Home > मॅक्स ब्लॉग्ज > सत्यशोधकचे सांस्कृतिक अपहरण आणि राजकारण - डॉ. गोविंद धस्के व गायत्री सुतार

सत्यशोधकचे सांस्कृतिक अपहरण आणि राजकारण - डॉ. गोविंद धस्के व गायत्री सुतार

सत्यशोधकचे सांस्कृतिक अपहरण आणि राजकारण - डॉ. गोविंद धस्के व गायत्री सुतार
X

आर एस एस-भाजप यांच्याशी संबंधित धार्मिक-राजकीय प्रवाह वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरून पुस्तकांसारख्या शैक्षणिक माध्यमातून त्यांच्या विशिष्ट पद्धतीच्या इतिहासाची पेरणी करत आहे, अशी राष्ट्रीय पातळीवर सुरु झालेली चर्चा आता स्थिरावलीय. एका बाजूला राजकीय वातावरण थंड-तप्त अशा विषम स्थितीतून जात आहे. याच वेळी मनोरंजन आणि सांस्कृतिक क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग होताना दिसत आहेत. यातला एक प्रकार म्हणजे व्यावसायिक चित्रपटांमधे अलीकडे ब्राह्मणेतर क्रांतिकारक, व समाज सुधारणा चळवळीतल्या निवडक प्रेरणादायी व्यक्तिमत्वांचा वाढत असलेला समावेश! एका बाजूला आजच्या सामाजिक परिस्थितीत वेगवेगळे दुर्बल गट त्यांच्याकडे होत असलेल्या दुलर्क्षाबद्दल सरकारला जबाबदार धरत असताना विरोधाभासी स्थितीत अचानक बहुजन नायक-नायिकांचे मुख्य प्रवाहातले अस्तित्व नक्की का वाढत आहे, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. या अनुषंगाने अलीकडे प्रदर्शित झालेला सत्यशोधक (२०२४) चित्रपट आणि त्याचे सध्याच्या राजकीय परिस्थितीत एक प्रतिकात्मक उदाहरण म्हणून तपासणे आवश्यक झाले आहे.

शालेय पुस्तकातली इतिहासाची मोडतोड वादग्रस्त ठरत असताना अत्यंत सूचक पद्धतीने राजकीय हेतूनी चित्रपट वापरणे हा प्रकार अलीकडे वाढला आहे. एरवी, आपापली मनोरंजन उत्पादने तयार करून निरागस प्रेक्षकांच्या सहाय्याने गल्ला भरणे हा उद्दात उद्देश घेऊन कार्यरत असणार्‍या मनोरंजन क्षेत्राने ‘द काश्मीर फाईल्स’ सारखे राजकीय संवेदनशील विषयावरचे चित्रपट प्रदर्शित करत “राष्ट्रीय” खळबळ माजवली होती. चित्रपट हे फक्त मनोरंजनाचे माध्यम नसून त्याचे राजकीय व सांस्कृतिक पटलावर वेगळे महत्व आणि वापर आहे. काश्मीर फाईल्स सारखे चित्रपट राजकीय धोरणात्मक चर्चेला धरून वेगवेगळ्या पद्धतीचे विचार आणि प्रभाव जनमानसात सोडण्यात कमालीचे यशस्वी ठरले. याच विशिष्ट प्रवाहात महात्मा फुलेंच्या जीवनावर विशिष्ट भाष्य करणारा सत्यशोधक चित्रपट आला आहे . वरकरणी लोकप्रिय होत असला तरी हा चित्रपट विवादास्पद आहे आणि त्याची तितकी प्रकट चर्चा घडून आलेली नाही. सोशल मिडीयावरच्या डाव्या गटातल्या काही बहुजन सौंदर्यवादी विचारवंतांचे किरकोळ लुटूपुटुचे टिकास्त्र आणि त्यासोबतच “चित्रपट जरूर बघा!” हे अगत्याचे सांगणे, अशा मनोरंजक पद्धतीने एकूणच ‘सत्यशोधक’चा विशेष प्रवास सुरुय.

भाषिक भ्रष्टाचार नव्हे तर आणखी काय?

