Home > मॅक्स ब्लॉग्ज > Dhurandhar Movie Review : हे असले सिनेमे बघून देशभक्ती करू इच्छिणाऱ्या लोकांची दया येते.

Dhurandhar Movie Review : हे असले सिनेमे बघून देशभक्ती करू इच्छिणाऱ्या लोकांची दया येते.

हे असले सिनेमे बघून देशभक्ती करू इच्छिणाऱ्या लोकांची दया येते. मग आपलीही येते. काय साला गरीब सिनेम्यांचे दिवस आलेत-मेघना भुस्कुटे

Dhurandhar Movie Review : हे असले सिनेमे बघून देशभक्ती करू इच्छिणाऱ्या लोकांची दया येते.
X

Dhurandhar Movie Review 'धुरंधर' उशिरा पाहिला. नोंदी करणे क्रमप्राप्त आहे. प्रोपोगॅंडा असण्याबद्दलचं बरंच महत्त्वाचं ध्रुव राठीनं कव्हर केलंच आहे. त्याखेरीज -

१. अत्यंत रटाळ सिनेमा. पहिला पाऊण तास बघणीय आहे. तो सही-सही 'सत्या'चा प्लॉट आहे. तो उचलून पाकिस्तानात नेलाय, बस, बाकी काहीही फरक नाही. माशी टु माशी कॉपी. वजा भावनिक बिल्डप. नंतरचे अडीच तास महाबोअर भरकट आहे. संपता संपत नाही. मुसलमानफोबिया असलेल्यांना मात्र त्यात विकृत समाधान मिळण्याची सोय आहे. उठता बसता रणबीर सिंगवर बलात्कार करू बघणारे मुस्लीम पाकिस्तानी पुरुष पेरले आहेत. यातून कोणते कोणते फोबिये दिसतात ते आपण आपापल्या कुवतीनुसार ठरवायचं.

२. रक्तपाताच्या नाना तऱ्हा आहेत. नंतर नंतर त्या तऱ्हा बघूनच माझं मनोरंजन होऊ लागलं. त्यातला धक्कादेऊपणा संपला. धक्कादेऊपणा संपावा, यातही एक धक्का असतो (आठवा : 'सत्या'तला वडापाव खात केलेला टॉर्चर सीन.). तो कळणं धरच्या मेंदूपलीकडे असावं.

३. रणबीर सिंग छान दिसलाय. पण अक्षय खन्ना मला तरुणपणी (आमच्या दोघांच्याही) आवडत असूनही यात अगदीच खप्पड आणि एकसुरी वाटला. त्याला नुसतं चालणं सोडून काही कामही नाहीय. जे आहे त्यात तो उरल्यासुरल्या केसांच्या झडपेखालून कसाबसा वर बघत स्टाईल मारत बोलायचा निष्फळ प्रयत्न करतो.

४. मुख्य नायिका म्हणे डॉक्टरी शिकू इच्छिते. बाप विरोध करत असतो. हेही मुस्लिमांना बदनाम करू पाहणाऱ्या हिंदुत्वखोरीला साजेसं नरेटिव्ह. पण नायक (सॉर्ट ऑफ लग्नानंतर) तिला गप घरी बसायला फर्मावतो, प्रश्न विचारायला मनाई करतो, हे? आणि तीही व्हीलन अजितच्या मांडीवर बसणाऱ्या मादक ललनेचं काम करत तिथे राहते हे? हिंदुत्वखोरी म्हणजे मुस्लीम पुरुषसत्ताकतेची नक्कल होय, हे यांच्या बथ्थड मेंदूत कधी शिरेल? हिंदुत्वखोरी की जय हो.

५. बरीच जुनी गाणी रंग लावून वापरली आहेत. 'सत्या' आणि 'ब्लॅक फ्रायडे' आणि 'गॅंग्स..'मधल्या गोष्टी ढापणे, गाणी बिनदिक्कत वापरणे, संतोषीच्या सिनेमाचा प्रभाव... यातून बॉलिवुडची महती अधोरेखित होत राहते. कितीही 'ये नया इंडिया है'चे नारे दिले, बॉलिवुडच्या गंगाजमनी परंपरेला शिव्या दिल्या... तरी बॉलिवूडचा प्रभाव पुसणं यांच्या बापालाही शक्य नाही, हे जाणवत राहतं.

हे असले सिनेमे बघून देशभक्ती करू इच्छिणाऱ्या लोकांची दया येते. मग आपलीही येते. काय साला गरीब सिनेम्यांचे दिवस आलेत.

मेघना भुस्कुटे

Updated : 26 Dec 2025 12:42 PM IST
author-thhumb

मेघना भुस्कुटे

मेघना भुस्कुटे भाषांतरकार, संपादक आणि ब्लॉगर आहेत. आयटी कंपनीमध्ये कार्यरत आहे. चित्रपट, साहित्य, भाषा आणि व्याकरण यांची आवड आहे.


Next Story
Share it
Top