Home > मॅक्स रिपोर्ट > पाऊस लांबला;धीर धरा पेरणीची घाई नको

पाऊस लांबला;धीर धरा पेरणीची घाई नको

पाऊस लांबला;धीर धरा पेरणीची घाई नको
X

Monsoon पाऊस लांबत चालल्याने शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. खरिपाचा हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पण सोलापूर जिल्हा हवामान कृषी केंद्र मोहोळ यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे,की पाऊस जरी लांबला असला तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. त्यांनी खरीप पिकांच्या पेरण्या जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कराव्यात असे आवाहन केले आहे, तर सोयाबीन या पिकाची पेरणी 15 जुलै पर्यंत करावी असे आवाहन हवामान खात्याने केले आहे. सोयाबीनची पेरणी 15 जुलै च्या पुढे गेल्यास या पिकावर परतीच्या पाऊसाचा परिणाम होऊ शकतो.

सोयाबीन पीक शेतातून बाहेर निघण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागत असल्याने याची पेरणी लांबल्यास या पिकावर परतीच्या पाऊसाचा परिणाम होवून शेतकऱ्यांचे नुकसान होवू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी 15 जुलै पर्यंत करावी असे आवाहन सोलापूर कृषी केंद्राचे हवामान तज्ञ डॉ.सूरज मिसाळ यांनी केले आहे.

भारतीय हवामान विभागाने आजपर्यंत मान्सून संबधी वर्तवलेले अंदाज

हवामान विभागाने १४ एप्रिल रोजी जाहीर केलेल्या पहिल्या दीर्घकालीन अंदाजात नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात (जून ते सप्टेंबर) या महिन्यात देशभरात ९९ टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. सुधारित अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) मंगळवारी (ता. ३१ मे) जाहीर होता. त्यात यंदा १०३ टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. यामध्ये चार टक्क्यांची कमी-अधिक तफावत गृहीत धरण्यात आली होती. १९७१ ते २०२० कालावधीत देशातील मॉन्सून पावसाची सरासरी ८७ सेंटिमीटर म्हणजेच ८६८.६ मिलिमीटर होती. तर सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस सर्वसाधारण मानला जात आहे. ला-निना स्थिती कायम विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील समुद्र पृष्ठभागात सध्या मध्यम ला निना स्थिती आहे. मॉन्सून मिशन मॉडेल आणि इतर जागतिक मॉडल्सनुसार मॉन्सून हंगामात ही स्थिती कायम राहणार आहे. यातच बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रातील तापमानाचा फरक (आयओडी इंडियन ओशन डायपोल) सध्या सर्वसाधारण स्थितीत आहे. मॉन्सून हंगामातही ही स्थिती नकारात्मक होण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

जून महिन्यातील पावसासंबधी हवामान विभागाचे अंदाज

जून महिन्यात 'स्टॅटेस्टिकल फोरकास्टिंग सिस्टिम आणि मल्टी मॉडल एनसेंबल फोरकास्टिंग सिस्टिम या मॉडलचा वापर करून मॉन्सून हंगामातील पावसाचा अंदाज वर्तविला आहे. सुधारित अंदाजानुसार मॉन्सूनमध्ये सर्वसाधारण पाऊस पडण्याची शक्यता सर्वाधिक (३६ टक्के), तर दुष्काळाची शक्यता ५ टक्के असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले होते. पाऊस सरासरी गाठणार यंदाच्या जून महिन्यात देशा ९२ ते १०८ टक्के सर्वसाधारण पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. वायव्य, मध्य भारतासह, दक्षिण भारताच्या उत्तर भाग पूर्व भारतातील राज्यात जून महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. तर ईशान्य भारतातील राज्ये आणि दक्षिण द्वीपकल्पाच्या दक्षिणेकडील भागात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. जून महिन्यात मॉन्सूनच्या आगमनाचा कालावधी असल्याने हवामानात वेगाने बदल होत असतात. त्याचा पावसाच्या वितरणावर परिणाम होतो. यंदा मॉन्सून हंगामात देशात पावसाचे वितरण चांगले राहण्याची शक्यता आहे. यात देशाच्या बहुतांशी भागात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. देशाची पूर्व-मध्य पूर्व, ईशान्य दक्षिण द्वीपकल्पाच्या नैर्ऋत्य भागात मॉन्सूनचे आगमन होवून तो महाराष्ट्रात दाखल झाला आहे.

