Home > मॅक्स ब्लॉग्ज > "मी ब्राह्मण आहे ........??"

"मी ब्राह्मण आहे ........??"

मी ब्राह्मण आहे ........??
X

श्याम आणि श्यामची आई यांचा फोटो टाकून ' श्याम दारू पिल्यावर बायकोला वास येऊ नये म्हणून काय करशील ? असे अत्यंत विकृत भाषेत मिमस आल्यावर हेरंब कुलकर्णी, त्यांच्या अनेक मित्रांनी व राष्ट्र सेवा दलाने त्याबद्दल गृहमंत्री व सायबर सेलकडे तक्रार केली. त्यावर अनेक आक्षेप घेतले जात आहेत. पण यात काही जातीयवादी लोकांनी हेरंब कुलकर्णी यांची जात काढल्याने त्याला हेरंब कुलकर्णी यांनी दिलेले उत्तर....

साने गुरुजी यांच्या मिम्स च्या निमित्ताने झालेल्या या वादात थेट माझी जात निघाली. मी आणि माझी ब्राह्मण मित्र साने गुरुजी यांचा बचाव करतो आहे अशा विकृत कमेंट अनेक पोस्टवर आल्या. मला ब्राह्मण ठरवण्याच्या दुःखापेक्षाही साने गुरुजी यांच्यासारख्या डिकास्ट झालेल्या आणि आयुष्यभर समतेचा संदेश देणाऱ्या व्यक्तीला ब्राह्मण ठरवले गेले याने जास्त व्यथित झालो.. फेसबुक वर ही जात निघण्याची पहिलीच वेळ नाही. महाराष्ट्रातील वातावरण किती विषारी झाले आहे हे अनेकदा अनुभवाला येते. आता समाजसुधारक ही जाती बघूनच आम्ही पुरोगामी होते की नाही हे ठरवणार आहोत का ? व्यक्तिगत आयुष्यात ब्राह्मण कुटुंबातील कर्मकांड भेदून पुरोगामी होणे अतिशय कठीण असते, रोज सणवार असलेल्या कुटुंबात ते सारे नाकारत पुढे जाणे यासाठी खूप संघर्ष करावा लागतो.

नातेवाईक नाराज होतात. ज्या परिघात राहतो तो मित्रपरिवार मनाने थोडा दूर जातो... ते करून पुरोगामी वर्तुळात यावे तर हे संशय..व्यक्तिगत आयुष्यात मी मुलाचे नाव ब्राह्मणी व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या चार्वाकचे ठेवले, तो हिंदू की मुस्लिम याची खूण नको म्हणून कानही टोचले नाहीत व खूप दडपण येऊनही मौंज किंवा कोणतेच विधी करू दिले नाहीत. आडनावावरून जात कळते म्हणून त्याच्या दाखल्यावर जात-धर्म तर टाकला नाहीच पण आडनाव काढून चार्वाक प्रतिभा हेरंब असे नाव नोंदवले, कोणत्याच जातीच्या व्यासपीठावर कधीच गेली नाही , ब्राह्मण जातीच्या एका मासिकाने लेख मागितला तरी सुद्धा कधी दिला नाही,सत्कार पुरस्कार तर दूरच..हे करताना त्या परिघात एक अघोषित बहिष्कार सहन करावा लागतो आणि इकडे हे ऐकावे लागते.. आयुष्यभर आमच्यासारख्यांनी 'आम्ही तसे नाही हो' असे म्हणून बोनाफाईड सर्टिफिकेट घेऊन फिरायचे का? अशावेळी ब्राह्मण मित्र 'आम्ही म्हणत होतो ना? शेवटी तुम्ही ब्राह्मणच ' असे विजयी वाक्य बोलतात, मेसेज करतात..आम्ही इकडचेही राहत नाही आणि तिकडचेही उरत नाही ..आणि वेदना ही की जे मला २० वर्षे बघतात त्या पुरोगामी मित्रांनी तरी अशांना उचकवावे तर ते ही काही सन्माननीय अपवाद वगळता गप्प राहतात हा सन्नाटा मला जास्त ऊदास करतो...एका मूर्खाने तर मी संघाचा आहे अशी पोस्ट टाकलीय.. काय करावं? त्या मूर्खाना आजपर्यंत केलेलं काम लेखन अशावेळी आठवत नाही.

