Home > मॅक्स ब्लॉग्ज > डी. वाय. पाटील नावाचे साम्राज्य

डी. वाय. पाटील नावाचे साम्राज्य

डी. वाय. पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री का होऊ शकले नाही? राजकारण सोडण्याचा निर्णय त्यांनी का घेतला? राजकारण सोडल्यानंतर शिक्षणाचं साम्राज्य कसं उभारलं? खेड्यापाड्यातील मुलांना वैद्यकीय आणि अभियांत्रिकीचं उच्च शिक्षण मिळावं म्हणून त्यांनी कोणकोणते प्रयत्न केले? बहुजन समाजातील शेतकरी कुटुंबातील डी. वाय. पाटील यांनी उभारलेल्या साम्राज्याचा आणि त्यांच्या जीवनप्रवासाचा आढावा घेणारा ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांचा लेख नक्की वाचा..

डी. वाय. पाटील नावाचे साम्राज्य
X


गणितात दोनशेपैकी १९८ गुण मिळाल्यावर दोन गुण कुठे गेले म्हणून मास्तरांनी थोबाड फोडले होते, या घटनेतून त्या मुलाच्या बुद्धीमत्तेची चमक दिसून येते. राजकारण हे त्यासाठीचे योग्य क्षेत्र नव्हे, हे ओळखून शिक्षण क्षेत्राकडे वळण्यातूनही त्यांच्या बुद्धीमत्तेचे आणि दूरदृष्टीचेच दर्शन घडते. कारण त्यातूनच डीवाय नावाचे साम्राज्य उभे राहिले.

इंदिरा गांधी यांच्याशी असलेल्या जिव्हाळ्याचा किंवा संजय गांधींशी असलेल्या मैत्रीचा राजकीय लाभ घ्यावा असे डीवाय पाटील यांना त्यावेळीही वाटले नाही, आणि तो घेतला नाही त्याबद्दल आजही खंत वाटत नाही. किंबहुना त्यांची तशी प्रवृत्ती नव्हती आणि नाही. त्यामुळेच राजकारणात ते रमले नसावेत.

डॉ. डी. वाय. पाटील यांची मंत्रिपदाची पहिली संधी हुकली नसती, तर ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचू शकले असते आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा भविष्यातला पोत बदलून गेला असता. सुदैवाने म्हणूया किंवा दुर्दैवाने डी. वाय. पाटील यांची मंत्रिपदाची पहिली संधी हुकली. १९७८ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यामुळे त्या संधीने पुन्हा पाठ फिरवली. पुढच्या पराभवानंतर त्यांचा राजकारणातला रस हळुहळू कमी होत गेला आणि ऐन उमेदीत त्यांनी राजकारणाला रामराम ठोकला.

पन्नास हे ख-या अर्थाने राजकारण सुरू करण्याचे वय असते. परंतु डी. वाय. पाटील यांनी वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी राजकारणाचा त्याग करून आजच्या काळात विश्वसनीय वाटणार नाही, असे धाडस केले. असा म्हणजे राजकारण सोडण्यासारखा निर्णय घ्यायला फार मोठे काळीज असावे लागते. एकदा राजकारणाचा चस्का लागला की मरेपर्यंत त्याचा मोह सुटत नाही, असे आपल्याकडील अनेक उदाहरणांवरून दिसून येते. परंतु डी. वाय. पाटील हे वेगळेच रसायन आहे. त्यांनी ते धाडस दाखवले आणि सक्रीय राजकारणाचा पुन्हा स्वप्नातही विचार केला नाही. राजकारण सोडणे हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय झाला. त्याच्याशी बाकीच्यांना काही देणेघेणे असण्याचा प्रश्न नव्हता. म्हणूनच मग प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे त्यांच्या या निर्णयातून साध्य काय झाले? या प्रश्नाच्या उत्तरातच डी. वाय. पाटील या व्यक्तिच्या कर्तृत्वाचे सार सामावले आहे. राजकारण सोडल्यानंतरच्या उर्वरित आयुष्यात त्यांनी जे काही उभे केले, ते एका व्यक्तिला नव्हे, तर एका सरकारलाही शक्य होणार नाही एवढे प्रचंड आहे.


सरकारच्या आणि सरकारमधल्या दूरदृष्टीच्या लोकांच्या पाठिंब्यावरच त्यांचे सगळे शैक्षणिक साम्राज्य उभे राहिले असले तरी ते उभे करण्यासाठी जी दृष्टी आणि जिगर असावी लागते, ती एखाद्याच डी. वाय. पाटील यांच्याकडे असू शकते.

