Home > मॅक्स ब्लॉग्ज > जरंडेश्वर कारखान्यावर जप्ती ही लुटूपुटूची लढाई

जरंडेश्वर कारखान्यावर जप्ती ही लुटूपुटूची लढाई

जरंडेश्वर कारखान्यावर जप्ती ही लुटूपुटूची लढाई असूच शकते. कदाचित सत्ताबदलासाठीची कारवाई... पण सहकारी बॅन्क घोटाळा हा असा घोटाळा आहे ज्यानं सहकार चळवळ संपवली आणि ऊस उत्पादक शेतकर्याचं मोठं नुकसान केलं असे विश्लेषण केलं आहे सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी....

जरंडेश्वर कारखान्यावर जप्ती ही लुटूपुटूची लढाई
X

या विषयावर मोठं आंदोलन आझाद मैदानात झालं होतं. नंतर राजकीय समीकरणं वेगात बदलली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ॲड योगेश पांडे (थेऊर साखर कारखाना) यांच्यापासून 'आप'च्या कनिष्क जाधव (कन्नड सहकारी) यांच्यापर्यंत अनेकांनी यामध्ये संघर्ष केला आहे. अण्णा, मेधाताई, राजू शेट्टी यांसह आमच्यासारखे छोटेमोठे आझाद मैदानावर आंदोलनात होते. अनेकांच्या याचिका प्रलंबित आहेत.

हा एकूण घोटाळा interesting होता.

आधी सहकारी साखर कारखान्यांना राज्य सरकारची अवाजवी पतहमी दिली गेली.

देणारे नेतेच.

मग सहकारी बॅन्कांनी त्यांना मोठमोठी कर्ज दिली.

पुन्हा देणारे नेतेच.

त्यानंतर सहकारी साखर कारखान्यांनी ती कर्ज थकवली.

थकवणारे नेतेच.

मग कर्ज फेडू शकत नाहीत म्हणून हे कारखाने अवसायनात काढले.

काढणारे नेतेच.

मग कर्ज फेडीसाठी लिलाव केले.

करणारे नेतेच.

आणि मग सहकारी साखर कारखान्यांच्या जमिनींसह संपूर्ण कारखान्याची विक्री कवडीमोल भावात नेत्यांच्या खाजगी कंपन्यांना गुप्त लिलावात केली गेली. उदाहरणार्थ एका कारखान्याच्या नुसत्या जमिनीची किंमत 600 कोटींची होती तो कारखाना 30 कोटीत विकला गेला.

तो विकत घेणारे नेतेच!

आपल्याला सगळ्यांना याची पूर्ण कल्पना आहे की ईडी राजकीय झाली आहे. इप्सित पूर्ण झालं की ईडी या मामल्याला कदाचित क्लिन चीट देईल. सिंचन घोटाळ्यात कशी क्लिन चीट या परमबीरसिंगांच्याच शुभहस्ते दिली गेली तेही आपण पाहिलं. एका हातात शपथविधी आणि दुसर्या हातात क्लिनचीट हे आपण उघडपणे पाहीलं आणि सहनही केलं.

शेवटी ज्याला 'चीट' केलं गेलं म्हणजे फसवलं गेलं तो ऊस उत्पादक शेतकरी होता आणि जिचा खून झाला ती शेतकर्याला उर्जित करणारी महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाची सहकार चळवळ होते हे आपलं भान सुटता कामा नये.

आपण गॅन्गवाॅरचा हिस्सा होऊ नये कारण हे सगळं सत्तेसाठीच चाललंय हे आपल्याला कळतंय पण ज्यांना लुटलं गेलं ते आपणच होतो हे विसरता कामा नये.

एकमेकांचे हिशेब दोन्ही टोळ्या काढत राहतील पण आपण आपल्या लुटीचा हिशेब दोघांकडेही मागत राहिलं पाहिजे.

Updated : 2 July 2021 3:41 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top