Home > मॅक्स ब्लॉग्ज > भारत महासत्ता होणार कधी?

भारत महासत्ता होणार कधी?

भारत महासत्ता होणार, अशी स्वप्न इथले राजकारणी सतत दाखवत असतात. मात्र, भारत महासत्ता होण्यासाठी आपल्याला काय करायला हवं? महासत्ता होणं म्हणजे कोणकोणत्या क्षेत्रात आपल्या देशाचा विकास व्हायला हवा? एक नागरिक म्हणून राज्यकर्त्यांना आपण काय प्रश्न विचारायला हवेत? वाचा भारत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्ष साजरा करत असताना विनोद थोरात यांनी मांडलेले विचार...

भारत महासत्ता होणार कधी?
X

उद्या १५ ऑगस्ट रोजी भारताचा अमृतमहोत्सवी म्हणजेच ७५ वा स्वातंत्र्य दिन आहे. उद्या भारताला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे पूर्ण होतील. २०२० हे वर्ष भारताच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे होते. कारण बऱ्याच लोकांनी २०२० पर्यंत भारत एक जागतिक महासत्ता बनेल असे भाकीत केले होते. परंतु आज खरंच परिस्थिती तशी आहे का? भारत एक जागतिक महासत्ता बनली आहे का? या प्रश्नाचे उत्तर दुर्दैवाने नाही असेच द्यावे लागेल. भारत भविष्यात जागतिक महासत्ता कधी बनेल या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी भारताची सद्यस्थिती आणि भारतातील राजकारण यांचा उहापोह करणे गरजेचे ठरते.

भारताची सद्यस्थिती

१९४७ चा भारत आणि २०२१ चा भारत यामध्ये फारच मोठा फरक आहे. गेल्या ७४ वर्षात भारताने अनेक क्षेत्रात खूप मोठी प्रगती केली आहे. परंतु ही प्रगती अपेक्षेप्रमाणे आणि क्षमतेप्रमाणे झालेली नाही. आज देशाची एकूण लोकसंख्या १३५ कोटीच्या आसपास असताना त्यातील बहुसंख्य तरुण वर्ग आहे. मात्र, त्यांच्या क्षमतेचा पुरेपूर उपयोग या देशात केला जातो असे वाटत नाही. अनेक उच्चशिक्षित तरुणांचा कल परदेशी स्थायिक होण्यातच आहे. कारण भारतातील समस्यांची जंत्री फारच मोठी आहे.

रस्ते, वीज, पाणी, पर्यावरण, आरोग्य, शिक्षण यासारख्या मूलभूत क्षेत्रात भारत अजूनही खूप मागे आहे. भारतातील अनेक गावात आज जायला व्यवस्थित डांबरी रस्ता नाही. जे रस्ते आहेत त्यात खड्डेच जास्त आहेत. गावांमध्ये तसेच शहरांमध्ये देखील २४ तास वीज आणि पाणी देणे अजूनही शक्य झालेले नाही. शहरांची वाढ अतिशय अनिर्बंधपणे झालेली आहे. त्यामुळे शहरे बकाल झालेली आहेत. घनकचरा व्यवस्थापन प्रश्न खूप जटिल बनला आहे. १३५ कोटी लोकसंख्येच्या देशात हाताच्या बोटावर मोजण्याइतके नोबेल पारितोषिक विजेते आणि ऑलिम्पिक मेडल विजेते आहेत. याचे मूळ कारण आपल्या शिक्षण पद्धती मध्ये आहे.

अजूनही तळागाळातल्या गरीब लोकांपर्यंत शिक्षण पोहोचलेलं नाही. शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे शिक्षण खूप महाग झाले आहे. खूपच कमी लोक उच्च शिक्षणापर्यंत पोहोचू शकतात. आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीतही आनंदीआनंदच आहे. देशात अजूनही लहान मुले वेळेवर ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून मृत पावतात. याला काय म्हणावे. कुपोषणामुळे दरवर्षी दहा लाख बालके मृत्युमुखी पडतात. खाजगी संस्थांचा विकास व्हावा म्हणून सरकारी शिक्षण आणि आरोग्य व्यवस्थेचा मुद्दाम बळी देण्यात येत आहे.

अजूनही शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही म्हणून दरवर्षी लाखो शेतकरी आत्महत्या करतात. हवामानाचा अचूक अंदाज वर्तवणारी यंत्रणा अजूनही आपल्याला उभारता आलेली नाही. अनेक शहरे प्रदूषणाच्या आणि वाहतूक कोंडीच्या बाबतीत जगात पुढे आहेत. बहुतेक नद्यांची गटारगंगा झालेली आहे. आज देशात बेरोजगारीने उच्चांक गाठलेला आहे. वाढत्या बेरोजगारीमुळे आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. एकीकडे जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती भारतात असताना अजूनही भारतातील बहुसंख्य लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली आहे. या विरोधाभासाला जबाबदार कोण?

