Home > मॅक्स ब्लॉग्ज > स्त्रीपुरूष विषमतेचा पुरस्कर्ता चाणक्य - प्रा.हरी नरके

स्त्रीपुरूष विषमतेचा पुरस्कर्ता चाणक्य - प्रा.हरी नरके

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चाणक्य आणि चंद्रगुप्त यांची जोरदार चर्चा आहे. पण चाणक्य हे नेमकं कशाचं प्रतीक आहे याचे विश्लेषण केले आहे प्राध्यापक हरी नरके यांनी...

स्त्रीपुरूष विषमतेचा पुरस्कर्ता चाणक्य - प्रा.हरी नरके
X

परवा विधान सभेत बोलताना श्री. देवेंद्र फडणवीस यांनी आपण चाणक्य असून श्री एकनाथ शिंदे हे त्यांचे चंद्रगुप्त असल्याचे सांगितले.सध्या संघ भाजपची मंडळी अहोरात्र चाणक्याच्या आरत्या ओवळीत असतात.नको इतके उदात्तीकरण चालू आहे. चाणक्य मुत्सद्दी होता. बुद्धिमान होता पण उच्चजातीय समाज रचनेचा, वर्चस्ववादी मानसिकतेचा पुरस्कर्ता होता. तेव्हा तो कितीही मोठा असला तरी आजचा आदर्श होऊ शकत नाही.पण मूळ चाणक्य किती लोकांनी वाचलाय? लोकांच्या या अज्ञानाचा फायदा घेऊन ही जातीयवादी, पेशवाई जाहिरात कंपनी त्याचे स्तोम माजवित आहे. स्त्रिया, सर्व पुरोगामी आणि बहुजन यांनी यापासून सावध राहायला हवे.

स्त्रीपुरूष विषमतेचा पुरस्कर्ता चाणक्य--प्रा.हरी नरके चाणक्य म्हणतो, स्त्रियांवर किंचितही विश्वास ठेऊ नये. स्त्री ही सर्व अशुभ गोष्टींचे उत्पत्तीस्थान आहे.


कौटिलीय अर्थशास्त्र हा ग्रंथ सुमारे २२०० वर्षे टिकून राहिलेला आहे. ज्याला आपण इकॉनॉमिक्स म्हणतो, त्यावरचा हा ग्रंथ नाहीए. त्यात प्रामुख्याने राजकारण, समाजकारण, न्याय, नीती, राजा, प्रजा, योगक्षेम, मुख्य म्हणजे व्यवहार आणि मुत्सद्दीपणा (कुटीलता) हे विषय आलेले आहेत.

हे पुस्तक जागतिक साहित्यातले महत्वाचे पुस्तक मानले जाते.

त्यात अनेक लोककल्याणकारी सुत्रे असली तरी सव्वादोन हजार वर्षांपुर्वीचा चाणक्य आज जसाच्या तसा स्विकारता येणे अवघड आहे. तो समतावादी नव्हता. कौटिल्य जन्मावर आधारित वर्णव्यवस्थेचा आणि व्यवसाय बंदीचा समर्थक होता. सगळे मानवाधिकार फक्त तीन वर्णांच्या पुरूषांना तो देतो.

शूद्रांचा धर्म ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या द्विज जातींची सेवा करणे हाच आहे असे चाणक्य स्पष्टपणे सांगतो. चातुर्वर्ण्य व्यवस्था चिरंतन व सुस्थीर राखणे हे राजाचे प्रमुख कर्तव्य असल्याचे तो सांगतो. तो गुलामीच्या प्रथेचे समर्थन करतो. ७० व्या अध्यायात गुलामांच्या खरेदी-विक्रीबाबत उल्लेख येतो. मात्र आर्येतराला (अनार्याला ) दास करावे, आर्याला कधीही दास करू नये अशी तंबी तो देतो.

