Home > मॅक्स ब्लॉग्ज > कोरोना संकट: मुंबईच्या मेकओव्हरची संधी!

कोरोना संकट: मुंबईच्या मेकओव्हरची संधी!

कोरोना संकट: मुंबईच्या मेकओव्हरची संधी!
X

भारताने कोरोना रुग्णांच्या बाबतीत चीनला मागे टाकले आहे आणि महाराष्ट्रातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या देशात सर्वाधिक झाली आहे. अशावेळी 120 वर्षांपूर्वी म्हणजे 1896-97 मध्ये आलेल्या प्लेगच्या साथीचे स्मरण होते. या दोन्ही साथींची तुलना केली तर वावगे ठरणार नाही. कोरोनाच्या संकटाप्रमाणेच ती प्लेगची साथही चीनमधून भारतात आली आणि संपूर्ण जगभरात पसरली होती. चीनमधील तत्कालीन क्विंग राजवटीला आताच्या कम्युनिस्ट राजवटी प्रमाणे प्लेगचा प्रसार रोखण्यात अपयश आले होते. पण तेव्हा प्रवास आणि संवादाची माध्यमे नसल्याने प्लेगची साथ चीनच्या किनाऱ्यांपर्यंत आणि तिथून भारतात तसंच इतर ठिकाणी पोहोचण्यास वेळ लागला. आताच्या कम्युनिस्ट राजवटीप्रमाणेच क्विंग राजाने त्यावेळी प्लेगची साथ रोखण्यासाठी उपाययोजना का केल्या नाहीतय़? या प्रश्नाचे उत्तर कदाचित त्यांना संसर्ग झालेल्या लोकांचे विलगीकरण करुन त्यांच्या कुटुंबापासून दूर ठेवायचे नव्हते, असे असू शकते.

पण जेव्हा ब्रिटीशांना भारतात प्लेगचा शिरकाव झाल्याची जाणीव झाली तेव्हा त्यांची चीनसारखी भावना नव्हती. त्यांनी कठोरपणे भारतीयांच्या घरांमध्ये छापे घालून संसर्ग झालेल्यांना वेगळं केलं आणि क्वारंटाईनही केल. लोकांना त्यांच्या इतिहासाची माहिती व्हावी यासाठी मुंबईमध्ये हेरिटेज वॉकचे आयोजन करणाऱ्या आणि हेरीटेज प्रोजेक्टच्या संस्थापक संचालिका आलीशा सादीकोट यांच्या मते, प्लेगच्या संकटाला ब्रिटीशांनी मुंबईला (तत्कालीन बॉम्बे) शहराला भारतातील प्रमुख शहर म्हणून मेकओव्हर करण्याची संधीही मानले. त्यांनी मुंबईतले रस्ते रुंद केले आणि घरांमध्ये भरपूर सूर्यप्रकाश आणि हवा खेळती राहील अशी रचना केली. त्याचबरोबर गटारांमध्ये समुद्राचे पाणी शिरेल अशी व्यवस्था करुन प्लेगला कारणीभूत ठरणारे उंदीर वाहून जातील अशी सोय केली. पण तरीही उंदीर वाढतच राहिले. बरोबर शंभऱ वर्षांनी 1996 मध्ये जेव्हा सुरतमध्ये प्लेगची साथ आली तेव्हा त्या धास्तीने मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या परीने उंदीरांना नष्ट करण्याचा प्रयत्न केला पण उंदरांची संख्या वाढतच राहिली.

1896-97 मध्ये जसे ब्रिटीशांनी आधुनिक मुंबईचे रुप घडवले तशीच एकमेव संधी आता महाराष्ट्र सरकारला आहे. प्लेगच्या साथीने दक्षिण मुंबईतल्या चाळींमध्ये दाटीवाटीनं राहणाऱ्या आणि सूतगिरण्यांच्या आवारात राहणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला होता. (मुंबई हे तेव्हा गिरण्यांचं शहर होतं. अमेरिकेतील 1863 च्या नागरी युद्धामुळे तिथून होणारा सुताचा पुरवठा कमी झाल्याने ब्रिटीशांनी मुंबईमध्ये गिरण्या उभारल्या होत्या.) ब्रिटीशांनी उपनगरांची उभारणी केली. सुरूवात दादरपासून झाली. नंतर दादर हे मुंबईचं मध्यवर्ती केंद्र बनलं आणि मग लोकांना माहीम, माटुंग्यापर्यंत राहायला जाता आलं. आज या उपनगरांपेक्षा आशियातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये आढळणारे कोरोनाचे रुग्ण हे सरकार आणि मुंबई महापालिकेपुढचे आव्हान ठरले आहे.

प्लेगच्या साथीच्या काळात बाधीत लोकांना शोधण्यासाठी चाळींमध्ये आणि इतर भारतीयांच्या घरात ब्रिटीश पोलीस थेट घुसत होते. पण लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार असे करु शकत नाही. ज्याप्रमाणे ब्रिटीशांनी 1897 मध्ये मुंबईत आलेल्या स्थलांतरीतांना त्यांच्या त्यांच्या राज्यात पाठवले होते, त्याचेच अनुकरण करुन सरकार मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या स्थलांतरीताना त्यांच्या राज्यात जाण्याची परवनागी देऊ शकते. ब्रिटीशांनी स्थलांतरीतांना रेल्वे आणि जहाजांनी लांबच्या ठिकाणी पाठवले आणि इतर देशांपर्यंत तो आजार पोहोचला. आता ज्यांना मुंबई सोडून जायचे आहे त्या स्थलांतरींतांसाठी सरकारने रेल्वे, बसेसची सोय केली आहे. तरीही काही स्थलांतरीत चालत घरी निघाले आहेत.