भारताचा समृद्ध वारसा

आपल्या भारताचा इतिहास खूप मोठा आहे. या भारतात अनेक महान व्यक्तींनी जन्म घेतलेला आहे. भारतात ज्याप्रमाणे गोपाळकृष्ण गोखले, दादाभाई नौरोजी, महात्मा गांधी यासारखे मावळ नेते होते, त्याचप्रमाणे लाला लाजपत राय, लोकमान्य टिळक यांसारखे जहाल नेते देखील होते. स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, योगी अरविंद यांसारखे अध्यात्मिक गुरु देखील होते.

महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज, विठ्ठल रामजी शिंदे, महर्षी कर्वे यांसारखे समाजसुधारक भारतातच होऊन गेले. स्वातंत्र्यवीर सावरकर, चंद्रशेखर आजाद, भगतसिंग यासारखे क्रांतिकारक होते जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, मौलाना आझाद, सुभाष चंद्र बोस यासारखे स्वातंत्र्यसेनानी होते. राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, सरोजिनी नायडू यासारख्या कर्तृत्ववान महिला देखील होत्या. एवढ्या साऱ्या महान व्यक्तींनी भारतात जन्म घेऊन देखील भारत सुधारला का नाही हे मला पडलेले कोडेच आहे. भारतीय समाज आणि व्यवस्था सुधारण्यासाठी आता कोणत्या अवताराने जन्म घ्यायला हवा?

गुलामगिरीची सवय सोडा

भारतात लोकशाहीची सुरुवात १९४७ नंतर झाली. त्याआधी दीडशे वर्ष इंग्रजांनी राज्य केले. त्या आधी सातशे वर्ष मुसलमानांनी राज्य केले आणि त्याआधी बाराशे वर्ष भारतात सातवाहन, राष्ट्रकूट, चालुक्य, वाकाटक यासारख्या विविध राज्य घराण्यांनी राज्य केले. त्यामुळे भारतीय समाजाला राजेशाही, घराणेशाही, गुलामगिरी यांची सवयच लागून गेली आहे आणि दोन हजार वर्षांची ही सवय सत्तर वर्षाच्या लोकशाहीमुळे संपेल असे मानणे चुकीचे आहे. भारत हा मुळात एकसंघ कधीच नव्हता. भारत 'भारत' झाला तो इंग्रज आल्यानंतर. त्याआधी तो छोट्या छोट्या राज्यांमध्ये अथवा संस्थानांमध्ये विभागलेला होता. इंग्रज आले नसते तर कदाचित आजचा भारत आपल्याला दिसला नसता.

युरोपातील छोट्या-छोट्या राष्ट्राप्रमाणे भारतातही अनेक छोटी-छोटी राष्ट्रे असती. स्वातंत्र्य लढ्यामुळे भारतीयांमध्ये एकात्मतेची भावना निर्माण झाली आणि त्यानंतर भारतीय संघराज्य उदयास आले. पण संस्थानिक जाऊन नंतर राजकीय संस्थाने भारतात अनेक ठिकाणी उदयास आली आहेत. खूप वेळा लोक या राजकारणातील घराणेशाहीला नावे ठेवतात. पण निवडणुकीमध्ये त्याच घराण्यातील वारसाला निवडून देतात. राजकारणी काही आकाशातून येत नाही. ते लोकांमुळेच उदयास येतात. कोणाला निवडून द्यायचे हे सर्वस्वी लोकांच्या हातात आहे. परंतु आज पैसा हे निवडणूक जिंकण्याचे एकमेव साधन बनले आहे.

एखादा सामान्य माणूस आज निवडणूक लढवण्याचा विचार देखील करू शकत नाही. आज प्रत्येक कार्यकर्त्याने आपापले साहेब, दादा, भाऊ ठरवून घेतले आहेत. ते म्हणतील तेच खरं. मग त्यांच्यासाठी कार्यकर्ते एकमेकांची डोकी फोडायला देखील तयार आहेत. पण आज एकमेकांना शिव्या घालणारे हेच साहेब, दादा, भाऊ उद्या राजकीय अपरिहार्यतेच कारण सांगून विरोधकांच्या मांडीला मांडी लावून बसतात तेव्हा कार्यकर्त्यांना हसावं की रडावे तेच कळत नाही. त्यामुळे अशा स्वार्थी राजकारण्यांची गुलामगिरी करणे सोडा आणि स्वतंत्र विचार करायला शिका.

प्रश्न विचारा

भारतीय समाजात प्रश्न विचारणे म्हणजे काहीतरी पाप आहे. अशीच लोकांची समजूत आहे. लहानपणी आई-बाबांना प्रश्न विचारायचे नाही, शाळेत गेल्यावर शिक्षकांना प्रश्न विचारायचे नाहीत, नोकरी लागल्यावर मालकाला प्रश्न विचारायचे नाहीत हे जणू ठरलेलेच आहे. तीच सवय मतदारांना देखील लागलेली आहे. आपण मत दिलेला नेता निवडून आला तर त्याला पाच वर्ष काहीही प्रश्न विचारायचे नाहीत हे लोकांनी ठरवूनच घेतले आहे.