दलितांसाठी मंदिर प्रवेश करण्यासाठी प्राण पणाला लागलेल्या साने गुरुजींना दलित विरोधी ठरवले जाते आणि शेतकऱ्यांसाठी आयुष्य दिलेल्या शरद जोशीना जाहीरपणे बामना म्हटले जाते तिथे आमच्यासारख्या चिल्लर लोकांची काय कथा ? आयुष्यभर आम्ही असेच त्रिशंकू जगणार आहोत काय ? जन्माने एका मध्यमवर्गात येऊन मी आदिवासी भटके-विमुक्त वंचित उपेक्षित यांच्या दु :खाचा विचार करताना आपण स्वतःलाच कोसो मैल दूर नेले आणि एका जिथून सुरुवात केली तिथेच मला पुन्हा आणून सोडतात..तू इथलाच आहे उगाच पुढे येऊ नको बजावतात.. यानंतर पुन्हा आणखी किती वेळा चालावं लागणार आहे ?? सगळ सोडून द्यावा आणि घरात बसावं असे वाटते ... समाजाच्या या नीच वर्तनाने तर गुरुजींनी स्वतःला संपवून घेतले नसेल ना ? गुरुजी तुमचा मन मला आज थोडेफार समजतंय...(हेरंबकुलकर्णी)"

या पोस्ट वर Dr Vishwambhar Choudhari सर यांची बोलकी आणि अचूक प्रतिक्रिया, खालीलप्रमाणे:-

"गांधींनी आपल्याला सत्य आणि अहिंसा शिकवले आहे. सत्याची कास न सोडता आपण लिहीत रहायचं. तुम्हाला संघी म्हणणारे कोणाचे घरगडी आहेत हेही सगळ्यांना माहित आहे. महाराष्ट्रात तुम्हाला पुरोगामी हे लेबल पाहिजे असेल तर काही भ्रष्टांची वैचारिक सेवा करावी लागते. ती जमत नाही तोपर्यंत त्यांचे गुलाम तुम्हाला छुपे संघी म्हणत असतात. यावर उपाय एकच म्हणजे आपला मनातला काॅम्प्लेक्स काढून टाकणे आणि बरं मी संघी, बोला पुढे! असं यांना म्हणणे.

मुळात पुरोगामी म्हणवून न घेता आणि काही विशिष्ट लोकांनी हायजॅक केलेल्या पुरोगामित्वाच्या शिक्क्याच्या मागे न लागताही आपण जगू शकतो. आपल्या भूमिका पुरोगामी आहेत एवढं मनाला पटलं की झालं. मनाचं सर्टीफिकेट- उत्तम सर्टीफिकेट. कळपाची गरज खरंच आहे का? मला आठवतं की जेव्हा माझंही छुपा संघी म्हणून ट्रोलींग झालं तेव्हा तुमच्यासह हाताच्या एका बोटावर मोजता येतील एवढेच लोक माझ्या बाजूंनं उभे राहिले. अशा कळपांमध्ये रहायचं तरी कशाला? एकट्याच्या बळावर सत्य आणि अहिंसा एवढंच पथ्य पाळत आपण जगू शकतो, व्यक्त होऊ शकतो.

मी स्वतः हीच भूमिका जगत आहे. एकदा म्हणून बघा की 'बरं मी छुपा संघी! पुढे?' थंड पडतील हे लोक. आपण पुरोगामी असण्याचा पगार घेत नाही तोपर्यंत आपल्याला शिक्क्याची गरज काय आहे? सगळेच उघडे पडत आहेत. केंद्र सरकारला विरोध केला की टाळया वाजवणारे हात महाराष्ट्रातील सरकारला बोललं की तुमच्यावर उगारले जात आहेत. काहीना धर्मांधता प्रिय आहे तर काहींना भ्रष्टाचार! गुलामांना कुठलं मतस्वातंत्र्य? आपण आपलं व्यक्त होत रहायचं. घटनादत्त हक्क सोडायचा नाही. एकला चालो रे! सामान्य माणूस आपल्याला ऐकू इच्छितो, आपल्यावर विश्वास ठेवतो तोपर्यंत टोळीवाल्यांना फिकीर कशाला करायची?"

Updated : 26 July 2020 5:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top