महाराष्ट्रातील मान्सूनचे आगमन

२०१८ ८ जून,२०१९ २० जून,२०२० ११ जून,२०२१ ५ जून,२०२२ १० जून

केरळमध्ये नियमित वेळेच्या तीन दिवस आधी मान्सून दाखल

देवभूमी केरळमध्ये नियमित वेळेच्या तीन दिवस आधीच (२९ मे) पोचून त्यानंतर दोनच दिवसांत संपूर्ण केरळ राज्य, कर्नाटक किनारपट्टीसह गोव्याच्या उंबरठ्यापर्यंत मॉन्सूनची प्रगती झाली. त्यानंतर प्रवाह मंदावल्याने मॉन्सून रेंगाळला होता. दहा जून रोजी कोकणात प्रवेश करणारा मॉन्सून ११ जून रोजी बहुतांशी कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात दाखल झाला. तर सोमवारी (ता. १३) मॉन्सूनने संपूर्ण कोकणसह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या बहुतांश भागापर्यंत टप्पा गाठत निम्मा महाराष्ट्र व्यापला. तर बुधवारी (ता. १५) दक्षिण भारतातील राज्यांमध्ये प्रगती करत मराठवाड्याच्या आणखी काही भागांत मॉन्सून दाखल झाला. मॉन्सूनने संपूर्ण कर्नाटक, रायलसीमा आणि तमिळनाडू व्यापून तेलंगणा, सीमांध्रच्या काही भागासह बंगालच्या उपसागरातही प्रगती केली आहे. तर वाटचालीस पोषक हवामान असल्याने शनिवारपर्यंत (ता. १८) मॉन्सून विदर्भाच्या काही भागांसह तेलंगाणा, सीमांध्रचा आणखी काही भाग, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये देखील पोहोचण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

हवामान विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला

यंदा वाऱ्याचा वेग कमी राहिल्याने, जूनमध्ये पावसात खंड राहणार असून, जूनमध्ये राज्याच्या दक्षिण कोकण, मुंबई, तसेच पश्चिम विदर्भाच्या काही जिल्ह्यांत कमी पावसाची शक्यता आहे. मात्र जुलैच्या दुसऱ्या पंधरवाड्यापासून ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रमाण अधिक चांगले राहणार आहे. एकंदरीत काय शेतकरी बांधवांनी अपेक्षित असा पाऊस आल्याशिवाय खरिपाची पेरणी करू नये. समाधानकारक पाऊस सलग तीन दिवस म्हणजेच ८० ते १०० मिमी पेक्षा जास्त तसेच मातीतील ओलावा अडीच ते तीन फूट पर्यंत या बाबी पेरणीसाठी निर्णायक आहेत, म्हणून पेरणी करताना या दोन्ही बाबींची खात्री करून सोयाबीन, मूग, मटकी, सूर्यफूल, भुईमूग, चवळी, उडीद, तूर, बाजरी, खरीप ज्वारी या पिकांच्या पेरण्या कराव्यात. शेतकऱ्यांनी धूळवाफ पेरणी करू नये. चांगला पाऊस सुरू झाल्यानंतर फळझाडांची लागवड करावी. आडसाली ऊस लागवडीसाठी जमीन तयार करावी.

पाऊसात वीज पडण्याची माहिती देणारे दामिनी aap शेतकऱ्यांनी download करावे

महाराष्ट्र राज्यात मान्सून पावसाला सुरुवात झाली आहे. मान्सून सक्रीय होत असताना अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होऊन पावसाने अनेक भागात हजेरी लावलेली आहे. गेल्या पंधरवड्यात वीज पडून जनावरे दगावली आहेत. विजांसह होणाऱ्या पावसाचे पुर्वानुमान शेतकऱ्याला समजावे व जीवितहानी टाळल्या जावी यासाठी पुण्यातील उष्णप्रदेशीय हवामान संशोधन संस्था (आय. आय.टी.एम.) व पृथ्वी प्रणाली विज्ञान संस्था (ESSO) यांच्या संयुक्तविद्यमाने दामिनी हे विजांच्या लखलखाटांचा इशारा देणारे मोबाईल अॅप विकसीत केले आहे.

