Home > मॅक्स ब्लॉग्ज > #WorldHoneyBeeDay मधमाश्यांचे चमत्कारिक विश्व:डॉ. रुपेश पाटकर

#WorldHoneyBeeDay मधमाश्यांचे चमत्कारिक विश्व:डॉ. रुपेश पाटकर

आज जागतिक मधमाशा दिन मधमाश्यांचे विश्व खूपच रोचक आहे. त्यांचा अभ्यास ही विज्ञानाची स्वतंत्र शाखा असून तिला 'एपिकल्चर' म्हणतात. मानवाचा पृथ्वीवरील बावर लाखो वर्षांचा असला तरी मधमाशांचा तो करोडो वर्षांचा आहे. मधमाशा दिनानिमित्त इतिहास आणि शास्त्रीय महत्त्व यावर प्रकाश टाकला आहे डॉ. रुपेश पाटकर यांनी...

#WorldHoneyBeeDay मधमाश्यांचे चमत्कारिक विश्व:डॉ. रुपेश पाटकर
X

मधमाश्यांचे विश्व जरी आपल्याला नावीन्यपूर्ण वाटत असले तरी ते आहे मात्र मानवी समजापेक्षा जुने. माणसाचा पृथ्वीवरील वावर लाखो वर्षांचा आहे तर मधमाश्यांचा करोडो वर्षांचा. वेगवेगळ्या देशातील देशातील मानवी समाजाला मध आणि मधमाश्या ठाऊक होत्या. मध हा माणसाला ठाऊक असलेला साखर आणि गुळपेक्षा जुना गोड पदार्थ. अनेक जुन्या ग्रंथात मध आणि मधमाश्यांचा उल्लेख आढळतो. श्रीमतभागवतात अवधूताने मधमाशीला आपला गुरू मानल्याचे वर्णन आहे. पिरॅमिडसाठी प्रसिद्ध असलेल्या इजिप्त देशात आणि चीन देशात हजारो वर्षापूर्वी मधमाश्या पाळत असत, पण ती पाळण्याची पद्धत आजच्यापेक्षा खूप वेगळी होती.

आधुनिक मधमाशीपालनाची सुरुवात 1734 मध्ये जन्मलेल्या ॲन्टन जानसा यांच्यापासून झाली. त्यांचा जन्मदिवस 20 मे हा जागतिक मधमाशी दिन म्हणून पाळला जातो. 1851 मध्ये फादर लॅगस्ट्राॅथ यांनी बनवलेल्या लाकडी पेटीमुळे मधमाशी पालन अधिक सुलभ झाले. त्यांनी मधमाश्यांच्या पोळ्यांचा अभ्यास करून खास चौकटी असलेली पेटी बनवली. भारतात आधुनिक पद्धतीने मधमाश्या पालनाचा प्रयोग 1882 मध्ये पोस्टखात्यात काम करणार्‍या एका व्यक्तीने केला. त्यानंतर पुसा येथील शेती संशोधन केंद्रात याबाबत काम सुरू झाले. स्वातंत्र्यानंतर खादी ग्रामोद्योग महामंडळाने यात काम सुरू केले.

वसाहत करून राहणार्‍या एपिस या वंशातील एपिस सेरेना इंडिका ही भारतात आढळणार्‍या मधमाशीची जात होय. एपिस मेलीफेरा ही युरोपियन मधमाशी. या दोन्ही मध माश्या ढोलीत किंवा कपारीत वगैरे अंधेरी जागेत रहात असल्याने त्यांना पेटीत ठेवणे सोपे जाते. या शिवाय आपल्याकडील आग्या माशा या देखील एपिस परिवारातील. याशिवाय एपिस फ्लोरिया हा देखील एक प्रकार आहे.

एपिस सेरेना इंडिका या पाळल्या जाणार्‍या भारतीय मधमाश्या. या अगदी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आढळतात. त्या प्रति वसाहत 10-12 किलो मध वर्षाकाठी देतात. त्यांच्या तुलनेत एपिस मेलीफेरा या पाचपट जास्त मध देतात. म्हणजे वर्षाला 50 किलो. त्यामुळे एपिस मेलीफेरा यांचे पालन करण्याकडे बहुतेक कल दिसतो. पण या मेलीफेरा मधमाश्यांना खाद्य देखील पाचपट लागते, त्यामुळे त्यांना पाळणारे त्यांना घेऊन स्थलांतर करत राहतात. पण यात एक पर्यावरणीय धोका दडलेला आहे. एखाद्या ठिकाणी मेलीफेराच्या वसाहती जेव्हा ठेवल्या जातात तेव्हा या माश्या निसर्गातील सेरेना इंडिका या स्थानिक मधमाश्यांसोबत मध आणि परागासाठी स्पर्धा करणार. मेलीफेराचे मधपाल एका वेळी शेकडो वसाहती ठेवत असल्याने आणि प्रत्येक वसाहत स्थानिक वसाहतींच्या तुलनेत पाचपट खाद्य गोळा करत असल्याने निसर्गातील सेरेना इंडिका वसाहती नाहीशा होण्याची भीती आहे. मेलीफेरा या स्थानिक नाहीत, त्यांना खाण्यासाठी स्थानांतरीत केले नाही तर त्या नष्ट होतात त्यामुळे त्या सेरेना इंडिकाची जागा घेऊ शकत नाहीत. आणि जर स्थानिक मधमाश्या नष्ट झाल्या तर त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या सपुष्प वनस्पती देखील नष्ट होतील. आणि पर्यायाने त्यांच्यावर अवलंबून असलेले प्राणी पक्षी देखील नष्ट होतील. मधमाश्यांचे महत्व अधोरेखित करताना महान शास्त्रज्ञ अलबर्ट आईनस्टाईन म्हणाले होते की मधमाश्या संपल्या तर मानव जात संपुष्टात येईल. त्यामुळे फायद्यापलीकडे जाऊन मधमाश्यांचे विचार करायला हवा.

