एकटा असलो तरी मनासारखं जगतो तुम्ही देखील मनासारखं जगा - धर्मेंद्र
ही कहाणी सांगते की धिप्पाड, भक्कम देहयष्टीचा 'ही-मॅन' हा देखील एक सहृदयी माणूस आहे . ज्याच्या हृदयात प्रेम आणि वेदना एकत्र नांदतात. बॉलीवुड अभिनेता धर्मेंद्र यांचा प्रवास शब्दांकित केलाय लेखक समीर गायकवाड यांनी...
X
त्याचे श्वास अजून जारी आहेत, त्याच्या सिनेमाविषयी वा त्याच्या करिअरविषयी खूपजण खूप काही सांगतील; मला थोडेसे वेगळे सांगायचेय.
धरमची गोष्ट सुरु होते 1935 मध्ये. 8 डिसेंबरला पंजाबच्या साहनेवाल गावात जन्मलेला हा एक साधा जाट मुलगा. धर्म सिंह देओल त्याचं नाव. जग त्याला 'धर्मेंद्र' म्हणून ओळखते, त्याच्या आयुष्याची कहाणी, केवळ चित्रपटांच्या यशाची नाही, तर अंतर्मनातील एकाकीपणाची, प्रेमातील द्वंद्वाची आणि संघर्षातील जयपराजयाची आहे. त्याने बॉलीवूडला 'ही-मॅन' दिला, त्याच्या जीवनात असे अनेक क्षण येऊन गेलेत जेव्हा त्याच्या डोळ्यांत अश्रू तरळले, हृदयात अपराधीपणाची जखम खोलवर रुजली आणि एकाकी एकांताने त्याला शांत केलं.
बालपणी त्याच्या आयुष्यावर गरीबीचे सावट होते. वडील शाळेत हेडमास्तर होते. कुटुंबाची परिस्थिती सामान्य होती. फिल्मफेअरमधील एका जाहिरातीने त्याला मुंबईकडे खेचले. 1954 मध्ये, वयाच्या अवघ्या एकोणिसाव्या वर्षी, प्रकाश कौरशी त्याचे लग्न झाले. समाजाच्या, बिरादरीच्या आणि कुटुंबाच्या बंधनात बांधलं गेलेलं नातं सुरुवातीच्या काळात त्याने नेकीने निभावलं.
प्रकाश कौर सोबतच्या दाम्पत्य जीवनात त्याला चार अपत्ये झाली – सनी, बॉबी, विजेता आणि अजीता! कुटुंबाचं जू खांद्यावर येऊनही त्याच्या मनातली अभिनयाची ज्योत विझली नाही. मुंबईत पोहोचल्यावर संघर्षाची खरी ज्वाला भडकली. त्याच्याजवळ पुरेसे पैसे नव्हते, राहण्याची व्यवस्था नव्हती. कधी मित्रांच्या खोलीत, कधी स्टुडिओमध्ये एकट्याने रात्र काढली. एका मुलाखतीत त्याने सांगितलेलं की, "एक वेळ अशी आली होती की खाण्यापुरते पैसे नव्हते."
हा संघर्ष त्याला 'फूल और पत्थर'पर्यंत घेऊन गेला, जिथे तो पहिल्यांदा सोलो हीरो म्हणून उभा राहिला. पण आयुष्याच्या या प्रवासात सर्वात मोठी जखम होती ती प्रेमाची. 'तुम हसीन मैं जवान'च्या सेटवर हेमाच्या रूपाने त्याच्या आयुष्यात प्रेमाचं आगमन झालं.
हे प्रेम त्याच्या पडद्यावरील प्रेमापेक्षा अधिक रिअल आणि उजवे होते! धर्मेंद्र आधीच विवाहित होता, चार मुलांचा बाप होता. तरीही त्याचे हृदय हेमाकडे झुकले. खरे तर हे नाते कथित नैतिकतेच्या व्याख्येत न बसणारे होते, मात्र तो इतका इरेस पेटला होता की 'शोले'च्या शूटिंगदरम्यान तो लाइटबॉईजना पैसे देऊन सीन लांबवायचा, बिघडवायचा; तेही फक्त हेमासोबत जास्त वेळ घालवण्यासाठी!
