Home > मॅक्स ब्लॉग्ज > पाणबुडीच्या बातमीच्या निमित्ताने......

पाणबुडीच्या बातमीच्या निमित्ताने......

देशात 6 पाणबुड्या बांधण्यासंदर्भातली बातमी तुम्ही वाचलीच असेल. या पाणबुड्या बांधल्याने नौदलाची ताकद संख्येच्या बाबतीत खरंच वाढणार आहे का? यामुळे आपण पाकिस्तान - चीन अशा दोन्ही शत्रूंशी लढायला भारत समर्थ होईल का? ज्येष्ठ पत्रकार अमित जोशी यांचा विशेष लेख

पाणबुडीच्या बातमीच्या निमित्ताने......
X

Courtesy -Social media

संरक्षण विभागाच्या Defence Acquisition Council - संरक्षण अधिग्रहण परिषदेने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतल्याने देशांत सहा पाणबुड्या बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या परिषदेने देशात पाणबुड्यांची निर्मिती करु शकणाऱ्या दोन कंपन्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.

माझगांव डॉक लिमिटेड आणि लार्सन ऐंड टुब्रो या दोन कंपन्यांची निवड परिषदेने केली आहे. यापुर्वीच पाणबुडीचे तंत्रज्ञान हस्तांतरीत करत भारतात पाणबुडी बांधू पहाणाऱ्या जगातील पाच कंपन्यांची निवड भारत सरकारने केली होती. या पाच कंपन्या म्हणजे रशिया, दक्षिण कोरीया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या देशांतील आहेत.

आता दोन भारतीय कंपन्या आणि पाच परदेशातील कंपन्या यांमध्ये करार होणार. परदेशातील कंपनी ही देशातल्या दोन्ही कंपन्यांशी करार करणार का एकाच कंपनीशी? का देशातील दोन्ही कंपन्या या परदेशातील वेगवेगळ्या कंपन्यांशी करार करणार? यामध्ये अजुन स्पष्टता नाही किंवा किमान तसं जाहीर केलेलं नाही. असं असलं तरी यामधील सर्वोत्तम करार हा केंद्र सरकार नक्की करेल आणि देशात नव्या 6 पाणबुड्या बांधणीच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. अर्थात यासाठी 2-3 वर्ष सहज जाणार आहेत. अशी अपेक्षा आहे 2030 मध्ये पहिली पाणबुडी ही नौदलात दाखल झालेली असेल.

या ताज्या दमाच्या पाणबुडी निर्मितीच्या प्रकल्पाला P-75I ( पी -75 आय ) असं सांकेतीक नाव देण्यात आलं आहे. हा सुमारे 43 हजार कोटी रुपयांचा करार असणार आहे. Make In India कार्यक्रमाअंतर्गत हा एक मोठा संरक्षण करार ठरणार आहे. परदेशातील पाणबुडीचे तंत्रज्ञान हस्तांतरीत करत देशात पाणबुडी बांधण्याचा हा कार्यक्रम 'सामरिक भागीदारी' प्रकारातील असल्याचं केंद्र सरकारने जाहीर केलं आहे.

नव्या पाणबुडीत काय असणार आहे ?

या नव्या पाणबुड्या AIP तंत्रज्ञानावर चालणार आहे. यामुळे सध्या आपल्याकडे असलेल्या सिंधुघोष आणि शिशुमार श्रेणीतील डिझेल इलेक्ट्रिक तंत्रज्ञानावर चालणाऱ्या पाणबुडीपेक्षा या नव्या पाणबुड्या दीर्घकाळ पाण्याखाली संचार करु शकणार आहेत. पाण्याखालून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे, अत्याधुनिक पाणतीर (torpedoes ), सोनार यंत्रणा या पाणबुडीत असणार आहेत. या नव्या पाणबुडीचे तंत्रज्ञान, युद्धसज्जता तेव्हा (2030) जगात सर्वोत्तम असेल यात शंका नाही. यामुळे नौदलाच्या ताकदीत मोलाची भर पडणार आहे.

६ नव्या पाणबुड्या पुरेशा आहेत ?

याचे उत्तर अर्थात नाही. भारताच्या तीन्ही बाजुला असलेला समुद्राचा पसारा, या भागातून असलेली जलवाहतूक, चीनची वाढती ताकद लक्षात घेता भारताकडे 'किमान' - 'किमान' 24 पाणबुड्या असणे आवश्यक आहे. अणू ऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्या आणि इतर तंत्रज्ञान असलेल्या...अशा मिळून 24 पाणबुड्या असं निश्चित करण्यात आलं आहे.