बहुचर्चित सत्यशोधक या चित्रपटातील कलाकारांची निवड वादग्रस्त ठरली ती फुलेंच्या म्हणजेच पडद्यावरच्या कुलकर्णींच्या तोंडून ऐकायला मिळणाऱ्या तथाकथित मराठी प्रमाण भाषेत. या चित्रपटात संदीप कुलकर्णी व राजश्री देशपांडे या ब्राह्मण कलाकारांनी क्रांतिकारक ज्योतिराव गोविंदराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची भूमिका बजावली आहे. देशी मराठी जी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रांतात लोककला आणि विविध बोलींच्या माध्यमातून जिवंत असते, तिला केंद्रबिंदु मानून फुल्यांनी सत्यशोधक चळवळ उभारली. फुलेंनी पुण्यातल्या नव शिक्षित ब्राह्मणी प्रवाहाच्या अँग्लो मराठी विरोधात शूद्रअतिशुद्रांच्या मराठी भाषेतच साहित्य निर्मिती केली आहे. मग चित्रपटात फुले ब्राह्मणी मराठी भाषेत बोलताना दाखवून निर्माते आणि दिग्दर्शक नक्की काय साध्य करू पाहत होते? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. रटाळ पुणेरी ब्राह्मणी मराठीला कंटाळलेल्या महाराष्ट्रातल्या जनतेला नागराज मंजुळे सारख्या दिग्दर्शकाने थोडा दिलासा दिला होता. पण, ते तात्पुरते प्रभाव ठरले. सत्यशोधकच्या बाबतीत मात्र विशिष्ट समुदायाच्या प्रमाण भाषेचा भाषिक भ्रष्टाचार अत्यंत दुर्दैवी आहे.

फुल्यांच्या तत्त्वज्ञानाच्या आणि चळवळीच्या मुशीत तयार झालेला सत्यशोधक जलसा हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या बहुजन भाषिक आणि सांस्कृतिक स्वातंत्र्याचे प्रतिक होता. वेगवेगळ्या जातीतले लोककलाकार आणि त्यांनी जिवंत ठेवलेल्या लोककला यांना एक नवा सांस्कृतिक मंच देत फुल्यांनी सर्वकष सांस्कृतिक संघर्ष उभा केला होता. या इतिहासाचे विद्रुपकरण करण्याचा नाठाळ सभ्यपणा सत्यशोधकमधे प्रकट दिसतो. आपल्या पद्धतीच्या भाषा बोलणाऱ्या पात्रांशी प्रेक्षकांचे सांस्कृतिक नाते तयार होत असते. सैराट सारखे चित्रपट त्यातल्या भाषेमुळे आपलेसे वाटतात. यातून प्रतिकात्मक पातळीवर सामान्य समाजात असे चित्रपट आणि त्यातली पात्रे प्रस्थापित होतात. या उलट सत्यशोधकमध्ये मूळ भाषेला तिलांजली देत तथाकथित फुल्यांच्या तोंडी शुद्ध भाषा देत त्यांना त्यांच्या मूळच्या बहुजन सांस्कृतिक ओळखीपेक्षा वेगळे दाखवण्यात आले आहे. विशिष्ट पद्धतीने सांस्कृतिक व भाषिक गुलामिगिरी तयार करण्याचे प्रयत्न या पूर्वी मुक्ता (१९९४) सारख्या चित्रपटांत दिसले आहे. सत्यशोधक त्याच शाळेतली निर्मिती आहे. यावेळेस हेडमास्तर आणि गुंतवणूकदार वेगळे आहेत हे निर्देशित करण्याचे कसब दाखवून ब्राह्मणेतर समुदायांवरील अत्याचार वेगळ्या कोटीत नेला गेलं आहे. दुर्दैवाने याची साधी भनकसुद्धा सामान्य बहुजन प्रेक्षकाला नाही. यात एक दिलासा देणारी बाब म्हणजे ब्राह्मणेतर समाजातल्या सांस्कृतिक पद्धती व धारणा नव्याने रुजू नयेत यासाठी पद्धतशीरपणे सांस्कृतिक प्रभाव तयार करणारी व्यवस्था स्वतःकडे ठेवणे हा प्रकार आता किमान काही बुद्धीजीवी लोकांना समजून आलेला आहे. अर्थात्, यावर सखोल आणि डोळे उघडणारी चर्चा होऊ नये यासाठी संवाद माध्यमांच्या वापरातून नियंत्रण ठेवणे हा प्रकार अजूनही सुरूच आहे. त्यामुळे, नजीकच्या काळात असल्या सांस्कृतिक अत्याचाराचा फार प्रतिकार होईल असे वाटत नाही.

सत्यशोधक/ब्राह्मणेतर चळवळीचे सांस्कृतिक अपहरण

ब्राह्मणेतर चळवळीच्या साच्यात न बसणाऱ्या कैक गोष्टी सत्यशोधक चित्रपटाच्या माध्यामातून जाणीवपूर्वक लादल्या गेल्या आहेत. पौराणिक सावित्रीच्या मिथकाला फुलेंचे समर्थन मिळेल अशा पद्धतीची चित्रपटातील प्रसंग रचना त्यांच्या एकूणच पौराणिक साहित्याला भाकडकथा ठरवणाऱ्या सांस्कृतिक संघर्षाबद्दल दिशाभूल करणारी आहे. मराठी चित्रपट क्षेत्रात विशिष्ट समुदायातल्या मंडळींचे फक्त आर्थिकच नव्हे तर सांस्कृतिक वर्चस्वसुद्धा आहे. या वर्चस्वावर वेळोवेळी तयार झालेलं प्रतिकार मोडण्यात नेहमीच ही व्यवस्था यशस्वी झाली आहे. किरण माने असोत किंवा सुजय डहाके असोत, मनोरंजन क्षेत्रात विशिष्ट सांस्कृतिक प्रभावांच्या अधिकाराखालीच तग धरता येते, हे आता स्पष्ट झाले आहे.

