Home > मॅक्स ब्लॉग्ज > Christmas Traditions : नाताळाचा आनंदमयी उत्सव

Christmas Traditions : नाताळाचा आनंदमयी उत्सव

Christmas Celebration कॅरोल सिंगर्स म्हणजे काय ? ख्रिस्ती समाजातील नाताळ विशेषांकमध्ये नेमकं काय असतं? नाताळ सण पारंपारिकरित्या कसा साजरा केला जातो? सांगताहेत ज्येष्ठ पत्रकार कामिल पारखे

Christmas Traditions : नाताळाचा आनंदमयी उत्सव
X

Christmas Celebration with Carols कॅरोल्स म्हटलं की, ख्रिसमसला मध्यरात्रीच्या ‘मिस्साविधी’ला किंवा ‘मिडनाईट मास’ला हजर असलेल्या कुणाही व्यक्तीला हमखास आठवणारे एक गीत म्हणजे ‘ग्लोरिया इन एक्सेलसिस देओ’ मूळ लॅटिनमधल्या या गाण्याचं हे धृपद संपूर्ण जगात अनेक ठिकाणी ख्रिसमसच्या काळात गायलं जातं. त्या नंतरची कवनं मात्र स्थानिक भाषांत गायली जातात. ‘देवाचा गौरव असो’ हा या लॅटिन शब्दांचा मराठी अनुवाद.

Christmas Traditions ख्रिसमस ‘मिडनाईट मास’च्या वेळी म्हणजे २४ डिसेंबरच्या मध्यरात्री चर्चमध्ये होणाऱ्या मिस्साविधीदरम्यान ख्रिस्तजन्माचं शुभवर्तमान वाचून झाल्यावर धर्मगुरू अल्तारापाशी असलेली बाळ येशूची प्रतिमा समारंभपूर्वक सजवलेल्या गव्हाणीकडे ख्रिस्तजन्माच्या देखाव्याकडे घेऊन जातात. या वेळी चर्चच्या बेलचा घंटानाद सुरू होतो आणि चर्चचा गायकवृंद वाद्यसंगीताच्या सुरात ‘ग्लोरिया इन एक्सेलसिस देओ’ हे गीत गातो. तेव्हा भाविकांच्या अंगावर रोमांच उभे राहतात.



नाताळ हा लॅटिन शब्द पोर्तुगिजांकडून मराठीत आला. डिसेंबर महिना सुरू झाला की, लहानपणापासून सतत कानावर पडलेली अशी कितीतरी नाताळाची मराठी गीतं कानांत गुंजू लागतात. ख्रिसमसच्या साधारणतः १०-१५ दिवस आधी कॅरोल सिंगर्सच्या तुकड्या ख्रिस्तमसची गाणी घरोघरी आणि इतर ठिकाणी म्हणण्यासाठी बाहेर पडतात. नाताळ सणापूर्वी एक-दोन दिवस आधी त्यांना त्यांच्या परिसरातील किंवा त्यांच्या चर्चमधल्या सगळ्या सभासदांच्या घरी भेटी द्यायच्या असतात. हे कॅरोल सिंगर्स गायनासाठी येतात, तेव्हा शेजारच्या घरांतील मुलंबाळं आणि मोठी मंडळीसुद्धा नाताळगीतं ऐकण्यासाठी जमत असतात. सांता क्लॉजसुद्धा कॅरोल सिंगिंगमध्ये रंगत आणतो.



गोव्यात जेसुईट फादरांच्या प्री-नोव्हिशिएटमध्ये (पूर्व-सेमिनरीत) हायर सेकंडरी आणि कॉलेज विद्यार्थी असताना मिरामार समुद्रकिनाऱ्यापाशी असलेल्या विविध घरांना कॅरोल सिंगर्स म्हणून आम्ही प्री-नॉव्हिस मुलं भेटी देत असू. गिटार वाजवणारा बेनेडिक्त उर्फ बेनी फरिया आमचा म्होरका असायचा. ‘ड्रमर बॉय’, ‘सायलेंट नाईट, होली नाईट’, ‘ओ कम ऑल यी फेथफुल’, ‘जॉय टू द वर्ल्ड’ वगैरे अभिजात कॅरोल्स गायली जायची आणि लोकांना फेस्टिव्ह मूडमध्ये नेलं जायचं.

येशूजन्माची अशी कितीतरी पाळणागीतं मराठीत गेल्या शतकाच्या काळात रचली गेली आहेत. ही पाळणागीतं महाराष्ट्रातील विविध चर्चमध्ये नाताळ सणाच्या काळात भक्तिभावानं गायली जातात. यापैकी पुढील ‘प्रभुचा पाळणा’ या नावानं खुद्द ‘स्मृतिचित्रे’कार लक्ष्मीबाई टिळक यांनी लिहिला आहे.


