Home > मॅक्स ब्लॉग्ज > कोरोना लस निर्मितीचा प्रवास: Saniya Bhalerao

कोरोना लस निर्मितीचा प्रवास: Saniya Bhalerao

कोरोना लस निर्मितीचा प्रवास: Saniya Bhalerao
X

ऑक्सफर्डच्या कोरोना व्हॅक्सिनच्या फेज १ आणि फेज २ क्लिनिकल ट्रायल्स संदर्भातला एक १३ पानाचा रिसर्च पेपर वाचला. जो 'द लॅन्सेट' या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. "द लॅन्सेट" हे जगातील मेडिकल सायन्सच्या सर्वोत्तम जर्नल्सपैकी एक. या जर्नलमध्ये नुकताच ऑक्सफर्ड विद्यापीठाने एस्ट्राझिनका या फार्मास्युटिकल कंपनीसोबत काम करत असलेल्या कोरोना व्हॅक्सिनच्या क्लिनिकल ट्रायल्स संदर्भात आणि परिणामकारकतेबाबत एक रिसर्च पेपर प्रकाशित केला आहे.

कोरोना व्हॅक्सिनच्या फेज १ आणि दोन या क्लिनिकल ट्रायल्सचे डिडेल्ड रिपोर्ट्स त्यांनी या रिसर्च पेपरमध्ये दिले आहेत. मागच्या लेखात मी सांगितलं होतं की, व्हॅक्सिन तयार होणं आणि त्यासाठी कराव्या लागणाऱ्या क्लिनिकल ट्रायल्स याची प्रोसेस काय असते. उगाच इथे तिथे छापून येणाऱ्या बातम्या, व्हॅक्सिन कधी येणार? या बाबत उलट सुलट चर्चा आणि त्यातून पसरणारा गैरसमज कमी व्हावा त्याकरिता हा लेख. (लॅन्सेट मध्ये चायना मधल्या एका कंपनीच्या व्हॅक्सीनच्या फेज २ ट्रायल्सच्या प्रॉमिसिंग रिझल्ट्सबद्दल सुद्धा छापून आलं आहे.)

सगळ्यात आधी तर मी सांगू इच्छिते की हे व्हॅक्सिन विकसित करणाऱ्या शास्त्रज्ञांची नावं. ही नावं माझ्यासाठी आणि माझ्यासारख्या रिसर्च फिल्डमध्ये काम करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. कारण हे लोक आमचे हिरो आहेत. यातल्या काही शास्त्रज्ञांचे रिसर्च पेपर्स कितीदा तरी वाचले आहेत. यांच्या रिसर्च पेपर्सना करोडो सायटेशन्स असतात. आणि कित्येक वर्षांपासून हे लोक शांतपणे पडद्यामागे बसून आपलं काम करत आले आहेत. म्हणून यांचं नाव घेणं अत्यंत गरजेचं आहे.

ऑक्सफर्ड विद्यापीठामधील प्रोफेसर सारा गिलबर्ट, प्रोफेसर अँड्रयू पोलार्ड, जेन्नर इन्टिट्यूटचे डायरेक्टर प्रोफेसर एड्रियन हिल, जेन्नर इन्टिट्यूटमधील असोसिएट प्रोफेसर डॉक्टर टेरेसा लॅम्बे हे या संशोधनाच्या मुख्य टीमला लीड करता आहेत. यांच्या व्यतिरिक्त अजून कित्येक नावाजलेले शास्त्रज्ञ या टीमचा भाग आहेत.

आता आपण ऑक्सफर्डच्या कोरोना व्हॅक्सिनच्या सुरु असलेल्या क्लिनिकल ट्रायल्सच्या रिझल्ट बद्दल बघूया. 23 एप्रिल ते 21 मे या काळात फेज 1 आणि फेज 2 या क्लिनिकल ट्रायल्स साधारण 1077 पेशंट्सवर केल्या गेल्या. रिसर्च पेपर मधल्या मेथेडॉलॉजीमध्ये न पाहता आपण त्यांना मिळालेल्या फाईंडिंग्ज बघूया.

मी मागच्या लेखात सांगितलं होतं त्याप्रमाणे व्हॅक्सिनचा डोस दिल्यावर कोरोना व्हायरसला व्हॅक्सिन किती प्रमाणात न्यूट्रलाइज करू शकतं? यावरून ते व्हॅक्सिन कोरोना व्हायरसला रोखण्यात किती प्रमाणात प्रभावी ठरतं हे आपल्याला कळतं. यासाठी 'न्यूट्रलाइजिंग अँटीबॉडी रीस्पॉन्स' बघितला जातो. हे व्हॅक्सिन दिल्यानंतर नुसतेच अँन्टीबॉडीज नाही. तर टी सेल रिस्पॉन्स देखील मोजल्या जातो.

हे ही वाचा..

Fact Check: कोरोना वाफेनं बरा होतो का?

