Home > मॅक्स ब्लॉग्ज > दृष्टीकोन: चांगल्या वाईटाचं जनरलायझेशन...

दृष्टीकोन: चांगल्या वाईटाचं जनरलायझेशन...

एक विचार जीवनात बदल घडवतो... त्यासाठी नजर नही नजरिया चाहिए... वाचा जीवनाचा नजरिया बदलणारा सानिया भालेराव यांचा विचार...

दृष्टीकोन: चांगल्या वाईटाचं जनरलायझेशन...
X

गोष्ट तशी साधीशी आहे. एकदा एका गावाच्या वेशी बाहेर एक झेन मास्टर बसलेले असतात. तितक्यात तिथे एक माणूस येतो. तो त्यांना म्हणतो, "मी या गावामध्ये येऊन वास्तव्य करण्याचा विचार करतो आहे. हे गाव, इथले लोक कसे आहेत जरा सांगाल का?" त्याला झेन मास्टर विचारतात की तू आधी होतास ते गाव कसं होतं? यावर तो माणूस म्हणतो, "बाप रे बाप.. ते गाव अजिबात चांगलं नव्हतं. तिथले लोक दुष्ट आणि कपटी होते. मला ते गाव अजिबात आवडलं नाही." यावर झेन मास्टर त्याला म्हणतात, "हे गाव देखील असंच आहे. मला वाटतं तुम्ही इथे राहायला येऊ नये." तो माणूस निघून जातो.

थोड्या वेळात तिथे अजून एक माणूस येतो. तो झेन मास्टर जवळ जातो आणि म्हणतो "मी या गावामध्ये राहायला येण्याचा विचार करतो आहे. तुम्ही सांगू शकाल का हे गाव, इथली माणसं कशी आहेत?"त्याला झेन मास्टर प्रतिप्रश्न करतात, "तू आधी होतास ते गाव कसं होतं?" यावर तो माणूस म्हणतो, "ते गाव फार छान होतं. तिथली माणसं देखील प्रेमळ होती. मी तिथे खूप आनंदी होतो."

यावर ते झेन मास्टर त्याला म्हणतात, "हे गाव देखील असंच आहे. मला वाटतं तुम्ही इथे राहायला नक्की यायला हवं" हे ऐकून तो माणूस मग तिथे राहायला येतो. खरं तर या गोष्टीचं तात्पर्य खूप सोपं असलं तरी अत्यंत महत्वाचं आहे. आपण आहोत तसं जग आपल्याला दिसतं. आपण काय पाहायचं, कोणाकडे पाहायचं. हे आपल्यावर अवलंबून असतं. खूपदा आपण राहत्या जगाला, या सो कॉल्ड व्हर्च्युअल जगाला नावं ठेवतो, त्यात काय वाईट गोष्टी आहेत. याकडे जास्त लक्ष देतो. हे खूपदा आपल्या नकळत होत असतं. पण जेव्हा आपल्याला हे जाणवतं. तेव्हा जर आपण जगाकडे बघायचा चष्मा जरा पुसून घेतला. तर कदाचित चांगल्या गोष्टी, प्रेमळ लोक नक्कीच दिसतील.

रुमी म्हणतो तसं "What you seek is seeking you". या सहा शब्दांमध्ये दडलेलं तत्वज्ञान म्हणूनच गहिरं आहे. वाईट अनुभव येतात, येणार ...पण म्हणून 'अमुक एक वाईटच' असं जे जनरलायझेशन होतं नं.. माणसांचं, नात्यांचं, जगाचं, अगदी फेसबुकसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचं.. ते करताना जर आपण आपला दृष्टीकोन थोडा बदलला तर कदाचित जग सुंदर दिसेल, कधी कधी चुका करणारी, ठेचाळणारी, मग पुन्हा नव्याने रस्ता शोधणारी प्रेमळ माणसं दिसतील.. तुमच्या माझ्यासारखी..

(सानिया भालेराव यांच्या फेसबुक भिंतीवरून)

Updated : 20 Oct 2020 4:47 AM GMT
Next Story
Share it
Top