Home > मॅक्स ब्लॉग्ज > कोरोनाच्या नावानं अफवाचं पीक

कोरोनाच्या नावानं अफवाचं पीक

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं जगभर धुमाकुळ घातला असताना देशात आणि राज्यात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्यानं वाढत आहे. त्यामुळं पुन्हा एकदा कोरोना अफवाचं पेव फुटलं आहे, त्यापार्श्वभुमीवर अभ्यासक सानिया भालेराव यांनी शंकानिरसन केलं आहे...

कोरोनाच्या नावानं अफवाचं पीक
X

कोरोनाची दुसरी लाट आपल्याकडे आली आहे, दर दिवसाला कोरोनाच्या केसेस वाढत आहेत आणि कोरोनाची लस आता ४५ वर्षांपुढील सर्व व्यक्तींना घेता येणार आहे. हे तिन्ही स्टेटमेंट्स खरे आहेत आणि दुर्दैवाने या तिन्ही वाक्यांना खोटं ठरवणाऱ्या कित्येक अफवा आजूबाजूला अजूनही फिरत आहेत. रिसर्च पेपर्स, रिअल टाइम डेटा आणि केवळ वैज्ञानिक आधार असलेली माहिती यांचा अभ्यास केला तर वरील तिन्ही वाक्य ही खरी आहेत असं म्हणता येईल. कोरोना वगैरे काही नाहीये, टेस्ट केली की रिझल्ट मुद्दामून पॉझिटिव्ह आणतात असं म्हणणाऱ्या सर्व लोकांना हे आवर्जून सांगावंसं वाटतं आहे की SBI ने केलेल्या सर्व्हेनुसार (२५ मार्च रोजी त्यांनी जो रिपोर्ट सबमिट केला) त्यानुसार कोरोनाची दुसरी लाट ही साधारण १५ फेब्रुवारी पासून पुढचे १०० दिवस म्हणजे मे महिन्याच्या शेवटापर्यंत राहील.

एप्रिल महिन्याच्या शेवटी या लाटेतील पीक पॉइंट असेल असं या अहवालात म्हटलं आहे.आता हे वाचून घाबरून जाण्यापेक्षा योग्य काळजी घेऊन राहणं हे जास्त गरजेचं आहे. दिवसाला ५०,००० हजार केसेस देशामध्ये रोज रिपोर्ट होत आहेत. आता दुर्दैवाची गोष्ट ही की भारताने जेव्हा लस घेऊ शकणाऱ्या लोकांच्या वयाचा आकडा हा ४५ वर्ष इतका केला त्याच सुमारास ही दुसरी लाट येऊ घातली आहे. व्हॅक्सिनेशन प्रोग्रामनुसार व्हॅक्सिनचे ६१ दशलक्ष्य डोसेस दिल्या गेले आहेत आणि साधारण ८.४ दशलक्ष्य भारतीयांना दोन्ही डोसेस मिळाले आहेत. याखेरीज ५३ दशलक्ष्य लोकांना पहिला डोस मिळाला आहे. आता शासनाला लसीकरण कार्यक्रमांतर्गत जो आकडा जुलै महिन्यापर्यंत पूर्ण करायचा आहे तो आहे २०० ते २५० दशलक्ष्य. फोर्ब्समध्ये छापून आलेल्या बातमीनुसार नॅशनल हेल्थ ऑथॉरिटीचे सीईओ आर एस शर्मा यांनी सांगितलं आहे की दिवसाला पाच दशलक्ष्य इतके डोसेस आम्ही देऊ शकतो आणि त्यासाठीची यंत्रणा सज्ज आहे. ते असेही म्हणाले की लोकांनी लस घ्यावी यासाठी शासन त्यांना बळजबरी करू शकत नाही.

