Home > News Update > हताश पाकिस्तान ने पसरले भारतापुढे हात

हताश पाकिस्तान ने पसरले भारतापुढे हात

हताश पाकिस्तान ने पसरले भारतापुढे हात
X

भारताकडे हायड्रोक्सिक्लोरोक्विनची वाढती मागणी

भारताकडे जगभरातील जवळपास 110 देशांनी हायड्रोक्सिक्लोरोक्विन या औषधी गोळ्यांचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे यामध्ये तुर्कस्तान, पाकिस्तान आणि मलेशिया या देशांचाही समावेश आहे. या तीनही देशांनी भारताने जम्मू काश्मिरच्या पुनर्रचना करण्याच्या घेतलेल्या निर्णयावर उघडपणे टीका केली होती, हे लक्षात घ्यायला हवे. पाकिस्तान हा तर सातत्याने भारताला अडचणीत आणणारा देश आहे. आज भारताबरोबरच पाकिस्तानातही कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढतो आहे. रुग्णांची संख्या वाढतेय. तरीही आपली हेकेखोर भूमिका न सोडणारा, भारताविरोधात सतत कुरघोडी करणारा, कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी घेतलेल्या भारताच्या पुढाकाराला विरोध करणारा पाकिस्तान आता मात्र देशातील परिस्थितीने हताश होत भारताकडेच हायड्रोक्सिक्लोरोक्विन पुरवण्याची मागणी करत आहे.

कोरोनापुढे पाकिस्तान हताश

आज पाकिस्तानची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. पाकिस्तानात कोरोनाचे सुमारे 8 हजार रूग्ण आहेत. मृत्युमुखी पडणार्यां च्या संख्या 100च्या वर गेली आहे. पाकिस्तानात कमालीची अनागोंदी निर्माण झाली आहे. अजूनही त्यांनी कोणतेही लॉकडाऊन घोषित केलेले नाही. तिथल्या सरकारची तशी इच्छाही नाही. कारण तिथल्या सरकारला लोकांच्या आ़युष्यापेक्षाही अर्थव्यवस्थेची अधिक चिंता आहे. त्यामुळेच इम्रान खान यांनी स्वतःच जाहीर केले की आम्ही लॉकडाऊन घोषित करणार नाही. जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जर्मनी, अमेरिका यांच्याकडे त्यांनी मदतीसाठी याचना केली आहे. आज पाकिस्तानात कोरोनाशी लढण्यासाठी आवश्यक असणारे पीपीई किट, मास्क, आयसीयू उपकऱणे या कशाचीच फारशी उपलब्धता नाही.

पाकिस्तानच्या कुरापती कायम

पण कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाही पाकिस्तानच्या कुरापती काही कमी झालेल्या नाहीत. गेल्या पंधरवड्यात पाकिस्तानने जाणीवपूर्वक शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. अलीकडील काळात या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. भारतावर कुरघोडी करण्यासाठी ते जाणीवपूर्वक नागरी वस्त्यांवर हल्ले करताहेत. सामान्य माणसांना लक्ष्य करताहेत. भारत कोरोना विषाणू संसर्गाशी झुंजत असताना, संपूर्ण देश लॉकडाऊन असताना आणि पाकिस्तानची अवस्था काही वेगळी नसताना जाणीवपूर्वक पाकिस्तान भारताला त्रास देतो आहे. गेल्या आठवड्यामध्ये जम्मू काश्मिरमध्ये दहशतवादी हिंसाचाराच्या घटनांची संख्याही वाढली आहे. त्याचबरोबर घुसखोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याचाच अर्थ पाकिस्तान आपल्या मूळ स्वभावाला सोडत नाहीये.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी संयुक्त राष्ट्र संघाला एक पत्र लिहिले आहे आणि त्यात कोरोना संदर्भाने उल्लेख न करता जम्मू-काश्मिरमध्ये कशा प्रकारे मानवाधिकारांचे उल्लंघन होते आहे याचा संदर्भ देत संयुक्त राष्ट्र संघाने त्यात हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे. वास्तविक, संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेने एक महत्त्वाचा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यांनी जगभरातील देशांना शस्त्रसंधीचे आवाहन केले. सर्व प्रकारचा संघर्ष टाळा आणि आपल्या सर्वांचा संघर्ष कोरोना विषाणूशी सुरू आहे असे सांगतानाच कोणत्याही राष्ट्राने कोणाबरोबरच संघर्ष करू नये, असे निर्देश दिले आहेत. तरीही जाणूनबुजून पाकिस्तान भारताला त्रास देण्याच्या प्रयत्नात आहे.

