थावरचंद गहलोत अशी दिग्गज नेत्यांची फळी दिल्लीच्या प्रचारासाठी उतरवली आहे.

सोबतच खासदार हेमा मालिनी, सनी देओल, हंसराज हंस, गौतम गंभीर, रवी किशन, दिनेश लाल यादव (निरहुआ), मनोज तिवारी अशी कलाकार आणि खेळाडू असलेल्या भाजप नेत्यांची फळी उभी केली आहे.नुकताच सायना नेहवालनेही भाजप प्रवेश केला आहे. या सर्व स्टार प्रचारकांसह ५ हजार रॅलींचं आयोजन भाजपने दिल्ली निवडणुकीसाठी केलं आहे. २०० नेतेमंडळी या प्रचारानिमित्ताने दिल्लीत येणार आहेत.

महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनाही प्रचारासाठी पाचारण करण्यात आलं होतं. यानिमित्ताने त्यांनी दिल्लीच्या देवली विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना संबोधित करत केजरीवाल यांच्यावर गरिबांसाठी गृहयोजना लागू न केल्याचा आरोप केला.

माजी शिक्षणमंत्री विनोद तावडेही आज भाजपच्या प्रचारात सामील झाले होते. दिल्लीच्या सफदरजंग भागात त्यांनी प्रचाराची धुरा सांभाळली. याविषयी केजरीवाल यांनीही त्यांची दखल घेत, “विनोद तावडे महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री आहेत ज्यांनी १३०० सरकारी शाळा बंद केल्या आहेत. आज ते दिल्लीत भाजपचा प्रचार करण्यासाठी आलेत.” असा टोला ट्वीटरच्या माध्यमातून लगावला.

https://twitter.com/ArvindKejriwal/status/1222403153200463872

यावर विनोद तावडे (Vinod Tawade) यांनीही स्पष्टीकरण देताना, “अरविंद केजरीवाल यांचं अजून एक असत्य, महाराष्ट्रात १३०० शाळा बंद नाही केल्या, तर १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ८९ शाळांमधील विद्यार्थ्यांना जवळीच्या शाळेत भरती केलं.” असं म्हटलं आहे.

दिल्लीच्या प्रचारात महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी शिक्षणमंत्री अशिष शेलारही सहभागी होणार आहेत.

महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांसोबतच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर, हरयाणाचे मनोहरलाल खट्टर, उत्तराखंडचे त्रिवेंद्र सिंह रावत आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हेदेखील भाजपच्या प्रचारासाठी दिल्लीत हजेरी लावणार आहेत.

तरी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर आणि खासदार प्रवेश वर्मा (MP Parvesh Varma) या दोन नेत्यांना स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिल्यानं भाजपला धक्का बसलाय. निवडणूक आयोगानं या दोन्ही नेत्यांना मंगळवारी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. दिल्लीतील एका प्रचारसभेत अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी हिंसेली येथे चिथावणी देणारी वादग्रस्त घोषणाबाजी केली होती.

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/783372135501606/?t=2

तर वर्मा यांनी “शाहीनबागमधील आंदोलक घरांमध्ये घुसून आमच्या माता भगिनींवर बलात्कार करु शकतात” असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

परवेश यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांना दहशतवादी असं संबोधलं होतं. दिल्लीत भाजप सरकार आल्यास १ तासात शाहिन बाग खाली करु, तर १ महिन्यात सरकारी जमिनीवरील एकही मस्जिद सोडणार नाही. असा दावाही त्यांनी आपल्या एका प्रचारसभेत केलाय.

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/2755160647854764/?t=3

दिल्लीच्या निवडणुकीत प्रचाराचे मुद्दे पाहता, भाजपने आपल्या प्रचारासाठी CAA, NRC आणि NPR या मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत केलंय. सोबतच दिल्लीचा रणसंग्राम शाहीन बागने धगधगता ठेवलाच आहे. ‘आप’ या निवडणुकीत केलेल्या कामांचा दाखला देत आहे. दिल्लीमधील सरकारी शाळांचं आधुनिकीकरण असो, महिलांसाठी फ्री बस सेवा असो, रस्ते किंवा ‘फ्री वायफाय’ असो या मुद्द्यांवर आप मतं मागत आहे. दिल्लीतील महिलांचा सुरक्षेचा मुद्दाही भाजप आणि आपकडून मुख्य मुद्दा बनवण्यात आला आहे. आप सरकारने शासकीय पैशाचा वापर विकासकामांसाठी करण्याऐवजी जाहिरातबाजीवर केला असल्याचा आरोप भाजपकडून केला जातोय.

सध्या दिल्लीत भाजप नेते आणि आप नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. खासदार गौतम गंभीर यांचं सरकारी शाळेत जाणं आणि शाळेची दूरवस्था सोशल मीडीयाच्या माध्यमातून लोकांना दाखवणं.

https://twitter.com/GautamGambhir/status/1221772608674443265

त्यांनंतर मुख्यमंत्री केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांनी पत्रकार परिषद घेऊन ती शाळा स्थलांतरीत करण्यात आल्याची ऑर्डर गौतम गंभीर यांना वाचता न आल्याचा खेद व्य़क्त करणं, असा संघर्ष सुरू आहे.

https://twitter.com/AamAadmiParty/status/1222074979354726400?ref_src=twsrc^tfw|twcamp^tweetembed|twterm^1222074979354726400&ref_url=https://www.altnews.in/gautam-gambhir-targets-aap-with-video-of-a-school-under-renovation/

मनोज तिवारी यांनी दिल्लीच्या रस्त्यांवरील खड्डयांची अवस्था दाखवून लंडनमधील रस्त्यांशी तुलना करुन हिणवलंय. एकूणच भाजप नेत्यांची विभागणी सरकारी शाळा, मोहल्ला क्लिनीक, फ्री इलेक्ट्रीसिटी, फ्री वायफाय, पाणी, महिला सुरक्षेच्य़ा दृष्टीने सी.सी.टी.व्ही कॅमेरा या कामाबाबत दिल्ली सरकारचे वाभाडे काढण्यासाठी केली आहे.

एकूणच काय तर दिल्ली निवडणुकीत मोदी- शाह जोडीने केजरीवाल सरकारचा धसका घेतल्याचं चित्र निर्माण झालं आहे. एवढ्या नेतेमंडळींचा ताफा, प्रक्षोभक भाषणं, शाहिन बाग (Shaheen Bagh) आंदोलन, CAA आणि NRC या सर्व झंझावाताचा भाजपला विजय मिळवण्यासाठी किती उपयोग होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Updated : 30 Jan 2020 3:18 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top