ऑक्सफर्ड विद्यापीठाची कोरोनावरील लस मानवी चाचणीत यशस्वी

एलायझासारखे ऐसे (चाचणी) या करिता वापरले जातात. कोरोना झाल्यावर त्याविरुद्ध लढण्यासाठी अँटीबॉडीजची गरज असते आणि जर कधी आपल्याला परत कोरोना झाला तर हे 'टी सेल्स' लक्षात ठेवून परत त्याच अँटीबॉडीज बनवायची ऑर्डर देतात. म्हणून ह्युमोरल इम्युनिटी जी हे अँटीबॉडीज तयार करते. सेलूयलर इम्युनिटी जी 'टी सेल्स' तयार करते. या दोन्हीही अत्यंत गरजेच्या आणि व्हॅक्सिन दिल्यावर हे दोन्हीही रिस्पॉन्स मेजर करणं आणि त्यांचा अभ्यास करणं महत्वाचं ठरतं. ऑक्सफर्ड विद्यापीठाने हे दोनही फॅक्टर लक्षात घेऊन सर्व चाचण्या केल्या आहेत.

तर सार्स कोव्ह २ (कोरोना व्हायरस) च्या विरुद्ध मिळालेला न्यूट्रलाइजिंग अँटीबॉडी रीस्पॉन्स हा सिंगल डोस करिता ९१ टक्के ( ३५ पैकी ३१ सब्जेक्टस्) होता आणि डबल डोस करिता १०० टक्के ( ३५ पैकी ३५ सब्जेक्टस्) होता. बूस्टर डोस दिल्यानंतर सर्व या ट्रायलमध्ये सहभागी असलेल्या सर्व माणसांमध्ये १०० टक्के न्यूट्रलाइजिंग रिस्पॉन्स आढळून आला.

हा रिसर्च पेपर पूर्ण वाचल्यावर थोडक्यात इंटरप्रिटेशन असं आहे की ChAdOx1 nCoV-19 हे जे ऑक्सफर्ड विद्यापीठाचं कोरोना व्हॅक्सिन आहे, ते स्वीकारार्ह सेफ्टी प्रोफाइल दाखवते आहे. तसंच या व्हॅक्सिनचे होमोलॉगस बुस्टिंग ( म्हणजे व्हॅक्सिनचे एका पाठोपाठ काही काळाने दिले जाणारे डोसेस) अँटीबॉडी रिस्पॉन्स वाढवतो आहे. म्हणजे व्हॅक्सिनची परिणामकारकता वाढवतं आहे. हे व्हॅक्सिन ह्युमोरल आणि सेलूयलर असे दोनही इम्युनॉलॉजिकल रिस्पॉन्स दाखवतं आहे आणि त्यामुळे सध्या सुरु असणाऱ्या फेज ३ ट्रायलसाठी हे एक पोटेन्शियल कँडिडेट ठरलं आहे.

सगळ्यात आधी हाय रिस्कमधल्या लोकांना जे समाजासाठी आपल्या तब्येतीची काळजी न करता काम करत आहेत, तसेच पासष्टवर्षांपेक्षा जास्तं वय असलेले लोक, यांना इम्युनाईज केलं पाहिजे असं इथे म्हटलं आहे. त्यामुळे आता हाय रिस्कमध्ये असणारे लोक म्हणजे हेल्थ केअर प्रोफेशनल्स, वृद्ध लोक, नर्सेस अशा सगळ्यांवर ट्रायल्स घेणं सुद्धा सुरु आहे.

एकदा का फेज ३ ट्रायल्सचे सर्व रिझल्ट आले की, मग लहान मुलांवर सुद्धा ट्रायल्स घेण्यात येणार आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारची घाई न करणं हे महत्वाचं.

द लॅन्सेट या जर्नलच्या एडिटोरियलमध्ये असं स्पष्ट म्हटलं आहे की, "व्हॅक्सिन त्वरित बाहेर यावं या करिता ही जी काही रेस चालू आहे ती दिसते आहे. आपल्या सगळ्यांनाच एक उपाय हवा आहे पण या सगळ्यामध्ये हे विसरून चालणार नाही की उपाया बरोबरच सेफ्टी ही सर्वोच्च महत्वाची बाब आहे"

आता नेहेमीचा प्रश्न : मग हे व्हॅक्सिन आपल्याकडे कधी येईल?

आता पर्यंत आपण पाहिलं की या व्हॅक्सिनचा प्रवास कसा चालू आहे. ते परिणामकारक आहे. हे आता आपल्याला कळालं आहे. आता त्याचा डोस किती पाहिजे? त्याची इफिकसी लेव्हल किती आहे? अशा चाचण्या फेज ३ मध्ये पार पडतील. सेफ्टी स्टडीज होतील. जेव्हा फेज ३ ट्रायल्स पूर्ण होतील आणि सर्व पॅरामीटर्स वर हे व्हॅक्सिन खरं उतरेल. तेव्हा या व्हॅक्सिनच्या उत्पादनाला ग्रीन सिग्नल मिळेल.