सध्या भारतीय नौदलाकडे 8 सिंधुघोष वर्गातील पाणबुड्या, शिशुमार वर्गातील 4, कलवरी वर्गातील ताज्या दमाच्या 3 अशा डिझेल इलेक्ट्रिक तंत्रज्ञानावर आधारीत एकुण 15 आणि एक अणु पाणबुडी आयएनएस अरिहंत अशा एकुण 16 पाणबुड्या आहेत. यापैकी सिंधुघोष आणि शिशुमार वर्गातील 8 पाणबुड्या या 30 वर्षांपेक्षा जास्त जुन्या आहेत.

म्हणजे 2030 पर्यंत या 15 पैकी निम्म्यापेक्षा जास्त पाणबुड्या या निवृत्त झालेल्या असतील, ज्या काही उरलेल्या असतील त्यांचे आयुष्य संपण्याच्या मार्गावर असेल. किंवा त्या पाणबुड्यांना नौसैनिकांना प्रशिक्षण आणि खोल नसलेल्या समुद्रात डेहळणी करण्यापुरते काम ठवेलेलं असेल.

सर्व काही सुरळीत सुरु झालं तर P-75 I प्रकारातील 6 नव्या पाणबुड्या या 2030 पासून दाखल व्हायला सुरुवात होईल. असं धरुया की 2035-36 पर्यंत नव्या 6 पाणबुड्या दाखल झालेल्या असतील. तोपर्यंत कलवरी वर्गातील आणखी 3 पाणबुड्या ( एकुण 6 ) दाखल झालेल्या असतील. तर अरिहंत वर्गातील एकूण 3 अणू पाणबुड्या, आंतरखंडीय क्षेपणास्त्रांचा मारा करणाऱ्या 3-4 पाणबुड्या दाखल होतील अशी आशा धरुया. अणू पाणबुड्या बांधणे. हे अत्यंत क्लिष्ट, वेळखाऊ काम असून भारताला अणू पाणबुडी बांधून, चाचण्यांचे सोपस्कार पार पाडून नौदलात दाखल होण्यासाठी सध्या 10 वर्षे सहज लागत आहेत.

तेव्हा 2035-36 पर्यंत सर्व पाणबुड्या मिळून 24 संख्याही गाठली जाणार नाहीये.

तोपर्यंत चीनची ताकद आणखी वाढलेल असेल. असा अंदाज आहे की तोपर्यंत चीनकडे 20 पेक्षा जास्त अणू पाणबुड्या आणि किमान 40 इतर पाणबुड्या असतील. एवढंच नाही तर ज्या वेगाने चीनचा युद्धनौका बांधणीचा कार्यक्रम सुरु आहे. ते बघता युद्धनौका आणि विमानवाहू युद्धनौका यांची फार मोठी भर पडलेली असेल. 2040 पर्यंत तर अमेरिकेच्या डोळ्याला डोळे भिडवता येईल. एवढी चीनचे नौदल प्रबळ झालेले असेल.

थोडक्यात 2035-36 पर्यंत नव्या P-75I पाणबुड्या दाखल होतांना, पाकिस्तान आणि चीन अशा दोन शत्रूंना दोन दिशेला अंगावर घेतांना, पाणबुड्यांच्या बाबतीत शस्त्रसज्ज होतांना भारताने गरजेपेक्षा कमीच मजल मारलेली असेल. असं असलं तरी पाणबुडी विरोधी स्टेल्थ युद्धनौका ( कमोर्टा श्रेणी ) दाखल होत आहेत, पाणबुडीचा सामना करण्यासाठी आवश्यक टेहळणी विमाने, हेलिकॉप्टर नौदलात दाखल होत आहेत, एवढंच नाही तर काही नव्या युद्धनौकाही लवकरच बांधल्या जाणार आहेत. एक प्रकारे पाणबुड्यांच्या कमी संख्येचं अवकाश आपण पाणबुडी विरोधी युद्धनौकांनी जागा भरून काढण्याचा प्रयत्न करत आहोत.

तेव्हा देशात पाणबुड्या बांधण्याचा वेग आणि संख्या वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. तेव्हा 6 पाणबुड्यांच्या बातमीने भविष्यात फार उणीव भरुन काढत दिलासा मिळेल अशी स्थिती अजिबात नाही हे वास्तव आहे.

अमित जोशी...

लेखक झी 24 तास या वृत्तवाहिनीमध्ये पत्रकार म्हणून कार्यरत आहेत.

(Correspondent, Zee 24 Taas, Journalist)

Updated : 6 Jun 2021 2:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top