उलटपक्षी त्याला मत दिलेल्या लोकांवरच त्याला प्रश्न विचारण्याची जास्त जबाबदारी आहे. कारण तुम्ही टाकलेला विश्वास त्याने सार्थ ठरवायला हवा. तुमच्या घरा पुढे रस्ता नीट नसेल, त्यात खूप खड्डे असतील तुम्हाला पाणी व्यवस्थित मिळत नसेल, वीज व्यवस्थित मिळत नसेल, तुमच्या मुलांना शिक्षण नीट मिळत नसेल, आरोग्य व्यवस्था योग्य त्या खर्चात मिळत नसेल तर तुम्ही नेत्यांना प्रश्न विचारायला हवेत. मग तो कोणत्याही पक्षाचा असू दे.

भारतात आज जी स्थिती आहे. त्याला केवळ सत्ताधारीच जबाबदार आहेत असे नाही. विरोधी पक्ष आणि जनता देखील तेवढीच जबाबदार आहे. कारण त्यांनी सत्ताधाऱ्यांना योग्य वेळी योग्य प्रश्न विचारले नाहीत. अनेकदा लोक म्हणतात मी एकट्याने प्रश्न विचारून काय उपयोग. एकाने प्रश्न विचारून कदाचित उपयोग होणार नाही परंतु हजारो-लाखो लोक जेव्हा तेच प्रश्न विचारू लागतील तेव्हा सत्ताधार्यांगना बदलणे भाग आहे. समूहाची ताकद खूप मोठी असते. फक्त त्या ताकतीचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी करायला हवा की अधोगती साठी याचा विचार समाजानेच करायचा आहे.

ज्यावेळी तुमच्या घरासमोरील रस्त्याच्या खड्ड्यात पावसाळी पाण्यामुळे तुमच्या घरातील एखादा सदस्य पडून मृत्युमुखी पडतो अथवा त्याला गंभीर इजा होते त्यावेळी तुम्ही कोणत्या पक्षाचे समर्थक आहात याला काहीच अर्थ उरत नाही. त्यामुळे तुम्ही कोणत्याही विचारसरणीचे असू द्या, राजकारण्यांना प्रश्न विचारा. हीच लोकशाहीने तुम्हाला दिलेली सगळ्यात मोठी ताकद आहे. तिचा योग्य उपयोग करायला शिका.

तुमची जबाबदारी ओळखा

आपल्याला सरकार कडून काय पाहिजे हे तुम्हाला पक्क माहीत असले पाहिजे. माझ्या घरा पुढे चांगला रस्ता नसला तरी चालेल, मला कमी दरात वीज आणि शुध्द पाणी मिळाले नाही तरी चालेल, शिक्षण आणि आरोग्यसेवा कमी खर्चात मिळाली नाही तरी चालेल, पण देशात मोठ्या प्रमाणात पुतळे, मंदिर, मस्जिद, चर्च उभारले पाहिजे असे जर तुमची मानसिकता असेल, तर देश पुढच्या शंभर वर्ष देखील महासत्ता होऊ शकत नाही. भारताला महासत्ता करण्याची जबाबदारी कोणत्याही अवताराची नाहीये, ती जबाबदारी सर्व समाजाची आहे.

त्यासाठी फार काही वेगळे करण्याची गरज नाही. तुम्ही सार्वजनिक स्वच्छतेचे आणि वाहतुकीचे नियम पाळा. वेळेवर टॅक्स भरा, समाजाच्या प्रश्नांचसाठी आवाज उठवा, समाजातील प्रत्येक व्यक्तीचा आदर करा एवढेच पुरेसे आहे. आज देशात धार्मिक उन्माद मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.

त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला त्याचा धर्म, जात, वर्ण, भाषा, प्रांत पाहून चुकीची वागणूक देऊ नका. बिकाऊ मीडिया मुळे लोकशाहीचा ऱ्हास होतो आहे. मिडीयाला सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांपेक्षा सेलिब्रिटींची लफडी दाखवण्यात आणि धर्मावर काहीतरी चर्चा करण्यातच जास्त रस आहे. अशावेळी लोकशाही टिकवायची जबाबदारी समाजातील सर्व लोकांवर आहे. शेवटी 'People get the government they deserve' आता तुम्हाला धार्मिक, जातीय, प्रांतिक, भाषिक आधारावर समाजात तेढ निर्माण करणारे राजकारणी हवे की लोकांच्या मूलभूत समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारे राजकारणी हवे हे सर्वस्वी तुमच्यावरच अवलंबून आहे.

जय हिंद !!

विनोद थोरात
जुन्नर, पुणे
मोबाईल ७५१७९२३२९२

Updated : 14 Aug 2021 10:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top