Home > मॅक्स ब्लॉग्ज > माणसांच्या बेसिकली तीन जाती...

माणसांच्या बेसिकली तीन जाती...

cast, religion, Constitution And citizenship analysis by Aanad Shitole

माणसांच्या बेसिकली तीन जाती...
X

एका टोकाला असलेले लोक ज्यांना धर्म-जात हे थोतांड वाटत आणि लोकांनी मुद्दलात देव धर्मच नाकारला पाहिजे. असं यांना वाटत. मात्र, हे अराजकवादी नसतात. तर देशातल्या कायदे-नियम-राज्यघटना ह्यांच्यावर ह्या जमातीचा विश्वास असतो. सगळ्यात अल्पसंख्य असलेली ही जमात. हे आक्रमक असले तरीही सगळेच डोक्याने विचार करत असल्याने सगळेच नेते असतात. ध्येय समान असले तरी मार्ग वेगवेगळे असल्याने कधीही संघटीत होत नाहीत ना कधी एकवाक्यता होते.

दुसऱ्या टोकाला असलेले लोक ज्यांना धर्म सर्वोच्च स्थानी आहे आणि मग देश-कायदे-राज्यघटना या किरकोळ गोष्टी येतात. असा ठाम समज आहे. हेही तसे अल्पसंख्य, मात्र, यांची आक्रमकता अंगावर येणारी असते. यांना सतत कुणीतरी नेता मसीहा देवदूत बोडक्यावर असायला लागतो. ज्याच्यापुढे मेंदू गहाण ठेवून अनुयायी बनण्यात धन्यता वाटणारी ही जात.

मधल्या मार्गावर असलेली जमात म्हणजे धार्मिक असलेली लोक ज्यांना आपापला धर्म आपापल्या घरात असावा आणि बाकी जगरहाटी देशाच्या कायदे नियम ह्यानुसार चालावी असं वाटतं. संख्येने बहुसंख्य असूनही आक्रमक नसणारा हा वर्ग. विखुरलेले, असंघटीत, आपण भले आपलं काम भलं असं वागणारे. ह्या वर्गातला मोठा भाग तात्पुरता का होईना सतत धर्म सर्वोच्च मानणाऱ्या वर्गाच्या कळपात जाण्याची भीती असते. या भितीला कारण असतं अज्ञान आणि भावनिक अस्मिताना गोंजारून कट्टरतेकडे नेणारी विचारसरणी. मात्र, ह्या वर्गाची समज आणि शहाणी यावर भारतातली मिश्र संस्कृती तगून आहे, टिकून आहे. कुठल्याही बाजूला टोकाची भूमिका, आक्रस्ताळेपणा, अतिआक्रमकता या वर्गाला झेपत नाही.

आपण नेमक्या कुठल्या वर्गात आहोत हे आपण ठरवायचं.

सध्या धर्म सर्वोच्च स्थानी आहे. असं समजणारी विचारधारा सत्तेवर आहे. अतिआक्रमकता हा गुणधर्म आहे. स्वाभाविकपणे आमचाच धर्म श्रेष्ठ आणि आपणच आपल्या धर्माचे एकमेव तारणहार इत्यादी अनेक गैरसमज अनुयायांच्या डोक्यात घुसवलेले आहेत त्याचे परिणाम आपण बघतो आहोतच.

लौकिक अर्थाने असलेले प्रमुख सहा धर्म, शेकडो जाती आणि तितक्याच बोलीभाषा, प्रांतवार-भाषावार असलेले सणवार ह्यांची ही बहुपेडी संस्कृती समूळ नष्ट करून तिच्यावर बुलडोझर फिरवून एकसाची, एकजिनसी ज्याला समरसता असं गोंडसं नाव दिलेलं आहे. अशी एकधर्मीय राजवट निर्माण करण्याच ध्येय असलेला आरएसएसचा अजेंडा सुस्पष्ट आहे.

लहानपणापासून संघ नेमका काय आहे? हे जवळून समजून घेता आल्याने पहिल्यापासून संघाच्या विरोधात मानसिकता तयार झालेली आहे. आपल्या विचारांच्या विरोधात असलेल्या माणसांच्या कपाळावर थेट देशद्रोही, नक्षलवादी, अतिरेकी असले शिक्के मारून संपूर्ण देशाची दोन भागात उभी विभागणी करणाऱ्या राजवटीच्या काळात कुठलाही माणूस तटस्थ असू शकत नाही.

जर तुम्हाला धर्माधारित राजवट मान्यच नसेल तरीही आणि तुम्हाला अतिरेकी धर्मवाद मान्य नसेल तरीही तुमचं किमान एका बाबीवर एकमत असू शकत. ते म्हणजे "तुम्ही धार्मिक असा अगर नसा,तुम्ही आस्तिक असा अगर नसा, आपला धर्म आपल्या घराच्या चार भिंतीत असावा आणि बाकी आपला व्यवहार आणि वागण देशाचे नियम-कायदे-राज्यघटनेनुसार घालून दिलेले मुलभूत अधिकार आणि कर्तव्य ह्यानुसार असावेत " अस ज्यांना वाटत त्यांना सध्याच्या काळात तटस्थ असून चालणारच नाही.

हे सगळ समजत असेल तर मग तुम्ही तुमचे मतभेद बाजूला ठेवून आधी हि मिश्र-बहुपेडी संस्कृती, जिच्या पाऊलखुणा काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यन्त सगळ्या ठिकाणी लखलखीत दिसतात, जिला गंगा-जमनी तहजीब म्हणतात तिला जिवंत ठेवायला उभ राहायला हवय. आता आपण ठरवायचं आपण नेमक्या कुठल्या बाजूला आहोत. मी कुठल्या बाजूला आहे हे मला पक्क माहित आहे त्यामुळे मी कधीही तटस्थ नव्हतो,नाही,नसेल आणि मी सतत संघाच्या विरोधात होतो, आहे आणि राहील. बाकी " संघाला समजून घेण्यासाठी आधी संघात येऊन बघा, शाखेत सहभागी व्हा" इत्यादी घासून गुळगुळीत झालेली कॉमेंट टाकण्याचा त्रास घेऊ नये.

राष्ट्रसेवादलात काम करत असताना लहानपणापासून संघ शाखा जवळून बघितलेली आहे आणि आपल्या देशासाठी धर्माधारित राजवट हीच मुद्दलात गंडलेली संकल्पना असल्याने शाखेत प्रत्यक्ष जाण्याची गरजही नाही. आपण #तटस्थ आहोत हा गैरसमज दूर व्हावा आणि आपलीच आपल्याला ओळख लागावी यासाठी हे दळण.

#आयडियाऑफइंडिया

Updated : 10 Oct 2020 6:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top