Home > मॅक्स ब्लॉग्ज > अर्णब गोस्वामी आणि षड्यंत्र

अर्णब गोस्वामी आणि षड्यंत्र

अर्णब गोस्वामी आणि षड्यंत्र
X

झूठ को चिल्लाना पड़ता है, और सत्य ख़ामोश रहकर कोहराम मचाता हैं.. हे वाक्य आहे रिपब्लिक टीव्ही चा संपादक अर्णब गोस्वामी याचं. सर्व मिडीयाने मिळून रिपब्लिक विरोधात आघाडी उघडलीय, मला माझी बाजू मांडण्यासाठी रजत शर्मा, आज तक, झी न्यूज़ ने बोलवावं असं आवाहनही अर्णब ने केलं आहे. रिपब्लिक ला बदनाम करण्यासाठी मुंबई पोलिस आयुक्तांनी आपल्या पदाचा गैरवापर केला असा आरोप ही अर्णब गोस्वामी ने केला आहे.

मध्यंतरी बलात्काराबाबत राजकीय भूमिकेतून पोस्ट व्हायरल करणाऱ्या लोकांसाठी मी एक व्हिडीयो बनवला होता, की हे सर्व तुमच्या घरापर्यंत ही येणार आहे. टीव्हीच्या स्क्रीन वर राजकीय सुपारीसाठी आक्रस्ताळ्या बातम्या करणाऱ्या अर्णबला ही आज याची प्रचिती आली असेल की हे सर्व तुमच्या घरापर्यंत-स्टुडीयोपर्यंत पोहोचलंय. आज तुम्ही न्याय्य पद्धतीच्या मिडीया कव्हरेज साठी आवाहन करताय. आज तुम्ही इमोशनल होऊन दोस्तो-भाईयों-देशवासीयों चीं भाषा वापरतायत…

अर्णब गोस्वामी ला माझं एकच सांगणं आहे, 'सिस्टीम च्या विरोधातील प्रामाणिक लढाईत आम्ही ही तुझ्या सोबत असू, पण तुझी लढाई प्रामाणिक नाही. तू एखादी राजकीय विचारधारा मानत असशील तर तसं जाहीर करून थेट भूमिका घे. पण तुझे ही राजकीय मास्टर जसं सांगतात तसंच तुझं वागणं होतं आणि आहे, त्यामुळे आज तुझ्या दारापर्यंत तुझीच गटारगंगा आल्या नंतर तुला त्याचा वास यायला लागला. स्क्रीन वरच्या तुझ्या आक्रमकपणामध्ये ही एक वैफल्य आहे.'

अर्णब गोस्वामी ने भारतीय टीव्ही न्यूजचं एकूण स्वरूप बदललं. न्यूज निवडण्याच्या पद्धतीतील भ्रष्टाचाराला त्याने न्यूज सांगण्याच्या आणि त्याच्याच पद्धतीने सांगण्याच्या पद्धतीपर्यंत आणलं. त्याने टीव्हीवरचा आवाज वाढवला. वारंवार एकच गोष्ट सांगून तीच गोष्ट कशी खरी आहे हे भासवण्याचा प्रयत्न केला. विविध स्कॅम मध्ये इन्वेस्टिगेशन केलं. अर्णब गोस्वामीचं इन्वेस्टिगेशन हे एकतर्फी असतं हे समजायला ही अनेकांना काही वर्षे लागली. अनेक पुरोगामी आणि निष्पक्ष पत्रकारांना तो व्यवस्थेविरोधातील आवाज वाटायचा. पण खऱ्या अर्थाने तो केवळ एका राजकीय पक्ष आणि त्याच्या मित्रपक्षांच्या विरोधातील आवाज़ होता हे अनेकांना खूप उशीरा कळलं. मी तर पाहिलंय, अनेकजण एनडीटीव्ही वरच्या पॅनेलला नाही म्हणत अर्णब कडे जाऊन बसण्यात आनंद मानायचे. माझ्या सोबतचे काही वरिष्ठ पत्रकारही माझ्या चॅनेलवर येण्याएवजी अर्णबकडून फोन येतोय का याची वाट पाहायचे. एकूणच अर्णबचं गारूड अनेक पत्रकारांच्या डोक्यावर होतं. हे वरिष्ठ पत्रकार अनेकदा अशी माणसं ओळखण्यात चूक करतात असं माझं निरिक्षण आहे, किंवा स्वतःला चमकवण्याच्या नादात मुद्दाम ते अशा प्रवृत्तींना साक्षांकित करतात. मला हे पुरोगामी पत्रकारही अर्णब इतकेच अप्रामाणिक वाटतात. असो, मुद्दा अर्णबचा सुरूय तर अर्णब करत असलेले काही घोटाळे मी इथे सांगतो.