हलवी मना प्रभुपाळणा हा

त्यजुनी सुखातें वरी यातनांना ||धृ||

पराकारणें जो झिजवी तनूला

यशोगान त्याचें मुदें गात गाना

हलवी मना, प्रभुपाळणा ||१||

हलवी मनातें हलवी जनातें

प्रभुपायिं लावी इत्तर जनांना

हलवी मना, प्रभुपाळणा ||२|


जगाच्या हिताचा प्रभूसेवनाचा

असे पाळणा जो पटवी मनांना

हलवी मना, प्रभुपाळणा ||३||

मराठी ख्रिस्ती समाजात भक्तिगीतांची, गायनाची आणि कीर्तनाचीसुद्धा फार जुनी परंपरा आहे. गेल्या शतकातील रेव्हरंड नारायण वामन टिळक आणि कृष्णा रत्नाजी सांगळे प्रभुतींचं यात फार मोठं योगदान आहे. नाताळाच्या आधी श्रीरामपूरला आमच्या घरी आठ-दहा दिवस दररोज संध्याकाळी करंज्या, लाडू, चकल्या, अनारशी वगैरे फराळ बनवण्याचं काम सुरू व्हायचं, ते मध्यरात्रीपर्यंत चालायचं. नाताळाच्या या फराळाची ताटं शेजारच्या माळी-मराठा आणि मुसलमान घरांतही जाणार असल्यानं पितळाचे मोठमोठे डबे गच्च भरून हे पदार्थ व्हायचे.

नाताळ किंवा ख्रिसमस विशेषांक काढण्याची परंपरा तशी खूप जुनी असली तरी याविषयी अनेकांना कदाचित माहिती नसेलही. नाताळाच्या पूर्वसंध्येला आज माझ्या हातात दयानंद ठोंबरे यांचा `अलौकिक परिवार' चा नाताळ अंक पडला. दिवाळी अंकांच्या धर्तीवर असलेल्या या नाताळ अंकांची परंपरा तशी खूप जुनी आहे.




`ज्ञानोदय' या मराठी भाषेतल्या सर्वात जुने नियतकालिकाचे ( स्थापना १८४२), सव्वाशे वर्षे जुना असलेल्या पुण्यातल्या `निरोप्या' मासिकाचे, वसईतल्या `सुवार्ता' मासिकाचे दरवर्षी नाताळ विशेषांक निघतात. ख्रिस्तोफर रिबेलो यांचा `ख्रिस्तायन' नाताळ ई-अंक असतो. त्याशिवाय वसई, अहमदनगर वगैरे ठिकाणी नाताळ विशेषांक प्रसिद्ध होतात. मराठी मायबोली असणाऱ्या ख्रिस्ती आणि इतर लोकांनीही या ख्रिसमस अंकांत लिहिले आहे. आपली सर्वसमावेशक संस्कृती आहे, यावर हे नाताळ विशेषांक शिक्कामोर्तब करतात.

आजही ख्रिसमस ट्री सजवताना आणि सणाची तयारी करताना ख्रिसमस कॅरोल्सचं पार्श्वसंगीत वेगळ्याच दुनियेत घेऊन जातं. प्रत्येकाच्या या सणाविषयीच्या कितीतरी सुखद आठवणी असतात.

आजकाल ख्रिसमस हा केवळ ख्रिस्ती समाजाचाच उत्सव राहिला नाही. हल्ली विविध शाळांत, उद्योगकंपन्यांत, शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि हॉटेलांत ख्रिसमस अगदी उत्साहानं साजरा होतो. या सोहळ्यात सर्वधर्मीय लोक सहभागी होतात आणि एकमेकांना आनंदी करतात. तसं पाहिलं तर विशिष्ट धार्मिक विधीचा अपवाद वगळता कुठल्याही सणाचं वा उत्सवाचं स्वरूप आणि उद्दिष्ट असंच सर्वसमावेशक असायला हवं.

जगातील कुठलेही ख्रिस्ती प्रार्थनास्थळ म्हणजे चर्च ही ख्रिस्ती भाविकांप्रमाणेच इतरधर्मियांनाही अगदी प्रार्थनेच्या वेळीही खुली असतात. नाताळानिमित्त जवळच्या एखाद्या चर्चला भेट देऊन तिथे नाताळचा ख्रिस्तजन्म सोहळा कसा साजरा होतो हे पाहता येईल.

सर्वांना नाताळाच्या शुभेच्छा ! मेरी ख्रिसमस !


(या लेखातील मतं ही लेखकाची वैयक्तिक आहेत. त्याच्याशी मॅक्स महाराष्ट्र सहमतच असेल असे नाही.)




Updated : 24 Dec 2025 9:14 AM IST
author-thhumb

कामिल पारखे

गेली चार दशके इंग्रजी पत्रकारितेच्या व्यवसायात आहेत. युरोपात बल्गेरिया येथे त्यांनी पत्रकारितेचे प्रशिक्षण घेतले. गोव्यात द नवहिंद टाइम्स, पुण्यात इंडियन एक्सप्रेस, टाइम्स ऑफ इंडिया तसेच महाराष्ट्र हेराल्ड-सकाळ टाइम्स या इंग्रजी दैनिकांत त्यांनी बातमीदार आणि इतर पदांवर काम केले आहे. सावित्रीबाई, जोतिबांचे शिक्षक मिचेल दाम्पत्य आणि स्त्रीशिक्षणातील पूर्वसुरी गोवा आणि महाराष्ट्रातील पत्रकारितेतल्या कथा, `चर्चबेल, पोळा सण, ख्रिसमस, डान्स आणि सोरपोतेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) : भारतातील अस्पृश्यता आणि अमेरिकेतील वर्णभेद' वगैरे पुस्तके त्यांनी मराठी आणि इंग्रजीत लिहिली आहेत.


Next Story
Share it
Top