सत्यशोधक चित्रपटातल्या अनेक तांत्रिक बाबी विशिष्ट प्रभाव तयार करण्यासाठी वापरल्या आहेत. ज्योतिराव फुले यांची प्रतिमा सत्यशोधकचे प्रणेते आणि सामाजिक सुधारणावादी व्यक्तिमत्व अशी दाखवली आहे. अत्यंत भडक पद्धतीचे संवाद देत त्यांच्या वैचारिक व धोरणी व्यक्तिमत्वाला उथळ करण्यात आले आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे तत्कालीन समाजातली प्रखर अस्पृश्यता आणि जातिवाद आणि त्यात फुल्यांनी केलेली क्रांती अशी सखोल वास्तववादी मांडणी जाणवत नाही. फुल्यांनी जिचा प्रतिकार केला ती ब्राह्मणेतर लोकांवर लादलेली अंधश्रद्धा, कर्मकांडयुक्त अत्याचारी व्यवस्थासुद्धा या चित्रपटात दिसून येत नाही. अत्यंत जाणीवपूर्वक पुण्यात काढण्यात आलेल्या सत्यशोधक समाजाच्या झेंड्याची मिरवणूक, हंटर कमिशनला दिलेली साक्ष, प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्याची मागणी, ब्राह्मण नोकरशाहीकडून शेतकऱ्यांची होणारी पिळकवणूक, ब्रिटिश नोकरशहांची विलासी व कामचुकारवृत्तीवर प्रहार या सारख्या क्रांतिकारी भूमिका ठळकपणे मांडणे आवश्यक असताना त्या टाळल्या गेल्या आहेत. लहुजी साळवेंच्या भूमिकेला रंजित कथारूप देऊन बेमालूमपणे पेशवे समर्थक बनवणे आणि जणू ते फुले यांच्यासाठी खाजगी सुरक्षा रक्षक असल्यासारखे दाखवणे यातून फुल्यांच्या सांस्कृतिक चळवळीची हेतुपूर्वक केलेली मोडतोड स्पष्ट होते. खरेतर फुलेंच्या सांस्कृतिक चळवळीतून त्यांनी एकत्रित केलेल्या उपेक्षित जातींमधील सामाजिक-सांस्कृतिक एकता समोर आणलीच गेली नाही. चित्रपट लक्षपूर्वक पाहिला तर फुलेंच्या संपूर्ण जीवनकाळात ते तथाकथित उच्चवर्णीय समाजातील सुधारणावादी नेत्यांचे फक्त बहुजन सहकारी होते की काय असे बघणाराला वाटावे इतपत राजकारण झाले आहे. एकंदरीत हा चित्रपट फुलेंना उपेक्षितांचे नायक म्हणून पुढे आणण्यात, तसेच त्यांच्या कार्यातील सामाजिक ,ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि राजकीय बारकावे दाखवण्यात समर्थ ठरला नाही. यातल्या काही टिकात्मक मुद्द्यांना मुख्यत्वे सोशल मिडीयावर अधोरेखित करण्यात काही ब्राह्मणेतर लेखकांनी आघाडी घेतली, पण चित्रपट पाहायला जाण्याचा आग्रह करत केलेली टिका जागरण करण्यात विशेष प्रभावी ठरली नाही.

हा तर बेलगाम राजकीय खट्याळपणा !