अर्णब ने टीव्ही डिबेटमध्ये केलेला सगळ्यात मोठा घोटाळा म्हणजे आवाज घोटाळा. अर्णबच्या पॅनेलमध्ये केवळ त्याचा आणि त्याच्या समर्थनार्थ बोलणाऱ्यांचाच आवाज व्यवस्थित ऐकू येईल असा असतो. इतर पाहुण्यांचा आवाज कमी ऐकू येतो. तर हे असं का घटतं? अर्णबच्या स्टुडीयोतील पीसीआर मध्ये गेस्ट चा आवाज़ कमी जास्त केला जातो. प्रोड्युसरना तशा सूचनाच असतात. विरोधकांना बोलू द्यायचं मुलभूत तत्व जो संपादक पाळत नाही, तो खरं तर संपादकच होऊ शकत नाही. तुम्ही एखाद्याला मुद्द्याने गप्प करणं वेगळं आणि तांत्रिक बाबी-तंत्रज्ञानाचा आधार घेऊन गप्प करणं वेगळं. कालही आपल्या वैफल्यग्रस्त शो मध्ये अर्णब ने आपल्या दोन पाहुण्यांचे आवाज असेच दाबले होते.

अर्णब करत असलेला दुसरा घोटाळा म्हणजे, फर्जी एक्स्पर्ट आणून त्यांना बोलू देणे, मतं प्रभावित करण्याचं साधन म्हणून वापरणे. हल्ली तो काही साधू-महंतांना आणतो. त्याचे काही पाहुणे अगदी डेकोरेशन सह बसतात. काल एका पाहुण्याच्या मागे हेडगेवार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अयोघ्या अशा पुस्तकांचं डेकोरेशन होतं. एका ठराविक विचारसरणीच्याच पाहुण्यांना त्याच्या शो मध्ये स्थान असतं. त्यांनाच मुद्दे मांडू दिलं जातं.

अर्धसत्य हेच पूर्ण सत्य आहे, असं तो सतत भासवत राहतों. त्याच्यामागे मोठमोठ्या शक्ती आहेत हे त्याच्या देहबोलीवरून लक्षात येतं. त्याचा वापर करून तो कुठलीही वाक्ये ट्वीस्ट करून लोकांसमोर मांडतो. त्यांने हे सर्व मांडण्यातील सौजन्य आणि संस्कारांनाही तिलांजली दिलेली आहे. काही फॅसिझमचं आकर्षण असणाऱ्या उजव्या विचारसरणीच्या लोकांना यात मोठी गंमत वाटते. ऐ, अबे, तुम्हें , तुझे, तू , तेरी औक़ात क्या है टाइप वाक्य काही लोकांना अतिशय ऊर्जा देतात. टीव्ही च्या स्क्रीन वरून कुणालाही असं बोलल्याने मानहानी होत नाही असा अर्णब चा ठाम समज आहे. पण अर्णबच्याच स्टाइलने मिडीया ट्रायल सुरू केल्याने अर्णबची २०० कोटींची मानहानी होते. असा त्याचा समज आहें, आणि त्याने तयार केलेले म्हणजे, पढवलेल्या पाहुण्यांना त्याचा तर्क खरा वाटतो. हा हिस्टेरीया तयार करण्याचा प्रयत्न आहे.

रिपब्लिक च्या टीआरपी घोटाळ्याचा तपास सुरू असताना पोलीसांनी बोललेलं त्याला आवडत नाही, पण सुशांतसिंह राजपूत केस मध्ये पोलीस का बोलत नाहीत म्हणून त्याचा प्रश्न असतो. तेव्हा अर्धवट माहिती आणि पुराव्यांशिवाय तो ठाकरेंच्या फार्महाऊस वर पोहोचतो, पण त्याला स्वतःला पोलीस स्टेशनला बोलवलेलं त्याला आवडत नाही.

टीआरपी घोटाळ्यामुळे अर्णब आता त्याच्या सारखाच 'एका' मालकाचा अजेंडा राबवणाऱ्या इतर चॅनेलचा दुष्मन झालाय. तो उद्धव ठाकरेंना वापरतो तशीच भाषा इतर 'उजव्या' चॅनेलच्या संपादकांसाठी वापरू लागला आहे. तो आता स्वतःच्या अस्तित्वासाठी सगळ्यांशी लढायला तयार आहे. त्याच्या राजकीय मालकासाठी हे काही योग्य नसलं तरी यामुळे बेरोजगारी-उपासमार अशा मूलभूत प्रश्नांपासून लोकांना दूर नेण्यासाठी त्यांना हा तमाशा ही चालण्यासारखा आहे.

सिस्टीम विरोधात लढण्याचा आभास निर्माण करून अर्णब गोस्वामी एक षड्यंत्र राबवतोय. त्याचे हेतू शुद्ध नाहीत हे स्पष्ट झालेलं आहे. त्याची भाषा आता त्याच्या मालकांनी पाळलेल्या ट्रोल सारखी झालेली आहे. त्यात त्याने ट्रोल इतकात निम्नस्तर गाठलेला आहे. तो ही ट्रोल लोकांसारखाच सोनिया सेना वगैरे विशेषणं वापरतो. हळूहळू अर्णबच्या चेहऱ्यावरचे मुखवटे गळू लागलेयत आणि आता त्याचा ट्रोल वाला खरा चेहरा समोर यायला लागलाय.

जाता जाता इतकंच सांगेन, तुम्ही जे पेरलं ते उगवतंय.. हळूहळू हे विष तुमच्या घरापर्यंत-स्टुडीयोपर्यंत येणार होतं, ते आता आलंय. अजून बराच खेळ बाकी आहे. सुरूही तुम्हीच केलाय.. संपणारही तुमच्यापर्यंत येऊनच.

Updated : 20 Oct 2020 12:11 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top