Home > मॅक्स ब्लॉग्ज > " तुझ्या मृत्यूचे टायमिंग चुकले बाळा"

" तुझ्या मृत्यूचे टायमिंग चुकले बाळा"

तिसरीत शिकणाऱ्या दलित मुलाने शिक्षकांसाठी ठेवलेल्या भांड्यातून पाणी प्यायला म्हणून शिक्षकाने त्याला अमानुष मारहाण केली, त्यामुळे या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप होतो आहे. राजस्थानातील या धक्कादायक घटनेबाबत सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी कवितेच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

 तुझ्या मृत्यूचे टायमिंग चुकले बाळा
X

राजस्थानमध्ये घडलेल्या एका घटनेने सध्या देश सुन्न झाला आहे. तिसरीत शिकणाऱ्या दलित मुलाने सवर्ण शिक्षकांसाठी ठेवलेल्या भांड्यातून पाणी प्यायला म्हणून शिक्षकाने त्याला अमानुष मारहाण केली. त्यामुळे या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप होतो आहे. राजस्थानातील या धक्कादायक घटनेबाबत सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी कवितेच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. हेरंब कुलकर्णी यांच्या फेसबुक पेजवरुन साभार...

प्रिय इंदर मेघवाल, (कविता)

तुझ्या मृत्यूचे टायमिंग चुकले बाळा,
स्वातंत्र्याने केलेल्या प्रगतीचे ढोल वाजत असताना,
आश्चर्यकारक उद्गारवाचक चिन्हांवर,
तुझ्या इवल्याश्या हातांनी प्रश्नचिन्ह उभं केलं
आणि प्रगतीच्या भ्रमावर क्षणात पूर्णविराम लागला...
अण्णाभाऊ साठे

दीड दिवसात घाबरून शाळेतून का पळून गेले ?
याचे उत्तर इतक्या वर्षांनी
तुझ्या मृत्यूने मला दिलं....
चवदार तळ्याची बाबासाहेब आंबेडकरांची

क्रांती
उलटी फिरवणारा तुझा शिक्षक बघितल्यावर
ही व्यवस्थाच त्या तळ्यात पुन्हा बुडवावीशी वाटते...
चितेवर चढवलेली सती,
बालविवाहाची परंपरा,
न्यायालयापुढचा मनूचा पुतळा,
पहेलुखानचा झुंडबळी
या धक्क्यानंतर ,

राजस्थानात घडलेली तुझी हत्या
या सर्वांवर क्लायमॅक्स करणारी...
'भारताचे भवितव्य शाळेच्या वर्गखोलीत घडते आहे...' या वाक्याचा अर्थ जर तुझा मृत्यू असेल
तर भारताच्या भवितव्याचीच काळजी वाटते मला बाळा....
शिक्षक असा कसा असू शकतो..?

हे दलितांच्या मंदिर प्रवेशासाठी उपोषण केलेल्या
आणि प्रेममूर्ती साने गुरुजी जपणाऱ्या,
आमच्या महाराष्ट्राला कळणे थोडे कठीण गेले...
पण खैरलांजी बघितलेल्या आमच्यातल्या
जातीयवादाने जाग आणून दिली की

साने गुरुजींचा जमाना संपला आहे...
आणि राज्य कोणतेही असो
जातीय कीड मनामनाला पोखरते आहे....
शेवटी शिक्षक समाज घडवतो की

शिक्षकाला समाज घडवतो ?

तुझ्या मृत्यूने हा चिरंतन प्रश्न ,
शिक्षणव्यवस्थेवर उभा केलाय...
शाळा शाळांचे बांधकाम करताना
शिक्षकांच्या मनाचे बांधकाम करणे बाकी आहे का ?

सडलेल्या समाजमनाची ही वरवर दिसणारी झाकीं आहे का..?
डिजिटल शिक्षणाचे ढोल वाजवताना
आमच्या जातीय मनाचा फॉरमॅट कसा मारायचा...?

बाबासाहेब,
वर्गखोलीत आम्ही वाचतो आहोत रोज
तुम्ही दिलेल्या राज्यघटनेचा सरनामा

पण

तुम्ही शाळेत वर्गखोलीच्या बाहेर जिथे बसला होता
तिथेच आज भारत अजूनही घुटमळतो आहे...

हेरंब कुलकर्णी

Updated : 16 Aug 2022 2:08 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top