News Update
Home > मॅक्स ब्लॉग्ज > कशी होती छत्रपती संभाजी महाराज यांची कर रचना

कशी होती छत्रपती संभाजी महाराज यांची कर रचना

छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातील व्यवहार आणि अर्थव्यवस्था कशी होती? शेती, आयात-निर्यातीवरचा कर कसा असायचा ? करांचे प्रकार कोणकोणते होते? युद्धात अर्थव्यवस्था कशी सांभाळली पाहिजे ? यावर अर्थशास्त्राचे अभ्यासक शिवम टिळेकर यांनी संभाजी राजेंच्या काळातील व्यवहार, करपद्धतीवर लिहिलेला लेख छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमीत्त पुनः प्रकाशित करीत आहोत.

कशी होती छत्रपती संभाजी महाराज यांची कर रचना
X

Courtesy -Social media

छत्रपती संभाजी महाराज आणि राजकारणातल्या खेळी तर सर्वांनाच माहित असतात. छत्रपती संभाजी महाराजांनी केलेल्या लढाया, दस्तुरखुद्द औरंगजेबाला दख्खनेत उतरायला लावेल असे कारनामे, आणि त्यांच्या विरुद्धच्या राजकारणातला त्यांचा टिकाव या गोष्टी अभ्यासण्यासारख्या आहेत.

इंग्रज, मुघल, डच आणि आप्तस्वकीय या सर्वांशी एकाचवेळी झुंज देणारा एक राजा आणि छंदोगामात्य कवी कलशा सारख्या एका मित्रावर जीव लावणारा एक मित्र अशी शंभुराजेंची दोन्ही रुप आपल्याला भुरळ पाडल्यावाचून राहत नाहीत. नियती अनुकूल नसेल तर समोर आलेल्या संकटांना तोंड देत लढायच कसं हे छत्रपती संभाजीराजे शिकवतात. बुधभूषण, सातसतक, नखशिखा यांसारख्या ग्रथांचे निर्मिक म्हणून एका विद्वानाची बाजू तर औरच.

संभाजीराजे खूप काही शिकवतात. आपल्याला जे जे लागेल ते ते आपण घ्यायचं. एक अर्थशास्त्राचा विद्यार्थी म्हणून मला तरी नेहमी उत्सुकता लागलेली असायची की महाराजांच्या काळातले व्यवहारिक आणि आर्थिक जग नक्की कसे असेल? आत्ता आपण अनेक गोष्टींवर कर देतो तसाच कर देखील महाराज घेत असतील का ? आता जवळपास सर्वच वस्तूंवर आत्ता आम्ही सरकारला कर देतो. त्याकाळी देखील असे कर गोळा केले जात असतील का ??

तर चला आता या प्रश्नांची उत्तरे शोधायला ।
ऍडम स्मिथ, डेविड रिकार्डो, थॉमस माल्थस...

ही वरची तीन नावं यांनी १८ -१९ व्या शतकात अर्थशास्त्र या विषयाचा विचार करायला भाग पाडणारे प्रबंध संपूर्ण जगासमोर मांडले. म्हणजे याचा अर्थ असा का की तोवर अर्थिक व्यवहार बंद होते ? नाही. पण जगाच त्याकडे लक्ष वेधून पुढील अर्थिक काळाची पायाभरणी या लोकांनी केली. त्यामुळे या लोकांच्या अगोदरच्या काळातील आर्थिक व्यवहार आणि कररोपण प्रणाली ही त्या राजाच्या आणि त्याच्या राज्याच्या बुद्धीप्रामाण्याचे मोजमाप करायला उपयुक्त असते. तत्कालीन राजांच्या विचारांची पोहोच कुठपर्यंत जाऊ शकते. याचा शोध घेण्याचे काम तत्कालीन व्यवहार करतात असे मला वाटते.

शिवकाळातील आणि शंभु महाराजांच्या काळातील कररचना आणि व्यवहार देखील असेच अचंबित करणारे आहेत. अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या करांची आपण कधी कल्पना देखील केली नसेल. तर चला जाणूण घेऊयात शिवकालीन आणि संभाजी महाराज कालीन अर्थव्यवस्था.

