Home > मॅक्स ब्लॉग्ज > Chhatrapati वारस की वंशज?

Chhatrapati वारस की वंशज?

छत्रपती शिवाजी महाराजांचे चे वंशज आणि वारस जनभावना आणि अपेक्षा यावर वैचारिक मंथन केले आहे लेखक रवींद्र पोखरकर यांनी..

Chhatrapati वारस की वंशज?
X

युगपुरुष,स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी राजकीय लाभांच्या पदांसाठी दरवेळी वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या वळचणीला जाऊन उभं रहावं ही बाब कायम खटकत आलेली आहे.खरंतर त्यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्यावर या राज्यातील कोणत्याही मतदार संघातील लोकांनी त्यांना बिनविरोध निवडून द्यावं इतका महान आणि उत्तुंग वारसा त्यांच्यापाठी आहे.परंतु त्या वारशाला अभिप्रेत असलेली आपल्या आचार-विचारांची नैतिक उंची राखण्यासाठी विद्यमान वंशज प्रयत्नशील असतात असं खरंच म्हणता येईल ?

छत्रपतींच्या गादीविषयी महाराष्ट्रातील जनतेच्या मनात अतीव आदराची भावना आधीपासून आहेच.निरपेक्ष वृत्तीने समाजहितासाठी कार्यरत राहून,महाराजांच्या आचार-विचारांशी सुसंगत वागून वंशजांनाही तसा आदर मिळवणे फारसे अवघड नव्हते.राजर्षी शाहू महाराजांचे मोठे उदाहरण समोर होतेच की..परंतु महाराजांचे विचार आपल्या कुवतीनुसार किती पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय हे दाखवण्याला महत्व देण्याऐवजी कुणी एकाच समाजाच्या उन्नतीसाठी जीवाचे रान करताना पाहायला मिळतात तर कुणी आपल्या लकबी आणि अन्य कारणांसाठी जास्त ओळखले जातात ! मागे दोन वंशजांचे कार्यकर्ते टोल नाक्यावरील सत्तेसाठी एकमेकांना शस्त्रांनिशी भिडल्याचे वृत्त वाचून तर हतबद्ध झालो होतो.

खरं म्हणजे राजकारणात रस असलेल्या महाराजांच्या वंशजांनी निस्पृह भावनेने आणि सर्वाना सोबत घेऊन लोकहिताचं काम सातत्याने सुरु ठेवलं असतं तर निवडून येण्यासाठी कुठल्याही राजकीय पक्षाच्या कुबड्या घेण्याची त्यांना गरजच भासली नसती.छत्रपतींचा वारसा आणि आपले काम या जीवावर ते अपक्ष म्हणूनही सहजपणे निवडून येत राहिले असते.परंतु दुर्दैवाने तसं होत नाही आणि मग निवडून येण्यासाठी किंवा मागच्या दाराने राज्यसभेवर जाण्यासाठी छत्रपतींच्या या महाराष्ट्रात त्यांचे वंशज कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाच्या वळचणीला गेल्याचं आपल्याला पहावं लागतं..

(कोल्हापूरच्या संभाजी छत्रपतींचा राज्यसभेतील विद्यमान कार्यकाळ संपल्यानंतर आता त्यांच्याबाबत विविध चर्चा सुरु झाल्यामुळे हे लिहावंसं वाटलं.)

Updated : 15 May 2022 3:32 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top