सत्यशोधक सिनेमाची कथा ही केवळ उद्बोधक किंवा प्रेरणादायी मनोरंजन अशी मर्यादित न राहता तिने राजकीय क्षेत्रातही प्रवेश केला आहे. महाराष्ट्राच्या अस्ताव्यस्त राजकारणात या चित्रपटाने वेगळ्या पद्धतीने राजकीय प्रतीकात्मक रचना आणि प्रभाव तयार केले आहेत. महाराष्ट्रात २०१४ पासूनचा भाजपचा खऱ्या अर्थाने उदय झाला. महाराष्ट्रातल्या पारंपारिक राजकारणात आघाडीवर असलेल्या मराठा आघाडीला हा वेगळा धक्का होता. तब्बल दहा वर्षाच्या प्रवासात सत्तेत असणारा समाज या ओळखीपासून ते आरक्षणासाठी हताशपणे धडपडणारा समाज अशी ही ऐतिहासिक वाताहत आता जवळपास सर्वमान्य झाली आहे. राष्ट्रीय पातळीवर ओबीसी समुदायांच्या प्रभावांमुळे भाजप सतेत आली हा प्रवाद आहे आणि तो महाराष्ट्रातसुद्धा चांगलाच विस्तारला आहे. हा सत्ताकारणातून आलेला विशिष्ट राग मंडल कमिशनपासून आरक्षित असलेल्या ओबीसी जातीवर असणाऱ्या द्वेषात भर टाकणारा ठरला. एकूणच हे सर्व राजकारण आणि त्यातले मंथन अलीकडे ओबीसी विरोधी प्रवाहात झाले. मराठा आरक्षणाच्या लढ्यात ओबीसी विरोधी लहर चांगलीच फोफावली आणि त्याचे परिवर्तन विशिष्ट पद्धतीच्या राजकीय संघर्षात प्रकटपणे होणे सुरु झाले आहे. सतेत असणाऱ्या भाजपला ओबीसी मतदारांना दुखावणारे राजकारण झेपणारे नाही. परंतु, आघाड्यांची राजकीय समीकरणे ही वेगळ्या अर्थाने जातीय समीकरणेही असतात त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षामध्ये ओबीसींच्या बाजूने प्रकट ठोस भूमिका घेणे राजकीय संधिसाधूपणाला साजेसे नाही. याची जाणीव भाजप नेतृत्वाला असल्याने एकूणच वातावरण संदिग्ध होते. या सर्व गदारोळात सत्यशोधकचे प्रसिद्ध होणे हा त्यांना एक प्रकारचा दिलासा ठरला आहे.

फुल्यांना ब्राह्मणेतर समाजामध्ये अत्यंत महत्वाचे स्थान आहे. प्रस्थापित जाती-वर्ण वादी सांस्कृतिक गट हजारो पद्धतीने प्रयत्न करून देखील फुल्यांचा प्रभाव अजूनही कमी करू शकले नाहीत. अशा परिस्थितीत राजकीय गरज म्हणून का होईना फुल्यांना जवळ करणे व त्या निमिताने काहीसा उथळ का होईना पण सांस्कृतिक धागा तयार करणे हे भाजपला आवश्यक होते. याच वेळी सत्यशोधकचे आगमन झाले आणि त्या निमित्ताने महाराष्ट्रातील उजवा पक्ष व त्यांचाशी संबंधित समजला जाणारा बहुसंख्य ओबीसी समुदाय मानसिक पातळीवर कुठेतरी पुन्हा जोडला गेला. मराठा आरक्षण आंदोलनाच्या प्रभावात एकाकी पडलेल्या ओबीसी समुदायांना स्वतःसोबत बांधून ठेवण्यात भाजप आणि सत्यशोधक चित्रपट किमान मानसिक पातळीवर यशस्वी ठरलेत. ब्राह्मण कलाकारांना मुख्य भूमिकेत साकारून आणि फुलेंच्या काळातील पुरोगामी ब्राह्मण व्यक्तींना ठळकपणे समोर दाखवत, या चित्रपटाने वर्ण-जातीय राजकीय समीकरणांना उजव्या विचारसरणीच्या राजकारणाच्या बाजूने मजबूत केले. हे करताना या चित्रपटाने बेमालूमपणे फुल्यांची खरी क्रांती न दाखवता सत्यशोधकची आरएसएस-भाजप आवृत्ती मांडली. जुलमी ब्राह्मणवादाविरुद्ध फुले यांची अस्सल सांस्कृतिक क्रांती दाखवणे म्हणजे ओबीसी समाज पुन्ह्या फुल्यांच्या विचारांकडे घेऊन जाणे ठरले असते. त्या वैचारिक प्रवासाचा सामाजिक व सांस्कृतिक धोका प्रस्थापित ब्राह्मणवादी समूहांना चांगलाच माहित आहे. परंतु, तसा राजकीय धोका सुद्धा पूर्णपणे टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न सत्यशोधकमधे घेण्यात आला आहे. एकाच वेळी राजकीय लाभासाठी सत्यशोधकचा वापर आणि त्याचवेळी फुले यांचा क्रांतिकारी वारसा आणि ब्राह्मणेतरांचे सामाजिक-राजकीय अस्तित्व यातला संबंध नष्ट करणे, असे दोन्ही घडवून आणण्यात प्रस्थापित समूह यशस्वी झाला आहे. एकूणच प्रस्थापित समाजाच्या राजकारणासाठी त्याच समाजाची सांस्कृतिक क्षेत्रातली आघाडी हातात हात घालून नफा आणि सत्ता दोन्ही वाढवत आहेत.

(हा मराठी लेख द प्रिंट या वेबसाईटवर प्रकाशित केलेल्या इंग्लीश लेखावर आधारित आहे. लेखकांची मते वैयक्तिक.)

Updated : 11 March 2024 2:53 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top