मधमाश्या स्वताच्या वसाहती कशा वाढवतात हे देखील रंजक आहे. वसंत ऋतूत जेव्हा खाद्य खूप असते व वसाहतींमध्ये माश्यांची संख्या खूप असते तेव्हा काही अळ्यांना रॉयल जेली देऊन वाढवले जाते. त्या अळ्या 16 व्या दिवशी कोषातून बाहेर पाडतात. जुनी राणी काही माश्यांना घेऊन निघून जाते व जुने घर नव्या राणीसाठी ठेवते. नवी राणी नरांशी हवेत संयोग करते. संयोगानंतर नरांचे काम संपते. त्यांना हाकलून लावले जाते. त्यानंतर ती राणी आयुष्यभर अंडी घालण्याचे काम करत राहते. राणीचे आयुष्य तीन वर्षे पर्यंत असते. राणी मधेच मेली तर तिच्या पासून येणारा फेरोमोनचा वास बंद होतो. अशा स्थितीत जी अंडी राणीने घातलेली असतात त्यातील फलित अंड्यापैकी काही अंड्यातून बाहेर येणाऱ्या अळ्यांना रॉयल जेली भरवून राणी बनवण्याचे काम सुरू केले जाते. अर्थात त्यातील एकच राणी बनते. उरलेल्या मारल्या जातात. जशी राणी सोळा दिवसांनी निर्माण होते तशी कामकरी माशी एकवीस दिवस तर नर सव्वीस दिवस घेतो. राणीचे काम सतत अंडी घालणे. ती दिवसाकाठी दोन ते तीन हजार अंडी घालते. नर माशीचे काम फक्त राणीशी संयोग करण्याचे. तर इतर सर्व कामे कामकरी माश्या करतात. लहान असताना त्या अळ्यांना भरवण्याचे, घर स्वच्छ ठेवण्याचे वगैरे कामे करतात. त्या मोठ्या झाल्या की मध गोळा करणे वगैरे बाहेरची कामे करू लागतात. कामकरी माश्यांचे आयुष्य कामानुसार ठरते. काम खूप असण्याच्या काळात आयुष्य कमी (दीड महीना) असते, तर काम कमी असताना जास्त (कमाल सहा महिन्यांचे असू शकते) असते.

मधमाश्यांचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांचा दंश. मधमाशी म्हटली की पहिले आठवते ते तिचा दंश. पण मध माशा उठसूठ चावत नाहीत. त्यांना त्रास दिला किंवा त्यांना धोका वाटला तरच त्या नंगी मारतात. त्यामुळे त्यांना काळजीपूर्वक हाताळले तर त्या शक्यतो नंगी मारत नाहीत. उलट त्यांचा दंश संधिवातावर उपाय म्हणुन मुद्दाम घेण्यात येतो.

.'आपण मधमाशा पळणार आहोत,' मी म्हणालो.

''त्यांना खायला कस घालणार?' बायकोने विचारले.

'त्यांना आपण खायला नाही घालणार, त्यांचे त्याच खायला गोळा करणार आणि वर आपल्याला मध देखील त्यांच्या कडून घेता येणार ', मी म्हणालो.

'त्या स्वतःच जर खाणे गोळा करणार असतील तर त्या आपल्या पासून पळून नाही का जाणार?' तिने विचारले.

WorldHoneyBeeDay, HoneyBee, agriculture, khadigarmodyog, epiculture'नाही पळून जाणार. कारण त्यांची राणी पेटीतच अडकून राहणार, ' मी म्हणालो.

'राणीला काय तुम्ही बांधुन ठेवणार?' तिने हसत विचारले.

'तिच तर गम्मत आहे. राणी इतरांपेक्षा आकाराने मोठी असते. त्यामुळे ज्या पेटीत मधमाश्यांची वसाहत ठेवली जाते त्या पेटीचे गेट अशा आकाराचे असते की त्यातून कामकरी माशा ये- जा करू शकतात पण राणी माशी जावू शकत नाही, ' मी म्हणालो.