शेती :

आपला देश हा कृषीप्रधान देश होता, आहे. तत्कालीन परिस्थिती देखील याला अपवाद नव्हती. त्याकाळात देखील राज्याच्या प्रमुख उत्पन्नाचे साधन शेती हेच होते. छत्रपती शिवरायांनी आपल्या राज्यातील सर्व जमिनीची प्रथमतः मोजणी करुन त्यानुसार कर आकारण्यास सुरुवात केली. जमिनींचे वर्गीकरण केले. त्यानुसार पिकाऊ जमीन, नापीक जमीन, पड, जंगल, कुरण यांवर जमिनीच्या प्रतिनुसारच कर लावून आदर्श करपद्धतीची रचना केली आणि त्यानुसार कर घेण्यास सुरुवात केली.

आता जमिनीची प्रत कोणी आणि कशी ठरवायची ?

यावर देखील नामी शक्कल तत्कालीन अधिकार्ऱ्यांनी आणि महाराजांनी काढून ठेवली होती. व जमीनीची प्रत ठरवण्याचे अधिकार त्यांनी स्थानिक शेतकरी व त्यांच्या चालत आलेल्या रुढी परंपरा यांना अग्रस्थानी ठेऊन ग्रामस्थांना देऊ केले. म्हणजे कोणी दुसरा येऊन क्षणात प्रत ठरवून मोकळा झाला तर शेतकऱ्यांवर अन्याय होईल. त्या ऐवजी ज्यांच्या डोळ्यासमोर ती जमीन आहे त्यांना अधिकार देणे कधीही फायदेशीर.

तर या शेतीवर अनुसरुन अनेक प्रकारच्या करांची वसुली केली जात असे ते खालील प्रमाणे :-

१. शेतसारा - शेतीशी संबंधित हा मुख्य कर होता. आणि हा जमीन महसूल धान्य स्वरुपातच वसूल केला जात असे. एकूण उत्पन्नाच्या ३३ टक्के सारा सरकारला द्यावा लागत असे.

२. १०० नारळांमागे ५ सुपारी, दरमणाला ६ मिठावरचा कर, गायी म्हशी यांच्यावरील कर, नगदी पिकांवर म्हणजेच ऊस, हळद, आले, भाजीपाला, कांदे, बटाटे यांवर देखील कर आकारला जात असे.

३. व्यापाऱ्याला व्यवसाय कर, दत्तक घेणाऱ्यास कर, सराफी कर अथवा सराफपट्टी, सुतार न्हावी यांच्यावर देखील कर आकारला जाई.

४. उत्पन्न कर यामध्ये इनामदार, मिरासदार, इनामपट्टी यांच्यासारखे कर आकारले जात असत.

५. पाटाच्या पाण्याची सोय ज्या ठिकाणी करुन देण्यात आली असेल त्या ठिकाणी पाणीपट्टी आकारली जाई.

६. गुलामांवर देखील कर आकारला जात असे.

आयात - निर्यात:

छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात इ.स.१६८४ रोजी इंग्रजांशी केलेल्या तहामुळे तत्कालीन आयात-निर्याती वरील करांची कल्पना येते. इंग्रजांना मराठ्यांच्या प्रदेशात ये जा करण्यास मुभा, जर काही दगाफटका झाला तर त्यांसही न्यायासनासमोर उभे रहावे लागेल अश्या प्रकारची तंबी महाराज देतात. निर्यात होणारा माल हा जकातमुक्त होता तर आयात मालावर दोन टक्के जकात आकारली जात असे.

पण परदेशी व्यापाऱ्याला देखील असणाऱ्या सहानुभुतीची कल्पना देणारे एक कलम त्यात नमूद आहे ते म्हणजे जर वादळ वैगेरे आपत्ती आल्यास कर घेऊ नये. असे महाराज म्हणतात. त्याचप्रमाणे लाकडाची खरेदी करणे व जकाती शिवाय नेणे याला शिवरायांच्या आणि तसेच संभाजी राजांच्या काळात देखील परवानगी नव्हती.

वेगवेगळे करप्रकार आणि त्यांची नावे

परप्रांतातून येणाऱ्या मालावर कर आकारला जाई त्यास 'चुंगी' अथवा 'मजुरा' असे म्हटले जाई.

धनगरांना आपल्या उत्पन्नातून कर म्हणून घोंगड्या द्याव्या लागत.

