Home > मॅक्स ब्लॉग्ज > भगवदगीता सक्तीबाबत काही प्रश्नः हेरंब कुलकर्णी

भगवदगीता सक्तीबाबत काही प्रश्नः हेरंब कुलकर्णी

महाराष्ट्रात शाळांमध्ये भगवदगीता सक्तीची करावी या आमदार लोढा यांच्या मागणीला वर्षा गायकवाड यांनी नकार देऊन जो ठामपणा दाखवला आहे तो महत्वाचा आहे.. यासंदर्भात काल मॅक्समहाराष्ट्राने जी महत्वाची चर्चा आयोजित केली त्यात मी खालील प्रश्न विचारले

भगवदगीता सक्तीबाबत काही प्रश्नः हेरंब कुलकर्णी
X

महाराष्ट्रात शाळांमध्ये भगवदगीता सक्तीची करावी या आमदार लोढा यांच्या मागणीला वर्षा गायकवाड यांनी नकार देऊन जो ठामपणा दाखवला आहे तो महत्वाचा आहे.. यासंदर्भात काल मॅक्समहाराष्ट्राने जी महत्वाची चर्चा आयोजित केली त्यात मी खालील प्रश्न विचारले

१) भगवदगीता हा ग्रंथ कठीण आहे म्हणून ज्ञानेश्वरांनी गीता प्राकृत भाषेत आणली व विनोबा भावे यांनी अधिक सोपी करून गीताई नावाने मराठीत आणली. ज्ञानेश्वरी आणि गीताई यांनी जर भगवदगीतेचे अतिशय सोपे अनुवाद केले असतील तर मग ज्ञानेश्वरी व गीताई सक्तीची करा अशी मागणी भाजपा का करत नाही ? ज्ञानेश्वर संपूर्ण विश्वात्मक भूमिका मांडतात. विनोबा जय जगत म्हणतात म्हणून ते संकुचित राजकारणासाठी गैरसोयीचे आहेत का....?

२) १९९८ पासून भारतीय जनता पक्षाचे सरकार जवळपास १४ वर्ष सत्तेत आहे. हा निर्णय देशपातळीवर का घेतला नाही ? ईशान्य भारत दक्षिण भारतासह देशातील सर्वच विद्यार्थ्यांना भगवद्गीता का शिकवायची नाही ? महाराष्ट्रातच आग्रह का ?

३) मागील वर्षी यात सरकारने नवीन शैक्षणिक धोरण आणले त्या धोरणात ही सक्ती सहज घालता आली असती.. देशाच्या शिक्षण धोरणात संशोधनावर भर द्यायचा, आणि दुसरीकडे अशी भाषा बोलायची.. तो विषय तापत राहिला पाहीजे हा काय प्रकार आहे ?

४) गीता विद्यार्थ्यांनी शिकायला हवी तर मग कुराण बायबल धम्मपद सक्तीचे का नसावे ? याचे उत्तर दिले पाहिजे. हिजाबमुळे शिक्षणात धर्म येतो,त्यामुळे हिजाबबंदीचे भाजप स्वागत करत असेल तर मग धार्मिक ग्रंथ शिक्षणात आणल्याने शिक्षणात धर्म येत नाही का....?

५)प्रत्येक इयत्तेच्या मराठीच्या पुस्तकात संत साहित्यातील अभंग आपण लहानपणापासून सगळेच शिकतो आहोत. संतांच्या बोधकथा या अभ्यासक्रमात नेहमीच असतात. शाळांमध्ये दिंडी, पालखी, गणेशोत्सवापासून सगळे सुरू आहे असे असताना सक्तीची मागणी करून जणू शिक्षणात हिंदू धर्माला अजिबात स्थान दिले जात नाही असे आकांडतांडव करण्यामागचा हेतू उघड करून दाखवायला हवा...

६) मात्र हा हेतू उघड करून दाखवताना भगवद्गीतेवर टीका करण्याची अजिबात गरज नाही. भगवद्गीता शाळांमध्ये उपयुक्त आहे की नाही हा मुद्दाच चर्चेला घेता कामा नये.. फक्त भाजपाचे राजकारण उघड करायला हवे. याचे कारण ही अशी मागणी ही गुगली असते.. नकळत पुरोगामी कार्यकर्ते भगवद्गीतेची चिकित्सा सुरू करतात व सर्व सामान्य माणसांपासून पुरोगामी कार्यकर्त्यांना, राजकीय पक्षांपासून तोडण्यासाठीचा त्यांचा हेतू आपोआप साध्य होतो.... बघा हे कसे धर्मविरोधी आहेत हिंदू विरोधी आहेत हे ओरडायला मोकळे.. त्यामुळे इथून पुढे जाणीवपूर्वक चिकित्सा वेगळ्या व्यासपीठावर करावी व अशा धार्मिक मागण्यातील यांचा दांभिकपणा उघड करण्यावर भर द्यायला हवा..

जे कृष्णमूर्ती असे म्हणायचे की शिक्षणाने विद्यार्थ्यांचे धार्मिक मन(religious mind) तयार झाले पाहिजे.. धार्मिक मन याचा अर्थ धर्मग्रंथ वाचणारे मन नव्हे तर धर्माने जी उदात्त मूल्य सांगितली त्या मूल्यांच्या आधारे संवेदनशील मनाचे विद्यार्थी घडवणे हे शिक्षणाचे ध्येय आहे धर्मग्रंथ वाचणे हे नव्हे...


Updated : 24 March 2022 12:24 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top