सिरम इंस्टीट्युटने ऑक्सफर्ड बरोबर करार केलेला आहे. त्यामुळे फेज ३ ट्रायल्स यशस्वी रित्या पार पडल्या की, व्हॅक्सिन निर्मिती सुरु होईल. शास्त्रज्ञ, टेक्निशियन्स, ते सर्व लोक जे स्वतः व्हॉलेंटियर म्हणून क्लिनिकल ट्रायल्स साठी भरती झाले आहेत.. हे सर्व जण आपापल्या भूमिका निभवता आहेत. आपण सुद्धा सुजाण आणि सजग नागरिक म्हणून आपली भूमिका निभावू. कोरोना संदर्भातल्या अर्थहीन बातम्या, फॉवर्ड्स पुढे न पसरवणं, पेशंट्सच्या प्रती अनुकंपा बाळगणं आणि न घाबरता शास्त्रीय दृष्टीकोनातून खबरदारी घेत जगणं.. हे करूया.

क्लिनिकल ट्रायल्स कशा गरीब लोकांवर घेतल्या जातात, कसे अत्याचार होतात? असं काही लोकांना वाटतं पण फेअर क्लिनिकल ट्रायल्स सुद्धा होत असतात आणि एथिकल फार्मा प्रॅक्टिसेस कशा पद्धतीने फॉलो केल्या जाव्यात. याचा ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या या क्लिनिकल ट्रायल्स हा एक उत्तम नमुना आहे.

कोरोना सारखा आजार ज्याने आज सगळ्या जगाला वेठीस धरलं आहे. त्यावर व्हॅक्सिन बनतं आहे ही एक ऐतिहासिक घटना आहे. नागरिक म्हणून यात आपण काहीतरी काँट्रीब्युट करावं अशी भावना ठेवून कित्येक जण ऑक्सफर्डच्या क्लिनिकल ट्रायल्समध्ये व्हॉलेंटिअर म्हणून सहभागी झाले आहेत.

त्यांना काय वाटलं या प्रोसेसमध्ये या व्हिडीओज च्या लिंक सुद्धा देते आहे. अजून एक गमतीचा भाग हा की यामधला एक व्हॉलेंटिअर भारतीय वंशाचा होता. आपल्याकडच्या एका न्यूज चॅनेलने त्याचा व्हिडीओ घेतला. त्यामध्ये पत्रकाराने त्या माणसाला विचारलं की तुला काय वाटतं मग कधी हे व्हॅक्सिन येईल?

मीडिया कन्क्ल्युजनला येण्यासाठी इतकी घाई का करतं आहे? या प्रश्नाचं उत्तर सापडत नाहीये. यात जो व्हॉलेंटिअर होता तो अतिशय समजूतदार असल्याने त्याने फेज तीन ट्रायल्स पूर्ण झाल्या की हे सांगता येईल असं म्हटलं ते उत्तम केलं. पण कोणाला काय विचारायचं? निदान कोरोना सारख्या पँडेमिकबाबत बातमी देताना याचं तारतम्य मीडियाने बाळगलं पाहिजे.

त्या मानाने रवीश कुमार यांनी याच माणसाचा घेतलेला इंटरव्ह्यू हा जास्त सेन्सिबल वाटला. या दोनही व्हिडीओजच्या लिंक सुद्धा शेअर करते आहे. आदर पुनावाला यांच्या इंटरव्ह्यूची लिंक देते आहे. ती पण जरूर बघा. आपल्याला जे ऐकायचं आहे त्यापलीकडे जाऊन ऐका. त्यातला मूळ मुद्दा समजावून घ्या. ऑक्सफर्डने विद्यापीठाने यावर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांना घेऊन एक छोटा व्हिडीओ काल पब्लिश केला आहे. त्याची लिंक सुद्धा देते आहे.

पारदर्शकता काय असते. विज्ञानाला आणि त्यावर काम करणाऱ्या माणसांना किती अनन्य साधारण महत्व असतं. हे त्यानिमित्ताने आपल्याकडच्या लोकांना कळेल आणि कदाचित आपल्याकडे यावर काम करणाऱ्या लोकांना निदान चिमूटभर का होईना? पण मान आपल्याला देता येईल. यात व्हिडिओ आहेत जे पाहून गैरसमज दूर व्हायला नक्कीच मदत होईल.

रेफरन्ससाठी लिंक्स

1) https://www.youtube.com/watch?v=HiLdEaSOJN4 (Courtesy: University of Oxford)

2) https://www.youtube.com/watch?v=wPTv11qWuIQ (Courtesy: University of Oxford)

3) https://www.youtube.com/watch?v=-szt0u2X0WI (Courtesy: CNN)

4) https://www.youtube.com/watch?v=LwqfZwkJtSg (Courtesy: India Today)

5) https://www.youtube.com/watch?v=mj3kOL83mvA (Courtesy: NDTV India)

6) https://www.youtube.com/watch?v=7MjBuyO_OcA (Courtesy: Hindustan Times)

7) https://www.youtube.com/watch?v=AbSSuz-DhFc (Courtesy: India Today)

-सानिया भालेराव

Updated : 30 Oct 2020 5:42 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top