Home > मॅक्स ब्लॉग्ज > Political Game : स्वर्गीय राजीव सातव यांना हा प्रवेश पाहून काय वाटले असेल ?

Political Game : स्वर्गीय राजीव सातव यांना हा प्रवेश पाहून काय वाटले असेल ?

ज्या भाजप कार्यकर्त्यांनी राजीव सातव यांच्यावर हल्ला केला, त्याच भाजपमध्ये आज त्यांची पत्नी प्रवेश करत आहे, ही राजकारणातील विडंबनात्मक बाब आहे. - भागवत जुंबड

Political Game : स्वर्गीय राजीव सातव यांना हा प्रवेश पाहून काय वाटले असेल ?
X

विधान परिषदेतही विरोधी पक्षनेते पद Leader of the Opposition राहू नये, यासाठी भारतीय जनता पक्षाने Bharatiya Janata Party जाणीवपूर्वक आणि योजनाबद्ध राजकीय खेळी political game खेळली आहे. विधान परिषदेत काँग्रेसचा आठवा आमदार असलेल्या, स्वर्गीय राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना आमदारकीचा राजीनामा द्यायला लावून थेट भाजपमध्ये प्रवेश करून घेण्यात आला.

विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पद मिळण्यासाठी एकूण संख्येच्या १० टक्के म्हणजेच ७८ पैकी किमान ८ आमदारांची आवश्यकता असते. भाजपने काँग्रेसचा एक आमदार कमी करून ही संख्या मुद्दाम खालच्या पातळीवर आणली, जेणेकरून विधान परिषदेतही विरोधी पक्षनेते नेमले जाऊ नयेत. हा प्रकार पाहता आपण नेमकी कोणत्या प्रकारच्या ‘सशक्त लोकशाही’कडे वाटचाल करतो आहोत, हा प्रश्न उपस्थित होतो.

प्रज्ञा सातव यांचे स्वतःचे कोणतेही ठोस राजकीय योगदान किंवा जनाधार नसताना केवळ त्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय राजीव सातव यांच्या पत्नी असल्यामुळे काँग्रेसने त्यांना दोन वेळा विधान परिषदेत पाठवले. मात्र आज त्या थेट भाजपमध्ये प्रवेश करत आहेत, ही बाब काँग्रेससाठीही आत्मपरीक्षणाची आहे.

राजीव सातव गुजरातचे प्रभारी असताना, भाजप कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर हल्ला झाला होता. त्या परिस्थितीतही राजीव सातव यांनी अत्यंत ठामपणे काँग्रेसच्या बाजूने लढा दिला आणि गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला एका मोठ्या संख्येपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ज्या भाजप कार्यकर्त्यांनी राजीव सातव यांच्यावर हल्ला केला, त्याच भाजपमध्ये आज त्यांची पत्नी प्रवेश करत आहे, ही राजकारणातील विडंबनात्मक बाब आहे.

आज महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेते नसण्याची स्थिती निर्माण झाली आहे. विधानसभेत कोणत्याही पक्षाकडे आवश्यक ते संख्याबळ नाही आणि विधान परिषदेत भाजपने संख्याबळ कृत्रिमरीत्या कमी करून ही जागा रिकामी ठेवली आहे. हीच का सशक्त लोकशाही? विरोधी पक्षाचा आवाज दाबून, संसदीय परंपरा मोडीत काढून, सत्तेचा गैरवापर करून उभा केलेला हा राजकीय डाव लोकशाहीसाठी घातक नाही का, याचा गंभीर विचार होणे गरजेचे आहे.

भागवत जुंबड

(राजकीय विश्लेषक)


Updated : 18 Dec 2025 4:48 PM IST
author-thhumb

भागवत जुंबड

राजकीय विश्लेषक


Next Story
Share it
Top