आता या ठिकाणी दोन वेगळे मुद्दे आहेत. एकतर शासकीय यंत्रणेने स्वतःला जास्तीस्त जास्त व्हॅक्सिनचे डोस देण्यासाठी सुसज्ज करणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकांच्या मनातून या लसीसंबंधी असेलली भीती दूर करणे. कारण कोरोनाचा हा पँडेमिक संपवण्याचा केवळ एकच शास्त्रशुद्ध मार्ग म्हणजे देशातील सर्व ( जास्तीत जास्त) लोकसंख्येचे जेव्हा लसीकरण होईल. सोशल डिस्टंसिंग, मास्क वापरणे, स्वच्छतेचे नियम पाळणे हे हे प्रतिबंधात्मक उपाय गरजेचे आहेतच आणि लसीकरण झाल्यानंतर सुद्धा जो पर्यंत कोरोनाच्या केसेस नगण्य होत नाहीत तोपर्यंत आपल्याला हे नियम पाळत राहावे लागणारच आहेत. पण सध्या ज्या पद्धतीने आपल्याकडे लस घेण्याबाबतची उदासीनता दिसते आहे ते पाहता दुसरी लाट येऊन गेल्यावर साधारण पुन्हा ऑक्टोबर महिन्यामध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यात जर सध्या ज्या बेजबाबदारीने आणि अवैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून असंख्य लोक वागत आहेत म्हणजे मास्कचा वापर न करणे, सार्वजनिक ठिकाणी जाणे, गर्दी करणे, या सर्व कारणांमुळे संसर्गाचे प्रमाण वाढणार हे नक्की.

यावर तोडगा काय? तर आता ४५ वर्षाच्या वरील व्यक्तींसाठी आजपासून कोरोनाची लस उपलब्ध आहे. आरोग्य सेतू किंवा को विन या ऍपवर रजिस्ट्रेशन करून मग लस घेता येणं शक्य आहे. २०११ सालच्या सेन्सस नुसार ४५ + या गटामध्ये आपल्या एकूण लोकसंख्येच्या १८.३ टक्के लोक आहेत. यानुसार जर या गटातल्या प्रत्येकाने लस घेतली तर आपण लसीकरणाकरिताचा खूप मोठा आकडा पार करू शकणार आहोत. कोव्हीशील्ड किंवा कोव्हॅक्सिन या पैकी कोणती लस घ्यावी? लस घेऊन आम्हाला काही त्रास झाला तर? असे बरेच प्रश्न अजूनही खूप साऱ्या लोकांच्या मनात आहेत. तर या दोनीही लशी सुरक्षित आहेत. लहान मुलाला लस जेव्हा आपण देतो तेव्हा कधी कधी बघा त्याला थोडा ताप वगैरे येतो. तसंच काहीसं कोरोनाची लस घेतल्यावर होऊ शकतं. दोन पैकी एका डोसला बारीक ताप, किंवा थोडा थकवा असं होऊ शकतं. आपण आपल्या शरीराला जर लढाईसाठी तयार करणार असू तर असं होणारंच नं.. आता अजून एक प्रश्न हा की एक डोस कोव्हीशील्डचा आणि दुसरा कोव्हॅक्सिनचा असं करता येईल का? तर अजून तरी व्हॅक्सिन क्रॉस ट्रायल्स झालेल्या नाहीयेत आणि खरं पाहता त्याची फार गरज सुद्धा नाहीये.

