Home > मॅक्स ब्लॉग्ज > चालता बोलता पेशंट दवाखान्यात गेला आणि अचानक सिरिअस कसा झाला?

चालता बोलता पेशंट दवाखान्यात गेला आणि अचानक सिरिअस कसा झाला?

सुरुवातीला कोरोना रुग्ण मला काहीच होत नाही. पहिल्या दिवशी ताप आला आता काहीच होत नाही, सगळं ठीक आहे सांगत असतो. मात्र, तो खरंच नॉर्मल असतो का? कोरोनाने रुग्णांच्या अवयवांवर नक्की कोणता परिणाम होतो.? चालता बोलता दवाखान्यात गेलेला आणि अचानक सिरिअस कसा होतो? वाचा डॉ. साथरोग तज्ज्ञ प्रिया देशपांडे यांची महत्त्वपूर्ण माहिती

चालता बोलता पेशंट दवाखान्यात गेला आणि अचानक सिरिअस कसा झाला?
X

खूप जणांना हा प्रश्न भेडसावतो. रुग्ण admit होताना चांगला बोलत होता आणि मग लगेच सिरीयस कसा होईल ? नक्की काहीतरी झोल आहे.

झोल तर आहेच ..

आणि तो झोल केलाय करोनाने.

करोनाला आपण सर्व फ्लू सारखी सर्दी समजून बसलो.

आणि कोरोना तर निघाला महा बिलंदर.

करोना शरीरातील फुफ्फुस तर बाधित करतोच.

त्यामुळे फुफ्फुसामध्ये न्युमोनिया होतो आणि रक्तामधील ऑक्सिजन कमीकमी होऊ लागते.

मात्र, करोनामुळे इतर बरेच अवयव देखील बाधित झालेले असतात .

त्यामुळे होते काय रक्तामध्ये ऑक्सिजन ९०, ८५, ८० , अगदी ७० झाले तरी कधीकधी रुग्ण शांत निवांत असतो. रुग्ण म्हणतो , "थोडे चालले तरच धाप लागतेय.. नाहीतर सर्व ठीक आहे.. कश्याला नेता दवाखान्यात . मी घरीच ठीक आहे." आपण म्हणतो धाप विश्रांती घेतली की होईल बरी. नंतर बघुया.

पण शरीराला तर ऑक्सिजन आवश्यक असते. करोना नसता तर ऑक्सिजन ९३-९० च्या खाली गेले की लगेच अस्वस्थपणा, धडधड , गोंधळल्याची स्थिती आणि धाप लागणे सुरु झाले असते. पण करोना मेंदूमधील आणि महाधमणीतील सेन्सर्स च्या कामामध्ये बिघाड घडवून मेंदूला समजूच देत नाही की, रक्तातील ऑक्सिजन कमी झालेय. म्हणून रुग्ण स्वतःला एकदम नॉर्मल समजत रहातो. याला Happy Hypoxia / Silent Hypoxia म्हणजे नकळत होणारी / लपलेली ऑक्सिजनची कमतरता असे म्हणतात.

लपलेली असली तरी ऑक्सिजनची कमतरता (हाय्पोक्झिया) शरीरातील सर्व अवयवांवर परिणाम करतच असते. काही काळाने अचानक रुग्णाला अतिशय धाप लागते आणि विविध अवयवांचे काम कमी होऊ लागते. म्हणजे अचानक किडनी काम करेनाशी होते. कोणाला हृदयाला त्रास होतो. (organ shut-down) आणि असे दवाखान्यात दाखल केल्यानंतर झाले की आपण म्हणतो चालत गेलेला रुग्ण कसा सिरीयस झाला..

रुग्ण सिरीयसच होता कारण रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण बराच काळासाठी ९३ हून कमी होते. फक्त ना ते रुग्णाला माहित होते , ना आपल्याला माहित होते. आपण नॉर्मलच समजत होतो. म्हणून जेव्हा कोविड सदृश्य लक्षण सुरु होतात, तेव्हा लगेच दिवसातून ४ वेळा पल्स-ऑक्सिमीटर वापरून sPO2 मोजणे आवश्यक आहे. आणि ते लिहून देखील ठेवायला हवे . एवढेच नाही तर ६ मिनिटे चालण्याची टेस्ट (6MWT) दिवसातून २ वेळा करायला हवी जेणे करून लपलेली ऑक्सिजनची कमतरता देखील लगेच समजेल आणि शरीरातील अवयवांचे नुकसान होण्यापूर्वीच आपण रुग्णाला ऑक्सिजनसाठी रुग्णालयामध्ये दाखल करू शकू.

त्यामुळे रुग्ण घरी असेल तेव्हा नियमित पणे sPO2 ची नोंद , दररोज दोन वेळा ६ मिनिटे चालण्याची टेस्ट आणि पोटावर पालथे झोपुन दीर्घ श्वास घेणे आवश्यक आहे. रुग्ण कितीही नॉर्मल वाटत असला तरी sPO2 ९३ च्या खाली आले किंवा ६ मिनिटे चालल्यावर sPO2 ३ हून अधिकने कमी झाले तर रुग्णाला घरी न ठेवता लवकर दवाखान्यामध्ये दाखल करा.

सहव्याधी असतील तर अधिक लक्ष ठेवायला हवे . लवकर ऑक्सिजन मिळाला की मृत्यूचा धोका कमी होतो. नकळत होणाऱ्या ऑक्सिजनच्या कमतरतेवर आपणच पहारा ठेवला आणि पहिल्या टप्प्यामध्ये ओळखले तर रुग्ण दवाखान्यातून सुखरूप घरी येतो.

हैपी हायपोक्झिया ओळखूया

करोनावर मात करुया !

अधिक माहिती हवी असल्यास -https://tinyurl.com/yfx83ql3

डॉ. प्रिया प्रभू (देशपांडे) M.D. साथरोग तज्ञ , मिरज.

(सदर लेख प्रिया देशपांडे यांच्या फेसबुक भिंतीवरून घेतला आहे.)

Updated : 11 May 2021 3:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top