पारंपरिकदृष्ट्या मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतरीत राहतात मग ते पांढरपेशे असो की अंगमेहनीतेच काम करणारे असो. धारावीमध्ये फक्त उत्तर भारतीयच नव्हे तर दक्षिण भारतीय, ओरिसा, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेशमली लोकही राहतात. त्या सगळ्यांमधलं साम्य म्हणजे ते प्लबंर, इलेक्ट्रशिअन, टॅक्सी ड्रायव्हर, घरकाम करणारे अशा असंघटित क्षेत्रात काम करतात. लॉकडाऊनमुळे या सगळ्यांचे काम ठप्प झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

कुणाला आवडणार नाही पण माझे मत असे आहे की, मुंबईतल्या झोपडपट्ट्या आणि चाळींमध्ये राहणाऱ्यांपैकी ज्यांना घरी परतायचे आहे त्यांना जाऊ द्यावे आणि इतरांना धारावीच्या झोपडपट्टीमधून संक्रमण शिबिरांमध्ये स्थलांतरीत कऱण्यात यावे. सरकारने हीच संधी साधत या झोपड्या काढून इथे वन रुम स्टुडिओ बांधावे, प्रत्येक अपार्टमेंटमध्ये बाथरुमची सोय करावी. ब्रिटीशांनी 20 व्या शतकाच्या सुरूवातीला शहराच्या स्वच्छतेसाठी आणि इथं राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यासाठी हेच केले होते. यामुळे नागरिकांच्या जीवनशैलीत आणि आरोग्यामध्येही मोठा बदल झाला.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे आतापेक्षा त्या काळात मुंबई आणि पुण्यामध्ये प्लेग हा जास्त विनाशकारी ठरला. लोकांच्या जातीय आणि धार्मिक भावनांमुळे बाधितांचे विलगीकरण करताना ब्रिटीशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. त्यांना एकत्र रहायचे होते, म्हणून मग मुंबईमध्ये हिंदू कॉलनी, पारसी कॉलनी, पाठारे प्रभू कॉलनी अशा वसाहती तयार झाल्या. त्यांनी दोन मुख्य रस्ते बांधले (सीडनेहॅम रोड, नंतर मुस्लिम वस्तीमुळे या रस्त्याचे नाव मोहंमद अली रोड असे झाले). त्याचबरोबर प्रिन्सेस स्ट्रिट (प्रामुख्याने ख्रिश्चन आणि पारसी) या रस्त्यांची बांधणी प्रामुख्याने अशा क्वार्टर्ससाठी कऱण्यात आली जिथे प्रकाश आणि हवा पोहोचेल. पण आता हे रस्ते गर्दीत हरवले आहेत.

पण सुदैवाने आता मोहम्मद अली रोडच्या पुनर्विकासाचे काम बोहरा समाजाचे धर्मप्रमुख सईदना यांनी स्थापन केलेल्या ट्रस्टमार्फत केले जात आहे आणि सरकारनेही याला मान्यता दिलेली आहे. पण दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध सैफी हॉस्पिटलचे प्रशासक अबुझर झाकीर यांच्या मते इथल्या रहिवाशांनी पुनर्विकास आणि आधुनिकीकरणाला तेवढाच विरोध केला जेवढा ब्रिटीशांना चाळी आणि समाजा-समाजांच्या वसाहतींमधून झाला. असे असले तरी ट्रस्ट आणि सरकार या भागाचा चेहरामोहरा बदलण्यावर ठाम आहेत. त्याच जिद्दीने आणि प्रेरणेने सरकारने आता लोकांना शुद्ध पर्यावऱण देण्यासाठी धारावी, गिरण्यांच्या जमिनींवरील चाळी आणि मुंबईतील इतर झोपडपट्ट्यांबाबत निर्णय घेतला पाहिजे.

ब्रिटीशांनी प्लेगशी कसा सामना केला? त्यांचा निर्धार पक्का होता आणि त्यांनी वाल्दमर हाफकीन या युक्रेनियन ज्युईश डॉक्टरला (त्यांच्या नावाने प्रसिद्ध हाफकीन इन्स्टिट्यूज आज उभे आहे) कोलकाता इथून लसीचा शोध लावण्यासाठी बोलावून घेतले. त्यांनी वर्षभराच्या आत प्लेगवरील लस तयार केली. एवढंच नाही तर स्थानिक भारतीयांचा विरोध असल्याने त्यांनी स्वत:वरच त्या लसीचा पहिला प्रयोग केला. त्यानंतर खोजा समाजानं त्यांना साथ दिली. जेव्हा त्यांनी प्लेगचा प्रतिकार केला हे सिद्ध झाले तेव्हा इतरांनी ती लस घेतली.

ब्रिटीशांचा विज्ञावर गाढ विश्वास होता. पण मला तेव्हा भीती वाटली जेव्हा सध्याच्या भारत सरकारने इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्थेला (ICMR) गंगाजलाचा कोरोना व्हायरसला प्रतिबंध करण्यासाठी उपयोग होऊ शकतो का, याची चाचणी करण्यास सांगितले. पण ICMRने लगेचचग सरकारची ही मागणी फेटाळली हे बरे झाले. प्लेगवरील पहिली लस भारतात तयार झाली. डॉ. हाफकीन यांनी केलेला वैज्ञानिक अभ्यास आणि पंडीत जवाहरलाल नेहरु यांना अपेक्षित असलेला भारतातील विज्ञानाचा वाढलेला प्रसार पाहता मला खात्री आहे आपण कोरोनालाही मात देऊ शकतो. फक्त गोमुत्रा सारख्या उपायांचा आणि मंत्रतंत्रांचा अडसर या मार्गात यायला नको.

Updated : 20 May 2020 2:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top