Dharashiv Floods : चुकीचं जलनियोजन, झोपलेला ऊस आणि शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेला विकास
धाराशिव जिल्हा परांडा तालुक्यातील करंजा गावात चुकीच्या जलनियोजनानं शेतकऱ्यांसोबत शेतीचं ही मोठ्याप्रमाणात नुकसान, महापुरामुळे शेतातील काळ्या मातीत वाळूचं आक्रमण… पुन्हा शेत कसं उभं राहणार ? सरकारकडून मिळालेली नुकसान भरपाई अपुरी? शेतात आडव्या पडलेल्या ऊसाला काढण्यासाठी हवाय खर्च ? शेतकऱ्यांचं २ वर्षांचं अर्थशास्त्र कसं कोलमडलंय जाणून घ्या मराठवाड्यातील पूरग्रस्त भागात दौरा करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सिरत सातपुते यांच्याकडून…
X
धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील परांडा तालुका. उसाच्या आणि द्राक्षाच्या बागायतीचा भाग. रस्त्याच्या दुतर्फा उसाचे मळे. महापुराचं सावट जाणवत नव्हतं आणि अचानक रस्त्याच्या कडेला कललेला ऊस दिसू लागला. परांडा तालुक्यातील करंजा गावाजवळ आम्ही आलो होतो. हमरस्ता सोडून गाडी आत वळली आणि अर्धवट वाळलेले ऊस दिसू लागले. जसं जसं पुढे गेलो तस तसा आडवा झालेला ऊस दिसू लागला. एका ठिकाणी येऊन थांबलो तर वाळूतच ऊस आडवा पडलेला. काळ्या मातीत वाळू हा काय प्रकार आहे हे लक्षात येईपर्यंत गावकऱ्यांनी पुराबद्दल सांगायला सुरुवात केली आणि लक्षात आलं की हा तर नदीचं पाणी शिरलेला उसाचा मळा.
21-22 सप्टेंबरला ढग फुटी सदृश्य पाऊस झाला आणि सीना कोळेगाव धरण भरलं. धरणाचं पाणी सोडलं आणि करंज्या सारख्या नदीकाठच्या अनेक गावात पाणी शिरलं. नदीपात्रातील बागायती शेती या पाण्याने पूर्ण उध्वस्त केली. दोन एक महिन्यांनी काढणीला येणारा ऊस पूर्णपणे आडवा झाला. शेतातली माती वाहून गेली आणि नदीतली वाळू शेतात पसरली. दीड महिन्यानंतरही शेतातला ऊस तसाच आडवा आहे आणि शेतही वाळूमयच आहे. आसपासच्या गावात बागायतीसाठी जीवनदायीनी असलेली ही सीना नदी आपल्या प्रवाहाबरोबर शेतकऱ्यांचे जगणच वाहून घेऊन गेली आहे.
गावाच्या वरच्या अंगाला असलेली शेतं राहिली पण नदीकाठच्या शेतांचं शंभर टक्के नुकसान झालं आहे. पंचनामे झालेत. नुकसान भरपाई काहींना मिळाली काहींना नाही. या सर्व गोंधळात शेतातील झोपलेला ऊस तसाच आहे. तो ऊस काढण्यासाठी लागणारा खर्च मिळावा अशी शेतकरी मागणी करत आहेत. हा ऊस काढल्याशिवाय नवीन लावता येणार नाही आणि हंगाम निघून गेल्यामुळे पडलेला ऊस काढायला पैसा नाही, या दुष्टचक्रात शेतकरी अडकला आहे. समुद्रकिनाऱ्यावरील वाळू सारखी वाळू ही नदीकाठच्या शेतांमध्ये पसरली आहे. ती काढल्याशिवायही नवीन लागवड करता येणार नाही. पाण्याच्या प्रवाहाने शेतात मोठमोठे खड्डे पडले आहेत. शेत तयार करणे हे खूप मोठे आव्हान शेतकऱ्यांपुढे उभे आहे. नुकसान भरपाईच्या पॅकेजने तात्पुरता रिलीफ मिळाला असला तरी गळीताचा हंगाम वाहून गेल्याने शेतकऱ्यांचं पुढच्या दोन वर्षांचं अर्थशास्त्र कोलमडलं आहे.
सीना कोळेगाव धरण 100% भरल्याशिवाय पाणी सोडलं नाही आणि जेव्हा खूप जास्त पाऊस पडला तेव्हा अचानक पाणी सोडल्याने महापूर आला. नदीने आपला प्रवाह बदलला आणि नदीलगतची शेतं वाहून नेली. नदीच्या पात्रात काही प्रमाणात झालेलं अतिक्रमणही ह्या महापुरात बाधित झालं. सवाल हा आहे की चुकीचं जलनियोजन आणि नदीपात्रातील अतिक्रमण याचा फटका बसलेला सामान्य बागायतदार या संकटातून वर कसा येणार?
परांडा तालुक्यातीलच वागेगव्हाण गावात तर नदीचा प्रवाह अनपेक्षितपणे काटकोनात वळल्यामुळे त्या संपूर्ण परिसरातील शेतीचे रूपांतरच नदीमध्ये झाले. संपूर्ण शेते खरवडून निघालेली आणि तिथे मातीच्या ऐवजी मोठमोठे दगड दिसत होते. पुराच्या वेळी ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याच्या डबक्यांमध्ये काही गुरे मरून पडलेली, पंचनाम्यांना लागलेला वेळ आणि उशीरा मिळालेली मदत याने गांजलेल्या शेतकऱ्यांनी दैनंदिन जीवन जरी सुरु केले असले तरी महापुराच्या खुणा जागोजागी जाणवत होत्या. खरीपाच्या मक्याचा चिखल आता सुकला असला आणि घरं आणि शाळा पूर्वपदावर येऊ लागली तरीही वाहून गेलेल्या पिकांची आणि जनावरांची आठवण अजून ताजीच आहे.
नदीवरचा भलामोठा कोल्हापुरी बंधारा पाटबंधारे खात्याच्या अकार्यक्षमतेमुळे पाण्याची वाट अडवून उभा राहिला आणि नदीला काटकोनात वळावे लागले. हे घडूनही नवीन प्रकल्पाचा बोगदा या गावाबाहेर होणार आहेच. अशावेळी "विकास कोन पथे?" हा प्रश्न विचारणे हा गुन्हा असेल की काय असे वाटावे असे धडाकेबाज काम चालूच आहे. पुढच्या पावसात काय वाढून ठेवलंय याची चिंता गावकरी आताच करताहेत. अस्मानी बरोबरच सुलतानीही हातात हात घालून आहेत. त्याचा मुकाबला करणं महापुराचा फटका बसलेले कसे करतील बरे?
#मराठवाडाडायरी #महापूर
सिरत सातपुते (सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका)






