Home > मॅक्स ब्लॉग्ज > हुकूमशहा 'नेहरू'

हुकूमशहा 'नेहरू'

हुकूमशहा नेहरू
X

गांधीजींच्या हत्त्येनंतर काँग्रेसमध्ये वैचारिक दुरावे तयार होत होते. केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य पुरुषोत्तमदास टंडन यांनी आरएसएस आणि हिंदू महासभेच्या लोकांना सोबत घेऊन निर्वासितांना सरकारच्या विरोधात उभे केले होते. लखनौमध्ये हरताळ जाहीर केला होता. (वस्तुतः हिंदुत्ववाद्यांच्या जनसंघाचे श्यामाप्रसाद मुखर्जी केंद्रीय मंत्रिमंडळात होते). काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले टंडन हरताळाचे आवाहन करत होते तर स्थानिक काँग्रेस कार्यकारिणी हरताळाच्या विरोधात होती.

दुसरीकडे गांधीवादी अर्थतज्ज्ञ कुमारप्पा आणि प्रफुल्ल घोष यांनी कोलकत्त्यातील एका कार्यक्रमातून सरकारवर प्रखर हल्ले चढवले होते. वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमातच सर्वोदय संमेलनात सरकारवर टीका करण्यात आली होती.

या पार्श्वभूमीवर पंडित नेहरूंनी 8 डिसेंबर 1949 रोजी राजेंद्रबाबूंना दीर्घ पत्र लिहिले आहे. त्यांनी काँग्रेसमधील आपले सहकारी सरकार विरूद्ध जे काही करत आहेत. त्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

नेहरू म्हणतात की, बापू होते तो पर्यंत मोठे निर्णय आपण त्यांच्यावर सोपवून निर्धास्त रहात होतो. आता आपले निर्णय आपल्यालाच एकत्रपणे आणि लवकर घेतले पाहिजेत. आपण म्हणजे कोण यावर खुलासा करतांना नेहरू म्हणतात 'आपण म्हणजे तुम्ही (राजेंद्रप्रसाद), राजाजी (चक्रवर्ती राजगोपालाचारी), वल्लभभाई, मौलाना आझाद आणि मी' (नेहरू). विशेषतः पहिले राष्ट्रपती म्हणून राजेंद्रबाबू की राजाजी हा निर्णय लवकरात लवकर होणं आवश्यक होतं.

याच पत्रात नेहरू म्हणतात की काही लोकांच्या वागण्यातून काँग्रेस विघटित होत आहे. मला काँग्रेस विघटित होण्याचीही खंत वाटली नसती. काँग्रेसला पर्याय म्हणून एखादा पक्ष जरी उभा असता तरी भारताला सुरक्षितपणे त्यांच्या हाती सोपवून आपण लोकांमध्ये लोकांची वेगळी सेवा करण्यासाठी निघून गेलो असतो. पण आत्ता काँग्रेस संपणे म्हणजे देश संपणे आहे. कारण जातीयवादी लोक भारताचे तुकडे तुकडे करण्यास सज्ज आहेत. इथं उघड आहे की जातीयवादी लोक म्हणजे मुस्लीम लीग, हिंदू महासभा आणि आरएसएस.

या पत्रात एकीकडे जे काही निर्णय (राष्ट्रपती निवडणूकी संदर्भात) असतील ते मी एकट्यानं नाही तर आपण पाच जणांनी मिळून घ्यावेत असं ठामपणे सांगणारे 'हुकूमशहा" नेहरू दिसतात, प्रसंगी इतर कोणत्याही पक्षाला सत्ता सोपवू असं सांगणारे 'सत्तालोलूप' नेहरू दिसतात तर दुसरीकडे...

दुसरीकडे आज आपल्याला राष्ट्रवाद शिकवणाऱ्या उडाणटप्पूंचे पूर्वज देशाला विभाजित करून आपला महान राष्ट्रवाद कसा सिद्ध करत होते हेही दिसते.

विश्वंभर चौधरी, सामाजिक कार्यकर्ते

Updated : 14 Nov 2021 12:56 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top