Home > मॅक्स ब्लॉग्ज > कम्प्युटर गेमिंग आणि करिअर

कम्प्युटर गेमिंग आणि करिअर

"मुलाला कम्प्युटर गेमिंग ची खूप आवड आहे, तो गेम डेव्हलपमेंट मध्ये करिअर करायचंय असे म्हणतो, तर त्यासाठी काय करावं लागतं आणि किती स्कोप आहे?" वाचा लेखक संदीप डांगे यांचा अनुभव

कम्प्युटर गेमिंग आणि करिअर
X

गेल्या दहा, बारा वर्षांपासून दरवर्षी दोन-चार पालक एक सल्ला घ्यायला माझ्याकडे येतात..

"मुलाला कम्प्युटर गेमिंग ची खूप आवड आहे, तो गेम डेव्हलपमेंट मध्ये करिअर करायचंय असे म्हणतो, तर त्यासाठी काय करावं लागतं आणि किती स्कोप आहे?"

साधारणपणे 14 ते 16 च्या वयोगटातील ही मुले असतात आणि यांना गेम खेळण्याचे भयंकर वेड लागले असते, अगदी व्यसन म्हणू इतक्या पातळीवर ते गेलेलं असतं. साहजिकच मग एखादा व्यसनी आपलं व्यसन कसं व्यसन नाही हे सिद्ध करण्यासाठी ना ना कारणं सांगतो तसेच ही मुलं आईबापाला शेंड्या लावतात...

गेमिंग चे कम्प्युटर बरेच महाग असतात म्हणजे अगदी एक लाख रुपयांपासून सुरू होतात..दोन ते तीन लाखापासून पुढे प्रोफेशनल लेव्हल चे गेमिंग कम्प्युटर्स सुरु होतात. कारण गेम खेळतांना अगदी मिलिसेकंद देखील हार-जीत बदलू शकतात, तेंव्हा तेवढे वेगवान कम्प्युटर्स, आणि हाय लेव्हल कॉम्पोनन्ट्स असतील तर जास्त चांगले असते. पण एवढे पैसे पालक निव्वळ खेळण्यासाठी घालणार नाहीत म्हणून त्यांना गेमिंग मध्ये कसे करीअर आहे, त्यात भरपूर पैसा आहे, मला गेम डेव्हलपर व्हायचे आहे अशा पुड्या मुलं सोडतात..

आता सत्य हे आहे की गेमिंग करणं म्हणजे खेळणं आणि ते डेव्हलप करणं या सर्वस्वी वेगवेगळ्या गोष्टी आहेत....जसं सिनेमा बघणं आणि सिनेमाची निर्मिती करणे अत्यंत वेगळे आहे तसे..

तर गेमिंग इंडस्ट्री चे स्पष्टपणे दोन वेगळे भाग पडतात.

1) गेम तयार करणारे (developers)

2) गेम खेळणारे (players)

कोणताही कम्प्युटर गेम हे एक सॉफ्टवेअर अप्लिकेशन असते. गेम डेव्हलपर होण्यासाठी गेम खेळता येण्याची गरज नसते तर सॉफ्टवेअर, कम्प्युटर प्रोग्रामिंग इत्यादीची आवश्यकता असते.

गेम डेव्हलपमेंट मध्ये आर्ट डिपार्टमेंट देखील असते ज्यात VFX आर्टिस्ट, ऍनिमेटर, व्हिज्युअल आर्ट प्रोफेशनल यांची गरज असते..

कम्प्युटर गेम्स ची सवय लागणं अत्यंत नैसर्गिक आहे. जगभरात करोडो लोक पैसे खर्च करून गेम्स खेळतात कारण ते सुद्धा एक मनोरंजन आहे.. ऑनलाइन गेम्स, कम्प्युटर गेम्स यात जे खेळतात (players) त्यांच्याकडून गेम कंपन्या पैसे कमवतात, कम्प्युटर पार्ट्स तयार करणारे कमवतात, कम्प्युटर बिल्डर्स कमवतात, प्रोफेशनल गेमर्स कमवतात. अशी ही एक परिपूर्ण इंडस्ट्री आहे.

आता प्लेयर चं, गेमर चं करीअर देखील घडतं, नाहीच घडत असं नाही. खरेतर प्रोफेशनल गेमर्स करोडो रुपये महिन्याला कमवत आहेत.... पण पण पण

प्रत्येक गेमर करोडो कमवत नाही.

प्रोफेशनल गेमर हे करीअर असलं तरी ते फ़िल्म इंडस्ट्री मध्ये स्टार, सुपरस्टार होण्यासारखे आहे.

म्हणजे जसे लाखो तरुण पुढचा शाहरुख खान व्हायला मुंबईत येतात पण फार थोड्या लोकांना सिनेमात करिअर घडून पोटापाण्याची व्यवस्था होण्याइतपत यश मिळते...तसेच गेमिंग मध्ये घडतं...

गेमिंग मध्ये करिअर शक्य आहे पण सर्वांनाच नाही. आणि तेवढं करीअर घडवण्यासाठी वेळ पैसा आणि आयुष्य पणाला लावण्याची तयारी लागते.

आपलं शिक्षण पूर्ण करून, नोकरी धंदा सांभाळून गेमिंग मध्ये स्वतःला सिद्ध करणे हा एक त्यातल्या त्यात सुरक्षित मार्ग आहे...

पण 13-14 वर्षांची मुलं कम्प्युटर गेमिंग मध्ये फक्त खेळायची भयंकर आवड आहे म्हणून गेम डेव्हलपमेंट मध्ये जातो अशी हूल पालकांना देत असतील, खोटं बोलून लाखो रुपये खर्च करायला लावत असतील तर ते योग्य नाही...

पालकांनी गेमिंग व गेम इंडस्ट्री याबद्दल पुरेशी माहिती घेऊन मुलांशी बोललं पाहिजे. त्यांचे योग्य समुपदेशन करायला हवे...

गेम डेव्हलपमेंट मध्ये जायचं तर प्रोग्रामिंग, सॉफ्टवेअर इत्यादी शिकावं लागतं, त्यासाठी गणित, लॉजिक चांगले पाहिजे.

प्रोफेशनल गेमिंग मध्ये जायचे तर भयंकर पॅशन, भरपूर वेळ, मजबुत पैसा आणि पेशन्स पाहिजे,

दोन्ही वेगवेगळे करिअर आहेत, एक निश्चित पैसा आणि नियमित नोकरी देणारे आहे तर दुसरे कंपिटीटीव्ह आहे, ज्यात यशस्वी होणं अनेक घटकांवर अवलंबून आहे, दोन्ही करिअर एकच नाहीत याची नोंद घ्यावी..

~ संदीप डांगे


Updated : 13 Sep 2023 7:16 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top