१९८० मध्ये त्याने हेमाशी लग्न केले! मात्र या लग्नाने त्याच्या कुटुंबात वादळ आलं. त्याची पहिली पत्नी प्रकाश कौरने त्याला घटस्फोट दिला नाही. समाजाने त्याला 'वुमनायझर' म्हटले. प्रकाश कौरने स्टारडस्टला सांगितलं की, "तिला माझाच नवरा मिळाला का? हेमासारख्या सुंदर स्त्रीला कोणताही पुरुष निवडेल. पण मी हेमाच्या जागी असते तर असे केले नसते." तिची तडफड त्या दोघांनीही दुर्लक्षित केली, ती दुखावली गेली जे साहजिक होते. तिच्याशी ही प्रतारणा होती आणि विश्वासघातही होता!
ती नंतरही एकदोनदा कळवळून बोलली. मात्र तिच्या एकाही वक्तव्यात स्वतःविषयीचे शल्य नव्हते, एका आईची आणि एका पत्नीची ती व्यथा होती! त्यामुळे नेमके काय करावे हे धरम हेमाला कळत नव्हते!
अशातच धर्मेंद्रने इस्लाम स्वीकारल्याच्या अफवा पसरल्या. दिलावर खान, केवल कृष्ण आणि आयेशा बी अशी नावं त्यांनी स्वीकारली अशीही माहिती समोर आली. पण त्याने ही बातमी आणि या सर्व गोष्टी साफ नाकारल्या. ही अफवा आहे, पूर्णपणे खोटी माहिती आहे. मी असा माणूस नाही जो धर्म बदलतो, असं त्याने इंडियन एक्सप्रेसला सांगितलेलं.
त्याने लग्न केलं आणि पहिली पत्नी प्रकाश कौर त्याच्यापासून अंतर ठेवून राहू लागली. तिने आपली चारही मुलं स्वतःपाशी ठेवून घेतली आणि धरमला रिकाम्या हाताने हेमाकडे पाठवलं. मनासारखी प्रेमिका मिळाली मात्र जिवापाड प्रेम असलेली मुलं त्याच्यापासून काहीशी दूर ठेवली गेली. धर्मेंद्रच्या दोन्ही कुटुंबांतील दरी भरली नाही. सनी-बॉबी ईशाच्या लग्नाला आले नाहीत.
धर्मेंद्र दोन्ही कुटुंबांमध्ये अडकला – एका बाजूला प्रकाश आणि चार मुले, दुसऱ्या बाजूला हेमा, ईशा आणि अहाना. हे द्वंद्व त्याला एकटेपणाकडे घेऊन गेलं. वयाची ऐंशी पार केल्यानंतरच्या त्याच्या काही सोशल मीडिया पोस्ट हृदय पिळवटून टाकतात. बऱ्याच पोस्टमध्ये त्याने, आता मी एकटा आहे, असं लिहिलं आहे. एकटा असलो तरी मनासारखं जगतो तुम्ही देखील मनासारखं जगा, असं त्याच्या चाहत्यांना तो सांगायचा.
त्याच्या या पोस्ट्सवरुन फिल्मफेअरच्या रिपोर्टरने एकदा बॉबी देओलला छेडलं होतं. 'पापा खूप इमोशनल आहेत. ते ड्रामॅटिक होतात, पण ते एकटे नाहीत. ते प्रकाश मामांसोबत खंडाळ्याच्या फार्महाऊसवर राहतात. ते फार्महाऊस त्यांच्या आठवणींनी भरलेलं आहे आणि त्यांच्या सान्निध्यात ते कधीही एकटे नसतात!' असं बॉबीने सांगितलेलं.
कुणी कितीही मधाळ शब्द वापरले तरी सत्य लपले नव्हते, त्याच्या शब्दांत अपराधीपणा दिसायचा. पहिल्या कुटुंबाला पुरेसा वेळ न दिल्याचा अपराधगंड त्याला छळत असे. एका मुलाखतीत तो रडला, जेव्हा त्याच्या गावाच्या शाळेचा आणि लस्सी-गाजर हलव्याच्या दुकानाचा व्हिडिओ दाखवला. 'रुला दिया यार... ते दिवस स्वप्नवत होतं. आता त्यातून बाहेर येणं त्रासदायक वाटतं!' हे त्याचे बोल होते!
'रॉकी और रानी की प्रेम कहानी'त त्याच्या मृत्यूच्या सीनने बॉबीला रडवलं, ती कल्पनाच त्याला सहन झाली नाही. प्रीमिअरच्या दरम्यानच तो थिएटरमधून बाहेर निघून आला. वरवर भक्कम मजबूत वाटणारा हा माणूस हळवा आणि संवेदनशील होता.