कर्मवीर भाऊराव पाटील, शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे यांच्यासारख्या ऋषितुल्य माणसांनी शिक्षण क्षेत्रात केलेले काम डी. वाय. पाटील यांच्यासमोर होते. किंबहुना ते पाहात, त्यांच्या त्यागाच्या गोष्टी ऐकतच ते मोठे झाले. डी. वाय.पाटील यांनी या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली, तेव्हा परिस्थिती वेगळी होती. कर्मवीर आणि बापूजींच्या काळातल्यासारखी परिस्थिती नव्हती. शिक्षणाची गंगा खेडोपाडी पोहोचली होती. शिवाजी विद्यापीठासारख्या विद्यापीठामुळे खेड्यापाड्यातल्या मुलांना उच्च शिक्षणाचे दरवाजेही खुले झाले होते. परंतु हे सगळे शिक्षण पारंपरिक पठडीतले होते. पदव्यांची भेंडोळी ट्रंकेत ठेवून बहुजन तरुणांना औतच हाणावे लागत होते.


वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षणासाठी मर्यादित जागा होत्या आणि उच्च प्रतीच्या गुणवत्तेमुळे तिथे ठराविक वर्गातील मुलांचीच मक्तेदारी होती. ही कोंडी फोडली वसंतदादा पाटील यांच्यासारख्या अवघी सातवी इयत्ता उत्तीर्ण असलेल्या मुख्यमंत्र्यांनी. राज्यात विनाअनुदानित शिक्षणाचे धोरण आणले आणि खेड्यापाड्यातल्या मुलांना वैद्यकीय, अभियांत्रिकी शिक्षणाचे दरवाजे खुले झाले. राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी पुढाकार घेतला आणि विनाअनुदानित शिक्षणाचे धोरण राबवले. परंतु सहकाराची कोणतीही ताकद नसलेल्या डी. वाय. पाटील, पतंगराव कदम यांच्यासारख्यांनी हे धोरण प्रभावीपणे आणि व्यावसायिक दृष्टीकोनातून राबवले. वसंतदादा पाटील यांनी जे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नाच्या पूर्तीसाठी पुढे शरद पवार य़ांच्यासारख्या दूरदृष्टीच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर अधिकची जबाबदारी सोपवली, ती त्यांनी उत्तमपणे पार पाडली. राज्याच्या प्रमुख शहरांमधून संस्थांचा विस्तार केला.

विनाअनुदानित शिक्षणाचे धोरण सुरू झाल्यानंतरच्या काही वर्षांतील परिस्थिती माझ्या नजरेसमोर आहे. त्या काळात कुणीही खासगी शिक्षण संस्थांबद्दल आणि त्यांच्या संस्थाचालकांबद्दल बरे बोलत नव्हते. शहरी प्रसारमाध्यमांनी त्यांच्यासाठी 'शिक्षणसम्राट' असा हेटाळणीयुक्त शब्द रूढ केला होता आणि त्याच शब्दाने त्यांना संबोधले जात होते. शिक्षणाची दुकानदारी सुरू केल्याची टीका केली जात होती. पारंपरिक विद्यापीठांमधील काही घटक या संस्थांमधील त्रुटी शोधण्याच्या मोहिमेवरच होते. विद्यापीठाची स्थानिक चौकशी समिती (एलआयसी) खासगी महाविद्यालयांच्या पाहणीसाठी जायची, तेव्हा ती परत आल्यानंतर त्या समित्यांचे काही सदस्य प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींपाशी तिथल्या गैरव्यवस्थेची रसभरीत वर्णने करायचे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद, सिनेटमध्ये विनाअनुदानित शिक्षण संस्थांमधील अनागोंदीची चर्चा केली जायची. या आरोपांमध्ये किंवा तक्रारींमध्ये अजिबातच तथ्य नव्हते, असे नाही. किंबहुना गैरसोयी होत्याच. परंतु त्याची कारणेही होती. बँकांची कर्जे काढून, स्थावर-जंगम मालमत्ता गहाण ठेवून संस्थाचालकांनी पैसा उभा केला होता आणि त्यातून इमारती उभ्या केल्या होत्या.