अलीकडच्या पृथ्वीवर इतर नैसर्गिक आपत्तीच्या तुलनेत वीज सर्वाधिक मारक म्हणून ओळखली जाते. त्यामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढले दामिनी: बिजली चेतावनी आहे. एकट्या विजेमुळे भारतात दरवर्षी सुमारे दोन हजार ते अडीच हजार मृत्यू होतात. दामिनी अॅपसाठी IITM ने लाईटनिंग लोकेशन नेटवर्क मॉडेल विकसित केले आहे. माहिती संकलनासाठी विविध भागात सेन्सर बसवण्यात आले आहेत. प्रत्येक सेन्सरची २०० कि.मी. परिघातील घडामोडींचा वेध घेण्याची क्षमता असून परिसरातील क्षेत्रात आगाऊ इशारा मिळतो. सर्व सेन्सर सेंट्रल प्रोसेसिंग युनिटशी जोडण्यात आले असल्यामुळे वादळी पाऊस, विजांच्या कडकडाटाचे अचूक अंदाज आणि घडामोडी नगरिकांना घर बसल्या समजणार आहेत.

या अॅपमुळे शेतकऱ्यांना विजांच्या कडकडाटांचा व वादळी पावसाचा अंदाज साधारणतः १५ ते ४५ मिनीटे अगोदर मिळू शकतो. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून उपाययोजनाही करणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर विजेसंबंधी शास्त्रीय माहिती, वीज पडणार असल्यास नागरिकांनी / शेतकऱ्यांनी घ्यावयाची दक्षता, वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाटाचा अचूक अंदाज ई. ची माहिती दामिनी अॅपमध्ये आहे. स्मार्ट फोन/अँड्रॉईड मोबाईल धारकांनी (शेतकऱ्यांनी/नागरिकांनी) गुगल प्ले स्टोअरमधून हे अॅप डाऊनलोड करून शेतकऱ्यांनी/नागरिकांनी आपले लोकेशन टाकल्यावर आपणास विजेसंबंधी पूर्वसूचना व इतर माहिती मिळणार आहे.

जून मधील पावसाचा खंड करावयाच्या उपाययोजना

खरीप हंगामात पावसाने ओढ दिल्याने ब-याचशा भागात पेरण्या झाल्या नाहीत. उपलब्ध पाण्याचा साठा देखील अनिश्चित असल्याने अशा परिस्थितीत शेतक-यांना कोणते पीक घ्यावे ह्या प्रश्न पडतो. अशावेळेस अवर्षणप्रवण विभागात उत्पादनात स्थिरता येण्यासाठी आणि आर्थिकदृष्ट्या शेती परवडण्यासाठी खालीलप्रमाणे पिकांचे नियोजन करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

पावसास उशिरा सुरुवात

अवर्षणप्रवण भागामध्ये पावसास बर्‍याच वेळा जुलै-ऑगस्टमध्ये सुरुवात होते. अशावेळी खरीप पिके घ्यावीत किंवा नाहीत अशा संभ्रमात शेतकरी असतात. अशा परिस्थितीत शेतकरी खरिपातील क्षेत्र रबी पिकाखाली घेण्याचा प्रयत्न करतात; परंतु खरीप जमिनी या हलक्या आणि कमी ओल साठविणार्‍या असल्यामुळे रबी पिके समाधानकारक येत नाहीत. म्हणून खरीप हंगामातच उशिरा पेरणीसाठी पिकांचे योग्य नियोजन करणे हे आपत्कालीन पीक योजनेचे महत्त्वाचे तंत्र आहे. म्हणजेच जुलैच्या दुसर्‍या पंधरवड्यापर्यंत बाजरी, सूर्यफूल तसेच हुलगा यांसारखी पिके चांगली उत्पादन देतात; परंतु मटकीसारखे पीक उशिरा पेरणीस योग्य ठरत नाही. खरीप हंगामामध्ये उशिरा पेरणी करताना कडधान्य, गळीतधान्य तसेच तृणधान्य इत्यादी पिकांचे उत्पादन स्थिर करण्यासाठी अनुक्रमे तूर, हुलगा, सूर्यफूल, एरंडी, राळा अशी पिके घ्यावीत. पर्यायी पिकांचे उत्पादन नेहमीच्या सरासरीइतके येणार नाही; परंतु कठीण परिस्थितीत काही प्रमाणात उत्पादन येऊन परिस्थिती सुसह्य होईल, हे मात्र निश्‍चित. या सर्व पर्यायी पिकांच्या बियाणांची पूर्तता मात्र वेळेवर करणे गरजेचे असते. पावसाच्या आगमनानुसार खरीप पिकांचे केलेले नियोजन पश्‍चिम महाराष्ट्र पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहमदनगर तर खानदेशातील नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांचा समावेश होतो.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाने पाऊस लांबल्यास पावसाच्या अपेक्षित कालावधीनुसार करावयाच्या पिकांच्या नियोजनाच्या दिलेल्या शिफारशी पुढीलप्रमाणे आहेत.