त्याच्या डिप्रेशनविषयीही तो बोलला होता हे विशेष! 'द हिंदू'शी संवाद साधताना त्याने सांगितलं, 'तेव्हा मी खूप एकाकी होतो, मात्र कुठून तरी एक आवाज कानावर आला, 'मी मृत्यू नाही, मी तुझी ती आई आहे जिच्या कुशीत तू पहिले स्वप्न पाहिलेस!' तो उतारवयातही त्याच्या आईच्या आठवणींनी कातर व्हायचा, किंबहुना त्यावरच तो आतापर्यंत तगला आहे.
या दरम्यान त्याचं दारू पिण्याचं प्रमाण काहीसं वाढलं होतं, त्यामुळे काहींच्या लेखी तो चेष्टेचा विषय झाला. त्याने त्याचं व्यसन वाढवलं हे सांगताना काहींनी कहर केला होता. त्याने एकाच दिवशी डझनभर बाटल्या रिचवल्या अशाही हेडलाईन्स काहींनी दिल्या होत्या. तो नेहमीप्रमाणे शांत राहिला. त्याला हवं त्या पद्धतीने एकट्याने जगत राहिला. आठ दिवसांपूर्वी त्याला ब्रिच कँडी हॉस्पिटलमध्ये श्वासाच्या तक्रारीने दाखल केलंय. अजून तरी तो जिवंत आहे – त्याच्या मृत्यूच्या अफवांना न जुमानता!
लोक त्याच्याविषयी बोलताना तेच तेच विषय मांडतात, मात्र काही भलत्याच गोष्टीही त्याने केल्या होत्या हेही सांगितले पाहिजे. 2004 ते 2009 या दरम्यान राजस्थानच्या बिकानेर मतदार संघात तो भाजपचा खासदार होता. "लोकशाहीसाठी आवश्यक असलेले 'मूलभूत शिष्टाचार' शिकवण्यासाठी 'हुकूमशहा' म्हणून निवडावे", असलं बिनडोक विधान त्याने केलं आणि त्याच्यावर खरपूस टीका झाली. हे विधान थेट सामाजिक, जातीय किंवा धार्मिक विषयावर नव्हते म्हणून त्याची तीव्रता कमी राहिली असावी.
समाजसेवेसाठी त्याने कुठली एनजीओ वा तत्सम संस्था काढली नव्हती, अथवा कधी मोठा दानधर्मही केला नव्हता. मात्र मुंबईमधील एका अखिल भारतीय मानवी हक्क संघटनेने त्याला मानवता सेवा पुरस्कार दिला होता, जो त्याने प्रत्यक्ष स्वीकारला नव्हता. आपण अशी कुठली सेवा केली नाही असं त्याने प्रांजळपणे सांगितलेलं; विशेष म्हणजे तेव्हा तो खासदार होता आणि तरीही त्याने हे सत्यकथन केलेलं.
त्याच्या खासदारकीच्या काळात बिकानेरची दुरवस्था अधिकच वाढली. पाण्याची समस्या अतिशय बिकट झाली. संसदेतील त्याची प्रचंड गैरहजेरी हा वृत्तपत्रांच्या मथळयाचा विषय झाला होता आणि बिकानेरमधील लोकांनी 'गायब खासदार' अशी त्याची संभावना केली होती. मात्र 2015 मधील एका मुलाखतीत त्याने आपण खूप चांगलं काम केलं होतं आणि लोकांनी त्यावर संतुष्ट व्हायला हवं होतं असं विधान करून चकित केलं होतं.
कारुण्यपूर्ण सॅड सीन्समध्ये अतिशय विचित्र अभिनय करणारा धर्मेंद्र नर्मविनोदी भूमिका तुलनेने चांगल्या करायचा. त्याचे डान्स सीन्स ही देखील एक कॉमेडी होती. मीनाकुमारीसाठी तो झुरला होता हे सत्य होते मात्र अन्य कुठल्या नट्यांसोबत त्याने भानगडी केल्या नाहीत हेही खरेच. तो लिटरली 'जट यमला पगला' होता मात्र आयुष्याच्या उत्तरार्धात तो दिवाना नक्कीच नव्हता.
मारधाड आणि ऍक्शन सीन्सची देमार असणाऱ्या सिनेमांचा रांगडा नायक ही त्याची प्रतिमा. कदाचित त्यामुळेच त्याला बॉलिवूडच्या हिमॅनची पदवी मिळाली. मात्र मलातरी वैयक्तिक आवड म्हणून, त्याचे ब्लॅक अँड व्हाईटमधले रोमँटिक सिनेमे अधिक आवडतात आणि त्यातला धर्मेंद्रही आवडतो, त्यात तो कमालीचा शालीन सोज्वळ निरागस दिसतो. त्याचा लुक डिसेंट असायचा आणि त्याचं देखणं व्यक्तिमत्व अजूनच खुलून दिसायचं.
