Home > मॅक्स ब्लॉग्ज > सनातनी ब्राह्मणी व्यवस्था नाकारणारा शाक्त राज्याभिषेक

सनातनी ब्राह्मणी व्यवस्था नाकारणारा शाक्त राज्याभिषेक

6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेला राज्याभिषेक कोणत्या प्रकारचा होता आणि त्या राज्याभिषेकाचे वैशिष्ट्ये काय होते? याचे विश्लेषण करणारा इतिहासाचे अभ्यासक डॉ. श्रीमंत कोकाटे यांचा लेख शिवराज्याभिषेक दिनानिमीत्त पुनः प्रकाशित करीत आहोत.

सनातनी ब्राह्मणी व्यवस्था नाकारणारा शाक्त राज्याभिषेक
X

छत्रपती शिवाजीराजे यांच्या जीवनामध्ये सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवावा, असा शाक्त राज्याभिषेक आहे. छत्रपती शिवाजीराजांनी राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा ब्राह्मणमंत्र्यांनी राज्याभिषेकाला विरोध केला. तो विरोध डावलून शिवाजीराजानी ६ जून १६७४ रोजी गागाभट्टांच्या पौरोहित्याखाली राज्याभिषेक केला. हा पहिला आणि वैदिकब्राह्मणी पद्धतीने केलेला राज्याभिषेक होता.

पहिला राज्याभिषेक म्हणजे धर्माच्या नावाखाली ब्राह्मणीधर्माने शिवरायांचा केलेला छळ होता, हे महाविद्वान आणि संस्कृत पंडित शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे यांच्या लक्षात आले. हा अपमान पुसून टाकण्यासाठी संभाजीराजांनी शिवरायांना दूसरा राज्याभिषेक करण्याचा सल्ला दिला. संभाजीराजे संस्कृतपंडित आणि अब्राह्मणी विचाराचे असल्यामुळे ब्राह्मणी षडयंत्र ओळखू शकले.

छत्रपती संभाजीराजे यांच्या सल्ल्यावरून शिवरायांनी दुसरा राज्याभिषेक २४ सप्टेंबर १६७४ रोजी शाक्त पद्धतीने स्त्रीप्राधान्य घटस्थापनादिनी निश्चलपुरी गोसावी यांच्या पौरोहित्याखाली केला. शाक्त ही परंपरा ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधातील परंपरा आहे. त्यांचे महत्त्वाचे तत्त्व म्हणजे शाक्‍त संस्कारसंपन्नै भेदाभेद न कारयेत(शाक्त व्यक्ती खाजगी आणि सार्वजनिक जीवनात कधीही भेदाभेद करत नसतात)

शिवरायांनी दुसरा राज्याभिषेक करून पहिला राज्याभिषेक नाकारला हे स्पष्ट होते, पहिला राज्याभिषेक नाकारला याचा अर्थ शिवाजीराजे- संभाजीराजे यांनी वैदिकब्राह्मणी धर्म नाकारला ही भारताच्या इतिहासातील धार्मिक क्षेत्रातील परिवर्तनवादी घटना आहे.

ज्याप्रमाणे महात्मा फुले यांनी सत्यधर्माची स्थापना करून ब्राह्मणीधर्म नाकारला. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी क्षात्र जगद्गुरू धर्मपिठाची स्थापना करून ब्राह्मणी धर्म नाकारला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धम्म स्वीकारून ब्राह्मणीधर्म नाकारला. या सर्व धार्मिक क्रांतीचा पाया सतराव्या शतकात छत्रपती शिवाजीराजांनी शाक्त राज्याभिषेक करून घातला.

शिवरायांचा दुसरा राज्याभिषेक अर्थात शाक्त राज्याभिषेक समतेकडे घेऊन जातो,ब्राह्मणीपरंपरा नाकारतो, वर्णाश्रमधर्म नाकारतो, महिलांचा सन्मान करतो, शूद्रातिशूद्रांना पोटाशी धरतो, म्हणून तो क्रांतिकारक आहे.

पहिल्या राज्याभिषेकाचे उदात्तीकरण ब्राह्मणीव्यवस्थेचा अनुनय करते, ब्राह्मणीव्यवस्थेशी हातमिळवणी करते.

छत्रपती शिवाजी राजांना ब्राह्मणीव्यवस्थेशी हात मिळवणी करायची नव्हती, हे त्यांनी प्रभावळीच्या सुभेदाराला आणि बंधू व्यंकोजीराजांना लिहिलेल्या पत्रातून स्पष्ट होते. शिवाजीराजे सुभेदाराला म्हणतात "ब्राह्मण म्हणून तुमचा मुलाहिजा बाळगला जाणार नाही" तर व्यंकोजीराजांना म्हणतात "ब्राह्मणांपासून सावधानता बाळगा".

वर्ग लढ्याबरोबरच सांस्कृतिक लढा महत्वाचा आहे हे ग्रामचीने ओळखले होते,ते भारतीय परिप्रेक्ष्यात ओळखणारे शरद पाटील होते,त्यामुळे ते इतिहासाची अब्राह्मणी बाजू मांडू शकले.

सत्य लपवता येते पण संपवता येत नाही,सत्य इतिहास असत्य इतिहासाबरोबर सावलीसारखा सोबत येत असतो,असे शरद पाटील म्हणत,त्यामुळेच ते दुसऱ्या राज्याभिषेकाचे कोड सोडवू शकले,जाणीवणेनिव अन्वेषी तर्कशास्त्र,बहुप्रवाही अन्वेषण पद्धत,अब्राह्मणी सौंदर्यशास्त्र आणि अपारंपारिक संस्कृतपंडित, सौत्रांतीकमार्क्सवादी असल्यामुळे ते ही उकल करू शकले.

छत्रपती शिवाजीराजांच्या दुसर्‍या राज्याभिषेकाच्या या निर्णयावरून शिवप्रेमींनी ठरवावे की कोणता अभिमान बाळगायचा पहिल्या ब्राह्मणी राज्याभिषेकाचा की दुसऱ्या शाक्त राज्याभिषेकाचा?

Updated : 6 Jun 2022 2:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top