पुर्वीच्या धर्मशास्त्रकारांपेक्षा चाणक्य शूद्रांच्या बाबतीत उदार होता असे ब. रा. हिवरगावकर सांगतात. अर्थात यातल्या काही मर्यादा काळाच्या आहेत. सगळा दोष चाणक्याच्या माथी मरणे उचित होणार नाही. वर्णधर्म आग्रह हा चाणक्याचा आणि त्याच्या पुर्वसुरींचा व मनूचा मुख्य गाभा होता. चाणक्य हा त्रैवर्णिक पुरूषांचा आदर्श असेलही पण तो स्त्री-शूद्र-अतिशूद्रांचा आदर्श कसा होऊ शकेल?

उत्तम किंवा आदर्श माणूस तयार करण्याचा कौटिल्याचा ध्यास नव्हता तर त्याचा सगळा भर व्यवहारावर असल्याने भारतात राजकारणाचे शास्त्र विकसित होऊ शकले नाही असा ठपका कौटिल्यावर दुर्गा भागवत ठेवतात.

विशेषत: स्त्रियांबद्दलची चाणक्यसुत्रे आजच्या समतावादी स्त्री-पुरूषांना मान्य होणे अवघड आहे. हे विचार अनुदारपणाचे असल्याचे भाषांतरकारही म्हणतात.

चाणक्य म्हणतो,

सुत्र क्र. ३३६- पत्नीने पतीच्या मनाप्रमाणे वागावे.

सुत्र क्र. ३५६-बायको ही बिनलोखंडाची बेडीच आहे.

सुत्र क्र. ३६०- स्त्रियांवर किंचितही विश्वास ठेऊ नये.

सुत्र क्र. ३५९-स्त्रियांवर दक्षतेने नजर ठेवावी.

सुत्र क्र. ३८९- जिला मुलं होतात तिलाच पत्नी म्हणावे

सुत्र क्र. ३९३- पत्नी ही पुत्र होण्यासाठीच असते.

सुत्र क्र. ४७७- स्त्री ही सर्व अशुभ गोष्टींचे उत्पत्तीस्थान आहे.

सुत्र क्र. ४७८ - स्त्रियांना पुरूषांची किंमत नसते.

सुत्र क्र. ४७९- स्त्रियांचे मन चंचल असते.

सुत्र क्र. ४८०- आपले अकल्याण होऊ नये असे ज्याला वाटते त्याने स्त्रियांमध्ये रमू नये.

सुत्र क्र. ४७६- स्त्रियांच्या बंधनातून सुटका होणे कठीण असते.

सुत्र क्र. ५१२- स्त्रियांना नवर्‍यापेक्षा दुसरे दैवत नाही.

सुत्र क्र. ५१३- नवर्‍याच्या मनाप्रमाणे वागण्यातच तिचे सुख आहे.

सुत्र क्र. ५०८- आईच्या सहवासात मुलग्याने राहू नये.

सुत्र क्र.४८६- कधीही अनार्याशी मैत्री करू नये. त्यापेक्षा दुसर्‍या आर्याशी शत्रुत्व परवडले.

या ग्रंथात पंधरा अधिकरणे, १४९ अध्याय आणि ५७१ चाणक्य सुत्रे आहेत. स्त्रीपुरूष विषमता आणि वर्ण श्रेष्ठत्व यांचा चाणक्य पुरस्कार करतो. २१ व्या शतकात हे विचार उचलून धरण्याजोगे, उदोउदो करण्याजोगे आहेत काय?

-प्रा.हरी नरके

टिप- कौटिलीय अर्थशास्त्र या ग्रंथावरचे हे समग्र परीक्षण नव्हे. त्यात दिसणार्‍या स्त्रीपुरूष विषमतेबद्दलचे हे एक संक्षिप्त टिपण आहे. जिज्ञासूंनी हा ग्रंथ मुळातून वाचूनच आपापली मतं बनवावीत.

मराठी अनुवादाचे हे पुस्तक साहित्य संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेले असल्याने ते सर्व शासकीय बुक डेपोंमध्ये मिळते.

Updated : 10 July 2022 7:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top