'त्यांची वसाहत असते म्हणजे काय?' तिचा प्रश्न.

'हो. मधमाशी हा एक गमतीशीर किटक आहे. तुला किटक माहीत असतील. माश्या माहीत असतील. डास माहीत असतील. डास, घरमाश्या हे तसे एकांडे किटक. म्हणजे ते एकटेच राहतात. त्यांच्यात नर आणि मादी असतात. पण ते एकमेकांना पोसत नाहीत. पण मधमाश्या या एकेकट्या राहत नाहीत. त्या हजारोंच्या संख्येने एकत्र राहतात. आणि नुसत्याच एकत्र राहात नाहीत तर प्रत्येकाला विशिष्ट काम दिलेले असते. प्रत्येक माशी आपल्याला दिलेले काम इमाने इतबारे पार पाडत असते,' मी म्हणालो.

'आपल्याला काय काम दिलेय हे प्रत्येक माशीला कसे कळते?'

'ही पण एक गम्मत आहे. त्यांच्यातील संदेशवाहन फेरोमोनद्वारे होते. म्हणजे ठराविक रासायनांच्या वासाद्वारे आणि नृत्यखुणाद्वारे. मुळात प्रत्येक वसाहतीत तीन प्रकारच्या माश्या असतात. एक राणी, हजारो कामकरी आणि शे- पाचशे नर,' मी.

'या सगळ्यांना जन्माला कोण घालतं?' तिचा पुढचा प्रश्न.

'राणी! राणीचे कामच अंडी देणे. आयुष्यभर ती हे एकाच काम करते,'

'पण कोणत्या अंड्यातून नर येणार आणि कोणत्या अंड्यातून राणी आणि कोणत्या अंड्यातून कामकरी हे कसे ठरते?' ती.

'राणी दोन प्रकारची अंडी घालते. फलित आणि अफलित. फलित अंड्यातून कामकरी आणि राणी जन्म घेते आणि अफलित अंड्यातून नर जन्म घेतात. आता तू प्रश्न विचारशील की फलित अंडी आणि अफलित अंडी म्हणजे काय? राणी आपल्या आयुष्यात एकदाच नराशी संयोग करते आणि त्याचे शुक्रजंतू पोटातील पिशवीत ठेवते. ज्या अंड्याचा या शुक्रजंतूंशी संयोग होतो, ती फलित अंडी आणि ज्यांचा होत नाही ती अफलित अंडी, ' मी.

'पण फलित अंड्यातून राणी जन्मावी की कामकरी हे कसे ठरते?' तिने विचारले.

'नवीन राणीची गरज निर्माण झाली की अळ्यांना भरवणार्‍या कामकरी माश्या ठराविक अळ्यांना रॉयल जेली हा पदार्थ खूप प्रमाणात भरवतात. हा पदार्थ त्या कामकरी माश्यांच्या डोक्याजवळच्या ग्रंथीतून स्रवतो,' मी.

'म्हणजे माशी बनण्याआधी त्यांच्या वेगळ्या अवस्था असतात का?'

'हो. अंडी, अळी, कोश या अवस्था असतात. पोळ्यातील खालच्या बाजूच्या षटकोनी कप्प्यात राणी अंडी घालते. एका कप्प्यात एक. त्यातून अळी बाहेर येते. तिला इतर माश्या अन्न भरवितात. पोळ्याच्या वरच्या भागात मध आणि पराग भरले जातात,' मी.

'बाहेर गेलेल्या माश्या परत कशा येतात?'

'राणी ही सर्वांना बांधुन ठेवणारी घटक असते. तिचा एक विशिष्ट वास असतो. त्यामुळे शेजारी शेजारी पोळी असली तरी एका वसाहतीतील माशी दुसर्‍या वसाहतीत जात नाही. माश्या पोळ्या पासून सुमारे दोन किमीच्या परिसरात फिरतात. त्या सर्वे करतात. कुठे पराग असलेली फूले आहेत, कुठे मध असलेली फुले आहेत हे शोधतात आणि येऊन इतर माश्यांना सांगतात. ' मी.

'कसे सांगतात?'

'विशिष्ट प्रकारचा नाच करून किंवा विशिष्ट गिरक्या घेऊन सांगतात,' मी.

'मधमाश्यांचे जिवन खूप रोचक आहे. पण आपण त्या का पाळणार आहोत?'

'मुख्यतः परागीकरणासाठी! मधमाश्या सपुष्प वनस्पतींच्या परागीकरणात मोलाची मदत करतात. त्यामुळे फलधारणा वाढते. शेतीचे उत्पन्न वाढते. दुसरा उपयोग म्हणजे मध मिळतो,' मी म्हणालो.

मधमाश्यांचे सर्व विश्व खूपच रोचक आहे. त्यांचा अभ्यास ही विज्ञानाची स्वतंत्र शाखा बनली आहे. तिला 'एपिकल्चर' म्हणतात.

Updated : 20 May 2022 7:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top