नुसत्या इमारती म्हणजे संस्था नव्हे, तर त्यापेक्षा कितीतरी अधिक गोष्टी होत्या. सुरुवातीच्या तुटपुंज्या आर्थिक स्थितीत कुणालाही या गोष्टी करणे शक्य नव्हते. परंतु परिस्थितीचा विचार न करता त्रुटींची चर्चा केली जात होती आणि शिक्षणाचा बाजार मांडल्याचे चित्र निर्माण केले जात होते. संस्थाचालकांच्या वाट्याला फक्त हेटाळणी आणि बदनामी येत होती.

मधे चाळीस वर्षांचा काळ निघून गेला आहे. नवी मुंबई, कोल्हापूर, पुणे या महाराष्ट्रातल्या तीन प्रमुख शहरांमध्ये डी. वाय. पाटील यांनी उभारलेल्या शिक्षणसंस्था दिमाखाने उभ्या आहेत. राज्याच्या आणि राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्थांच्या स्पर्धेमध्ये केवळ गुणवत्तेच्या बळावर नुसत्या टिकूनच नाहीत, तर दिवसेंदिवस विस्तारत आहेत. तीन दशकांपूर्वी शिक्षणाची दुकानदारी म्हणून हेटाळणी झाली, त्या संस्था आज काळाची गरज बनल्या आहेत. या संस्था एवढ्या वर्षांनंतर आज उभ्या आहेत त्या सहजासहजी टिकलेल्या नाहीत. बाहेरून पाहिल्यानंतर फक्त या संस्थांच्या दिमाखदार इमारती दिसतात, त्यांच्या कॉलेजांच्या जाहिराती दिसतात, परंतु त्यासाठी काय आणि कशा खस्ता खाव्या लागल्या आहेत, किती रक्त आटवावे लागले आहे, कोणत्या संकटांना सामोरे जावे लागले याची कल्पना जे त्यांच्यासोबत होते त्यांनाच माहीत आहे.

डी. वाय. पाटील यांनी डायरी लिहिली असती आणि त्यात रोजच्या घटनांची नोंद केली असती तर त्यांनी डोनेशनच नव्हे, तर फी शिवाय प्रवेश दिलेल्या अनेक मुला-मुलींच्या कहाण्या समोर आल्या असत्या. त्याचाच एक जाडजूड ग्रंथ झाला असता. परंतु त्यांचे जगण्याचे एक तत्त्वज्ञान आहे - आपण दुसऱ्याला केलेली मदत समुद्राकाठच्या वाळूत लिहावी, आणि दुस-याने आपल्याला केलेली मदत मात्र हृदयात कोरून ठेवावी. त्यानुसार दुसऱ्यांना केलेल्या मदतीचा ते कधीच कुठे उल्लेख करत नाहीत. परंतु आपल्याला वेगवेगळ्या पातळ्यांवर मदत करणा-या सगळ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. राजारामबापू पाटील, वसंतदादा पाटील, चंद्रशेखर, शरद पवार, बॅरिस्टर ए. आर. अंतुले, अर्जुन सिंग, मुरली मनोहर जोशी, देवेंद्र फडणवीस अशा पक्षभेदापलीकडे अनेकांचा उल्लेख ते करतात.

डी. वाय. पाटील यांनी नेपाळ, मॉरिशसमध्ये शिक्षणसंस्था काढल्या त्याची खूप चर्चा झाली. परंतु ती चर्चा त्यावेळी तेवढ्यापुरतीच झाली. डी. वाय. पाटील ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील असामी बनली आहे किंवा त्यांचे साम्राज्य देशाबाहेर विस्तारले आहे, अशा आशयाची ती चर्चा होती. नेपाळमध्ये त्यांना आणि त्यांच्या सहका-यांना ज्या दिव्यातून जावे लागले, ते फारसे कुणाला माहीत नाही.

