Home > मॅक्स ब्लॉग्ज > लाल कृष्ण अडवाणी यांची रथयात्रा आठवते ? - केमिल पारखे

लाल कृष्ण अडवाणी यांची रथयात्रा आठवते ? - केमिल पारखे

सध्या देशात राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे. अशाच प्रकारची साधर्म्य असणारी यात्रा ऐंशीच्या दशकात निघाली होती. लालृष्ण अडवाणी यांची रथयात्रा! या दोन्ही यात्रांमध्ये महत्वाचा फरक काय असेल तर माध्यमांनी दिलेलं कव्हरेज... त्यावेळी मोकळीक असल्याने रथयात्रा घराघरात पोहोचली मात्र भारत जोडोला माध्यमांनी जणू वाळीत टाकल्याची परिस्थिती आहे हे असं का जाणून घेण्यासाठी वाचा केमिल पारखे यांचा हा लेख!

लाल कृष्ण अडवाणी यांची  रथयात्रा आठवते ? -  केमिल पारखे
X

काही घटना, काही प्रसंग काळजात एकदम धडकी निर्माण करतात.

एकेकाळी साध्वी ऋतंबरा आणि साध्वी उमा भारती ही दोन नावं त्यांच्या भाषणांसाठी खूप गाजत असत. काळ ऐंशीच्या दशकाचा शेवट. भारतीय जनता पक्षानं त्यावेळी अयोध्यातल्या बाबरी मशिदचा प्रश्न आणि तिथं राम मंदिर उभारण्याचा विषय लावून धरला होता. साध्वी ऋतंबरांची हिंदीतली भाषणं देशात ठिकठिकाणी आवश्यक ती वातावरण निर्मिती करण्यासाठी आयोजित केली जात होती. काही ठिकाणी त्यांच्या भाषणाच्या कॅसेट्स जमलेल्या लोकांसमोर ऐकवल्या जात असत.

साध्वी ऋतंबरा यांचं असंच एक भाषण मी ऎकलं. कुठं ते आता नक्की आठवत नाही, पण या साध्वी खुर्चीवर बसून भाषण देत होत्या हे नक्की आठवतं.

त्या उत्कृष्ट वक्त्या होत्या याबाबत वादच नव्हता. साध्वी जे काही बोलायच्या ते समोरच्या लोकांच्या , त्यांच्या चाहत्या लोकांच्या मनाला भिडायचे. मात्र त्यांच्या भाषणातला बराचसा अंश हा अल्पसंख्य लोकांविरुद्ध असायचा आणि ही भाषण त्यांच्या मनात धडकी, भीती आणि असुरक्षितता निर्माण करील असंच होती.

भारतीय जनता पक्षाचे तेव्हाचे सरचिटणिस असलेले प्रमोद महाजन यांनी अडवाणी यांच्या या `रथयात्रे'चे सारथ्य केले होते. (वरच्या फोटोत काळ्या गॉगलवाले). त्या काळात म्हणजे सद्याचं हे नव राजकीय युग सुरु होण्याआधी काँग्रेस आणि हो, भारतीय जनता पक्षातसुद्धा, सरचिटणिस हे एक अत्यंत महत्त्वाचे, प्रतिष्ठेचं पद असायचे. या दोन्ही पक्षांत दहाबारा सरचिटणीस असायचे, त्यामध्ये संघटन सरचिटणीस अशी काही पदे अति महत्त्वाची असायची.

राष्ट्रीय पक्षांच्या विविध सरचिटणिसांच्या मुलाखती प्रसिद्ध व्हायच्या, पक्षाचे हे सरचिटणीस आणि प्रभारी आपापल्या पक्षांच्या भूमिका मांडत असत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून नरेंद्र मोदी यांची भारतीय जनता पक्षात पहिल्यांदा प्रतिनियुक्ती झाली तेव्हा त्यांनाही असंच एक पद देण्यात आलं होतं.

आता काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांतील एखाद्या सरचिटणीसाचं साधं नाव आठवतं का पहा...!! असो.

कॅथोलिक धर्माचे सर्वोच्च धर्मगुरु पोप हे व्हॅटिकन सिटीतल्या सेंट पिटर्स स्केअरमध्ये जमलेल्या भाविकांना आशीर्वाद देण्यासाठी एका खास डिझाईन केलेल्या उघड्या वाहनातून फिरत असतात. अशाच एका प्रसंगी पोप जॉन पॉल यांच्यावर १९८१ साली गोळ्या झाडल्या गेल्या, तेव्हापासून `पोपमोबाईल' नावाने ओळखले जाणारे वाहन बुलेटप्रुफ पोप यांच्यासाठी वापरण्यात जातं.