कोव्हीशील्ड मध्ये चिपांझीमधला एडिनो व्हायरस व्हेक्टर आहे आणि बेसिकली कॉमन कोल्डसाठी कारणीभूत असणारा हा व्हायरस आहे. SARS-CoV-2 च्या स्पाईक प्रोटीनला एनकोड करणारी जीन यात घातली आहे ज्यामुळे दोन डोस घेतल्यानंतर आपल्या शरीरात कोरोना विषाणूशी लढणारे अँटीबॉडीज तयार होतील. आता कोव्हॅक्सिन हे मृत कोरोना विषाणू वापरून बनवण्यात आलेलं आहे. SARS-CoV-2 च्या स्पाईक प्रोटीन व्यतिरिक्त कोरोना विषाणूचं जेनेटिक मटेरियल ज्या आवारणामध्ये बंदिस्त आहे त्या न्यूक्लिओकॅप्सिड प्रोटीनवर ऍटॅक करणारे अँटीबॉडीज ही लस तयार करू शकते. सो अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर समजा आपल्याला एखादं घशाचं इन्फेक्शन झालं आणि आपण दोन डॉक्टरांना दाखवलं . तसं बघायला गेलं तर खूप सारे वेगवेगळे अँटिबायोटिक असतात. एका डॉक्टरने अझिथ्रोमायसिन हे अँटिबायोटिक दिलं आणि दुसऱ्याने सिफीक्झाईम हे अँटिबायोटिक दिलं. दोनीही औषधांनी आजार बरा होणार आहे. पण जर पहिल्या दिवशी अझिथ्रोमायसिन घ्यायचं आणि दुसऱ्या दिवशी सिफीक्झाईम असं आपण केलं तर चालेल का? या दोनीही औषधांचा काम करणायचा मार्ग वेगळा आहे आणि ही औषधं इफेक्टिव्ह व्हावी म्हणून रक्तातील त्यांचं एक ठराविक कॉन्सन्ट्रेशन असणं फार गरजेचं आहे. त्यामुळे दोघांपैकी कोणतं तरी एक औषधाचा कोर्स पूर्ण करणं हे उत्तम आणि हेच कोरोना लशींच्या संदर्भात लागू होतं. म्हणून दोन्ही डोस हे एकाच लसीचे हवे.

आता अजून एक प्रश्न हा की लशीचा दुसरा डोस घेतला तरी कोरोना होऊ शकतो का?

तर लशीचा दुसरा डोस घेऊन साधारण २० ते २५ दिवस आपल्याला योग्य प्रमाणात अँटीबॉडीज निर्माण व्हाव्या यासाठी द्यावे लागणार आहेत. याखेरीज प्रत्येकाची इम्युन सिस्टीम कमी अधिक वेळ घेऊ शकते त्यामुळे लस घेतल्यानंतर निष्काळजीपणे वागून चालणार नाहीये. अजून एक महत्वाचा मुद्दा असा की तुम्ही लस घेतली म्हणजे तुम्हाला कोरोना होणार नाही पण तरीही तुम्ही हा आजार पसरवू शकता. CDC ( सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड ट्रान्समिशन) ने मार्च २१ ला दिलेल्या अहवालाबाबत बोलत असतांना डायरेक्टर रोशेल वॉलेन्स्की असं बोलून गेल्या की मॉडर्ना आणि फायझर कंपनीच्या व्हॅसिन डेटा नुसार व्हॅक्सिन घेतलेले लोक हा आजार पसरवू शकत नाही आणि मग यावरून काही प्रमाणात गदारोळ झाला. तर वैज्ञानिक दृष्टीकोनातून सांगायचं झाल्यास व्हॅक्सिन घेल्यावर तुम्ही स्वतःचा बचाव जरी करत असला तरीही हा विषाणू इतरांना पसरवू शकत नाही याची १०० टक्के शाश्वती देता येऊ शकत नाही. यावर पूर्ण संशोधन अजून झालेलं नाहीये. त्यामुळे जो पर्यंत १०० टक्के लसीकरण होत नाही तोपर्यंत कोरोनाचा संपूर्णपणे नायनाट होणार नाहीये.