बिहारमधील उच्च शिक्षणाची सगळी व्यवस्था किडली होती. आधीच्या राज्यपालांनी पैसे घेऊन कुलगुरूंच्या नेमणूका केल्या होत्या, त्याची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली होती. दरम्यान डी. वाय. पाटील यांची त्रिपुराहून बिहारमध्ये राज्यपाल म्हणून बदली झाली. त्यांनी तिथल्या उच्च शिक्षण व्यवस्थेला जी काही शिस्त लावली,त्यामुळे नीतिश कुमार यांच्यासारखे मुख्यमंत्रीही थक्क झाले. जिथे जायचे तिथे तिथले होऊन काम करायचे, उत्तमातले उत्तम रिझल्ट द्यायचे, ही डी. वाय. पाटील यांच्या कामाची पद्धत आहे, ती त्यांनी राज्यपाल पदावरूनही दाखवली. त्रिपुरासारख्या गरीब राज्यासाठी आपल्या पदाचा उपयोग करताना त्यांनी केंद्रातील ओळखींचा उपयोग करून पॉवर प्रोजेक्ट मंजूर करून घेणे, त्रिपुराला एज्यूकेशन हब बनवण्यासाठी प्रयत्न केले. राज्यपालपद हे केवळ वृद्धापकाळ आरामात व्यतीत करण्यासाठी नसते, तर राज्याच्या विकासात तेही योगदान देऊ शकतात, हा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला. अवघा एक रुपया मानधन घेऊन काम करणारा हा राज्यपाल देशाच्या इतिहासात विरळाच म्हणावा लागेल.

बहुजन समाजातील शेतकरी कुटुंबातील एक तरुण जिद्दीच्या बळावर काय करू शकतो, हे त्यांनी दाखवून दिले. सधन शेतकरी कुटुंबातील लाडात वाढलेला मुलगा, बेदरकार तरूण, राजकारणात झोकून देऊन काम करणारा नेता, राष्ट्रीय पातळीवरील अनेक नेत्यांशी मैत्र जोडणारा कार्यकर्ता, कर्जबाजारी शिक्षण संस्थाचालक ते शिक्षण क्षेत्रातील प्रचंड मोठ्या साम्राज्याचे अनभिषिक्त सम्राट अशी अनेक वळणे त्यांच्या आयुष्याला आहेत. या सगळ्या प्रवासामध्ये जिवाभावाच्या माणसांचा गोतावळा मात्र सतत त्यांच्या सभोवती राहिला. त्यांच्या सामाजिक जाणिवेचे प्रतिबिंब डॉ. संजय डी पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसते, तर त्यांनी अर्ध्यात सोडलेला राजकीय प्रवास सतेज पाटील आणि नातू ऋतुराज पाटील यांनी पुढे सुरू केला आहे.

डी. वाय. पाटील राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकले असते, असा उल्लेख सुरुवातीला केला आहे. त्या दृष्टीकोनातून विचार केला तर काय दिसते ? महाराष्ट्राचे आजवर जे मुख्यमंत्री होऊन गेले त्या मुख्यमंत्र्यांपैकी किती मुख्यमंत्र्यांची नावे सहजपणे आठवतात ? नुसती नावे आठवली तरी ते मुख्यमंत्री त्यांच्या कोणत्या कर्तृत्वामुळे लक्षात राहतात ? या आणि अशा प्रश्नांच्या अनुषंगाने विचार करताना एका हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्याच मुख्यमंत्र्यांची नावे आणि त्यांचे काम पटकन समोर येऊ शकते. बाकीच्यांसाठी विकिपीडियावर जाऊन यादी पाहावी लागते.


डी. वाय़. पाटील यांच्यासारखा नेता मुख्यमंत्री झाला असता तर त्यांनी आपल्या कर्तृत्वामुळे ठळकपणे नाव कोरले असते की, तेही यादीतले एक बनले असते या प्रश्नाचे उत्तर जर-तरच्या भाषेत देण्यात काहीच अर्थ नाही. परंतु ते मंत्री होऊ शकले नाहीत, त्यामुळे त्यांनी अवघ्या पंचेचाळीसाव्या वर्षी राजकारणाचा त्याग करून शिक्षण क्षेत्राला वाहून घेतले. त्यातून जे साम्राज्य उभे राहिले, त्यामध्ये शेकडो लोकांना रोजगार उपलब्ध झाले. शेकडो अभियंते, डॉक्टर आणि इतर व्यावसायिक समाजासाठी मिळाले. त्यांच्यासारख्या सहृदय संस्थाचालकामुळे गरीब घरातल्या अनेक मुलांना वैद्यकीय, अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करता आले. हे काम कुणा मुख्यमंत्रिपदावरील व्यक्तिला करता आले नसते, हे ठामपणे म्हणता येते. योग्य माणसाने योग्य ठिकाणी काम करावे, डी. वाय. पाटील यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन आवडीच्या क्षेत्रात काम सुरू केले. त्याची फलनिष्पत्ती आपल्यासमोर आहे.

आज डीवायदादांचा वाढदिवस, त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा

विजय चोरमारे, ज्येष्ठ पत्रकार

(फेसबुक साभार)

Updated : 22 Oct 2021 7:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top