या जीवघेण्या हल्ल्यातून वाचलेले पोप जॉन पॉल १९८६ साली भारत भेटीवर आले तेव्हा गोव्यात मिरामार समुद्रकिनारी कंपाल ग्राउंडवर `पोपमोबाईल'मधून फिरताना त्यांना मी अगदी जवळून पाहिलं तेव्हा मी इंग्रजी दैनिक `द नवहिंद टाइम्स'चा क्राईम आणि कोर्ट रिपोर्टर होतो. बारा दिवसांच्या पोप यांच्या या भारत दौऱ्यात कार्यक्रमानुसार दोन `पोपमोबाईल' देशात तैनात ठेवण्यात आल्या होत्या.

त्यानंतर शाह रुख खान वगैरे बॉलीवूड नट आपल्यासाठी विविध सुविधा असणाऱ्या अशी खास डिझाईन केलेली वाहने आऊटडोअर शूटिंग दरम्यान वापरू लागले.

तर अशाच धर्तीवर लाल कृष्ण अडवाणी यांच्या या रथयात्रेसाठी खास `रथा'ची निर्मिती करण्यात आली होती. अशा प्रकारचं खास डिझाईन केलेलं हे तसं भारतीय लोकांसमोर मोठ्या प्रमाणात येणारं भारतातल हे पहिलं वाहन. त्यामुळे या रथात काय सुविधा आहेत याविषयी अनेक राष्ट्रीय आणि राज्य प्रादेशिक थरावरच्या दैनिकांत रसभरीत वर्णनं छापून येत होती. `टिआरपी' हा शब्द त्यावेळी रुढ झालेला नव्हता पण दृश्यं आणि छापील प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी या `रथयात्रे'ला खूप प्रसिद्धी देत होती.

अनेक दैनिकांनी ही रथ यात्रा कव्हर करण्यासाठी आपले वार्ताहर नेमले होते.

पुण्यात ही रथ यात्रा आली तेव्हा अडवाणी यांची शनिवारवाडयासमोर जाहीर सभा झाली, त्यावेळी मी तिथं हजर होतो. अडवाणी यांचं भाषणसुद्धा असंच काहींच्या अंगांवर रोमांच निर्माण करणारं आणि काहींच्या काळजांत धडकी निर्माण करणारं होतं.

ही रथ यात्रा गायपट्ट्यात पोहोचली तेव्हा तेथील काही समाजघटकांच्या मनात प्रचंड भीती, असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती तर त्याचवेळी देशभर दुसऱ्या बाजूनं प्रचंड उन्माद तयार होत होता.

आता पुढे काय होणार, रथ यात्रा आपल्या इच्छित स्थळी पोहोचणार काय आणि तिथं काय होणार असा प्रश्न सर्वांच्या मनात होता.

त्यावेळी उत्तर प्रदेशात नुकतेच दिवंगत झालेले मुलायम सिंग यादव मुख्यमंत्री होते तर त्यांचे समाजवादी साथी लालू प्रसाद यादव बिहारमध्ये मुख्यमंत्री होते.

ही रथ यात्रा उत्तर प्रदेशात प्रवेश करण्याआधी बिहारच्या सीमेवर असतानाच लालुजींनी या रथाची चाके थांबवली.

मुलायम सिंग यादव यांनीं याबद्दल लालू प्रसाद यादव यांना शेवटपर्यंत माफ केलेलं नसावं.

या रथ यात्रेची पुढे झालेली फलश्रुतीसुद्धा सर्वांना माहिती आहेच.

या रथ यात्रेत काय पेरलं गेलं होतं हे सांगायची आता गरज नाही.

त्याकाळी पेरलेलं आता देशात ठिकठिकाणी उगवलेलं आणि त्या रोपां-झाडांना बरीच फळंसुद्धा लगडलेली दिसतात.


त्यानंतर अनेक वर्षांनंतर आता राहुल गांधी यांची देशपातळीवरची `भारत जोडो' यात्रा चालू आहे.

राहुल गांधी यांच्या `भारत जोडो' कार्यक्रमाने सत्ताधारी पक्षाच्या तंबूत धडकी भरवली आहे, तसेच देशभर विविध राजकीय पक्षांच्या लोकांना, समर्थकांना राहुलने आकर्षित केले आहे. त्यामुळे `भारत जोडो' यात्रेकडं सरळसरळ दुर्लक्ष करायचं असा फतवा देशभरातील इंग्रजी, मराठी आणि इतर भाषांतील दैनिकांच्या आणि वाहिन्यांच्या मालकांनीं काढलेला दिसतो !

अडवाणी यांची `रथ यात्रा' आणि राहुल गांधी यांची `भारत जोडो' यात्रा या दोन्हींमध्ये अनेक दृष्टींनीं आणि अनेक बाबतींत जमीन अस्मानाचा फरक आहे हे स्पष्ट जाणवतं.

कदाचित `भारत जोडो' या यात्रेची देशासाठी फळंही वेगळी, मधुर असणार आहेत.

केमिल पारखे

लेखक

Updated : 22 Oct 2022 5:03 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top