अ) १५ जुलै पर्यंत पाऊस

1. पिंके- सोयाबीन, कापूस, संकरित ज्वारी, संकरित बाजरी, तूर, सूर्यफूल, तीळ, मका, खरीप कांदा

2. आंतरपीक - बाजरी + तूर (२:१) , सूर्यफूल + तूर (२:१). सोयाबीन + तूर (३१), गवार + तूर (२१)

3. चारा पिके- गोड़ ज्वारी (फुलें गोधन, रुचिरा, अमृता), मका

4. गवताची पिके - फुले गोवर्धन, फुलें जयवंत

ब) १६ जुलें ते ३१ जुलें पर्यत पाऊस

1. पिके- सूर्यफूल. तूर, हुलगा, एरंडी, बाजरी, तीळ, सोयाबीन', मका, रागड़ा कांदा

2. आंतरपीक- सूर्यफूल + तूर (२:१). तूर + गवार (१:२), बाजरी + तूर (२:१)

3. चारा पिके- गोड़ ज्वारी (फुले गोधन, रुचिरा, अमृता), मका

4. गवताची पिके - फुले गोवर्धन, फुले जयवंत (*मध्यम कालावधीचे वाण + संरक्षित पाणी व्यवस्थापन )

क) १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट पर्यंत पाऊस

1. पिके- सूर्यफूल, तूर, एरंडी, रांगडा कांदा, मका, हुलगा, तीळ

2. चारा पिके -गोड ज्वारी (फुले गोधन, रुचिरा, अमृता), मका )

3. गवताची पिके -फुले गोवर्धन, फुले जयवंत )

4. कमी पाणी व्यवस्थापनांर्तगत तांबडा भोपळा व गवार ही भाजीपाला पिके घ्यावीत.

5. रब्बी ज्वारी करिता पाणी संवर्धनाची तयारी सुरु करावी (Compartment Bunding)

ड) १६ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट पर्यंत पाऊस

1. पिके -सूर्यफूल, तूर', एरंडी, रांगडा कांदा, मका

2. चारा पिके - गोड ज्वारी (फुले गोधन, रुचिरा, अमृता), मका

3. गवताची पिके -फुले गोवर्धन, फुले जयवंत (*मध्यम कालावधीचे वाण + संरक्षित पाणी व्यवस्थापन)


delayed monsoon no need to panic for sowing report

1. पाणी टंचाईच्या काळात ६ फुटावर तुरीची पेरणी करून दोन रोपातील अंतर १ फूट ठेवावे

2. तुरीच्या मधल्या पट्ट्यामध्ये संरक्षित पाणी उपलब्ध असल्यास सोयाबीनच्या दीड फुटाच्या अंतराने ३ ओळी पेराव्यात.

3. यात किंवा मधल्या पट्ट्यात रीजरने खोल सरी काढून त्यामध्ये पावसाच्या पाण्याचे संधारण करावे. किंवा

4. तूर- सोयाबीन आंतरपीक घेताना ३ फुटावर सलग सरी पाडाव्यात. एकाआड एक वरंब्यामध्ये तूर व सोयाबीनची टोकन करून लागवड

करावी. तुरीची लागवड वरंब्याच्या मध्यभागी (१८o x ३० सें.मी.),तर सोयाबीन वरंब्याच्या दोन्ही बगलांमध्ये (४५ x १० सें.मी.) लागवड करावी असे आवाहन सोलापूर हवामान विभागाचे तज्ञ डॉ.सूरज मिसाळ यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

Updated : 18 Jun 2022 2:40 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top