भारताच्या पुढाकाराना विरोध

काही दिवसांपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्कच्या व्यासपीठावरून आठही सदस्य देशांच्या प्रमुखांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली होती. त्याहीवेळी इम्रान खान यांचा इगो आडवा आला. ते स्वतः उपस्थित न राहाता तिथे आपला प्रतिनिधी पाठवला. त्याहीवेळी कोरोना संकटावर न बोलता या प्रतिनिधींनी तेथे जम्मूकाश्मिरच्या मुद्द्यावर भाष्य केले आणि चीनचे कौतुकही केले. यावरुन कोरोनाविषयी पाकिस्तानला अजिबातच गांभीर्य नाही हे जगाला कळून चुकले आहे. पण आता हाच पाकिस्तान भारतापुढे मदत मागतो आहे.

भारताच्या भूमिकेकडे लक्ष्य

पाकिस्तानने भारताकडे पहिल्यांदाच हायड्रॉक्सिक्लोरोक्विनची मदत मागितली आहे. आपल्याला सातत्याने अडचणीत आणणार्यात पाकिस्तानला याबाबत मदत करावी की नाही असा प्रश्न भारतापुढे आहे. आज हायड्रॉक्सिक्लोरोक्विनचे सर्वाधिक उत्पादन भारतात होते आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने भारतात पुढील सहा महिने पुरेल इतका हायड्रॉक्सिक्लोरोक्विनचा साठा आहे हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे भारत आपल्या गरजा भागवून इतर देशांना मदतीचा हात देऊ शकतो. अमेरिकेनेही अशी मागणी केली होती आणि ती मदत करण्याचे भारताने मान्यही केले होते. त्यावेळी भारताकडून असे सांगण्यात आले होते की आम्ही स्वतःची गरज भागवू, त्यानंतर शेजारच्या देशांची गरज पाहू आणि मग उर्वरीत जगाला मदत करू. पाकिस्तानही आपला शेजारी देश आहे.

पाकिस्तान सरकार, पाकिस्तान लष्कर आणि गुप्तहेर संघटना आयएसआय हे भारताविरोधात कितीही कांगावा करत असले, अडचणी निर्माण करत असले तरीही भारताचे शत्रुत्व तिथल्या नागरिकांशी नाही. तसेच भारताचे परराष्ट्र धोऱण हे सातत्याने मानवी मूल्यांवर आधारित आहे. भारताने अनेक कठीण प्रसंगी शेजारी देशांना मदत केली आहे. उदा. नेपाळमधील भूकंप, श्रीलंका, मालदिवमधील आणबाणी असो भारत सर्व प्रकारचे मतभेद, तणाव बाजूला सारत मदतीला धावून गेला आहे.

कोरोनाच्या जागतिक महासंकटाच्या काळातही बांग्लादेश, श्रीलंका, नेपाळ, भूतान या देशांना किटस पाठवणे, डॉक्टरांची मदत पाठवणे, औषधे पुरवणे अशी मदत भारताने केली आहे. इतकेच नव्हे तर सार्क सदस्य राष्ट्रांनी एकत्रितरित्या मिळून कोरोनाविरोधात लढण्यासाठी भारताने 10 दशलक्ष डॉलरचा निधी उभा केला आहे. आता भारताने पाकिस्तानकडून केलेल्या औषधांच्या मागणीचाही सकारात्मक विचार करायला हवा. कदाचित, मागील संघर्षांच्या पार्श्वभूमीवर जनमतातून याविरोधात सूर उमटेलही; परंतु एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे आताच्या कसोटीच्या-अडचणीच्या काळात भारताने मदत देऊ केली तर पाकिस्तानच्या जनतेमध्ये एक अत्यंत चांगला संदेश जाऊ शकतो. खुद्द पाकिस्तानी सरकार तिथल्या लोकांना मदत करत नाहीये, तिथल्या जनतेला सरकारने वार्यािवर सोडले आहे, अशा प्रसंगी भारतासारखा देश त्यांना मदत करतो आहे ही गोष्ट अनेकार्थांनी महत्त्वाची ठरु शकते.

चीनच्या वुहान प्रांतात जेव्हा कोरोनाचा संसर्ग वाढत होता तेव्हा भारताने चीनला देखील मदत केली आहे. मलेशियाने भारताला मास्कची ऑर्डर दिली होती. त्यामुळे भारताच्या परराष्ट्र धोऱणाचा इतिहास पाहिला तर आपण मानवतावादी मूल्यांना प्राधान्य दिले आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या मागणीकडे भारताने सहानुभुतीपूर्वक पाहून त्यांना मदत देणे गरजेचे आहे. यातून भारत जगापुढे मानवतावादी उदार दृष्टीकोनाचा नवा आदर्श ठेवू शकतो. भविष्यात कोरोनाचा इतिहास लिहिताना भारताचे नाव निश्चितच ठळकपणाने लिहिले जाईल यात शंका नाही.

डॉ. शैलेंद्र देवळाणकर,

परराष्ट्र धोरण विश्लेषक

Updated : 20 April 2020 5:29 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top