आपण सर्वांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की १२ वर्षाखालील मुलांना लस देता येणार नाहीये त्यामुळे मुलांच्या शाळा सेफली सुरु होण्यासाठी, त्यांना कोणत्याही भीतीशिवाय पुन्हा एकदा खेळता यावं, बागडता यावं आणि जगता यावं यासाठी आपण सर्वांनी लस घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. असिम्प्टोमॅटिक कॅरियर्सचे आकडे , सिरोप्रिव्हेलन्सचे वाढते परसेंटेज हे सगळं हेच दाखवतं आहे की कोरोना विषाणू पसरण्याचं प्रमाण सध्या वाढतं आहे. लॅन्सेटमधील सिरोसर्व्हेच्या रिसर्च पेपरमध्ये सिरोप्रिव्हेलन्स बद्दल फार महत्वाचे मुद्दे मांडले आहेत. सिरोप्रिव्हेलन्स म्हणजे काय, आजाराची लक्षण नाहीयेत पण विषाणूचा संसर्ग झाला आहे हे असं होऊ शकत का, त्याने इतरांना कसा धोका संभवतो यावर एक वेगळं आर्टिकल लिहीन मी नंतर.

आमच्यात हर्ड इम्युनिटी आली आहे, आम्हाला कोरोना होऊन गेला आहे, हे कोरोना वगैरे स्कॅम आहे, पैसे कमवण्याचे धंदे आहेत, नुसता सर्दी खोकला तर आहे आणि टेस्ट केली की ती पॉझिटिव्ह येतेच मग कशाला टेस्ट करायची , हे सगळं औषध कंपन्यांचं रॅकेट आहे, प्रशासनाला सुद्धा फक्त पैसे कमवायचे आहे, कुठूनतरी फ़ंड मिळता आहेत म्हणून हे खोटे आकडे दाखवता आहेत, लस वगैरे सगळं बोगस आहे, व्हॅक्सिनवर आमचा विश्वास नाहीये, व्हॅक्सिन घेऊन सुद्धा कोरोना होऊ शकतो मग कशाला घ्यायचं ते व्हॅक्सिन.... वगैरे वगैरे दोन हजार दोनशे चौऱ्याऐंशी (गैर)समज घेऊन जगणाऱ्या माझ्या सर्व बंधू भगिनींना मी फक्त इतकंच सांगू इच्छिते की कोरोना हा खरा खुरा आजार आहे. हा पँडेमिक वेगाने पसरतो आहे. व्हॅक्सिन घेणे हा एकमेव लॉजिकल आणि सायंटिफिक पर्याय यावर आहे आणि व्हॅक्सिन घेतल्यावर सुद्धा निदान या संपूर्ण वर्षभरात तरी आपल्या सर्वांना मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंगचे आणि स्वच्छतेचे नियम पाळणे हे करावं लागणार आहे. जर विश्वास ठेवायचाच असेल तर विज्ञानावर ठेवूया. या पँडेमिकमधून सुखरूप बाहेर पडायचं असेल तर विज्ञानाची कास धरूनच आपल्याला चालावं लागणार आहे हे लक्षात ठेवायला हवं.

काही रिसर्च पेपर्स आणि आर्टिकल्सच्या, आरोग्य सेतू आणि को- विन च्या देखील लिंक्स देते आहे. स्वतः वाचा आणि मगच विश्वास ठेवा. पोस्ट शेयर करू शकता त्यासाठी परवानगीची आवश्यकता नाही.

©सानिया भालेराव
#CoronaUpdate

1. https://www.thelancet.com/journals/langlo/article/PIIS2214-109X(20)30546-5/fulltext

2. https://www.forbesindia.com/article/take-one-big-story-of-the-day/covid19-indias-second-wave-is-here-and-the-worlds-largest-vaccination-programme-may-just-not-be-enough/67231/1

3. https://www.nytimes.com/2021/04/01/health/coronavirus-vaccine-walensky.html?

4.https://health.economictimes.indiatimes.com/news/industry/covid-19-an-faq-factsheet-for-covishield-vaccine-by-serum-institute/80243379

5. https://www.cowin.gov.in/home

6. https://www.aarogyasetu.gov.in/

Updated : 2 April 2021 9:25 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top