त्याचे चाहते सणकी नव्हते मात्र त्यांनी त्याच्यावर जीवापाड प्रेम केलं, त्याच्या काळात प्रत्येक नटाची स्वतःची अशी एक खास स्टाईल असायची, तशीच त्याचीही अनोखी शैली होती. पडद्यावर त्याने अनेक थोराड नट्यांचा नायक म्हणून काम केलं मात्र हेमामालिनीसोबतच तो अधिक खुलून दिसला.
अभिनयाच्या बाबतीत कमालीची वानवा असूनही तो पासष्ट वर्षे इंडस्ट्रीत टिकला याचे श्रेय त्याच्या हि-मॅन इमेजला आणि वादग्रस्तता, कोलाहलापासून दूर राहण्याच्या त्याच्या स्वभावाला द्यावे लागेल. कदाचित यामुळेच त्याने त्याचा अलीकडचा दशकभराचा काळ फार्महाऊसवर घालवलाय.
तो चवीने मांसाहार करायचा आणि आवडीने दारू प्यायचा हे त्याने कधी लपवले नाही, खेरीज एखादा अपवाद वगळता या गोष्टींच्या तो आहारीही गेला नाही. अलीकडील काळात तो सोशल मीडियावर पोस्ट करून चाहत्यांशी बोलायचा.
आपलं वय त्याने लपवलं नाही, फालतूच्या प्लॅस्टिक सर्जरी करण्याऐवजी निसर्गाच्या सान्निध्यात राहून आपल्या आवडत्या गोष्टी तो दिलखुलासपणे करत राहिला. त्याला पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला होता तेव्हाची प्रतिक्रिया बोलकी होती, नक्की माझेच नाव आहे का असं हसत हसत विचारलं होतं. अभिनयासाठीचे एकही फिल्मफेअर त्याला मिळालं नाही याचे त्याला शल्य नव्हते.
2011 मध्ये लाईफटाइम अचिवमेंटचा पुरस्कार घेताना तो अमिताभसोबत मंचावर होता तेव्हा मात्र गहिवरला होता कारण त्याच्या कोस्टार्सवर त्याने नेहमी प्रेम केलं होतं! इंडस्ट्रीत त्याने कुणाला फसवलं नाही, त्याची स्वतःची चित्रपट निर्मिती संस्था काढली आणि त्यात त्याने फटके खाल्ले. मात्र त्याचे रडगाणे त्याने कुठे गायले नाही!
जलनेवाले गये भाड में, अशीही त्याची वृत्ती नव्हती. त्याच्या एका क्लिपमध्ये तो म्हणतो की, त्याला टोमणे मारणाऱ्या लोकांचाही तो आभारी आहे कारण त्यामुळे त्याला नव्या प्रेरणा गवसतात.
शून्यातून पुढे आलेल्या या अभिनेत्याने मर्यादित काळापुरते नेता होऊन दाखवले. मात्र नंतर राजकारणात तो पुन्हा कधी सक्रिय झाला नाही. त्याने कधीही विखारी स्टेटमेंट्स दिली नाहीत ही देखील एक चांगलीच गोष्ट म्हणावी लागेल कारण आताच्या काळात एखाद्याने चांगली विधाने केली नसली तरी त्याने मुक्ताफळे उधळली नाहीत ही गोष्टही भारी वाटू लागलीय!
असं असलं तरीही अनेकांच्या लेखी तो नट म्हणून बरा होता पण माणूस म्हणून खूप भारावून टाकणारा खास नव्हता, मात्र त्याला याही गोष्टीने कधी फरक पडला नाही हीदेखील एक बाजू होती.
त्याच्या आयुष्यात भरीव यश आहे, प्रेम आहे, पण खोलवर एकटेपणाची जखम आहे जी कधीच भरली नाही. ही कहाणी सांगते की धिप्पाड, भक्कम देहयष्टीचा 'ही-मॅन' हा देखील एक सहृदयी माणूस आहे – ज्याच्या हृदयात प्रेम आणि वेदना एकत्र नांदतात.
आपल्यापैकी अनेकांच्या आयुष्यातील आनंदांच्या काही क्षणांना त्याने आकार दिला आहे, ही गोष्ट त्याच्या विषयीच्या सहानुभूतीसाठी पुरेशी वाटते!
जिथवर त्याच्या आयुष्यात आनंद आहे तितके आयुष्य त्याला लाभो!
समीर गायकवाड, लेखक
(साभार - सदर पोस्ट समीर गायकवाड यांच्या फेसबुक भिंतीवरून घेतली आहे.)