विणकरांना एका मागास १/४ असा कर द्यावा लागे त्यास 'मागसका' असे म्हणत.

बाजारात पाल टाकण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना फी स्वरुपात कर द्यावा लागे त्यास 'मोहतर्फा' असे म्हणत.

चांभारांना 'पायपोशी' नावाचा कर असे.

ज्याला संदेश पोहचवायचा आहे. त्याकडून 'हेजीबपट्टी' म्हणजे संदेशकर आकारला जाई.

गावातील सोयींसाठी खर्चपट्टी, नाशवंत मालासाठी घसारापट्टी,मशालधारकांच्या खर्चासाठी 'कापुरपाईक', कोतवालासाठी कोतवाली,गडावरच्या सैनिकांसाठी गडछावणी, नदी पार करण्याच्या सरकारी सुविधेसाठी ' नदी टोकरा', रोगराईच्या नियंत्रणासाठी 'बिखार टका'.

जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी 'शिंगोटी' नावाचा कर आकारला जात असे. घोड्यावरील कराला ताजी असे म्हणत. उंटावरील वाहतुकीसाठी उंटपट्टी. तसेच संभाजीराजांच्या काळात जनावरांवर 'वनटका' नावाचा कर आकारला जाई.

विशेष कर -

लग्न करणाऱ्यास 'वरातटका' अथवा 'लग्नतटका' नावाचा कर द्यावा लागे.

पुनर्विवाह करायचा असेल तर 'पाटदाम' नावाचा कर द्यावा लागे.

सर्व घरमालकांस 'घरटका' नावाचा कर द्यावा लागे.

खेळणी विकणाऱ्यांना 'भुतफरोसी' नावाचा कर द्यावा लागे.

वाटसरुंना देखील 'अंगभाडे' नावाचा कर आकारला जात असे. कालांतराने शंभु राजांनी तो कर बंद करविला.

युद्ध आणि अर्थ (पैसा) -:

पराभूत राजाने अथवा मांडलिक राजाने आपल्या उत्पन्नातील चौथा भाग देणे. याला चौथ असे म्हणत असत.

सरदेशमुखी - वसुल उत्पन्नातील १/१० भाग हा राजाच्या खाजगी उत्पन्नात जमा केले जात असे.

एवढे सर्व कर त्यांची नावे सर्व आश्चर्यकारक आहे. ज्या गोष्टींचा आपण विचार देखील केला नसेल. अशांवर कर आकारला जात होता. यावरुन महाराजांच्या करप्रणाली विषयीची कल्पना आपल्याला येऊ शकते.

छत्रपती संभाजी राजांच्या काळात राज्यात प्रचंड कोलाहल माजला होता. त्यात मोठ्या दुष्काळाला देखील तोंड द्यावे लागले होते. अनेक अधिकारी सेवक फितूर झाले होते. यामुळे करवसुली थांबली आणि शासन कमकुवत झाले.

आज्ञापत्रात या परिस्थितीचे वर्णन करताना रामचंद्रपंत अमात्य म्हणतात - "राज्यावर औरंगजेबासारखा सबळ शत्रू चालून आला. या राज्यानिमित्त आपला संपूर्ण पराक्रम व अर्थवैभवादी सर्व शक्ती वेचली. तथापी श्रीकृपाकटाक्षाने सकळही निर्फळ जाहले.

दस्तुरखुद्द दिल्लीपतीचा सामना करण्यासाठी छत्रपतींना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. अनेकदा संकटांना तोंड देऊन देखील हे छत्रपती आहेत तसे उभे होता. यातच सबंध खजिना संपला. अराजक माजले. जे मनी नव्हते ते घडून छत्रपतींचा शेवट झाला. त्यानंतर राज्याची आर्थिक घडी निट करण्यासाठी मराठ्यांना देखील कष्ट उपसावे लागले. आणि त्या "दिल्लीपती" कडून देखील खंडणी घेण्याचे काम मराठ्यांनी करुन दाखवले.

या पराक्रमाच्या परंपरेला शतशः नमन ।

- शिवम प्रकाश टिळेकर
(लेखक अर्थशास्त्राचे अभ्यासक आहेत)

संदर्भ -

ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा - डॉ.सदाशिव शिवदे.

Updated : 2022-05-14T13:01:07+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top