Home > मॅक्स ब्लॉग्ज > Nikhil Wagle Analysis : निवडणूक आयोगाच्या लबाडीला कोर्टाचा हिरवा कंदील

Nikhil Wagle Analysis : निवडणूक आयोगाच्या लबाडीला कोर्टाचा हिरवा कंदील

उध्दव ठाकरे यांच्या हातून धनुष्यबाण आणि पक्ष एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात जाण्यास कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत. निवडणूक आयोगाने केलेल्या लबाडीला सर्वोच्च न्यायालयाने कशा प्रकारे हिरवा कंदील दाखवला? याबरोबरच मोदी सरकारने खेळलेली चाल, उध्दव ठाकरे यांची चूक आणि एकनाथ शिंदे यांचे पुढचे पाऊल याविषयी सविस्तर विश्लेषण केले आहे ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांनी...

Nikhil Wagle  Analysis : निवडणूक आयोगाच्या लबाडीला कोर्टाचा हिरवा कंदील
X

लबाडी निवडणूक आयोगाची आहे, पण तिला हिरवा कंदिल सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) दाखवला. १६ आमदारांच्या अपात्रतेबद्दल सुप्रीम कोर्टात चाललेला खटला संपेपर्यंत निवडणूक आयोगाने निर्णय देऊ नये, ही उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) मागणी होती. सुरुवातीला कोर्टाने आयोगाला स्थगिती दिली आणि मग एक दिवस अचानक ती उठवली. उद्धव ठाकरे दिल्ली हायकोर्टात गेले, पण उपयोग झाला नाही. निवडणूक आयोगातल्या राजकारणाचा अंदाज उद्धवना आला असावा. म्हणूनच काही दिवसांपूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सावधगिरीचा इशारा दिला होता. नारायण राणे (Narayan Rane) तर आयोगाचा निकाल आधीच जाहीर करुन बसले होते.

सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajiv Kumar) यांच्या मूळ नेमणुकीवरुन वाद झाला होता. अशोक लवासा (Ashok Lavasa) या बाणेदार आयुक्तांच्या जागी त्यांची नेमणूक घाईघाईने करण्यात आली होती. मोदींच्या गेल्या आठ वर्षात मोदी (PM Modi) आणि भाजपवर आक्षेप घेणारे लवासा हे एकमेव आयुक्त होते. त्यांच्या जागी आलेले राजीव कुमार वित्तसचिव होते आणि मोदींच्या विश्वासातले आहेत. त्यामुळे अशा निवडणूक आयुक्तांकडून तुम्ही न्यायाची काय अपेक्षा करणार? हा निकाल भाजपला अनुकूल असणार ही चर्चा गेले काही महिने होत होती. अर्थात, एक नोकरशहा म्हणून आयुक्तांनी आपलं काम चोख बजावलंय. आपल्या ७७ पानी निकालात त्यांनी सज्जड वकिली युक्तिवाद केला आहे. गंमत म्हणजे, आज युपीए सरकार असतं तर हाच तपशील वापरुन त्यांनी उद्धव ठाकरेंच्या बाजूने निवाडा दिला असता. या निकालावर तिन्ही आयुक्तांच्या सह्या आहेत. ( या निकालचं सविस्तर विश्लेषण मी @nikhilwagleoriginal या माझ्या युट्यूब चॅनलवर केलं आहे.)

हा निर्णय पक्षपाती आहे, सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली घेतलाय हे उघड आहे. आता याविरुद्ध सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. जरुर प्रयत्न करा, पण फार आशा ठेऊ नका. अंतिम निकाल जनतेच्या कोर्टातच होईल. निवडणुकीच्या तयारीला लागा.

मी काल म्हटल्याप्रमाणे हा ठाकरे कुटुंबिय आणि मुळ शिवसेनेच्या दृष्टीने कसोटीचा काळ आहे. शिंदे (Eknath Shinde) यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन उद्धव यांचा राजकीय काटा काढण्याचा प्रयत्न भाजप करणार. त्याला तोंड देण्यासाठी उद्धव ठाकरे यांना घराघरात पोहोचवावं लागेल. शिंदेंचं याच्या पुढचं पाऊल शिवसेनेच्या मालमत्तांवर दावा सांगण्याचं असेल. ती लढाई न्यायालयातच लढावी लागेल.

जो जनतेचा विश्वास मिळवेल आणि प्रामाणिकपणे लढेल तो जिंकेल. कोर्टाचा न्याय आणि प्रत्यक्षातला न्याय वेगळा असतो. शिंदेचं भूत उद्धव ठाकरेंनीच उभं केलंय आणि भाजप त्याचा वापर करतंय. पण त्याही पेक्षा महत्वाचं, ही लढाई लोकशाही वाचवण्याची आहे. अन्यथा, भाजपचा भस्मासूर तुम्हा-आम्हा सगळ्यांना गिळून टाकेल.

Updated : 18 Feb 2023 5:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top